बातम्या आणि गंभीर विषयांसाठी वर्तमानपत्र वाचायचं आणि मनोरंजनासाठी मासिकं किंवा पुस्तकं वाचायची अशी साधारणतः आपली परंपरा. तशी ही परंपरा जगभरच आहे. पण बातम्या ह्याही मनोरंजनाचा विषय होऊ शकतात हे सिद्ध करणारं एक सदर ऑस्ट्रेलियाच्या सिडनी मॉर्निंग हेराल्ड ह्या जगप्रसिद्ध दैनिकात नेहमी प्रकाशित होत असतं. त्या सदराचं नाव आहे स्ट्रेंज बट ट्रू. म्हणजे विचित्र पण सत्य.
आता एक एक बातम्या पहा. केनियामधला एक अतरंग कैदी. त्याला तुरूंगात मोबाईल फोन न्यायचा होता. तुरूंगात तो न्यायला अर्थातच बंदी होती. त्याने काय शक्कल लढवावी?त्याने एका प्लास्टीकच्या पिशवीत मोबाईल पॅक केला, आणि तो तोंडावाटे गिळला. तो अर्थातच तिथून जठरात गेला असणार. असल्या ह्या क्लुप्त्या कधी कोणाला पचतात का सांगा? त्या कैद्याच्या तपासणीत तो मोबाईल त्याच्या पोटात, मोठ्या आतड्यात गेलेला दिसला. एक्स रे मशिनमध्ये मोबाईल दिसल्यानंतर अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. डॉक्टर म्हणे म्हणाले की हा मोबाईल त्याच्या पोटात जवळ जवळ एक महिनाभर होता. ही बातमी मूळात वाचायची असेल तर त्यासाठी सिडनी मॉर्निंग हेराल्डच्या वेब साईटचा पत्ता आहे:www.smu.com.au/strange
तुम्ही ह्या साईटवर जाऊन इतरही बातम्या जरूर वाचा. त्या वाचून दिवसभरातला थकवा अक्षरशः दूर पळतो. आपल्या दुर्मुखल्या चेहेऱ्यावर कधी हसू आलं हे आपलं आपल्यालाच कळत नाही. आता ही आणखी एक बातमी पहा. ह्या बातम्या ११ जानेवारी २०११ च्या आहेत. दररोज त्या बदलत असतात. सिडनी मॉर्निंग हेराल्ड च्या छापिल अंकात त्या छापल्या जातात. पण इंटरनेटच्या जागतिक सोयीमुळे आपल्याला त्या वाचायला मिळतात. अमेरिकेतल्या ओहीओ प्राणी संग्रहालयातला १८ वर्षे वयाचा अजगर हा म्हणे पिंजऱ्यात पाळला गेलेला आणि जगातला सर्वाधिक दीर्घायुषी असलेला होता. त्याची लांबी सुमारे ७.५ मीटर म्हणजे २२ फूट होती. त्याचं वजन १३६ किलो होतं. दिसायला तो टेलिफोनच्या खांबाएवढा जाड होता. आता यातली बातमी म्हणजे ह्या अजगराचं नाव फ्लफी, आणि हा फ्लफी नुकताच स्वर्गवासी झाला. मृत्युचे कारण म्हणजे त्याच्या पोटात ट्युमर झाला.
आता ही चीनमधली बातमी पहा. चीनमध्ये बिजिंगला ट्रॅफिक जाम झाला. वाहनांची जी लाईन त्यामुळे लागली ती शंभर किलोमीटरपर्यंत लांब होती. म्हणजे थोडफार आपल्या पुणे - ठाणे अंतराएवढी. आता यात मध्ये जे लोणावळ्याला किंवा तळेगावला अडकलेले असतील त्या चिनी भाईंचं काय झालं असेल असा विचार मनात येऊन आपण हंसतोच थोडं तरी.
तर असं हे स्ट्रेंज बट ट्रू. सिडनीचं हे दैनिक विश्वासार्ह बातम्यांसाठी प्रसिद्ध आहे. उगाचच पुड्या सोडण्याची त्यांची ख्याती नाही. त्यामुळे धम्माल बातम्या वाचण्यासाठी ह्या संकेतस्थळावर नेहमीच गर्दी होताना दिसते. मला माहित आहे की त्या गर्दीत लवकरच तुम्हीही जाऊन मान वर करणार आहात. धम्माल बातम्या वाचण्यासाठी. कुठे मिळतात हो आजकाल अशा धम्माल बातम्या? दररोज त्याच त्या भ्रष्टाचाराच्या बातम्या वाचून वाचून आपण पकलेले आहोत. तर तेवढाच हा विरंगुळा. स्ट्रेंज बट ट्रू चा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा