२१ फेब्रु, २०११

पेन ड्राईव्हमधील तिजोरी

पेन ड्राईव्ह उर्फ युएसबी ड्राईव्ह उर्फ युएसबी स्टीक या सदर्भातला हा लेख आहे हे शीर्षकावरून तुमच्या लक्षात आलेलं आहे. जे तुमच्या लक्षात आलय ते अगदी बरोबर आहे. पेन ड्राईव्हच्या संदर्भातलाच हा लेख आहे. ज्या शीर्षकावरून तुम्ही हे ताडलत त्यातले पेन ड्राईव्ह हे शब्द तुम्हाला दिसले आणि तुम्ही तुमचा अंदाज बांधलात. तुमचा तो अंदाज बरोबर जरी असला तरी तो अर्धा अंदाज आहे. कारण शीर्षकात पुढे 'तिजोरी' हा शब्द आहे. पेन ड्राईव्हमधील तिजोरी म्हणजे नेमकं काय याचा अंदाज तुम्हाला आलेला नाही. तो यावा यासाठी मी एक साधं रोजच्या जीवनातलं उदाहरण घेतो.

कल्पना करा, आपण घरातून बाहेर जायला निघालेलो आहोत. घराला कुलूपही लावून झालेलं आहे. आता त्या कुलूपाची चावी आपण आपल्या विश्वासू शेजार्‍यांकडे देतो, आणि निश्चिंत मनाने बाहेर पडतो. शेजार्‍यावर आपला विश्वास असतो. पण एक लक्षात घ्यायला हवं की शेजार्‍यावर कितीही विश्वास असला तरी आपल्या कपाटातील तिजोरीची चावी आपण शेजार्‍याला देत नाही. आपल्या तिजोरीत नेमकं काय ठेवलय याची माहितीही, शेजारी कितीही विश्वासू असला तरी, आपण त्याला देत नसतो. हे सगळं स्वाभाविक असतं. मुख्य दरवाजाची चावी लावून शेजारी आपलं घर उघडू शकतो याची कल्पना आपल्याला असते. आपल्या अनुपस्थितीत त्याने तशा पद्धतीने घर उघडलं तरी आपली त्याला तशी हरकत नसते. पण आपल्या घराची तिजोरी आणि त्यातल्या चीजवस्तू ही आपली खाजगी आणि अतिशय गुप्त अशी बाब असते. ती चावी आपण कुणालाच देत नसतो.

रोजच्या जीवनातलं हे उदाहरण बाजूला ठेवून आपण आपल्या पेन ड्राईव्हकडे वळू. पेन ड्राईव्ह म्हणजे काय हे 'एंटर' च्या वाचकांना समजावून सांगण्याची आवश्यकता नाही. ह्याच सदरात आपण 'ज्याची त्याची मास्टर की' नावाचा लेख वाचला होता. त्यात मी पेन ड्राईव्हचा वापर किती सोपा झाला आहे, किती परवडण्याजोगा आहे आणि प्रत्येकाला तो किती आवश्यक झाला आहे हे लिहीलं होतं. त्यामुळे तो भाग टाळून आपण आपल्या पेन ड्राईव्हकडे वळू. पेन ड्राईव्ह आणि आपलं घर याची तुलना करून पहा. पेन ड्राईव्ह हा सुद्धा आपल्या घरासारखाच असतो. पूर्णतः आपला स्वतःचा, स्वतःपुरता आणि ज्याच्यात आपल्याला पूर्ण प्रायव्हसी अपेक्षित असते अशी ती जागा (स्पेस) असते. घरातही स्पेस असते, आणि पेन ड्राईव्हमध्येही स्पेस असते. घरात आपलं चालतं. पेन ड्राईव्हमध्ये काय ठेवायचं, काय काढायचं याबद्दलही आपलं चालत असतं. ह्या निकषांवर आपलं घर आणि आपला पेन ड्राईव्ह यांच्यात चांगलच साम्य आहे.

आपल्या पेन ड्राईव्हमध्ये कशाकशाचा म्हणून भरणा नसतो? मित्र-मैत्रिणीच्या पर्सनल फोटोंपासून ते आपल्या वेगवेगळ्या पासवर्डपर्यंत आपण त्यात भरलेलं असतं. आपल्या आठ, दहा ईमेलचे पत्ते, आपल्या दोन चार क्रेडिट कार्डांचे एटीएम पिन नंबर्स, बॅंकेच्या लॉगिनचा तपशील, हिशोब, महत्वाची पत्रे वगैरे वगैरे सगळा जोखमीचा डेटा आपल्या पेन ड्राईव्हमध्ये साठवून ठेवणारी मंडळी मला माहीत आहेत. काही जण तर आपली रोजनिशी लिहून ती पेन ड्राईव्हमधल्या डायरी नावाच्या फोल्डरमध्ये दैनंदिन स्तरावर साठवत असतात. हा सारा डेटा दुसर्‍या कोणाच्याही हातात पडू नये असं आपल्याला वाटणं हे अगदी स्वाभाविक असतं. अतिशय खाजगी आणि अतिशय व्यक्तीगत असा तो माहिती-ऐवज असतो. असं असताना अचानक आपला पेन ड्राईव्ह दुसर्‍या कोणाच्या तरी हातात देण्याची वेळ आपल्यावर कधी तरी येते. अशा वेळी आपली गडबड उडते. पेन ड्राईव्हमध्ये तो व्यक्तीगत डेटा असतो. दुसर्‍याच्या हातात तो द्यावा, तर आपल्याला अडचणीचं वाटत असतं. वेळ तर आणीबाणीची असते. घाईचीही असते. वेळ नसतो. मग अशा वेळी आपण मधला मार्ग शोधतो. आपला पेन ड्राईव्ह आपण दुसर्‍याच्या हातात देण्यापूर्वी त्यातला तो व्यक्तीगत डेटा प्रथम डिलीट करतो. डिलीट झाल्याची खात्री करतो, मग निर्धास्त मनाने पेन ड्राईव्ह आपल्या मित्राच्या, नातेवाईकाच्या, किंवा सहकार्‍याच्या किंवा बॉसच्या हातात देतो. साधारणतः हीच मंडळी अशी असतात की ज्यांच्या आग्रहाला बळी पडण्यावाचून आपल्याला गत्यंतर नसतं.

आता पहा, आपलं घर आणि आपला पेन ड्राईव्ह याच्यातला फरक. आपल्या घराची चावी शेजार्‍याकडे ठेवताना आपण निर्धास्त असतो. कारण आपल्याला माहीत असतं की शेजार्‍याने घर उघडलं तरी त्याला आपली तिजोरी उघडता येणार नाहीये. त्या तिजोरीत काय आहे हे त्याला कधीच समजणार नाहीये. पण पेन ड्राईव्हमध्ये तशी तिजोरी कुठे असते? सगळच उघडं असतं. ज्याच्या हातात पेन ड्राईव्ह असतो तो त्यातलं काहीही पाहू शकतो. अशा परिस्थितीत काय करायचं? किती वेळा आपला व्यक्तीगत डेटा त्यात कॉपी करायचा, किती वेळा डिलीट करायचा? ह्या परिस्थितीवर काही उपाय नाही का? घरात जशी बंद तिजोरी असते, तशी काहीतरी पण पूर्णतः खात्रीची सोय आपल्या पेन ड्राईव्हमध्ये करता येणार नाही का?

मंडळी, घरातल्या तिजारीइतकीच किंबहुना त्यापेक्षा उत्तम सोय आपल्याला आपल्या पेन ड्राईव्हमध्ये करता येते. आपला व्यक्तीगत डेटा त्यात ठेवून आपण आपला पेन ड्राईव्ह निर्धास्तपणे कुणाच्याही हातात देऊ शकतो. आपला पेन ड्राईव्ह त्याने ' कोना कोना छान मारून ' पाहिला तरी आपल्या तिजोरीत काय आहे हे त्याला दिसूही शकत नाही, आणि कळूही शकत नाही. खरं तर आपली ती तिजोरीच मूळात अदृश्य असते. जर तिजोरीच दिसत नसेल तर त्यात आत काय आहे हे कळण्याची कसलीही सुतराम शक्यता मूळातच नाही. अगदी एखादा काँप्युटर एक्सपर्ट जरी येऊन बसला किंवा एखाद्या हॅकरच्या हातात तुमचा पेन ड्राईव्ह सापडला तरी त्यालाही दुसरा जन्म घेतल्याशिवाय ती तिजोरी फोडून आतला ऐवज पाहता येणार नाही.

पेन ड्राईव्हमध्ये तिजोरीची ही जी संकल्पना मी सांगतो आहे, तिचे नाव आहे ' रोहोस मिनी ड्राईव्ह ' . संकल्पना साधी सोपी आहे. तुमच्या पेन ड्राईव्हमध्येच एक स्वतंत्र ड्राईव्ह गुप्तपणे जन्माला घातला जातो. ह्या ड्राईव्हमध्ये तुम्हाला हव्या त्या पद्धतीने फोल्डर्स व फाईल्स ठेवता येतात. ही सारी फोल्डर्स व फाईल्स AES 256 bit key length पद्धतीने एन्क्रीप्ट करून साठवली जातात. म्हणजेच तुम्ही त्यात फोटो साठवला असला किंवा एखादी व्हिडिओ क्लीप त्यात ठेवली असली तरी ती सांकेतिक भाषेत गोंधळ घालून ठेवलेल्या माहितीसारखी भासते. ती वाचणं हे हॅकर सोडा ब्रम्हदेवालाही शक्य होणारं नसतं. आता बघा, तुमचा पेन ड्राईव्ह जेव्हा तुम्ही तुमच्या किंवा कोणाच्याही संगणकाच्या युएसबी ड्राईव्हमध्ये सरकवता तेव्हा तुम्हाला काहीतरी G किंवा H वगैरे अद्याक्षराचा नवा ड्राईव्ह विंडोज एक्स्प्लोअरर मध्ये दिसू लागतो. माझ्या संगणकात मी माझा पेन ड्राईव्ह लावला की H ड्राईव्ह अवतरतो. ह्याच ड्राईव्हमध्ये आपल्या पेन ड्राईव्हमधील फोल्डर्स आणि फाईल्स असतात. मी माझ्या पेन ड्राईव्हमध्ये रोहोस मिनी ड्राईव्ह ची सोय केली आहे. रोहोस मिनी ड्राईव्ह म्हणजे दुसरं तिसरं काही नसून एक प्रकारची तिजोरीच (तीही एन्क्रीप्शनची सोय असलेली) आहे. माझ्या H ड्राईव्हमध्ये इतर सर्व फोल्डर्स व फाईल्स दिसतात. त्या कोणालाही दिसतात. पण रोहोस मिनी ड्राईव्ह मधील फोल्डर्स व फाईल्स मात्र दिसत नाहीत. त्या ऐवजी Rohos नावाची एक Exe फाईल दिसते. ह्या फाईलवर क्लीक केल्यानंतर ती तुमचा पासवर्ड मागते. तो पासवर्ड दिल्याशिवाय माझ्या माहितीची तिजोरी मूळातच उघडत नाही. त्यामुळे तिजोरीतला माझा तो डेटा सुरक्षित राहतो. इतरांच्या हातात पेन ड्राईव्ह देऊनही मला डेटा सेफ्टी ची भिती नसते.

हा रोहोस मिनी ड्राईव्ह लावणं अतिशय सोपं आहे. लहान मुलांनाही तो सहजपणे लावता येईल इतका सोपा. त्याची पद्धत सांगतो. प्रथम http://www.rohos.com/rohos_mini.exe ह्या लिंकवरून रोहोस मिनी ड्राईव्ह डाऊनलोड करून घ्या. तो तुमच्या संगणकावर इन्स्टॉल करा. तुमच्या संगणकावर Windows XP किंवा Windows Vista असणं मात्र आवश्यक आहे. रोहोस मिनी ड्राईव्ह पूर्णपणे मोफत उपलब्ध आहे. त्यात तुम्ही १ जीबीपर्यंतचा डेटा एन्क्रीप्ट करून गुप्त ड्राईव्हमध्ये साठवू शकता. रोहोसचे वैशिष्ट्य हे की एक पेन ड्राईव्ह असून तुमच्या एक्स्प्लोअररमध्ये दोन ड्राईव्हज दिसतात. माझ्या बाबतीत एक ड्राईव्ह H असतो तर दुसरा ड्राईव्ह R असतो. H मधला डेटा सर्वांसाठी खुला असतो. R ड्राईव्ह पासवर्ड टाईप केल्याशिवाय मूळातच दिसत नाही. पासवर्ड टाईप केला की मात्र एक्स्प्लोअरर तो दाखवू लागतो. पासवर्ड आपल्याला हवा तेव्हा बदलता येतो. गुप्त ड्राईव्हमध्ये फोल्डर्स वा फाईल्स घालता येतात, काढता येतात. एन्क्रीप्शनची प्रक्रिया त्यात आपोआप होते, आपल्याला त्यासाठी काहीही करावं लागत नाही. ही सारी माहिती www.rohos.com ह्या साईटवर तुम्हाला पहायला मिळेल.

थोडक्यात काय, तर यापुढे काळजी करू नका. आपलं घर काय, किंवा पेन ड्राईव्ह काय चावी विश्वासू शेजार्‍याच्या हातात द्यायला हरकत नाही. तिजोरी मात्र नीट बंद करून ठेवा. त्याची चावी कोणाच्याही हातात पडणार नाही याची काळजी घ्या. तिजोरीत हवा तो ऐवज ठेवा. नंतर मग मात्र निर्धास्त राहण्याची सवय करून घ्यायला हवी. निर्धास्त कसं रहायचं हे शिकवणारे ब्लॉग्ज आणि ट्युटोरियल्सही इंटरनेटवर उपलब्ध आहेत. तेव्हा काळजी नसावी.

1 टिप्पणी: