अमेरिकेतील आयोव्हा प्रांतात राहणारे जोनाथन कुमिन आणि कॅसी श्मिट ह्या दोन तरूणांनी ही युटीलिटी आणि प्रिंटव्हॉटयूलाईक डॉट कॉम ही वेबसाईट जन्माला घातली आहे. जोनाथन आणि कॅसी हे दोघेही आयोव्हातील ग्रीनेल कॉलेजचे काँम्प्युटर सायन्सचे विद्यार्थी. जोनाथन २००३ बॅचचा, तर कॅसी २००५ च्या बॅचचा. अभ्यास करता करता इंटरनेटवर भटकंती करणं, नोटस काढणं, महत्वाची वेब पेजेस प्रिंटरवर प्रिंट करून घेणं हा त्यांचा नेहमीचा उद्योग (खरं तर अभ्यासाचाच भाग) होता. विविध वेबसाईटसवरून त्यांना खूप चांगली माहिती मिळत असे. ह्यामुळे जोनाथन आणि कॅसी दोघेही समाधानी असायला हवे होते. पण प्रत्यक्षात तसं नव्हतं. दोघेही एका तांत्रिक कारणामुळे निराश होते. खरं तर त्या तांत्रिक कारणामुळे जगातले सगळेच जण निराश आणि वैतागलेले असतात. ते कारण म्हणजे वेब पेजची प्रिंट घेताना फुकट जाणारे कागद आणि टोनर किंवा प्रिंटरची इंक. एवढं स्पष्ट केल्यानंतर तुम्हालाही एव्हाना जाणवलं असेल की हो हा एक मोठाच प्रॉब्लेम आहे. वेब पेजवर जाहिराती, नको ती ग्राफीक्स म्हणजे चित्रे किंवा फोटोज वगैरे आणि नको त्या माहितीचे त्याच पानावर विखुरलेले मजकूरांचे ठोकळे असं काही बाही नको असलेलं असतं. आपल्याला हवी असते ती दोन परिच्छेदांची माहिती. ती मिळविण्यासाठी वेब पेज प्रिंटरवर प्रिंट करावं तर त्या बरोबर नको असलेलं ते सगळं प्रिंट होतं. त्या पायी कागद जास्त लागतात, प्रिंटरवर वेळही खूप जातो, आणि लेझर प्रिंटर असला तर तो महागडा टोनर किंवा इंकजेटवर ती महागडी इंक उगाचच वाया जाते. हा अनुभव अमेरिकेतल्या जोनाथन आणि कॅसीलाच आहे असं नाही. भारतातल्या राहुल, बंटी आणि नेहालाही ती समस्या भेडसावत असते.
जोनाथन आणि कॅसी यांनी ह्या समस्येवर काही उपाय सापडतो का हे नेटवर शोधण्याचा चंग बांधला. दोघांनीही वेबची दुनिया गुगलून काढली. पण उपाय काही सापडला नाही. इतर मित्र मैत्रिणींना विचारलं तेव्हा ते म्हणाले की त्यांनी एक उपाय शोधला आहे पण तो रोगापेक्ष औषध भयंकर असावं असा काहीसा आहे. जोनाथन आणि कॅसीचे मित्र हवं ते वेबपेज पूर्ण कॉपी करायचे आणि वर्ड प्रोग्राम उघडून त्यात पेस्ट करायचे. एवढं केल्यावर त्यातला नको असलेला भाग म्हणजे जाहिराती वगैरे काढून टाकायचे आणि हवा तेवढाच फक्त भाग राहिल्यावर ते पान प्रिंट करायचे. काही जण ते वेब पेज प्रथम एचटीएमएल फाईल म्हणून सेव्ह करायचे, आणि नंतर ते वर्ड किंवा अन्य प्रोग्राममध्ये उघडून एडिट करून त्याद्वारे नको असलेला भाग काढून टाकायचे. हा उपद्व्याप करावाच लागायचा. तो केला नाही तर कागद आणि टोनर वाया जायचा.
ह्या समस्येवर दुसरा उपाय नाही हे लक्षात आल्यावर जोनाथन आणि कॅसी ह्या दोघांनी निश्चय केला की आपणच आता ह्यावर उपाय काढायचा आणि तो जगाला अर्पण करायचा. दोघेही काँप्युटर सायन्सचे विद्यार्थी असल्याने त्यांच्याकडे तंत्रज्ञान होतं, तारूण्यसुलभ उत्साह होता, आणि मुख्य म्हणजे दृढ निश्चय होता. जोनाथन आणि कॅसी यांनी जे काम केलं त्यातून प्रिंटव्हॉटयूलाईक डॉट कॉम ही वेब साईट तयार झाली. ही वेबसाईट आज डिसेंबर २००८ मध्ये बिटा व्हर्जन म्हणजे चांचणी अवस्थेत आहे. पण तुम्ही ह्या साईटवर जाऊन जोनाथन आणि कॅसीने देऊ केलेल्या युटीलिटीची चांचणी घेतलीत तर तुम्ही खूष व्हाल. प्रिंटव्हॉटयूलाईक डॉट कॉम ह्या साईटने देऊ केलेल्या उपायामुळे कागद, वेळ, टोनर, इंक ह्या सगळ्याच गोष्टींची बचत जगभर दररोज होणार आहे यात खरंच शंका नाही.
प्रिंटव्हॉटयूलाईक डॉट कॉम ला तुम्ही भेट दिलीत तर दर्शनी पानावर सर्वांत वर उजवीकडे तीन ब्रीद वाक्य दिलेली तुम्हाला दिसतील. सेव्ह मनी, सेव्ह द एनव्हायरोन्मेंट आणि प्रिंट व्हॉट यू लाईक ही ती तीन ब्रीद वाक्य किंवा घोषणा. हिरव्यागार पानांच्या पार्श्वभूमीवर ह्या तीन घोषणा आपल्याला दिसतात. खाली ट्राय दि डेमो ची लिंक आहे. त्यावर जाऊन ह्या युटीलिटीची चाचणी आपण घेऊ शकतो. ती चाचणी कशी घ्यायची याचं अतिशय सोप्या शब्दातलं १० पायर्यांचं मार्गदर्शन त्या पानावर आहे. तुम्ही काय काय करू शकता हे त्या दहा पायर्यांतून तुमच्या लक्षात येईल. तुम्हाला हवं ते वेबपेज तुम्ही ह्या साईटमध्ये उघडू शकता. त्यासाठी तुम्ही तुम्हाला हव्या असलेल्या वेब पेजची लिंक तेथे फक्त पेस्ट करायची. तुमचं वेब पेज उघडलं की तुम्हाला नको असलेला मजकूर/चित्रे/छायाचित्रे/कोरा भाग वगैरे क्लीक करून सिलेक्ट करायचा आणि रिमुव्ह ह्या बटणावर क्लीक करायचं. तुम्हाला हवा असलेला मजकूर मोठ्या अक्षरांत असेल तर अक्षरांचा म्हणजे फाँटचा साईज तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता. त्यासाठीही वेगळी बटणे तिथे आहेत. पानावरची रंगीत पार्श्वभूमीही तुम्ही काढून टाकू शकता. थोडक्यात काही क्लीकनंतर तुम्हाला हवं ते पान प्रिंट करण्यासाठी उपलब्ध होतं. तुमचे कोरे कागद, टोनर वगैरे तर वाचतातच, पण वर्डमध्ये वगैरे पेस्ट करण्याचा त्रासही वाचतो.
ह्यातला सगळ्यात महत्वाचा भाग हा की ही सारी युटीलिटी म्हणजे वेब अप्लीकेशन आहे. तुम्हाला काहीही डाऊनलोड करावं लागत नाही. जे काही करायचं असतं ते प्रिंटव्हॉटयूलाईक डॉट कॉम ह्या साईटवरच. सारं काही इंटरनेट एक्स्प्लोअरर, नेटस्केप किंवा मोझीला फायरफॉक्स सारख्या वेब ब्राऊझरवरच होतं. समजा तुम्हाला आत्ता ताबडतोब प्रिंट करायचं नसेल तर तुम्ही तुमचं ते पान पीडीएफ म्हणून किंवा एचटीएमएल म्हणून सेव्हही करू शकता. ते सेव्ह केलत आणि तुमच्याच ईमेलवर पाठवून ठेवलत की तुम्हाला हवं तेव्हा ते प्रिंट करण्यासाठी उपलब्ध होतं.
आणखी एक वैशिष्ट्यही सांगायला हवं. खूपदा वेबसाईटवरील मजकूर हा अरूंद कॉलममध्ये दिलेला असतो. कॉलम अरूंद आणि मजकूर भरपूर अशी स्थिती असेल तर ते वेब पेज उंचीला खूपच मोठं होतं. असं वेब पेज प्रिंट केलं तर कागद जास्त लागतात. कारण कागदाच्या मधोमध तो अरूंद कॉलम आणि दोन्हीकडे कोरी जागा असा प्रकार होतो. तसं होऊ नये म्हणून प्रिंटव्हॉटयूलाईक डॉट कॉम वर कॉलमची रूंदी वाढवून लागणार्या कागदांची संख्या कमी करण्याची सोय आहे. हे सारं करता करता आपल्या हातून चुका झाल्या तर अन डू आणि रिडू करण्याची सोयही उत्तम रितीने दिलेली आहे. काम भराभर करता यावं यासाठी किबोर्ड शॉर्टकटसही हेल्प सदरात दिले आहेत. एकापेक्षा अधिक संख्येन वेब पेजेस असतील तर ती एकाखाली एक घेण्याची सोयही देण्यांत आली आहे.
थोडक्यात, प्रिंटव्हॉटयूलाईक डॉट कॉम ही खर्या अर्थाने युटीलिटी आहे. ती अर्थातच मोफत आहे. आज बिटा (चाचणी आवृत्ती) व्हर्जन मधील ही युटीलिटी आणि वेबसाईट उद्या पूर्ण आवृत्ती बनून आली की कशी असेल हे पाहण्याची उत्सुकता अनेकांना आहे. बिटा आवृत्तीचा उद्देश हा चाचणीचाच असल्याने काही दोष वा अडचणी तुम्हाला येऊ शकतात. पण तरीही, कितीतरी ब्लॉग्जनी ह्या साईटची वैशिष्ट्यपूर्ण म्हणून दखल घेतली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा