दहशतवाद हा विषय गेली कित्येक वर्षे जागतिक चव्हाट्यावर चर्चिला जातो आहे. २६ नोव्हेंबरला मुंबईवर जे दहशतवादी हल्ले झाले त्यामुळे तर हा विषय दुरदर्शनवरच्या बातम्यांचा मिनिटा मिनिटांचा अपडेट बनला आहे. वर्तमानपत्रांचे अक्षरशः हजारो रकाने दहशदवादाच्या बातम्या, छायाचित्रे, लेख आणि संपादकीयांनी भरून वाहताना आपण गेल्या महिनाभर पाहिले. लोकसभेपासून ते राज्यसभा आणि विधानमंडळापर्यंत हा विषय गाजतो आहे. मुख्यमंत्र्यांपासून ते केंद्रीय गृहमंत्र्यापर्यंत अनेकांना आपल्या खुर्च्या ह्याच विषयामुळे सोडाव्या लागल्या आहेत. जागतिक राजकारण त्यामुळे ढवळून निघाले आहे. युद्धाचे ढग गडगडाट करू लागले आहेत. अन्न, वस्त्र, निवारा आणि दहशतवादापासून संरक्षण ह्या आता खर्या अर्थाने सामान्य माणसाच्या चार किमान गरजा बनल्या आहेत.
ज्या वेळी दहशतवादी हल्ला होतो त्यावेळी आणि पुढले काही दिवस हा विषय कमालीचा चर्चेत राहतो. पुढे काही दिवसांनी वातावरण शांत झाले की हळू हळू तो विषय पडद्याआड जाऊ लागतो. संसदेवर झालेला हल्ला आठवा. संपूर्ण राष्ट्र त्याने ढवळून निघालं. पण नंतर तो विषय मागे पडला. मग वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्बस्फोटांच्या मालिका झाल्या. पुन्हा ते सारं विसरून लोक कामाला लागले. मुंबईवर झालेल्या हल्ल्याने मात्र सर्वच जण हादरले. आता जो तो दहशतवादाविषयीची माहिती कुठे वाचायला मिळाली की विशेष जिव्हाळ्याने ती वाचतो. त्यावर चर्चा करतो. हे सारं अगदी मनापासून होतं. कारण सामान्य माणूस आता हे गृहित धरून चालू लागला आहे, की ज्या रेल्वे स्टेशनवर तो उभा आहे तिथे कधीही गोळ्यांचा वर्षाव करणारा दहशतवादी अचानक उपटू शकतो. आयुष्यभर जी पथ्ये, औषधपाणी आणि उपचार घेत तो आपला जीव वाचवत आला तो जीव एका गोळीने केव्हाही जाऊ शकतो.
दहशतवादावर वर्तमानपत्रातून खूप लिहीलं जातय. दुरदर्शन वाहिन्यांवर खूप काही दाखवलंही जातय. पण ते सारं तात्कालिक असतं. संसदेवर झालेल्या हल्ल्याची बातमी देणारं वृत्तपत्र आज शोधायचं झालं तर सहजासहजी ते मिळू शकेल का? अशा वेळी संदर्भासाठी हमखास कामी येतं ते इंटरनेट. पण इंटरनेटवरही ते सारे संदर्भ एका जागी मिळणं दुरापास्त असतं. गुगलवर खूप वेळ शोधावं, पुन्हा पुन्हा शोधावं म्हणजे मग त्यातलं काही हाती येतं. ह्या शोधण्यात खूप वेळ आणि शक्ती खर्ची होते. अशा वेळी स्वाभाविकच मनात विचार येतो की दहशतवादासारख्या विषयाची सर्वांगीण माहिती एका जागी उपलब्ध करणारी एखादी वेबसाईट कोणती? मनात येणारा हा प्रश्न वरकरणी सरळ वाटतो. पण तो खर्या अर्थाने सरळ नसतो. दहशतवाद हा क्षणाक्षणाला बातम्या फोडणारा विषय आहे. वेबसाईटवर दहशतवादाची माहिती एकत्रित तर हवीच, पण ती अगदी मिनिटा मिनिटाला नसली तरी निदान दररोज अपडेट होणारी हवी. सर्वंकषता आणि अद्ययावतता ह्या दोन बाबींची पुर्तता करणारी वेबसाईट मिळेलही, पण त्या दोन बाबींपेक्षाही महत्वाची बाब म्हणजे त्या साईटची विश्वासार्हता. सर्वंकष व अद्ययावत पण चुकीची व अपुरी माहिती देणारी वेबसाईट असेल तर ती दहशतवादाइतकीच धोकादायक ठरेल.
दहशतवादासारख्या विषयावरील वेबसाईट कशी हवी याविषयीची प्रस्तावना आपण वर केली. आणखी एक मुद्दा म्हणजे आपण पॅलेस्टाईन-इस्त्रायलमधील किंवा ब्राझील-मेक्सिकोमधील दहशतवादापेक्षा अधिक संबंधित असतो ते पाकिस्तान, बांगला देश, श्रीलंका, नेपाळ आणि खुद्द आपल्या देशातील दहशतवादाशी. त्यामुळे आपल्याशी संबंधित दहशतवादाशी संबंधित, सर्वंकष, अद्ययावत आणि विश्वासार्ह अशी वेबसाईट ही ह्या संदर्भातील आपली गरज आहे. हे सगळे निकष भागवणारी, मला नोंद घ्यावीशी वाटणारी वेबसाईट म्हणजे http://www.satp.org/
SATP म्हणजे South Asian Terrorism Portal. ह्या संदर्भात नोंद घेण्यासारख्या दोन गोष्टी. एक म्हणजे ही वेबसाईट .org प्रकारची म्हणजे कोणत्या तरी संस्थेची आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ही वेबसाईट ना नफा, ना तोटा तत्वावर चालणार्या सामाजिक संस्थेची आहे. त्या संस्थेचे नाव आहे Institute for Conflict Management. ही एक नोंदणीकृत आणि मुख्य म्हणजे भारतीय संस्था आहे. पंजाबात पोलीस दलाचे प्रमुख म्हणून गाजलेले के.पी.एस. गिल हे निवृत्त आय.पी.एस. अधिकारी ह्या संस्थेचे अध्यक्ष आहेत. ह्या संस्थेतर्फे दहशतवादाची माहिती देणारं Faultlines नावाचं एक नियतकालिक प्रकाशित होतं. त्याचे संपादकही के.पी.एस. गिल हेच आहेत. दहशतवाद हा विषय जाणणारा गिल यांच्यासारखा ज्येष्ठ व अनुभवी माणूस ज्या संस्थेचा अध्यक्ष व संस्थेच्या नियतकालिकाचा संपादक आहे अशी वेबसाईट आपण निश्चितच विश्वासार्ह मानू शकतो.
SATP.ORG मध्ये फक्त दक्षिण आशियाचा विचार होत असल्याने त्यात फक्त भारत, पाकिस्तान, बांगला देश, भूतान, नेपाळ व श्रीलंका हे देश अंतर्भूत होतात. मूळ भारतीय संस्था असल्याने भारताचा विचार त्यात पूर्ण विस्ताराने होणार हे ओघानेच आले. स्वाभाविकच जम्मू-काश्मीर, आसाम, मणीपूर, त्रिपुरा, मिझोराम, नागालँड आंध्र प्रदेश, अरूणाचल प्रदेश व पंजाब ह्या राज्यांची दहशतवादाशी संबंधित सविस्तर पार्श्वभूमी आपल्याला इथे एकत्र मिळते. ह्या माहितीशी संबंधित तज्ज्ञांचे शेकडो लेख, आकडेवारीचे रकाने, टाईमलाईन म्हणजे घडलेल्या घटनांचा कालानुरूप क्रमाचा तपशील वगैरे त्यात उपलब्ध करण्यांत आला आहे. ह्या वेबसाईटवरील लिंक्सची ही शीर्षके पहाः Backgrounder, Assessment, Data Sheets, Timelines, Documents, Bibliography, Terrorist Groups, Maps वगैरे वगैरे. ह्या शीर्षकांवरून आत काय असेल याची आपल्याला कल्पना येते. ह्या शिवाय Terrorism Update ह्या सदरामध्ये आपल्याला दैनंदिन स्तरावर घडणार्या दहशतवादी घटनांची वृत्ते उपलब्ध होतात.
यातला पाकिस्तानचा विभाग भरगच्च माहितीने युक्त आहे. कारगिल युद्धाचे वेळी पाकिस्तानचे पंतप्रधान असणारे नवाझ शरीफ यांनी १२ जुलै १९९९ रोजी पाकिस्तानच्या जनतेला उद्देशून जे भाषण केले होते त्या पासून ते अगदी अलिकडील राष्ट्राध्यक्ष झरदारी यांच्या भाषणांपर्यंतचा शब्दशः तपशील पाकिस्तान डॉक्युमेंटस मध्ये वाचायला मिळतो. १२ जुलै १९९९ रोजी संभाव्य युद्धाच्या संदर्भात पाकिस्तानी जनतेशी जाहीरपणे बोलताना तात्कालिन पंतप्रधान नवाझ शरीफ म्हणाले होते " Dear brother and sisters, by the grace of God, Pakistan is not a wall of sand or a child's plaything. We have the ability to deal befittingly with aggression. Had war been imposed on us, the invader would have lived to regret the day. However, we do not wish to make war, nor have we looked for it. We know that in a nuclear conflict there can be no victors…."
१९९९ साली नवाझ शरीफ जे म्हणाले होते आणि आज २००८ मध्ये झरदारी आणि गिलानी जे म्हणत आहेत त्यातलं प्रचंड साम्य पाहून आश्चर्य वाटतं. अगदी अभ्यास म्हणून नाही तरी 'युद्धस्य कथा रम्याः' म्हणतात त्या न्यायानं ही सारी माहिती आपल्याला रंजक वाटते. अशा प्रकारच्या माहितीचा प्रचंड साठा ह्या वेबसाईटवर आहे.
थोडक्यात, दहशतवादाचा विषय जेव्हा जेव्हा येईल त्या त्या वेळी satp.org ही साईट आपल्या मदतीला येईल. ह्या विषयासाठी केवळ ह्या एकाच वेबसाईटवर अवलंबून रहावं असं मी अर्थातच म्हणणार नाही. पण ह्या संदर्भात इंटरनेटवर माहितीचा जो सागर आहे त्या सागरातला हा एक उपयुक्त तराफा मात्र नक्कीच आहे. दहशतवादाविषयीच्या माहिती सागरात नेटवर गटांगळ्या खाऊ लागलात आणि दिशा सापडेनाशी झाली तर ह्या तराफ्याचा आधार तुम्हाला नक्कीच वाटेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा