२१ फेब्रु, २०११

ड्व्होरॅक (Dvorak) कीबोर्ड

माणूस परंपरेने चालत असतो असं म्हणतात. काँप्युटरचा कीबोर्ड हे एका परंपरेचच प्रतीक आहे. कीबोर्डची ही परंपरा चालत आली आहे १८७२ सालापासून. म्हणजे कीबोर्डच्या परंपरेला आता १३३ वर्षे झाली. संगणकाचा जो कीबोर्ड आज आपण वापरतो त्याला QWERTY कीबोर्ड असं म्हंटलं जातं. कीबोर्डवर अक्षरांची जी सर्वांत वरची बटणं असतात त्यात QWERTY ही ओळीने पहिली सहा अक्षरं. कीबोर्डवरील अक्षरांची ही रचना आणि पहिला टाईपरायटर तयार केला ख्रिस्तोफर शोल्स ह्या अमेरिकन माणसाने. १८७२ साली शोल्सने त्याचे पेटंट रेमिंग्टन ह्या टाईपरायटर कंपनीला १२००० डॉलर्सना र्विकून टाकले. तेव्हापासून शोल्सने तयार केलेली QWERTY कीबोर्डवरील अक्षरांची रचना काहीही बदल न होता जशीच्या तशी चालत आली आहे. काँप्युटरच्या कीबोर्डनेही शोल्सची ही रचना स्वीकारली आणि ती आता जगभर चालू आहे.
ख्रिस्तोफर शोल्स हा मूळचा एक पत्रकार. १८४५ साली तो 'साऊथपोर्ट टेलिग्राफ' नावाच्या एका छोट्या वृत्तपत्राचा संपादक होता. शोल्स पत्रकार असला तरी त्याच्या पिंडात एक संशोधक भिणलेला होता. तंत्रज्ञानविषयक त्याचे काही ना काही उद्योग सतत चाललेले असतं. कागदावर पान क्रमांक छापण्याचे जे छोटे यंत्र होते त्या यंत्राच्या आधारावर क्रमांकांच्या जागी अक्षरे टाकून त्याने एक मिनी टाईपरायटर तयार केला होता. आपल्या ह्या संशोधनाचं पेटंटही शोल्सने १८६४ साली नोंदवलेलं होतं. टाईपरायटरच्या ह्या टप्प्यापर्यंत QWERTY अक्षररचना शोल्सच्या स्वप्नातही नव्हती. पुढे १८६८ साली त्याने टाईपरायटरचं आणखी एक यंत्र तयार केलं आणि त्याचं पेटंटही आपल्या नावावर नोंदवलं. ह्याच दरम्यान कधीतरी QWERTY अक्षररचना तयार झाली.
खरं तर शोल्सने टाईपरायटरचा जो पहिला प्रयत्न केला होता त्यातली अक्षररचना ABCDEFG अशी क्रमाने म्हणजे अकारविल्हेच होती. ह्या पद्धतीने असलेल्या टाईपरायटरमधील अक्षरांचे दांडे टाईप करताना एकमेकात अडकत असतं. हे दांडे एकमेकात अडकले की टायपिस्टचं काम थांबत असे. टायपिस्टला ते अडकलेले दांडे हाताने सोडवावे लागत आणि मग पुन्हा टायपिंग सुरू करावे लागे. ह्या दोषावर मात करण्याचा प्रयत्न शोल्स आणि त्याचा व्यवसायातला भागीदार जेम्स डेन्समोर हे दोघे करीत होते. टायपिंग करताना नेमक्या कोणत्या अक्षरांच्या दांड्या वारंवार अडकतात याचे निरीक्षण डेन्समोरने केले. त्या निरीक्षणातून वारंवार अडकणार्‍या अक्षरांच्या दांड्यांच्या जागा त्यांनी बदलून पाहिल्या. अशा प्रकारे जागा बदलल्याने मूळची ABCDEFG अशी जी अकारविल्हे अक्षररचना मूळ कीबोर्डवर होती ती बदलली गेली. पण अक्षरांच्या दांड्या अडकण्याचे प्रमाण खूपच कमी झाले. अक्षरांच्या जागा बदलण्याच्या ह्या खटाटोपातूनच QWERTY ह्या अक्षररचनेचा आज वापरात असलेला कीबोर्ड तयार झाला. पुढे रेमिंग्टन टाईपरायटर कंपनीने आपला टाईपरायटर बाजारात आणला तो ह्याच अक्षररचनेला कायम स्वीकारून. पुढे टायपिस्टसच्या कितीतरी पिढ्या हाच कीबोर्ड शिकून आपला टायपिंग स्पीड वाढवत राहिल्या. इतर टाईपरायटर कंपन्यांनीही हीच अक्षररचना कायम ठेवून आपले टाईपरायटर बाजारात आणले.
शोल्सचा हा जो जगभर वापरला जाणारा कीबोर्ड (म्हणजे QWERTY ही अक्षररचना) आहे त्यामागे केवळ टाईपरायटरच्या अक्षरांच्या दांड्या एकमेकात अडकू नयेत इतकाच विचार आहे. आज आपण आपल्या काँप्युटरचा कीबोर्ड वापरतो त्यातही तीच अक्षररचना आली आहे ती केवळ परंपरेतून. ही परंपरा तोडण्याचा अंशतः यशस्वी प्रयत्न केला तो डॉ. ऑगस्ट ड्व्होरॅक ह्या शिक्षणतज्ज्ञाने. ड्व्होरॅक ह्या नावाचा उच्चार करताना सुरूवातीस ड चा अगदी पुसटसा उच्चार केला जातो. तो पुसटसा उच्चार ऐकू न आल्यास डॉ. ऑगस्ट व्होरॅक असेच नाव कानी पडेल. डॉ. ड्व्होरॅक हे वॉशिंग्टन विद्यापीठात सिअॅटल येथे शिक्षणशास्त्र आणि मानसशास्त्राचे प्राध्यापक होते. टायपिस्ट जेव्हा टायपिंग करीत असतो तेव्हा त्याचे काम तणावाचे न होता आरामदायी (Ergonomic) व्हावे आणि टायपिस्टची उत्पादकता वाढावी असा प्रयत्न डॉ. ड्व्होरॅक करीत होते. त्यांनी माणसाच्या बोटांचा शारिरीक व हालचालींच्या दृष्टीकोनातून बारकाईने अभ्यास केला. डॉ. ड्व्होरॅक यांचे हे संशोधन चालू होते १९३० च्या आसपास. १९३२ साली ते पुर्णत्वाला जाऊन त्यांचा नवा कोबोर्ड तयार झाला. १९३६ साली त्यांचे पेटंट अमेरिकन सरकारने नोंदवले. तो काळ दुसर्‍या महायुद्धाचा होता. महायुद्धाच्या समस्येपुढे डॉ. ड्व्होरॅक यांचे हे नवे संशोधन मागेच राहिले. १९७५ साली डॉ. ड्व्होरॅक यांचे निधन झाले. त्यानंतर सात वर्षांनी म्हणजे १९८२ साली त्यांच्या ह्या कीबोर्डला रितसर मान्यता मिळाली. पुढे आयबीएम कंपनीने आपल्या काँप्युटर कीबोर्डसाठी ड्व्होरॅक कीबोर्डचा पर्यायही उपलब्ध केला. १९८४ साली ड्व्होरॅक कीबोर्ड वापरणारे १००००० टायपिस्ट अमेरिकेत होते. १९९५ ची मायक्रोसॉफ्ट विंडोज ९५ आली तेव्हा त्याबरोबर नेहमीच्या QWERTY कीबोर्डबरोबर डव्होरॅक कीबोर्ड देखील उपलब्ध करण्यांत आला. आजही तुमच्या आमच्या संगणकावर तुम्ही ड्व्होरॅक कीबोर्ड वापरू शकता. एक गंमत म्हणून तो वापरून पहायला काहीच हरकत नाही.
तुम्ही जर Windows 98, Windows XP किंवा Windows Vista वापरत असाल तर तुमच्या संगणकावरचा तोच कीबोर्ड कायम ठेवून तुम्हाला ड्व्होरॅक कीबोर्ड (सॉफ्टवेअरच्या सहाय्याने) पद्धतीने टाईप करता येईल. त्यासाठी Help मध्ये जाऊन Dvorak हा एकच शब्द टाईप करून माहिती शोधा. तुम्हाला आवश्यक ती सर्व माहिती Windows Help मध्ये मिळेल. ड्व्होरॅक कीबोर्डचं वैशिष्ट्य म्हणजे त्यात तुम्हाला एका हाताने टाईप करण्याची सोय आहे. आपला नेहमीचा QWERTY हा कीबोर्ड दोन्ही हातांनी टाईप करावा लागतो. पण खूपदा एखादा हात प्लास्टरमध्ये असेल किंवा काही दुखणे असेल तर एका हाताने (डाव्या आणि उजव्या कोणत्याही) टाईप करण्याची सोय ड्व्होरॅक कीबोर्डमध्ये आहे. अर्थात ज्यांना दोन्ही हातांनी टायपिंग करायचे असेल तर तीही सोय अर्थातच ड्व्होरॅक मध्ये आहे.
आता कोणी म्हणेल की हे काहीतरी काँप्युटर सॉफ्टवेअरवाल्यांचे नवे फॅड आहे. तर मंडळी तसं नाही. ड्व्होरॅक कीबोर्ड हा गीनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस मध्येही गेला आहे. २००५ मध्ये बार्बारा ब्लॅकबर्न ह्या महिलेने ड्व्होरॅक कीबोर्ड वापरून दर मिनिटाला २१२ शब्द ह्या वेगाने टायपिंग करून दाखवले. तिचा हा टायपिंग वेग गीनेस बुकवाल्यांनी जगातील सर्वांत फास्ट टायपिंगचा विक्रम म्हणून नोंदवलेला आहे. ह्या कीबोर्डची माहिती विंडोजच्या हेल्पव्यतिरिक्त इंटरनेटवर सर्वत्र उपलब्ध आहे. http://www.gigliwood.com/abcd/ ह्या साईटवर तर A basic course in Dvorak (त्याला ABCD असं छान नाव दिलं आहे) हा कीबोर्ड शिकण्याचा एक कोर्सच उपलब्ध आहे. http://www.mwbrooks.com/dvorak/di.html ही साईट एका सेवाभावी संस्थेची म्हणजे Dvorak International यांची आहे. ही संस्था ह्या कीबोर्डचा प्रचार जगभरात सर्वत्र व्हावा यासाठी प्रयत्नशील आहे. तुमच्या संगणकावर ड्व्होरॅक कीबोर्ड कसा लावायचा याची माहिती http://www.dvorak-keyboard.com/convert.html ह्या साईटवर उपलब्ध आहे.
जे हा कीबोर्ड वापरतात त्यापैकी अनेकांचं म्हणणं असं आहे की हा कीबोर्ड वापरून तुमचा टायपिंग स्पीड ७० ते १०० टक्केपर्यंत वाढू शकतो. हे म्हणणं खरं असेल तर मग आजपर्यंत ह्या कीबोर्डचा प्रचार का झाला नाही? तो सगळीकडे मोठ्या प्रमाणावर का पसरला नाही? असे प्रश्न तुम्हा-आम्हाला पडणं स्वाभाविक आहे. ड्व्होरॅक कीबोर्डचे जे पाठिराखे आहेत ते त्यावर म्हणतात की परंपरा न सोडण्याची आपली वृत्ती त्याला कारणीभूत आहे. वेगळा मार्ग चोखाळण्याला धाडस लागतं. ते धाडस आपण करीत नाही. आपल्यासारखेच इतर बहुतेक जण असतात. त्यामुळे QWERTY कीबोर्ड पिढ्यान पिढ्या चालत राहिला. परंपरेच्या नाण्याची दुसरी बाजू म्हणजे चाकोरी. चाकोरीबाहेर जाऊन प्रयत्न करणारे कमी असतात. त्यामुळेच ड्व्होरॅक कीबोर्ड तितकासा रूढ झाला नाही. हे ड्व्होरॅकच्या पाठिराख्यांचं म्हणणं खरं की खोटं याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही. तुमचं त्यावरचं मत ठरविण्यापूर्वी मात्र तुम्ही तो वापरून पहायला हवा इतकच मला म्हणायचं आहे.
तुम्हाला वाटतं तितकं ते अवघडही नाही, आणि वेगळ्या दमड्या मोजायच्या नसल्याने खिशाला चाट पाडणाराही हा प्रकार नाही. काहीतरी नवं करून पाहण्याची आवड असणारांनी हा नवा कीबोर्ड अवश्य वापरून पहायला हवा असं मला वाटतं.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा