२१ फेब्रु, २०११

आपापली मास्टर 'की'

"ड्राईव्ह" ह्या इंग्रजी शब्दाचे विविध अर्थ आहेत. "लेफ्ट हँड ड्राईव्ह" पासून ते "ब्लड डोनेशन ड्राईव्ह" पर्यंत अनेक छटा त्यात आहेत. पण आपल्या संगणकातले ड्राईव्हज आणखी वेगळे. ते ड्राईव्हज म्हणजे संगणकाच्या मंत्रीमंडळातले कॅबिनेट मंत्रीच म्हणायला हवेत. हार्ड ड्राईव्ह, फ्लॉपी ड्राईव्ह, सीडी ड्राईव्ह असे वेगवेगळ्या प्रकारचे ड्राईव्हज संगणकाच्या कारभारात फार महत्वाची भूमिका बजावत असतात. हार्ड ड्राईव्ह हा तर संगणकाचा गृहमंत्रीच म्हणायला हवा. फ्लॉपी किंवा सीडी ड्राईव्ह ह्या मंत्रीपदाच्या खुर्च्या कायम असल्या तरी मंत्री मात्र सारखे बदलत असतात. आपल्या विंडोज एक्स्प्लोअररवर नजर टाकलीत तर दिसेल की आपल्या फ्लॉपी ड्राईव्हमध्ये फ्लॉपी असो वा नसो, त्याचा 'ए' किंवा 'बी' ड्राईव्ह कायम दिसत असतो. तीच गोष्ट सीडी वा डिव्हीडी ड्राईव्हची. त्यात सीडी असो वा नसो त्या ड्राईव्हला दिलेले अक्षर फाईल मॅनेजरमध्ये कायम दिसत असते. बहुतेक वेळा ई, एफ, जी, किंवा एच ह्यापैकी कोणते तरी एक अक्षर सीडी ड्राईव्हला बहाल केले गेलेले असते. ह्या ड्राईव्हमध्ये सीडी नसताना आपण त्या ड्राईव्हच्या अक्षरावर क्लीक केले तर 'आत सीडी नाही' असा संदेश संगणक देतो.
फ्लॉपी आणि सीडी ड्राईव्हपेक्षा वेगळी यंत्रणा असणारा ड्राईव्ह म्हणजे पेन ड्राईव्ह. पेन ड्राईव्हला युएसबी ड्राईव्ह, फ्लॅश ड्राईव्ह, युएसबी स्टीक वगैरे टोपण नावेही आहेत. पेनाला टोपण असते तशी पेन ड्राईव्हला ही काही टोपण नावे. पेन ड्राईव्हला अलिप्त ड्राईव्ह असेही नाव खरं तर द्यायला हरकत नाही. कारण पेन ड्राईव्ह कोणाचाही नसतो. तो आपला आपण स्वतंत्र असतो. कुठल्याही संगणकात तो गुंतत नाही. आपले अस्तित्व स्वतंत्र ठेवून कुठेही न गुंतणारी कोरडी माणसे जगात असतात, तसा हा पेन ड्राईव्ह कोरडा असतो. तुम्ही ज्यावेळी एखादा पेन ड्राईव्ह तुमच्या संगणकाला लावता, तेव्हा तो तुमच्या संगणकाचा होतो. त्याचे 'जी', 'एच', किंवा 'आय' वगैरे अक्षर तुमच्या संगणकाच्या फाईल मॅनेजरमध्ये दिसू लागते. मात्र हे अक्षर कायम नसते. जेव्हा तुम्ही तो पेन ड्राईव्ह बाहेर काढता तेव्हा बाहेर जाताना पेन ड्राईव्ह त्या संगणकाशी आपले नाते पूर्णपणे तोडूनच बाहेर पडतो. पुन्हा दुसर्‍या एखाद्या संगणकात तो गेला की तिथे तो आपले अक्षर तयार करतो आणि बाहेर पडला की पुन्हा पूर्वीचे नाते तोडून स्वतंत्र राहतो. 'पानी तेरा रंग कैसा जिसमे मिलावे वैसा' अशी हिंदी म्हण आहे. त्या आधाराने म्हणायचे तर 'पेन ड्राईव्ह तेरा अक्षर कैसा कंपुटर में जो मिले वैसा' असं म्हणता येईल.
पेन ड्राईव्ह हे आजच्या पीसी युजर्ससाठी म्हणजे तुमच्या आमच्यासाठी एक वरदान आहे. एक तर मुर्ती लहान किर्ती महान ही म्हण त्याला पुरेपूर लागू पडते. आपल्या कीचेनला पेन ड्राईव्ह लावून फिरणारे आज आयटी क्षेत्रामध्ये अक्षरशः हजारो आहेत. काही जण गळ्यात लॉकेट घालून फिरावं तसे पेन ड्राईव्ह गळ्यात घालून वावरताना दिसतात. जेमतेम पंचवीस-तीस ग्रॅम वजनाचा हा पेन ड्राईव्ह ताकदीने मात्र आपल्या सीडी किंवा अगदी डीव्हीडीपेक्षाही भारी असू शकतो. १ जीबी क्षमतेपासून ते अगदी १६ जीबी पर्यंतचे पेन ड्राईव्हज आपल्याकडे आज अडीचशे रूपयांपासून ते पाच हजार रूपयांपर्यंतच्या किंमतींना अगदी सहजपणे उपलब्ध आहेत. साध्या वह्या पुस्तके विकणार्‍या स्टेशनरी शॉप्समध्येही ते मिळू लागले आहेत यावरून त्यांची वाढती लोकप्रियता आपल्या लक्षात येते.
पेन ड्राईव्ह आणि आजची सीडी किंवा डिव्हीडी यांची उपयुक्ततेच्या दृष्टीने तुलना केली असता पेन ड्राईव्ह शर्यतीत जिंकतो. संगणक चालू होत नसेल तर आपण आपल्याकडील बुट डिस्क किंवा बुटेबल सीडी टाकून तो चालू करण्याचा प्रयत्न करतो. पण बहुतेक वेळा घडतं असं की ती बुटेबल सीडी कधी जागेवर मिळत नाही. अशा वेळी आपल्या खिशात किंवा गळ्यात कायम असणारा पेन ड्रार्ईव्ह उपयोगी पडू शकतो. पेन ड्राईव्हच्या माध्यमातून संगणक बुट करणे शक्य असते. बुटींग व्यतिरिक्त पोर्टेबल प्रोग्राम्स ही पेन ड्राईव्हने करून दिलेली एक फार मोठी सोय आहे. पोर्टेबल प्रोग्राम हा नावाप्रमाणे खरोखरीच पोर्टेबल असतो. पेन ड्राईव्हमध्ये त्याचे इन्स्टॉलेशन झालेले असते. संगणकाला पेन ड्राईव्ह लावताच आपण त्या प्रोग्रामचा वापर सुरू करू शकतो. उदाहरणार्थ, समजा काही कारणाने तुमच्या संगणकातला इंटरनेट एक्स्प्लोअरर करप्ट झाला आहे. तो पुन्हा नव्याने इन्स्टॉल करण्याइतका वेळ तुमच्याकडे नाही. पण चटकन एखादी ईमेल तुम्हाला चेक करायची आहे. अशा वेळी तुमच्याकडे पेन ड्राईव्ह असेल आणि त्यात पोर्टेबल फायरफॉक्स ब्राऊझर असेल तर तुम्ही फायरफॉक्समध्ये इंटरनेट सर्फींग करू शकता किंवा ईमेल चेक करू शकता. मला स्वतःला आवडणारा पोर्टेबल प्रोग्राम म्हणजे मोफत उपलब्ध असणारा अतिशय उपयुक्त असा ओपन ऑफिस सूट. वर्ड, एक्सेल, पॉवरपॉईंट वगैरेच्या फाईल्स तातडीने उघडण्याची वेळ येते आणि नेमका आपला ऑफिस प्रोग्राम त्यावेळी बिघडलेला असतो. अशा वेळी पेन ड्राईव्हमधला ओपन ऑफिस हा अॅप्लीकेशन सूट खूपच उपयोगी पडतो.
पेन ड्राईव्ह हा प्रायव्हसीच्या दृष्टीने आपल्या मोबाईल फोनसारखा आहे. तो सतत आपल्या खिशात वा पर्समध्ये राहतो. इतरांना तो देण्याची वा इतरांनी तो वापरण्याची गरज नसते. त्यात आपल्या खाजगी फाईल्स, हिशोब, फोटो, व्हिडीओज, आवाजाच्या फाईल्स वगैरे आपण ठेवू शकतो. हा सर्व व्यक्तीगत किंवा गोपनीय स्वरूपाचा डेटा Trucrypt सारखे टूल (www.truecrypt.org) वापरून आपण एन्क्रीप्ट करून ठेवू शकतो. त्यामुळे आपला पेन ड्राईव्ह हरवला वा कोणी चोरला तरी त्याला आपला डेटा वाचता वा वापरता येत नाही. एन्क्रीप्शन करून ठेवलेला डेटा हा आपल्याला माहीत असलेल्या पासवर्डशिवाय उघडला जाऊ शकत नाही. त्यामुळे ज्यांना गोपनीय फाईल्स ठेवायच्या आहेत त्यांचेसाठी पेन ड्राईव्हसारखे दुसरे साधन नाही. पेन ड्राईव्हला सीडी वा डिव्हीडीप्रमाणे चरे येत नसल्याने त्या कारणाने तो बाद होऊन पंचाईत होण्याची वेळ येत नाही. मात्र अतिशय निष्काळजी पद्धतीने पेन ड्राईव्ह वापरल्यास तोही अकाली बाद होण्याची शक्यता असते. खूपदा घाईघाईत पेन ड्राईव्ह व्यवस्थित लॉग आऊट न करता खस्सकन खेचून बाहेर काढण्यामुळे डेटा करप्शन तर होतच होतं पण तो कायमचा बाद होण्याची शक्यताही असते. पेन ड्राईव्हमधील डेटा त्यामुळे बॅकअप करून ठेवणे हे अत्यंत आवश्यक असते. काही जण दोन पेन ड्राईव्ह ठेवतात आणि त्यापैकी एकात बॅकअप असतो. मात्र बॅकअप हा नेहमी वेगवेगळ्या प्रकारातील मिडीयामध्ये म्हणजे पेन ड्राईव्हबरोबरच सीडी वा डिव्हीडी तसेच हार्ड ड्राईव्ह अशा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये एकाच वेळी ठेवलेला असणे केव्हाही सुरक्षित असते.
तुम्ही पेन ड्राईव्ह वापरत नसाल तर अवश्य तुमच्यासाठी एक खरेदी करा. सुरूवातीस अडीचशे रूपयांचा १ जीबी क्षमतेचा पेन ड्राईव्ह खूप होतो. यात तुम्ही तुमचा सारा आवश्यक व महत्वाचा संगणकीय डेटा सतत जवळ बाळगू शकता. बाहेरगावी गेल्यानंतर तर याचा फारच उपयोग होतो. एखाद्या मित्राकडे वा सायबर कॅफेत हा पेन ड्राईव्ह उघडून त्यातील पत्रांच्या प्रिंटस घेणे खूपच सोपे असते. जे महत्वाचे पोर्टेबल प्रोग्राम्स आपल्याला नेहमी लागत असतात त्यांचा उत्तम संग्रह म्हणजे Lupo Pen Suite. हा सूट http://www.lupopensuite.com ह्या वेबसाईटवरून तुम्हाला मोफत डाऊनलोड करून घेता येईल. त्यात २०० हून अधिक अधिकृतरित्या मोफत असणारे उत्तम प्रोग्राम्स व काही गेम्सही उपलब्ध केलेले आहेत. ह्या Lupo Suite वर एक स्वतंत्र लेख लिहीता येईल एवढा त्याचा अंतरंग भरगच्च आहे. अशाच प्रकारचा एक संग्रह portableApps.com ह्या साईटवरही मोफत उपलब्ध आहे.
पेन ड्राईव्हमध्ये महत्वाची सॉफ्टवेअर व इतर आवश्यक डेटा ठेवल्याने त्याचा उपयोग एखाद्या मास्टर की सारखा होतो. एन्क्रीप्शनची सोय असल्याने तो डेटा चोरीस जाण्याची शक्यता नसते. पेन ड्राईव्हची किंमत खिशाला परवडण्यासारखी असल्याने तो सहज घेता येतो, आणि मोबाईल सांभाळताना आपल्या मनात जो एक तणाव असतो तसा तणाव पेन ड्राईव्हबद्दल नसतो. वजनाने फारच हलका असल्याने तो जड होत नाही. त्याची अडचण वाटत नाही. एकूण हे सारे गुण लक्षात घेतले तर प्रत्येकाकडे त्याची स्वतःची एक मास्टर की म्हणजे पेन ड्राईव्ह असायला हरकत नाही अशी शिफारस कोणीही करू शकेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा