२१ फेब्रु, २०११

ब्लुक वर एक लूक

बुकर पुरस्कार जगभर प्रसिद्ध आहेत. १९९७ चा बुकर पुरस्कार भारतीय लेखिका अरूंधती रॉय यांच्या 'दि गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज' ह्या कादंबरीला मिळाला, किंवा अगदी अलिकडचा २००६ बुकर पुरस्कार आपल्या किरण देसाईंना त्यांच्या 'दि इनहेरीटन्स ऑफ लॉस' ह्या कादंबरीला मिळाला. खेरीज व्ही.एस. नायपॉल किंवा सलमान रश्दी यांच्या कादंबर्‍यांना मिळालेले बुकर पुरस्कार आपण कुठे ना कुठे वाचले, ऐकले वा टीव्हीवर पाहिले आहेत. बुकर पुरस्कारांना ३८ वर्षांची परंपरा आहे. पन्नास हजार ब्रिटीश पौंडाचा (सुमारे ४१ लाख रूपये) हा पुरस्कार जगभर प्रचंड प्रतिष्ठेचा मानला जातो.

बुकर पुरस्कार जेवढे परिचयाचे आहेत तेवढेच ब्लुकर पुरस्कार अपरिचित आहेत. आपल्यापैकी बर्‍याच जणांना ब्लुकर पुरस्कार म्हणजे बुकर पुरस्काराची काहीतरी नक्कल असावी असं वाटण्याची शक्यता आहे. ते स्वाभाविकही आहे. कारण बुकर आणि ब्लुकर ह्या दोन शब्दांमध्ये चांगलच साधर्म्य आहे. शब्दांमधील अक्षरांमध्ये बराचसा सारखेपणा असला तरी बुकर आणि ब्लुकर यांच्यात माध्यमाचा मोठाच फरक आहे. बुकर पुरस्कार लिखित वा पुस्तकरूपाने प्रसिद्ध झालेल्या कादंबर्‍या वा साहित्याला दिला जातो. ब्लुकर हा शब्द ब्लॉग ह्या शब्दाशी साधर्म्य दाखवणारा आहे. इंटरनेटच्या महाजालात दररोज हजारो ब्लॉग्जची भर पडते आहे. ह्या ब्लॉग्जमधून ज्या कादंबर्‍या किंवा अन्य साहित्य (नंतर पुस्तकरूपाने तयार होण्याजोगे) निर्माण होते त्यांना 'ब्लुक' असे नाव दिले गेले आहे. बुक हे छापिल पुस्तक, आणि ब्लुक हे इंटरनेटवरील ब्लॉग (वा एखादे संकेत स्थळ) वर तयार झालेले पुस्तक. बुक साठी बुकर पुरस्कार आणि ब्लुक साठी ब्लुकर पुरस्कार असा एकूण प्रकार आहे.

ब्लुकर पुरस्काराची सुरूवात २००६ साली झाली. त्याची एकूण रक्कम फक्त ८१७५ ब्रिटीश पौंडांची (सुमारे ७ लाख रूपये) आहे. बुकर आणि ब्लुकर मध्ये एकूण सात पटींचा फरक आहे. २००६ आणि २००७ अशी एकूण दोनच वर्षे ब्लुकर पुरस्कार दिले गेले आहेत. तिसर्‍या वर्षीचे म्हणजे यंदाच्या २००८ ब्लुकर पुरस्काराची तयारी व घोषणा मात्र अद्यापि व्हायची आहे. ब्लुकर पुरस्कार तीन प्रकारात दिले जातात. पहिला काल्पनिक साहित्य किंवा फिक्शन. दुसरा काल्पनिक नसलेले लेखन अर्थात नॉन फिक्शन, आणि तिसरा वेब कॉमिक. पुरस्काराची एकूण सात लाखाची रक्कम ह्या तीन प्रकारातील पुरस्कारांसाठी विभागली जाते.

२००७ मधील ब्लुकर पुरस्कारात नॉन फिक्शन विभागातील पुरस्कार विजेता एक तरूण अमेरिकन सैनिक आहे. त्याचे नाव कोर्बी बझैल. २००४ साली तो इराकमध्ये सैनिकी ड्युटीवर होता. मशिनगन चालवणं आणि शेकड्यांनी गोळ्या झाडणं हे त्याचं काम होतं. बझैलला जेव्हा वेळ मिळे तेव्हा तो आपल्या टेंटमध्ये असलेल्या इंटरनेट कॅफेमध्ये न चुकता जात असे. इतर सैनिकही तिथे जात. पण त्यांचे लक्ष गेम खेळणे, सिनेतारकांची छायाचित्रे पाहणे वगैरेंकडे असे. बझैल इंटरनेट कॅफेत संगणकावर बसून आपल्या ब्लॉगमध्ये रोजचे अनुभव लिहून ठेवत असे. त्याचं हे लिखाण सतत आठ आठवडे चाललं. आठ आठवड्यांत त्याच्या ह्या ब्लॉगने चांगला आकारही घेतला होता. ह्या ब्लॉगमधून एक ब्लुक किंवा पुस्तक तयार होईल हे त्याच्या ध्यानीमनीही नव्हतं. आठ आठवड्यानंतर बझैलचा हा उद्योग त्याच्या अधिकार्‍यांच्या लक्षात आला. त्यांनी अर्थातच त्याचं पुढलं लिखाण थांबवलं. दरम्यानच्या काळात त्याचा ब्लॉग पत्रकारांमध्ये चांगलाच माहितीचा झाला होता. इराकमध्ये प्रत्यक्ष मशिनगन चालवणारा एक सैनिक खुद्द युद्धस्थळावर अनुभवलेला हाल कथन करत असल्याने कित्येक वृत्तपत्रांनी त्याच्या ब्लॉगचा उल्लेख आपल्या वृत्तांतून केला. साहजिकच प्रकाशकांचं लक्ष त्या ब्लॉगकडे गेलं. त्यातून My War: Killing Time in Iraq हे ब्लुक जन्माला आलं. ह्या पुस्तकाची रॉयल्टी बझैलला जी काही मिळाली असेल ती असेल. पण २००७ च्या ब्लुक पुरस्कारांचा तो मानकरी ठरला. बझैल म्हणतो, की मी ब्लॉग लिहीला नसता तर हे कधीच शक्य झालं नसतं.

ब्लुकर पुरस्कारांच्या निमित्ताने ब्लॉग ह्या माध्यमाचे साहित्य जगतातील योगदान किती महत्वाचे आहे हे लक्षात आल्यावाचून रहात नाही. बझैल सारखा शेकडो शत्रूसैनिक ठार मारणारा माणूस ब्लॉग लिहीतो तो केवळ आपल्या समाधानासाठी. पण त्यातून एक पुस्तक जन्माला येतं आणि पेनग्विनसारखा प्रकाशक ते प्रकाशित करतो ह्या उदाहरणावरून बरच काही घेण्यासारखं आहे. मराठीमध्ये आज हजाराहून अधिक ब्लॉग्ज दिसतात. युनिकोड फाँटस सहज उपलब्ध झाल्याने अगदी सामान्यातला सामान्य माणूस आपले विचार व अनुभव मराठीतील आपल्या ब्लॉगवर नोंदवू शकतो. गावोगावी पसरलेले सायबर कॅफे, ब्रॉडबँडचा झपाट्याने होत चाललेला प्रचार आणि अन्न, वस्त्र, निवार्‍याबरोबर आवश्यक बनू पहाणारं इंटरनेट यांतून अनपेक्षितपणे कितीतरी ब्लुक्स आपल्यासमोर येऊ शकतात.

तळागाळांतून उभं राहिलेलं दलित साहित्य हे मराठी साहित्यातील एक अतिशय महत्वाचं दालन आहे. पण लिहीलं गेलेलं सर्वच दलित साहित्य पुस्तक रूपाने छापलं गेलं असेल असं नाही. असं साहित्य सहजपणे ब्लॉगवर जाऊ शकतं. त्यातून ब्लुग्ज जन्माला येऊ शकतात. बुक आणि ब्लुक यात फरक हा की बुकसाठी प्रकाशक शोधावा लागतो, आणि तो सहजासहजी मिळत नाही. मी लिहीलं तर कोण प्रकाशित करणार, मग लिहा कशाला उगाच? असा प्रश्न करणारांना ब्लॉग आणि ब्लुक हे दोन शब्द म्हणजे वरदानच आहेत. कोणी प्रकाशित केलं नाही तरी तुमचा ब्लॉग प्रकाशित होऊ शकतो. त्यासाठी एक दमडीही खर्च येत नाही. संगणक व इंटरनेटचं जुजबी ज्ञान त्यासाठी पुरेसं असतं हा संदेश बझैलच्या उदाहरणावरून आपल्यापर्यंत पोहोचतो आहे.

मध्यंतरी एक मराठी ब्लॉग चालवणारा किशोरवयीन मुलगा भेटला. तो स्वतःच्या कवितांचा ब्लॉग चालवतो. तो म्हणाला "मला ब्लॉग हा प्रकार फारच आवडतो. कारण तो माझी एकही कविता 'साभार' पाठवत नाही. माझ्या सर्व कविता त्यावर प्रकाशित होतात. त्यावर कॉमेंटस आल्या की मला धमाल वाटते. कविता मी कुठेही पोस्टाने पाठवत बसत नाही."

मला वाटतं की आपल्या प्रकाशकांनी ह्या ब्लुक प्रकाराकडे लक्ष ठेवून असायला हवं. मराठीतला एखादा बझैल त्यातून त्यांना केव्हा मिळेल हे सांगता येणार नाही. मराठी ब्लॉग्जमधून जर ब्लुक्स जन्माला येऊ लागली तर शासनानेही त्याकडे स्वागताचा कटाक्ष टाकायला हवा. ब्लुक्ससाठी शासनाचा पुरस्कार जाहीर झाला तर मराठीच्या मुकुटातील ते एक नवे पिस ठरल्याशिवाय राहणार नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा