२१ फेब्रु, २०११

उपयुक्त झमझार

The Metamorphosis हे नाव तुम्ही ऐकलं असेल. जगप्रसिद्ध जर्मन कादंबरीकार फ्रँझ काफ्का याची १९१५ साली प्रकाशित झालेली ही कादंबरी. ह्या कादंबरीत ग्रेगर झॅमझाँ (Gregor Samsa) हे एक पात्र आहे. ग्रेगर हा तरूण व्यवसायाने फिरता विक्रेता असतो. रात्री झोपेतून उठल्यानंतर ग्रेगर झॅमझाँचं रूपांतर एका महाकाय किटकात होतं. झुरळ नाही पण आकाराने प्रचंड अशा झुरळासारखा व उडण्याची क्षमता असलेला हा किटक. मूळ माणसाचं रूपांतर किटकात होतं ही कादंबरीची संकल्पना सुमारे पावणेदोनशे वर्षांनंतर एका वेबसाईटला आपल्या नावासाठी घ्यावीशी वाटली. ती वेबसाईट म्हणजे www.zamzar.com.
Zamzar.com ला The Metamorphosis कादंबरीतल्या त्या पात्राच्या नावाचं आकर्षण वाटलं याचं कारण एका गोष्टीचं दुसर्‍या गोष्टीत रूपांतरण होण्याची त्या कादंबरीतली ती संकल्पना. Zamzar.com चा नेमका संबंध रूपांतरणाशीच आहे. ही वेबसाईट फक्त रूपांतरणाचं काम करते. दुसरं काहीही करत नाही. पण तुमच्या आमच्यासाठी झमझार डॉट कॉम प्रचंड आणि कायम उपयोगाची आहे. तुम्ही म्हणाल की असं कसलं रूपांतरण आपल्याला लागत असतं की झमझार सारखी साईट आपल्याला प्रचंड आणि कायम उपयोगाची वाटेल? तुमच्या ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही ह्या साईटला भेट दिलीत की चटकन मिळेल.
झमझार आपल्या संगणकावर असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या फाईल्सचं रूपांतर वेगवेगळ्या प्रकारच्या दुसर्‍या फाईल्समध्ये करते. हे रूपांतरण ऑनलाईन म्हणजे तुम्ही इंटरनेटवर काम करता करता करण्याची सोय झमझारने केली आहे. उदाहरणं देऊन थोडं स्पष्ट करून हे सांगायला हवं. आपण पहिलं उदाहरण तुमच्याकडे असलेल्या डिजिटल कॅमेर्‍याचं उदाहरण घेऊ. आजकाल घरोघरी डिजिटल कॅमेरे आहेत. त्यात तुम्ही जे फोटो घेता ते प्रामुख्याने jpg किंवा jpeg प्रकारच्या फाईल्सच्या स्वरूपात असतात. जेव्हा डिजिटल कॅमेर्‍यातून तुम्ही ते तुमच्या संगणकात उतरवता तेव्हा प्रत्येक फोटो हा .jpg वा .jpeg ह्या फाईल एक्सटेंशनने युक्त असतात. यातला एखादा मूळ jpeg असलेला फोटो समजा तुम्हाला स्मरणिकेत छापायला द्यायचा आहे. छपाईच्या कामात .tif प्रकारच्या फाईल्स सर्रास वापरल्या जातात. छपाई करणार्‍या प्रिंटींग प्रेसने नेमकी जर तुमच्याकडे .tif प्रकारची फाईल मागितली असेल तर? तुमचा फोटो jpeg प्रकारचा आहे. प्रेसला तर tif प्रकारात तुमचा फोटो हवा आहे. अशा वेळी प्रेसच्या त्या गरजेमुळे तुम्हाला तुमची मूळ .jpeg फाईल .tif प्रकारच्या फाईलमध्ये रूपांतरित करणं भाग आहे. हे रूपांतरण फोटोशॉप किंवा कोरल ड्रॉ सारख्या सॉफ्टवेअरमध्ये किंवा Irfanview सारख्या उपयुक्त फ्रीवेअरचा वापर करून होऊ शकतं. पण त्यासाठी तुमच्याकडे ती सॉफ्टवेअर असायला हवीत. नसतील तर डाऊनलोड करून घेण्यासाठी व्यवस्था व वेळ हवा. आणखी एक गोष्ट म्हणजे ती सॉफ्टवेअर वापरण्याची माहितीही हवी. यातलं हवं ते जर तुमच्याकडे तयार नसेल तर Zamzar.com तुमच्या तात्काळ मदतीला येते, आणि तुमची फाईल रूपांतरणाची समस्या सोडवते. तीही मोफत.
एक उदाहरण फोटोचं घेतलं. आता संगीत आणि गाण्यांकडे वळू. समजा तुमच्याकडे गाण्यांची एक सीडी आहे. त्यातली गाणी wav प्रकारच्या फाईल्समध्ये आहेत. तुम्हाला ती mp3 प्रकारच्या फाईलमध्ये हवी आहेत, कारण तुमचा mp3 प्लेअर wav प्रकारातली गाणी प्ले करीत नाही. अशा वेळीही झमझार तुम्हाला wav फाईल्सचं रूपांतर mp3 मध्ये करून देऊ शकतो.

Document प्रकारच्या फाईल्स 

एक अगदी सर्वत्र दिसणारं चित्र म्हणजे मायक्रोसॉफ्ट वर्ड सारख्या लोकप्रिय प्रोग्रामच्या फाईलचं. कुणीतरी आपल्याला ईमेलने अटॅच करून त्याच्याकडील वर्डची फाईल पाठवतो. त्याने पाठवलेली वर्ड फाईल आपल्या वर्ड प्रोग्राममध्ये उघडत नाही. कारण ज्याने फाईल पाठवली त्याच्याकडे मायक्रोसॉफ्ट वर्ड ची २००७ ची आवृत्ती असते. ह्या आवृत्तीत वर्ड फाईल्स तयार होतात त्या docx प्रकारच्या. त्याने पाठवलेली docx फाईल आपण वापरत असलेल्या मायक्रोसॉफ्ट वर्ड २००३ मध्ये उघडत नाही, तिथे फक्त doc प्रकारातली वर्ड फाईलच उघडत असते. म्हणजे गंमत पहा, दोन्हीकडे प्रोग्राम तोच, मायक्रोसॉफ्ट वर्डच. फक्त आवृत्तीत फरक. एक २००७ ची दुसरी नवी, दुसरी २००३ ची त्यामानाने जुनी. अशा पेचप्रसंगात देखील झमझार कामी येतो. तो तुम्हाला doc चे रूपांतर docx मध्ये सहजपणे आणि चुटकीसरशी करून देतो.
वर्डचं जे तेच html आणि pdf चं. नेहमी इंटरनेटवर बसणारांना ह्या दोन्ही प्रकारच्या फाईल्स चांगल्याच पाठ असतात. Html चं रूपांतर pdf मध्ये आणि pdf चं html मध्ये कसं करायचं हा यक्षप्रश्न बड्याबड्यांना पडलेला मी पाहिलेला आहे. हा प्रश्नही झमझार सोडवू शकतो.
वर्डच्या बरोबरीने जवळजवळ प्रत्येक कचेरीत वापरला जाणारा प्रोग्राम म्हणजे एक्सेल. तिथेही xls, xlsx, csv ह्या प्रकारातल्या फाईल्सचं रूपांतर इतर किंवा mdb सारख्या अक्सेस डेटाबेस फाईल्समध्ये करून देण्याचं काम झमझार करू शकतो.
नेहमीचं आपलं पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन घ्या. त्याची ती सुप्रसिद्ध ppt फाईल आपल्याला pdf करून हवी असते. किंवा काही वेळा ppt चं रूपांतर वेबसाईटसाठी फ्लॅशच्या swf फाईलमध्ये करून हवं असतं. तिथेही झमझार सेवा द्यायला सज्ज असतो.
इतर फाईल्स 

आपण नेहमी bmp, jpg, tif, gif, pcx, png ह्या प्रकारच्या इमेज फाईल्स पहात असतो. चित्रे, छायाचित्रे, नकाशे, छोटी अनीमेशन्स, क्लीपार्ट ही बहुधा ह्या प्रकारच्या फाईल्समध्ये दिसते. त्यांच्या रूपांतरणाची व्यवस्था आपल्याला नेहमी लागते. कित्येकदा आपल्या कार्यालयात किंवा घरी संगणकावर त्याची सोय असते. पण कधीतरी प्रवासात वा दौर्‍यावर असताना नेमकं अडलेलं असतं. अशा वेळी जवळच्या कुठल्याही सायबरकॅफेत जायचं आणि झमझार उघडून फाईल्सच्या रूपांतरणाची समस्या सोडवायची ही क्लृप्ती कामी येते.
मुकी छायचित्रे जशी इमेज फाईल्समध्ये असतात तशा चालत्या बोलत्या व्हिडिओ फिल्मस avi, mov, mp4, ram, wmv, vob, mpg, flv, gvi वगैरे प्रकारात असतात. झमझारने हे प्रकारही उपलब्ध केले आहेत.
इमेलला अटॅट होऊन येणार्‍या zip वा rar किंवा cab, tar, lzh प्रकारच्या फाईल्सचं रूपांतरण करण्याचं कामही झमझारवर होऊ शकतं.

वैशिष्ट्ये आणि मर्यादा 

झमझारचं पहिलं वैशिष्ट्य हे की तुम्हाला कोणतही सॉफ्टवेअर यासाठी डाऊनलोड करावं लागत नाही. जे काही करायचं ते थेट इंटरनेटवरच. तिथल्या तिथे. दुसरं म्हणजे, कोणतीही मोफत सेवा इंटरनेटवरून घ्यायची की हमखास रजिस्ट्रेशन नावाचा तापदायक आणि कंटाळवाणा उपचार करणं मोफत असलं तरी सक्तीचं केलेलं असतं. झमझारने तेही टाळलेलं आहे. तुम्हाला कोणतंही रजिस्ट्रेशन न करता ती सेवा मिळते. तुम्ही जी फाईल झमझारकडून रूपांतरित करून घेता ती तुम्हाला तुमच्या ईमेलवर अटॅच करून तात्काळ पाठवली जाते. झमझारच्या ह्या पद्धतीमुळे ती फाईल आपल्याला वेगळी कुठेतरी सेव्ह केली नाही तरी चालते. स्वतः झमझार ती फाईल चोवीस तासपर्यंत बॅकअप करून ठेवतो.
झमझारची सेवा दोन प्रकारची आहे. त्यातली मोफत उपलब्ध सेवा वर सांगितल्याप्रमाणे. यात रूपांतरित करावयाची फाईल १०० एम.बी. आकारापर्यंत असावी लागते. अर्थात तुम्हा-आम्हाला एवढी मर्यादा भरपूर होते, आणि त्याने कधीच अडत नाही. ज्यांना १०० एम. बी. पेक्षा मोठ्या आकाराच्या फाईल्स रूपांतरित करायच्या असतील त्यांना झमझारची पेड सेवा घेता येते. पेड सेवेंतर्गत आणखी काही जादा सेवा झमझार देऊ करतो. फाईलच्या रूपांतरणासाठी आपली फाईल तात्काळ अपलोड होत असली तरी झमझारकडे जाऊन तिला रांगेत उभं रहावं लागतं. आपल्या फाईलच्या रूपांतरणाचं काम पूर्ण करून नवी रूपांतरित फाईल संगणकीय स्वयंचलित पद्धतीने आपल्याला ईमेलने पाठविली जाते हे खरं असलं तरी काही वेळा ह्या कामात काही तास निघून जातात. झमझारने अधिकृतपणे चोवीस तासांची मुदत सांगितली आहे. तेवढी प्रतिक्षा करणं मात्र आपल्याला भाग असतं. पण ही सेवा मोफत व चोख असल्याने जगातले लाखो लोक तेवढी प्रतिक्षा करायला तयार असतात.
झमझारच्या पद्धतीने सेवा देणारी आणखी एक वेबसाईट म्हणजे media-covert.com. मात्र दोन्ही वेबसाईटमध्ये अधिक चांगले व युजर फ्रेंडली डिझाईन आहे ते झमझारचे. १९१५ सालच्या कादंबरीतली संकल्पना एकविसाव्या शतकातल्या नव्या वेब संकल्पनेशी जाऊन कशी मिळते आणि जुळते हे झमझारच्या उदाहरणातून दिसतं. ज्ञानाच्या पेशी स्थल-काल मर्यादा ओलांडून वाहतात त्या ह्या अशा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा