२१ फेब्रु, २०११

शब्दांचे खेळ

मराठीत "ती होडी जाडी होती" हे वाक्य शेवटाकडून वाचलं तरी तेच रहातं. ह्या प्रकाराला इंग्रजीत Palindrome असं म्हणतात. "चिमा काय कामाची" हा मराठीतला आणखी एक पॅलिनड्रोम. पण मराठीत असे पॅलिनड्रोम्स खूपच कमी आढळतात. इंग्रजीत मात्र त्यांची रेलचेल आहे. http://thinks.com/words/palindromes/x-y-z.htm ह्या साईट लिंकवर गेलात तर तेथे अक्षरशः ए टू झेड अद्याक्षरांनी विभागून शेकडो इंग्रजी पॅलिनड्रोम्स वाचायला मिळतात. त्यातल्या काहींचा उल्लेख येथे करावासा वाटतो.

But Anita sat in a tub.

किंवा हा धुम्रपानविरोधी पॅलिनड्रोम पहा. Cigar? Toss it in a can, it is so tragic!

किंवा Devil never even lived. हे साध्य वाक्य हाही एक पॅलिनड्रोम.

Do go to God हे वाक्य मागून पुढून कसंही वाचलत तरी तोच संदेश मिळतो, 'देवाकडे जा.'

Gate-man sees name, garage-man sees name-tag.

Live not on evil, madam, live not on evil.

No, it never propagates if I set a gap or prevention.

Red roses run no risk, sir, on nurse's order.

असे शब्दांचे खेळ छोट्यांना तर आवडतातच पण मोठ्यांनाही ते भावतात. नेहमीच्या त्याच त्या कामातून थोडं वेगळं म्हणून, किंवा मुलांना अभ्यासातून डोकं वर काढून मनोरंजन म्हणून असे शब्दांचे गंमतीदार खेळ वाचणं म्हणजे एक रिलीफच असतो.

आता ते gry ने शेवट होणारे शब्द इंग्रजीत दोनच आहेत. एक Angry आणि दुसरा Hungry. पण तुम्ही http://www.fun-with-words.com/word_gry_angry_hungry.html ह्या लिंकवर गेलात तर gry ने शेवट होणारे एकूण १२४ शब्द दिलेले तुम्हाला दिसतील. ह्या १२४ शब्दातले बरेचसे म्हणे १९३३ सालच्या ऑक्सफर्ड इंग्लीश डिक्शनरीमध्ये आलेले होते. नंतर इतरही काही शब्दकोशांनी त्यातले काही (पुन्हा म्हणे) आपल्यात सामावून घेतले होते. ती १२४ शब्दांची यादी एक गंमत म्हणून तुम्ही अवश्य पहा. मला मात्र शोधूनही Oxford किंवा Webster शब्दकोशांच्या वेबसाईटसवर त्यातले काहीच आढळले नाहीत. Angry आणि Hungry ला gry चे पर्याय नाहीत हेच खरं असावं बहुतेक.

पुन्हा ते shion ने शेवट होणारे शब्दही इंग्रजीत पुन्हा दोनच. Fashion आणि Cushion. पण गंमत म्हणजे dictionary.com ह्या साईटवर kishion नावाचा एक शब्द सापडला.

हे शब्द शोधणं जे असतं त्यासाठी आपल्या कागदी डिक्शनरीपेक्षा इंटरनेटवरची (किंवा वरच्या) डिक्शनरीज फार उपयुक्त असतात. अशी इंटरनेटवरची onelook.com ही माझी आवडती डिक्शनरी आहे. मी जो शब्द तिथे शोधतो तो एकाच वेळी १०६५ शब्दकोशांमध्ये शोधला जातो असा onelook.com चा दावा आहे. तो दावा खरा असो वा नसो. पण onelook मला चांगलीच कामाला येते. तुम्ही साधा आपला what हा शब्द तिथे शोधलात तर तो एकूण ३३ डिक्शनरीजमध्ये शोधला गेलेला तुम्ही दिसेल. त्यात Merrium Webster, Oxford, Cambridge, Encarta, American Heritage पासून ते Wiktionery पर्यंत अनेक डिक्शनरीज आहेत. इंटरनेटवरच्या onelook काय किंवा अन्य इतर Webster वा Oxford सारखी डिक्शनरी काय, तिथे wild card उपयोग आपल्याला करता येतो. ज्यांना wild card म्हणजे नेमके काय हे माहित नाही त्यांच्यासाठी एक दोन शब्दांचे खेळ करून दाखवणं गरजेचं आहे. हे खेळ अगदी सोपे आहेत. Onelook.com वर जा. तिथे *phere असं टाईप करून शब्द शोधा (म्हणजे Search वर क्लीक करा). तुम्हाला phere ने शेवट होणारे एकूण ६७ शब्द तिथे मिळतील. त्यात aerosphere पासून ते atmosphere पर्यंत आणि blogosphere पासून ते ozonosphere पर्यंत सारे आहेत. तुम्ही जे *phere असं टाईप केलत त्यातली * ही खूण (इंग्रजीत asterisk ) म्हणजे वाईल्ड कार्ड होतं. * च्या जागी आवश्यक ते शब्द टाकून phere ने शेवट होणारे सर्व डिक्शनरीजमधील शब्दांची यादी onelook.com ने तुमच्या समोर हजर केली. * सारखं दुसरं वाईल्ड कार्ड म्हणजे आपलं प्रश्नचिन्ह (?). हे समजून घेण्यासाठी तुम्ही b??F असं टाईप करून onelook.com मध्ये शब्द शोधा. तुम्हाला b ने सुरू होणारे आणि f ने शेवट होणारे एकूण १५ शब्द onelook शोधून देईल. ते असे-

1. baff, 2. bamf, 3. barf, 4. basf, 5. batf, 6. bcdf, 7. bcnf, 8. bdnf, 9. beef, 10. biff, 11. boff, 12. brdf, 13. bsrf, 14. buff, 15. bumf तुम्ही एकाच वेळी * आणि ? चा वापर करून देखील शब्द शोधू शकता. b??f* असं टाईप करून शब्द शोधून पहा. तुम्हाला असे शेकडो शब्द मिळतील की जे b ने सुरू होतात, त्यांचे चौथे अक्षर f असते आणि नंतर काही अक्षरे असतात. आपल्या कागदी डिक्शनरीत अशा प्रकारे शब्द शोधण्याची सोय नसते. त्यामुळे संगणक वा इंटरनेटवर उपलब्ध असणार्‍या डिक्शनरीज अशा वेळी खूपच उपयुक्त ठरतात. Onelook वर रिव्हर्स डिक्शनरीचीही सोय आहे. म्हणजे आपल्याला माहित असलेल्या अर्थाशी जवळीक साधणारे शब्द त्यात शोधता येतात. उदाहरणार्थ मला Java ह्या प्रोग्रामिंग लॅंग्वेजचं नाव आठवत नाहीये. तर अशा वेळी मी रिव्हर्स डिक्शनरीमध्ये जाऊन Programming Language असं टाईप करून शब्द शोधला असता माझ्या समोर Cobol पासून ते Pascal पर्यत आणि Java पासून lisp आणि Fortran पर्यंत सर्व शब्द हजर होतात. रिव्हर्स डिक्शनरीचा वापर वक्ते, लेखक, पत्रकार, प्राध्यापक वगैरे मंडळीं नेहमीच करीत असतात. कारण नेमका हवा तो, पूर्वी कधी तरी माहीत असलेला, पण आता ह्या क्षणाला आठवत नसलेला शब्द शोधण्यासाठी त्याचा कमालीचा उपयोग होतो.

Onelook बद्दल हे वाचत असताना अनेकांची ट्युब पेटली असेल की वाईल्ड कार्डचा आणि रिव्हर्स डिक्शनरीचा वापर करून सुटता सुटत नसलेलं शब्दकोडं चुटकीसरशी सोडवता येईल. मंडळी, तुमचा अंदाज बरोबर आहे. इंग्रजी शब्दकोडं सोडविण्यासाठी onelook.com चा किंवा वाईल्ड कार्डची सोय असणार्‍या डिक्शनरीजचा चांगला उपयोग होतो. Onelook.com चे परिक्षण देताना अमेरिकेचे सुप्रसिद्ध दैनिक न्युयॉर्क टाई्म्सने लिहीले होते - "A superb way to cheat at crossword puzzles" . ही साईट अनेक वर्षांपासून इंटरनेटवर आहे. आठ वर्षांपूर्वी म्हणजे २००० साली याहूने "10 Supremely Useful Sites" असं लिहून जगातील पहिल्या दहा साईटसमध्ये onelook ची गणना केली होती.

शब्दांचे खेळ उच्चारांशिवाय कधी पूर्ण होणार नाहीत. आजकाल इंटरनेटवरच्या किंवा सीडीतून येणार्‍या बहुतेक डिजिटल इंग्रजी डि्कशनरींमध्ये शब्दाचा उच्चार ऐकण्याची सोय असते. पण त्या शब्दाचा उपयोग करून वेगवेगळी बोली भाषेतील वाक्ये किंवा वाकप्रचार ऐकण्याची सोय करणारी howjsay.com ही साईट onelook च्या बरोबरीने वापरणं मी पसंत करतो. Howjsay हे नाव थोडं विचित्र आहे. यातला J मात्र अर्थपूर्ण आहे. तो त्या साईटवर आपल्याला गुलाबी रंगात दिसतो. ह्या साईटवर जाऊन आपण शब्द शोधायचा. शोधलेला शब्द पुढे येणार्‍या पानावर आपल्याला गुलाबी रंगात दिसतो. त्या गुलाबी शब्दावर आपला माऊस नुसता न्यायचा (क्लीक सुद्धा करायचं नाही) की त्याचा उच्चार आपल्याला ऐकायला मिळतो. तुम्ही उदाहरणार्थ what हा इंग्रजी शब्द howjsay.com वर शोधलात तर what चा उच्चार तर तुम्हाला ऐकायला मिळतोच पण त्याच बरोबर what a pity, किंवा what did you expect किंवा what do you mean वगैरेंसारखी काही इंग्रजी वाक्ये कशी उच्चारायची हेही ती साईट तुम्हाला दाखवायला तयार असते.

शब्दांचे खेळ करायचे म्हंटले आणि यमक साधायची धमक दाखवली नाही असं कसं होईल. इंग्रजीत कविता लिहायची धमक करायची असेल आणि इंग्रजी शब्दांचं यमक साधायचं असेल तर rhymer.com सारखी साईट तुम्हाला माहीत असायला हवीच. Fear हा तुमच्या कवितेच्या ओळीचा शेवटचा शब्द असेल तर यमक जुळविण्यासाठी तु्म्हाला dear, clear, cheer, year, hear, sheer वगैरे यमकांची गरज लागेल. ते आठवत बसायचे नसेल तर rhymer.com वर जायचं. यमक तयार घ्यायचं. कविता फिनिश करायची.

आणखी एक शब्दांचा खेळ म्हणजे जगातले सर्वांत मोठे शब्द शोधणं. त्यासाठी तुम्हाला एक वेबसाईट सांगतो. तिचं नाव आहे - http://thelongestlistofthelongeststuffatthelongestdomainnameatlonglast.com आता ही जी the longest list of the longest stuff at the longest domain name at long last.com नावाची साईट आहे ती खरंच आज अस्तित्वात आहे. तुम्ही अवश्य तिथे जाऊन पहा. विशेषतः त्या साईटवरील http://thelongestlistofthelongeststuffatthelongestdomainnameatlonglast.com/long1.html ही सर्वांत मोठ्या शब्दाची जी लिंक आहे, त्याला तर तुम्ही भेट द्याच. त्यात

Pneumonoultramicroscopicsilicovolcanoconiosis हा सर्वांत मोठा शब्द (४५ अक्षरे) दिला आहे. त्या शब्दाचा अर्थ आहे, फुफ्फुसातील एक प्रकारचा रोग. हा शब्द उच्चारताना आपली दमछाक होऊन फुस फुस व्हायला लागतं तो भाग निराळा. काही लबाड मंडळी ह्या टप्प्यावर howjsay.com वर जातील आणि त्या बिचार्‍या गुणी साईटला हा शब्द उच्चारायला भाग पाडतील याची कल्पना मला आहे. पण सध्या तिथे जाऊ नका. एवढा मोठा शब्द उच्चारण्याची त्यांची प्रॅक्टीस अजून चालू असावी. त्यामुळे तो उच्चार तिथे अजून आलेला नसावा.

मंडळी, इंग्रजी भाषेला वाघिणीचं दूध असं म्हंटलं जातं. संगणक आणि इंटरनेटने हे दूध चांगलं पचवलं आहे. आता इंटरनेट इतर भाषा पचविण्याच्या बेतात आहे. गुगलने आपली राष्ट्रभाषा हिंदी पचवायला सुरूवातही केली आहे. इंग्रजीतून हिंदीत आणि हिंदीतून इंग्रजीत भाषांतराची सोय गुगलने आपल्या http://www.google.com/translate_t ह्या लिंकवर केली आहे. तिथे इंग्रजी-हिंदी शब्दकोश उपलब्ध आहे, आणि तो खरोखरच उपयुक्त आहे. पण अजूनही भाषांतराची कला संगणक काय किंवा इंटरनेट काय, त्यांना जमलेली नाही. Google ला मी I am going. ह्या वाक्याचं भाषांतर तिथे करायला सांगितलं तर त्याने "मुझे इस बात की जा रही है " असं काहीतरी भांग प्यायल्यासारखं केलं. असो. इंटरनेट इतर भाषा कवेत घे्ण्यासाठी धडपडते आहे हे मात्र नक्की. मराठी-इंग्रजी शब्दकोश गुगलवाले कधी आणताहेत याची वाट तुम्ही नक्कीच पहात असाल. मीही पहातोय. तुमच्यासारखे मलाही त्यात wild cards वापरून शब्दांचे खेळ करता येतात का हे पहायचय.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा