२१ फेब्रु, २०११

बहुगुणी इरफानव्यू

आपला संगणक सारं जग स्वतःमध्ये सामावून घेतो आहे. इंटरनेटची सुरूवात झाली तेव्हा त्याला फक्त अक्षरे आणि आकडेच तेवढे माहीत होते. नुसतं एकरंगी मजकूराचं इंटरनेट नीरस वाटणं हे साहजिक होतं. माणसाला जन्मतःच रंग आणि विविध आकारांचं आकर्षण असतं. इंटरनेटवर अक्षरं आणि शब्दांबरोबर चित्रे, छायाचित्रे हवीत आणि तीही रंगीत, स्पष्ट व आकर्षक हवीत हा ध्यास माणसाने घेणं हे स्वाभाविक होतं. त्यानुसार अतिशय झपाट्याने काम आणि संशोधन होत गेलं, आणि आपला संगणक रंगीत आणि सचित्र झाला. इंटरनेटही त्या पाठोपाठ चित्रमय झालं. माणूस हा समाधान मानणारा प्राणी नाही. मुकी चित्रे आणि छायाचित्रांवर तो थांबून कसा राहणार? स्टील ग्राफीक्स पाठोपाठ तो व्हिडिओच्या मागे न लागता तरच आश्चर्य होतं. माणसाने तेही साध्य केलं. संगणक आणि इंटरनेटवर आता मल्टीमिडिया पूर्णावस्थेपर्यंत पोहोचला आहे. टीव्हीवरच्या सिरीयल्स आणि नवे-जुने सिनेमे आपण आता इंटरनेटवरही पाहू शकतो.
संगणकाची तुलना आपण माणसाच्या शरीराशी केली तर सीपीयु म्हणजे मेंदू, कीबोर्ड आणि माऊस म्हणजे हात-पाय, मदरबोर्ड म्हणजे अस्थिसंस्था, आणि हार्ड डिस्क म्हणजे त्याचं पोट हे वर्णन एखादा शाळकरी मुलगा सुद्धा आता सांगू शकेल. समोरचा स्क्रीन किंवा मॉनिटर म्हणजे संगणकाचा चेहेरा असतो. असंच पुढे जाऊन विचार केला तर संगणकाच्या अंगात डिरेक्टरी किंवा फोल्डर्स म्हणजे रक्तवाहिन्या आणि असंख्य प्रकारच्या फाईल्स म्हणजे संगणकाच्या अंगातल्या पेशी असं आपल्याला सुचू शकतं. संगणक जेव्हा फक्त अक्षरं आणि शब्दांपुरता मर्यादेत होता तेव्हा त्याला TXT किंवा टेक्स्ट फाईल तेवढी माहित होती. पुढे जेव्हा चित्रे आणि छायाचित्रे आली तेव्हा JPG, TIFF वगैरे प्रकारच्या फाईल्स जन्माला आल्या. जेव्हा व्हिडीओ व चलत्चित्र आली तेव्हा AVI, MOV, MPEG ह्या फाईल्स अवतरल्या. आवाजासाठी mp3, midi, wav ह्या फाईल्सना महत्व आलं.
ही सारी बाळबोध प्रस्तावना इथे केली याचं कारण - इरफानव्यू. वाचकहो, कदाचित तुमच्यापैकी कितीतरी जण हे इरफानव्यू नावाचं सॉफ्टवेअर वापरतही असतील. कारण गेली अनेक वर्षे एक उत्तम फ्रीवेअर म्हणून इंटरनेटवर ते गाजतं आहे. मी स्वतः गेली किमान आठ वर्षे ते समाधानाने वापरतो आहे. मात्र अशी काही मंडळी असण्याची शक्यता आहे की ज्यांची ह्या इरफानव्यूशी गाठभेट किंवा ओळख अजून झालेली नाही. जर तुम्ही त्या पैकी एक असाल तर ह्या नंतरच्या परिच्छेदात येणारी माहिती तुम्हाला उपयोगाची वाटेल यात शंका नाही.
बहुगुणी इरफानव्यू असं शीर्षक ह्या लेखाला दिलं याचं कारण इरफानव्यू खरोखरीच बहुगुणी आहे. वर उल्लेख केलेल्या फाईल्स म्हणजे JPG, TIFF, AVI, MOV, MPEG, MP3, MIDI, WAV ह्या उघडण्याची वा चालविण्याची व्यवस्था इरफानव्यू मध्ये आहे. पण ह्या झाल्या फक्त ८ प्रकारच्या फाईल्स. इरफानव्यू ची ताकद प्रचंड आहे. तो एकूण ११७ प्रकारच्या फाईल्स उघडू शकतो. त्यातली एखादी TXT किंवा TTF प्रकारची फाईल सोडली तर बाकीच्या सर्व चित्रे, छायाचित्रे, चलत्चित्रे, आकृत्या, चित्रपट, आवाज यांचेशी संबंधित आहेत. थोडक्यात, इरफानव्यू हा ग्राफीक आणि मल्टीमिडीया फाईल स्पेशालिस्ट आहे. तुमचा संगणक नुकताच आणलेला वा नव्याने फॉरमॅट केलेला असेल तर इरफानव्यू त्यावर अग्रक्रमाने लावा असं मी सुचवेन. कारण उद्या समजा तुम्हाला तुमच्या मित्राने PSD प्रकारची फाईल पाठवली आणि तुमच्या संगणकावर अजून अडोबी फोटोशॉप हे महागडं सॉफ्टवेअर आलेलं नसेल तर ती PSD तुम्ही उघडणार कशी? PSD फाईल म्हणजे फोटोशॉपने तयार केलेली फाईल. ती उघडणार फोटोशॉपमध्ये, आणि तुमच्या संगणकावर फोटोशॉप अजून लागलेलंच नाही. हा पेचप्रसंग इरफानव्यू सोडवू शकतो. कारण इरफानव्यू मध्ये PSD फाईल उघडण्याची व्यवस्था आहे. आणखी एक उदाहरण घेऊ. समजा तुमच्याकडे एक चित्र BMP फाईलचे आहे. ते तुम्हाला तुमच्या ब्लॉगवर, अर्थात इंटरनेटवर टाकायचे आहे. त्यासाठी तुम्हाला ते चित्र JPG किंवा PNG किंवा GIF ह्यापैकी एका फाईल प्रकारात हवं आहे. तर त्यासाठीही इरफानव्यू तुमच्या मदतीला येतो. BMP, JPG, PNG, GIF ह्यापैकी कोणत्याही प्रकारची फाईल कोणत्याही प्रकारात बदलण्याची व्यवस्था इरफानव्यू मध्ये आहे. फाईल्स हँडलींगच्या बाबतीत इरफानव्यू इतकी बहुगुणी सॉफ्टवेअर्स (आणि त्यातही फ्रीवेअर म्हणजे मोफत असणारं टूल) फारच अपवादात्मक आहेत.
इरफानव्यूचे सारे उपयोग एका लेखात बसवून सांगण अशक्य आहे. इरफानव्यू हा एक चांगला MP3 Player सुद्धा आहे. तुमची MP3 गाणी तुम्ही त्यात ऐकू शकता. इरफानव्यू मध्ये स्लाईड शो तयार करता येतो. तोही अगदी दीड ते दोन मिनिटांत. हा स्लाईड शो तुम्हाला Exe फाईल म्हणून सेव्ह करता येतो. एवढच नव्हे तर तोच स्लाईड शो तुम्ही SCR फाईल म्हणजे Screen Saver म्हणूनही सेव्ह करू शकता. तुमची PDF प्रकारची फाईलही इरफानव्यूमध्ये उघडू शकते. म्हणजे काही कारणाने Acrobat Reader करप्ट झाला असेल तर काळजी नको, इरफानव्यू है ना? अक्षरशः "मै हूँ ना" म्हणत इरफानव्यू तुमच्या मदतीला नेहमीच धावून येतोय असं तुमच्या अनेकदा लक्षात येईल. आणखी एक उदाहरण सांगतो. आपले संगणकावरचे छोटे छोटे आयकॉन घ्या. ते ICO प्रकारच्या फाईलमध्ये साठवलेले असतात. इरफानव्यू मध्ये तुम्ही ते उघडू शकता. एखादा फोटो वा चित्र तुम्हाला आवडलं तर ते Wallpaper म्हणून वापरण्यासाठी इरफानव्यूमध्ये सेटींग उपलब्ध आहे. छायाचित्र शार्प करण्याची, ते ब्लॅक अँड व्हाईट करण्याची, ते अधिक आकर्षक (Enhance) करण्याची सोय देखील त्यात आहे. एखाद्या फोल्डरमध्ये अनेक फोटो असतील तर ते सारे फोटो थंबनेल्स स्वरूपात एकदम पाहण्याची सोय इरफानव्यू मध्ये आहे.
असे अनेक उपयोग. त्यासाठी तुम्ही इरफानव्यू वापरून पहायला हवा. वापरण्यासाठी तो डाऊनलोड करायला हवा. त्यासाठी www.irfanview.com ह्या साईटवर तुम्हाला जावं लागेल. इरफानव्यू तसा छोटासाच प्रोग्राम आहे. जेमतेम १.१० एम.बी. आकाराचा. त्या बरोबरचे प्लगिन्सही तुम्ही घ्यायला हवेत कारण ते खूपच उपयोगी आहेत. ते साधारणतः ७ एम.बी. आकाराचे आहेत. म्हणजे साधारणतः ८ एम.बी. आकाराचा हा इरफानव्यू आहे. इरफानव्यू मधला हा इरफान म्हणजे साधारणतः २३-२४ वर्षांचा तरूण आहे. तो मूळचा बोस्नियाचा. आता ऑस्ट्रिया देशात स्थायिक झालेला. त्याचा फोटो तुम्हाला irfanview.com वर पहायला मिळेल.
आणि हो, एक फार महत्वाची गोष्ट सांगायची राहिली. इरफानव्यू हा युनिकोड काँप्लायंट आहे. म्हणजे तुम्ही इरफानव्यूच्या विंडोत मराठी युनिकोड फाँट वापरून टाईपही करू शकता, किंवा चक्क एखादी फाईल मराठी अक्षरात सेव्हही करू शकता. असा हा बहुगुणी इरफानव्यू. हॅटस ऑफ टू यू इरफान. हा प्रोग्राम तू एखाद्या कंपनीला लाखो डॉलर्सना विकू शकला असतास. त्यासाठी बड्याबड्यांनी रांगही लावली असती. पण तू लाखो करोडोंच्या मागे लागला नाहीस. गेली कित्येक वर्षे तू इरफानव्यू फ्री ठेवला आहेस. रियली हॅटस ऑफ टू यू.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा