२१ फेब्रु, २०११

वेबचे संदर्भशास्त्र

ग्रंथालय आणि तेथील ग्रंथ व तत्सम सामग्री ह्या परंपरेने चालत आलेल्या संदर्भांच्या मुख्य खाणी.एखाद्या विषयाचा नव्याने अभ्यास सुरू केलेला कोवळा विद्यार्थी असो की संशोधनात गुंतलेला एखादा पीएच.डी. किंवा एम.फील. चा विद्वत्तेची झालर प्राप्त झालेला अध्यापक असो, संदर्भाच्या खाणीत गेल्याशिवाय विषयाला खोली आणि समृद्धी लाभणं अवघडच. संदर्भासाठी 'पावले चालती ग्रंथालयाची वाट' आणि 'बोटे चाळिती पुस्तकांची पानं' हे नेहमीचच. एरवी महाविद्यालय प्रशासनात व्यस्त झालेल्या प्राचार्यांचीही अध्यापन आणि संशोधनाशी असलेली नाळ कायम असते. मग संदर्भांसाठी केबिनमध्ये ग्रंथ मागवणं, किंवा काही वेळा चक्क केबिन सोडून ग्रंथालयात जाऊन बसणं ज्यांना चुकलं असे प्राचार्य असणं दुर्मिळच. संदर्भ हे पुस्तकाच्या किंवा माणसाच्या माध्यमातून उपलब्ध होणं ही विसाव्या शतकापर्यंतची परंपरा आज एकविसाव्या शतकातही तशीच, तेवढच महत्व असलेली दिसून येते. जेव्हा एखादा संदर्भ पुस्तकात सापडत नाही तेव्हा हमखास एखाद्या अनुभवी ज्ञानवंताला दुरध्वनी करायचा, किंवा अगदी भेटायला जाऊन त्यांचा सल्ला घ्यायचा हे नेहमीच घडतं. असं न घडता डॉक्टरेट पदरात पडलेला संशोधक सापडणार नाही. पुस्तक आणि माणसं ह्या संदर्भाच्या दोन आद्य स्त्रोतांमध्ये आता भर पडली आहे ती वेबची अर्थात इंटरनेटची. पुस्तकं ही साधी सरळ, गरीब स्वभावाची, गंभीर, काहीशी पोक्त आणि आज्ञाधारक विद्यार्थ्यांसारखी असतात. संदर्भ देऊन ती पळून जात नाहीत. किंवा, संदर्भ देताना थट्टामस्करी करून अवसानघात करत नाहीत. त्यांची ही अशी खात्री देता येत असल्याने पुस्तकांतल्या संदर्भांवर अवलंबून राहता येतं.
पण वेब उर्फ इंटरनेट नामक संदर्भस्त्रोत हा पुस्तकाच्या अगदी उलटा वाटतो. वेब म्हणजे खट्याळ स्वभावाचा, काहीतरी संदर्भ दिला आणि तो संदर्भासहित वेबसाईटच गायब झाली हा अनुभव अशक्य नसतो. चुकीचे संदर्भ छातीठोकपणे देऊन नंतर पुढे त्यात परस्पर दुरूस्ती अपलोड करून टाकणं हे पुस्तकांत घडणं अशक्य, पण वेबमध्ये सर्रास घडू शकतं. कुणातरी तिसर्‍याच्या नावे चौथ्याने काहीतरी संदर्भ सांगून टाकून वेबवर थरार निर्माण करून थट्टामस्करी करणार्‍या साईटस् आणि ब्लॉगची तर रेलचेलच असते. अशा ह्या वेबच्या संदर्भांवर किती अवलंबून रहायचं. हा मोठाच प्रश्न संदर्भाच्या ग्राहकांपुढे असतो.
संदर्भ ही एक वस्तू (कमोडिटी) मानून ह्या प्रश्नाचा विचार केला तर त्यातून थोडा मार्ग सापडतो. संदर्भाची मग एक बाजारपेठ कल्पनेत तयार होते. बाजारपेठ म्हंटलं की मग निरनिराळे प्रवाह असणार हे ग्राहकाला गृहित धरायचच असतं. पुस्तकांतील संदर्भ ही एक बाजारपेठ आणि वेबवरील संदर्भ ही दुसरी वेगळी बाजारपेठ धरून विचार करीत थो़डं आणखी पुढे गेलं की काही मुद्दे स्पष्ट होऊ लागतात. पुस्तकांच्या बाजारपेठेतही काही उत्पादने दर्जाच्या दृष्टीने निकृष्ट मानून त्यातून संदर्भ उचलणं आपण टाळत असतो. हे इतकं अंगवळणी पडून गेलेलं असतं की त्या बाबतीत हंसाचं नीरक्षीरविवेकाचं तंत्र आपण नकळत अवलंबत असतो. त्यात आपली सहसा चूक होत नाही. वेबच्या बाबतीत मात्र चूक होते. याचं कारण पुस्तकांची आणि आपली ओळख पिढ्या न पिढ्यांची आहे, आणि वेबचं कार्ट आपल्या टेबलावर काल-परवाचं आलय. त्याची आपली तेवढी घसट नाही. त्यात पुन्हा त्याची वरवर दिसणारी लक्षणं काही ठीक नाहीत. त्यामुळे त्याच्याकडून काही संदर्भ उचलायचे तर आपल्यापुढे भरपूर प्रश्नचिन्ह असतात. काही वेळा ती प्रश्नचिन्ह इतकी नको वाटतात की वेबच्या संदर्भांवर नकळत अघोषित बहिष्कार टाकून आपण केवळ पुस्तकांतील संदर्भांवर गुजराण करतो. ते सोयीचही असतं आणि खात्रीचंही असतं.
पण वेबला संदर्भांच्या बाबतीत असं वाळीत टाकणं एकविसाव्या शतकात परवडणारं राहिलेलं नाही. वेब लायब्ररीयनची संकल्पना आता रूजली आहे. लायब्ररी म्हणजे फक्त पुस्तकं ही पारंपारिक संकल्पनाही आता नदीचं पात्र विशाल व्हावं तशी प्रचंड रूंदावलेली आहे. लायब्ररीत आता ईबुक्स, सीडीज, डीव्हीडीज स्थिरावल्या आहेत. त्यांची उपयुक्तता स्वीकारली गेली आहे. त्या ईबुक्स, सीडीज आणि एकूणच ईसंदर्भांचं मूळ बीज आपल्याला वेबवर कुठेतरी सापडतं. लायब्ररीतली एकूणच ईसामग्री वेबच्या ऐरणीवर ठाकून ठोकून पाहून तपासणं शक्य असतं. वेब हे द्वाड कार्ट असलं तरी ते फार हुशार, प्रचंड स्मरणशक्तीची क्षमता असलेलं, रोजच्या रोज येऊन पडणारी नवनवी माहिती आत्मसात करून ती ज्ञानदूताच्या भूमिकेतून उपलब्ध करणारं असं गुणी पोरंही आहे. प्रश्न इतकाच की त्यातला द्वाडपणा पारखून आणि ज्ञानाची शक्तीस्थळे ओळखून त्याला संदर्भाच्या कामाला नेमकं कसं लावायचं?
प्रिंट बुक आणि ईबुकचा विषय नेहमी निघतो. तो निघाला की पहिला मुद्दा मी तरी मांडतो तो हा की प्रिंट बुक्स म्हणजे मुक बधिर विद्वानासारखी आहेत. तुमचं काही ऐकून घ्यावं किंवा तुमच्याशी काही संवाद साधावा यासाठीची इंटरॅक्टीव्ह क्षमता त्यांच्याकडे नाही. छापिल पुस्तकांतील पानं ही जुन्या तोफा आणि रणगाड्यांसारखी. ईबुक्समधील ऑडिओ, व्हिडिओ आणि सर्चची क्षमता आजच्या अत्याधुनिक दूर पल्ल्याच्या अचूक क्षेपणास्त्रांसारखी. त्यांना जोड रोजच्या रोज अपडेट होणार्‍या वेबची. अशा ह्या अफाट शक्तीमान तंत्रज्ञानाच्या मुसक्या बांधून त्याला आपल्या संदर्भाच्या कामासाठी लावणं, आणि ते काम त्याच्याकडून पूर्ण विश्वासार्हतेनं करून घेणं हे आजचं आव्हान आहे. वेबचं संदर्भशास्त्र Referology किंवा Science of Web Referencingहा त्यामुळेच आजचा एक स्वतंत्र आणि आव्हानात्मक विषय आहे. हे काम केवळ वेब लायब्ररीयनवर सोपवून मोकळं होणं ही चूक ठरेल. कारण वेब लायब्ररीनच्या कामाचा आवाकाही काही कमी नाही. वेबवर येणारं सारं केवळ गुगल सारख्या सर्च इंजिनवरूनच शोधून मिळेल हा भोळा समज आहे हे आता आपल्या लक्षात येतय. गुगलला मानवी मेंदूचे म्हणजे वेब लायब्ररीयनचे हात लागणं आवश्यकच आहे. त्यातून सुटका नाही. गुगल सारखी सर्च इंजिन्स ही ज्ञानप्रलयाचे लोंढे आपल्यावर आणून आदळत असतात. आपण त्या पाण्यातून विशिष्ट शिंपले आणि मोती शोधू पहात असतो, पण होतं असं की ज्ञानप्रलयाचा लोंढा इतका भीषण असतो की त्यात आपणच वाहून जातो. शिंपले, मोती तर कुठल्या कुठे जातात. ह्या लोंढ्यातून आपल्याला सावरण्याचं काम वेब लायब्ररीयन बरच करू शकेल. पण त्याच्या शक्तीलाही मर्यादा पडणारच. कुठे काय आहे, हे तो सांगेल. पण कुठलं विश्वासार्ह आहे, ते तपासण्याचे मार्ग कोणते, संदर्भाचे शोध घेण्याच्या नवनव्या क्लृप्त्या कोणत्या, तंत्रज्ञान कोणतं हे संदर्भशास्त्रज्ञ सांगू शकेल.
माझ्यापुढे lii.org नावाची वेबसाईट आहे. Librarians Index to Internet म्हणजे L I I. ही साईट संदर्भशास्त्राच्या दिशेने काम करणारी एक नमुना वेबसाईट आहे असं मला वाटतं. संदर्भाची खाण म्हणून तर ती काम करतेच. पण जगातले अनेक क्रियाशील वेब लायब्ररीयन्स मिळून वेबवरील विश्वासार्ह संदर्भस्थळे जोखतात आणि ती आपल्यापुढे पेश करतात, अशी ह्या साईटची भूमिका आहे. उद्याच्या वेब संदर्भशास्त्राच्या सुरूवातीच्या धड्यांची ही केवळ सुरूवातीची पाने आहेत. त्यात अनेक बदल होत जातील. नवनवी तंत्रे त्यात येऊन मिळतील. वेबवरील 'पॉझिटीव्ह ग्लोबल ग्रुपिझम' केवळ लिनक्ससारखी ऑपरेटींग सिस्टमच तयार करू शकेल असं नाही, तर तो विश्वासार्ह संदर्भस्थळांची मांदियाळीही निर्माण करू शकेल. उद्या असं होऊ शकतं याची जाणीव आज ठेवणं हे आपल्याला क्रमप्राप्त आहे. महाविद्यालयातले अध्यापक आणि ग्रंथपाल काही विद्यार्थी हाताशी धरून आणि वेबसारखे जगव्यापक माध्यम कामाला लावून ह्या दृष्टीने लहान मोठे प्रकल्प आपल्या स्तरावर हातात घेऊ शकतात. वेबचे संदर्भशास्त्र आकार घेण्यासाठी असे प्रकल्प फार उपयुक्त ठरतील यात शंका नाही. वेबचे संदर्भशास्त्र जेवढे आणि जेवढ्या त्वरेने आकार घेईल तेवढे तेथील संदर्भ मानवाच्या कामी येऊ लागतील. वेबच्या आजच्या ज्ञानप्रलयात हिरे-माणकंही वहात आहेत, आणि गटारगंगेचे प्रवाहही उसळ्या घेत आहेत. संदर्भाच्या बाजारपेठेत आज मंदीचे नाही खरे आव्हान तेजीचे आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा