पाणी ही जीवनावश्यक गोष्ट आहे तशी संगणक ही शिक्षणावश्यक गोष्ट आहे. शाळेत, महाविद्यालयात किंवा कोणत्याही शैक्षणिक संस्थेत ग्रंथालयाइतकेच तेथील संगणक आवश्यक बनले आहेत. संगणक म्हंटला की तो एकटा येत नाही. इंटरनेटच्या हातात हात घालूनच आजकाल तो येतो. संगणकाबरोबर इंटरनेटही आता अधिकाधिक जीवनावश्यक होते आहे. आताशा विद्यार्थ्यांची संगणकाशी गाठ पडते ती अगदी कोवळ्या वयात. इयत्ता तिसरी वा चौथीचा विद्यार्थीही आपलं ओर्कुट अकाऊंट किंवा इमेल पत्ता उघडून बसलेला दिसतो. पुढे दहावी-बारावी होताना तो संगणकाला पूर्ण सरावलेला असतो. तो त्याच्या आयुष्याचा भाग बनून गेलेला असतो. काही कारणाने एखादा दिवस जर इंटरनेट कनेक्शन नसले तर तो कासावीस होतो. आपल्याला लिहायचं असावं आणि आपलं पेन सापडत नसेल तर जी अस्वस्थता असते त्यापेक्षा ती अस्वस्थता वेगळी नसते. पेनाइतकंच संगणक आणि इंटरनेट हे विद्यार्थ्याचं अतिशय महत्त्वाचं असं शैक्षणिक अवजार आहे.
एका बाजूला संगणक आणि इंटरनेट शिक्षणावश्यक बनत असताना दुसर्या बाजूला 'युनिकोड' तंत्राची चर्चा सतत कानावर पडते आहे. ' हे तंत्र आपल्या मराठी, हिंदी वगैरे भारतीय लिप्यांशी संबंधित आहे, आणि त्याची आवश्यकता व वापर अतिशय महत्त्वाचा आहे' एवढा संदेश महाराष्ट्राच्या शैक्षणिक जगतात आज बर्यापैकी पसरलेला आहे. हा संदेश कानावर पडलेला असला तरी त्या संदर्भात नेमकी कृती काय करायला हवी, त्या संदर्भातले तंत्र आणि ज्ञान यांचा नेमका अवलंब आपल्या संगणकीय जीवनात कसा करावा याची माहिती नसलेली मंडळी आज शेकड्याने दिसतात. नुकताच एका महाविद्यालयात जाण्याचा योग आला. तेथील प्राचार्यांच्या चेंबरमध्ये बसलेलो असताना त्यांचा पत्रव्यवहार पाहणारा सहकारी तिथे आला. प्राचार्यांकडे पहात त्या सहकार्याने मला विचारलं की "आम्हाला तुम्ही पाठवलेल्या मराठी ईमेल मिळाल्या. त्या वाचता आल्या. पण आम्ही मराठी ईमेल पाठवल्या की पलिकडल्याला त्या वाचता येत नाहीत. असं का होतं?”
प्रश्न साधा आणि नेहमीचा होता. त्याचं उत्तर अर्थातच 'युनिकोड' तंत्रात दडलेलं होतं. मी त्या सहकार्याला विचारलं की "तुम्ही मराठी फाँट कोणते वापरता?” तो म्हणाला "आम्ही पुर्वी एपीएस आणि आकृती फाँट वापरायचो. पण आता 'युनिकोड' वापरतो. तरी असं का होतं?”
त्या प्रश्नाचं उत्तरही सरळ होतं. ईमेल पाठवताना ती UTF-8 एनकोडींगने पाठवायला हवी होती. तसं न केल्याने, म्हणजे फाँट 'युनिकोड' चा आणि एनकोडींग इंग्रजीसाठीचं असल्याने ती समस्या येत होती. त्या सहकार्याला 'युनिकोड' माहीत होतं, पण UTF-8 म्हणजे '8 Bit Unicode Transformation Format' ची माहिती नव्हती. ही माहिती घेण्यासाठी फक्त जिज्ञासेची गरज आहे. कोणतंही विशेष संगणकीय ज्ञान त्यासाठी लागत नाही. पण प्राचार्यांचा सहकारी 'युनिकोड' चा पहिला थर ओलांडून पुढे गेलेला नसल्याने त्याला UTF-8 माहीत नव्हते. परिणामी त्याची मराठी ईमेल पलिकडल्याला नीट दिसत नव्हती. मराठी भाषेतून संपर्क साधताना अडचण येत होती. त्या अडचणीवर उपाय शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्या सहकार्याने निश्चितच केला असावा. पण इंटरनेटवर मोठी मुशाफिरी केल्यानंतरही त्याला निश्चित उपाय मिळालेला नव्हता. मराठी ईमेलसाठी प्राचार्य आपल्या सहकार्यावरच मुख्यत्वे अवलंबून होते. 'मराठीत जात नसेल तर इंग्रजीतून ईमेल पाठव' ही परवानगी देऊन प्राचार्यांनी तात्पुरती ती समस्या बाजूस सारली होती. मराठी संपर्काची जागा इंग्रजी संपर्काला घ्यावी लागली याचं कारण मराठी 'युनिकोड' तंत्राचा पद्धतशीर प्रसार महाराष्ट्रात अद्यापि सुरू झालेला नाही. ग्रामीण भागात, तालुक्यांमध्ये आणि खरं तर मागास जिल्ह्यामध्येही संगणक पोहोचले आहेत हे खरे आहे. पण संगणक वापरणारी मंडळी इंग्रजीपेक्षा मराठीशी अधिक जवळीक असलेली आहेत. त्यांना इंग्रजी भाषेतून संपर्क अवघड वाटतो. मराठीतून ते कितीतरी अधिक चांगल्या प्रकारे संपर्क साधू शकतात. पत्रव्यवहार करू शकतात. पण त्यांना संगणकावर मराठी वापरणं अतिशय कटकटीचं वाटतं. इंग्रजीची स्पेलींग्ज आणि व्याकरण अवघड आणि दुसरीकडे संगणकावर मराठी टायपिंग अवघड. अशा स्थितीत ते शेवटी आपल्या बेताच्या इंग्रजीचा आधार घेतात, आणि मराठी बाजूस सारून इंग्रजीतून वेळ मारून नेतात. 'युनिकोड' तंत्राने खरं तर मराठी टायपिंगची आणि संगणकावरच्या मराठीची समस्या चांगल्या प्रकारे सोडवली आहे. पण आपल्याकडे 'युनिकोड' च्या वापराचे ज्ञान देणारी ज्ञानपोई सहजपणे उपलब्ध नाही. तहान आहे पण पिण्याचे स्वच्छ पाणी देणारी पाणपोई नसेल तर वाटसरूची जी अवस्था होईल तशी 'युनिकोड' तंत्राची आजची अवस्था आहे.
'युनिकोड' ची ज्ञानपोई उपलब्ध करणं ही फार मोठी किंवा फार अवघड अशी बाबच नाही. साधारणतः तासा-दोन तासात हे सारं आवश्यक ज्ञान संगणक वापरणारा कोणीही विद्यार्थी वा व्यक्ती आत्मसात करू शकते. त्यापेक्षा अधिक वेळ देण्याची खरंच गरज नाही. बरं, दोन तासात एकदा हे ज्ञान घेतलं की त्याचा उपयोग आपल्याला आयुष्यभरासाठी होतो. इंटरनेटवर जगातील अनेकांनी ह्या संदर्भातील सचित्र ट्युटोरियल्स उपलब्ध केली आहेत. त्यातील काही मराठीत देखील आहेत. पण स्क्रीनवर वाचून ते ज्ञान आत्मसात करणं अनेकांना जमत नाही हे मात्र खरं. आपल्या महाविद्यालयाच्या पातळीवर सर्वप्रथम प्राचार्यांनी 'युनिकोड' तंत्राची माहिती घेण्याची आवश्यकता आहे. प्राचार्यांना किंवा प्राध्यापकांना मराठी टायपिंग करण्याची गरज कधी लागत नाही, हे खरं आहे. पण गुगलमध्ये एखादा मराठी संदर्भ शोधायची वेळ आली तर केवळ तेवढ्यासाठी त्यांना सहकार्याला बोलवावं लागू नये, हेही तेवढच खरं आहे. मराठी टायपिंगसाठी Transliteration ची पद्धत उपलब्ध आहे. tatwadnyan असं इंग्रजीत टाईप केलं की मराठीत 'तत्त्वज्ञान' हा शब्द आपोआप टाईप होऊ शकतो अशी ती सोय आहे. रात्री किंवा वेळी अवेळी आपल्या संगणकावर अभ्यास वा संशोधनाचे काम करण्याची वेळ प्राध्यापकांवर नेहमीच येते. त्यावेळी तेथे सहकारी उपलब्ध नसतो. मराठी शब्द टाईप करून संदर्भ तर तातडीने शोधायचा असतो. अशा वेळी 'युनिकोड' चे ज्ञान उपयोगी पडते. टायपिंगचा स्पीड असण्याची गरज नाही. मराठी टायपिंग येण्याचीही आवश्यकता नाही. दोन तासात घेता येणारे 'युनिकोड' संबंधीचे आवश्यक ज्ञान घेतलेले असले की आपण संगणकावरच्या मराठी टायपिंगसाठी स्वावलंबी झालेलो असतो. एखादी खाजगी वा गोपनीय मराठी ईमेल पाठवायची तर ती आपली आपण पाठवू शकतो. त्यासाठी सहकार्याला पाचारण करून गोपनीयता घालवण्याची आवश्यकता नसते.
आपल्या महाविद्यालयातील प्राध्यापक मंडळींपर्यंत 'युनिकोड' चे हे पुरेसे ज्ञान पोहोचलेले आहे काय याची खात्री सर्व प्राचार्यांनी करून घ्यायला हवी असं मला वाटतं. जर ते ज्ञान पुरेसे पोहोचलेले असेल तर उत्तमच, पण काही कारणाने तसे नसेल तर मात्र त्यांचेसाठी दोन तासांचे 'युनिकोड' प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यासाठी प्राचार्यांनी पुढाकार घ्यायला हवा. ती एक राष्ट्रीय गरज आहे यात शंका नाही. भारतातील हिंदी, मराठी, गुजराती, कानडी, तेलुगू, मल्याळी, तामिळ, बंगाली, गुरूमुखी (पंजाबी), उडिया ह्या भाषांच्या संगणकीय टायपिंगची समस्या सोडवणं, आणि त्यासाठी उत्तम प्रमाणिकरणाचं काम करण्याचं काम जागतिक स्तरावरील 'युनिकोड' कन्सोर्शियमने केलं आहे. हा कन्सोर्शियम म्हणजे 'ना नफा' तत्त्वावर चालणारी संस्था आहे. त्याची अतिशय सविस्तर माहिती माझ्या 'युनिकोड' तंत्र आणि मंत्र ह्या मराठी पुस्तकात आली आहे. जिज्ञासूंनी ती पहावी असा सल्ला आत्मस्तुतीचा दोष पत्करून मला ह्या लेखात द्यावासा वाटतो. ते दोन तासांचे ज्ञान त्या पुस्तकाच्या २०० पानांत देण्याचा प्रयत्न मी केला आहे. असो. महाराष्ट्रात 'युनिकोड' मराठी रूजणं आज संपर्कासाठी अत्यंत आवश्यक आहे. काही चळवळी रस्त्यावरच्या असतात, पण 'युनिकोड' सारखी चळवळ त्यासाठीच्या ज्ञानपोया ठिकठिकाणी उघडून करण्याची आहे. प्राचार्यांना त्यासाठी फार मोलाचे योगदान देता येईल. ह्या संदर्भात व्यक्तिशः माझी मदत लागल्यास त्या देण्याची माझी तयारी आहे. त्याचा उपयोग प्राचार्यांना झाल्यास मला आनंद वाटेल. संपर्कासाठी माझा ईमेल पत्ता ms@pujasoft.net असा आहे. धन्यवाद.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा