दि वर्ल्ड फॅक्टबुक मध्ये १९४ स्वतंत्र देशांची अत्यंत सविस्तर अशी माहिती आहे. त्या व्यतिरिक्त तैवानसारखा अमेरिकेने अद्यापि मान्यता न दिलेला प्रदेश, वा ऑस्ट्रेलिया, ब्रिटन सारख्या खंडांतील काही प्रदेश वा बेटे वगैरेंची भर त्यात घातल्यास जगातील एकूण २६६ भौगोलिक क्षेत्रघटकांची माहिती ह्या कोशात आपल्याला मिळते.
माहितीचे स्वरूप
आपण पुन्हा भारताच्या पानावर येऊ. भारताविषयीच्या माहितीचे पान आपण आपल्या प्रिंटरवर छापायचे ठरवले तर तो मजकूर ए-४ आकाराची एकूण १६ पाने व्यापतो. म्हणजेच भारतासारख्या एकूण २६६ भौगोलिक क्षेत्रघटकांची माहिती देण्यासाठी हे हँडबुक ३००० हून अधिक पानांचा मजकूर आपल्यापुढे उपलब्ध करते. भारताच्या पानावर सर्वात वर आपला तिरंगा झेंडा आणि भारताचा नकाशा आहे. त्यानंतर भारत देशाची एकूण ऐतिहासिक पार्श्वभूमी थोडक्यात, पण आर्य - द्रविड ते मौर्य काळापर्यंत आणि पुढे इंग्रजांचा अंमल, स्वातंत्र्य चळवळ असे टप्पे घेत आजच्या काळापर्यंत दिलेली आपल्याला दिसते. ही थोडक्यात पार्श्वभूमी संपली की पुढे आपल्यावर माहितीचा एक जबरदस्त धबधबा कोसळू लागतो. भारताचे जमिनी व सामुद्रिक क्षेत्रफळ, सीमारेषांची किलोमीटरमधील लांबी (उदाहरणार्थ चीनची सीमा ३३८० कि.मी., पाकिस्तानची २९१२ कि.मी., नेपाळची १६९० कि.मी. वगैरे), शेती व बिगर शेती जमिनीचे क्षेत्रफळ हे तपशील प्रथम येतात. मग लोकसंख्येचे आकडे दिसू लागतात. त्यात एकूण लोकसंख्या, त्यात स्त्रिया किती, पुरूष किती, ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण किती, जन्म-मृ्त्यूचा दर किती वगैरे माहिती नेमकी दिलेली दिसते. पुढे भारतातल्या एडस आणि एच.आय.व्ही. बाधितांचे आकडेही असतात. धर्माच्या निकषावर लोकसंख्येचे प्रमाण (हिंदू ८०.५%, मुस्लीम १३.४%, ख्रिस्ती २.३%, शीख १.९% वगैरे) देणारी टक्केवारी पुढे येते. कोणत्या भाषा बोलल्या जातात, साक्षरता किती आहे हा आणखी सविस्तर तपशीलही नोंदलेला दिसतो. एवढं झाल्यावर भारतातील सरकारी व राजकीय माहितीचा विभाग असतो. त्यात राज्यांची नावे, राष्ट्रपती प्रतिभा पाटील, पंतप्रधान मनमोहनसिंग, उपराष्ट्रपती हमिद अन्सारी यांच्या नावाचा उल्लेखही असतो. लोकसभेच्या ५४५ जागांपैकी ५४३ निवडणूकीने व २ जागा राष्ट्रपतींद्वारा नेमणूकीने भरल्या जातात हे देऊन काँग्रेस १४७, भाजपा १२९, सीपीआय(मा) ४३, स.प. ३८, शिवसेना १२, राष्ट्रवादी काँग्रेस १० वगैरे पक्के आकडे देऊन सरकारची रचना नेमकी कशी आहे हे दाखवलेलं असतं. राजकीय पक्षांचा तपशील देताना बहुजन समाज पार्टीच्या मायावतींपासून ते शिवसेनेच्या बाळासाहेब ठाकरें आणि काँग्रेसच्या सोनिया गांधींपर्यंत सर्व प्रमुख पक्षप्रमुखांची दखल घेतलेली दिसते. राजकीय दबाव गटात विश्व हिंदू परिषद, रा.स्व. संघ, बजरंग दलापासून ते हुरियत काँन्फरन्सनाही वगळलेले नसते.एखाद्या देशाची सविस्तर माहिती हा कोश देतो म्हणजे नेमकी कोणती माहिती त्यात आपल्याला मिळते हे समजून घेणे आवश्यक आहे. आपण त्यासाठी आपल्याच देशाचे उदाहरण घेऊ. भारताची माहिती देणार्या पानावर जेव्हा आपण येतो तेव्हा सर्वांत वर एक सूचना आपल्याला वाचायला मिळते. 'This page was last updated on 19 June 2008' हे वाक्य पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येते की कोणतेही छापिल पुस्तक आपल्याला इतकी अद्ययावत माहिती उपलब्ध करू शकणार नाही. कारण छापिल पुस्तकातील माहिती कंपोज आणि प्रुफरीड करून पुढे ती छापली जाऊन जेव्हा आपल्यापुढे येते तेव्हा ती किमान महिना दोन महिने तरी जुनी झालेली असते. ते पुस्तक छापल्यानंतर त्याच्या प्रती संपेपर्यंत पुढील आवृत्ती येत नसल्याने छापिल पुस्तकांतील माहिती जुनी जुनी होत जाते. 'दि वर्ल्ड फॅक्टबुक' इंटरनेटवर दर पंधरा दिवसांनी अपडेट होत असल्याने माहितीच्या अद्ययावततेच्या स्पर्धेत ते छापिल पुस्तकाला शर्यतीत खूपच मागे टाकते. ह्या कारणामुळेच जगभरातील लाखो अभ्यासकांसाठी हे फॅक्टबुक म्हणजे एक दैनंदिन संदर्भासाठीचा ग्रंथ झालेला आहे.
राजकीय पार्श्वभूमी एवढी सविस्तर आल्यानंतर आर्थिक बाजू तेवढ्याच तपशीलाने येणं स्वाभाविकच असतं. शेतकर्यांचे प्रमाण, मजुरांची संख्या, बेकारांची संख्या, महागाईचा दर, राष्ट्रीय अंदाजपत्रक, पिके, उद्योग, तेल, वायू, खनिजे, आयात-निर्यात, चलन, आर्थिक वर्षाचा तपशील हे सारंही तपशीलाने असतं.
महत्वाची आकडेवारी
एवढं झाल्यानंतर आपल्या लष्कराची माहिती त्यांनी दिली नसती तरच नवल. आपलं पायदळ, हवाई दल, आणि नाविक दलाचा तपशील तिथे आपल्याला मिळतो. भारताचे चीन, पाकिस्तान, बांगला देश, श्रीलंका, भूतान वगैरेंशी कसे संबंध आहेत त्याबद्दलचे टिपणही पुढे वाचायला मिळते. पुढे भारतात आलेल्या निर्वासितांची संख्याही दिलेली असते.भारतात एकूण लँडलाईन फोन्स २००५ साली ४ कोटी ९७ लाख होते. मात्र २००६ साली भारतातील मोबाईल फोन्सची संख्या १६ कोटी ६१ लाख होती. इतका बारीक तपशील देताना भारताच्या VSAT आणि INSAT पद्धतींचा उल्लेख करायला सी.आय.ए. चे हे हँडबुक विसरत नाही. भारतातील रेडिओ आणि टीव्ही स्टेशन्सची संख्या, इंटरनेट युजर्सची संख्या, इंटरनेट होस्टस, एकूण विमानतळे, विमानतळांच्या धावपट्ट्यांची एकूण लांबी, गॅस पाईपलाईन्सची एकूण लांबी, रेल्वेमार्गाची व महामार्गांची एकूण लांबी, जलमार्गांचा तपशील हा नेमकेपणाने सी.आय.ए. कडे उपलब्ध असतो. मुंबई, गोव्यापासून कांडलापर्यंत महत्वाची बंदरे त्यांनी नोंदलेली असतात.
वरील परिच्छेदांमध्ये आपण फक्त भारताविषयी कोणती माहिती आली आहे याचा तपशील पाहिला. अशाच प्रकारचा तपशील २५० हून अधिक देशांबद्दल आणि क्षेत्रघटकांबद्दल त्यात आलेला आहे. इंटरनेट वा संगणकावर बसून फक्त गेम खेळण्यात वेळ घालवणार्या आबालवृद्धांनी ही माहिती पाहताना चीन-भारत, किंवा भारत-पाकिस्तान, किंवा भारत-बांगला देश वगैरे तुलना करून पाहिली तर गेमपेक्षाही चांगले मनोरंजन होऊ शकेल.
वाचनासाठी मोफत उपलब्ध
हा सारा माहितीचा खजिना तुम्ही इंटरनेटवर मोफत वाचू शकता. निरनिराळ्या स्पर्धा परिक्षांना बसणार्या विद्यार्थ्यांसाठी करन्ट इव्हेंटस वा जनरल अवेअरनेसचे ज्ञान सुधारण्यासाठी ह्या हँडबुकसारखे दुसरे साधन नाही.