२१ फेब्रु, २०११

रेलगाडीचा उपयुक्त ज्ञानकोश

झुक झुक गाडीच्या आकर्षणानं बालपणाला सुरूवात होते आणि पुढे ती रेल्वेची गाडी आपण गृहित धरायला लागलेलो असतो. पुढे ह्याच रेल्वेगाडीने आपण शेकडो मैलांचा प्रवासही केलेला असतो आणि स्टेशन, रिझर्व्हेशन, बर्थ, लगेज, वेटींग लिस्ट, आरएसी कोटा वगैरे शब्दांचं आपल्याला काहीही वाटेनासं झालेलं असतं. 'लांबचा प्रवास आणि रेल्वे' हे समीकरण आपल्या नकळत अंगवळणी पडून गेलेलं असतं. रेल्वेचा प्रवास अनेकदा केलेला अस ल्याने एक प्रकारचा घट्ट आत्मविश्वास आपल्याला आलेला असतो. ''रेल्वे' चं मला सगळं माहित आहे'' असा आपला आपण सोयीस्कर समजही करून घेतलेला असतो. पण हा समज बर्‍याच अर्थाने गैरसमज असतो. कितीतरी साध्या साध्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात. उदाहरणार्थ हे तीन साधे प्रश्न घ्या. १) काही रेल्वे स्टेशनांच्या नावापुढे Road असा शब्द आलेला असतो. उदाहरणार्थ, नासिक रोड, वसई रोड वगैरे. अशा काही विशिष्ट स्टेशनांच्या पुढेच हा 'रोड' का आलेला असतो? २) रेल्वेने प्रत्येक स्टेशनला एक विशिष्ट कोड दिलेला आहे. स्टेशनच्या नावातील इंग्रजी अद्याक्षरांवर आधारित हे कोड असतात. उदाहरणार्थ, दादरला DDR, नागपूरला NGP, अंबरनाथला ABH वगैरे. असं असताना कुर्ल्याचा कोड CLA का? विजयवाडाचा कोड BZW का? किंवा कानपूर सेंट्रलचा कोड CNB का? 3) काही गाड्या Down Trains तर काही Up Trains असतात. हा Down आणि Up प्रकार कसा ठरतो, किंवा कशावर अवलंबून असतो?
खरं तर असे मुद्दे आपण कधी लक्षातच घेतलेले नसतात. कारण आपलं त्यावाचून तसं काही अडत नसतं. पण जेव्हा ते मुद्दे सरळ समोर येऊन उभे राहतात तेव्हा त्यांची उत्तरं पटकन मिळावीत यासाठी आपण अधीर होतो. दादर म्हणजे DDR, मग कुर्ल्याचं KLA का नाही, CLA कसं? त्याचं उत्तर म्हणजे Kurla हे स्पेलींग पूर्वी Coorla असं होतं. त्यामुळे ब्रिटीश काळातील पद्धतीनुसार चालत आलेलं कुर्ल्याचं कोड CLA हेच कायम राहिलेलं आहे. विजयवाडा हा नाव बदलण्यापूर्वी Bezwada होता. त्यामुळे त्याचं कोड BZW; आणि, 'कानपूर सेंट्रल' पूर्वी स्पेलींगने Cawnpore होतं त्यामुळे त्याचं कोड CLA.
तीन पैकी एका प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं. इतर दोन प्रश्नांच्या उत्तरांसाठी आपल्या मदतीला येतेय http://www.irfca.org ही वेबसाईट. IRFCA म्हणजे Indian Railways Fan Club. जसे अमिताभ बच्चन, शाहरूखखान आणि रजनीकांत वगैरे अभिनेत्यांचे फॅन क्लब आहेत, तसा फॅन क्लब भारतीय रेल्वेचा असू शकतो ह्या कल्पनेने आपल्याला एव्हाना कौतुक वाटलेलं आहे. भारतीय रेल्वेचा हा फॅन क्लब प्रथम सुरू झाला तो अमेरिकेत. त्यामुळे त्याचं नाव तेव्हा Indian Railways Fan Club of America असं होतं. IRFCA मध्ये शेवटी अमेरिकेचा A आहे तो त्या जुन्या नावामुळेच. IRFCA ची सुरूवात झाली ती ऑगस्ट १९८९ मध्ये अमेरिकेत. मणी विजय (विजय बालसुब्रमण्यम), शंकरन कुमार आणि धीरज संघी ह्या तीन जणांचा प्रायव्हेट ईमेल लीस्ट ग्रुप होता. यातून त्यांच्यात संपर्काची जी देवाणघेवाण व्हायची त्यातून IRFCA ची स्थापना झाली. मेरिलॅंड, येल, कॅलिफोर्निया, सांता बार्बारा ह्या विद्यापीठांच्या लीस्ट सर्व्हरवर १९८९ ते १९९९ ह्या काळात IRFCA चे वास्तव्य राहिले. पुढे तेथून ते OneLIST येथे हलविण्यात आले. ह्या सुमारास IRFCA ची सदस्य संख्या होती फक्त ५० ते १०० च्या दरम्यान. OneLIST हे पुढे eGroups मध्ये विलीन झाले, आणि eGroups चा ताबा नंतर YAHOO ने घेतला. ह्या काळापर्यंत IRFCA च्या सदस्यांमध्ये फक्त अमेरिकतील आणि काही ब्रिटनमधील मंडळी होती. १९९७ नंतर भारतात इंटरनेटचा प्रसार झपाट्याने होत गेल्यानंतर मात्र IRFCA मध्ये भारतीयांची संख्या झपाट्याने वाढत गेली. आज IRFCA मध्ये भारतीय आणि अनेक मराठी नावेही दिसतात. IRFCA ची सदस्यसंख्या आता ३००० च्या आसपास आहे. 
IRFCA चा हा सारा इतिहास आज तुमच्यापुढे अशासाठी ठेवला की तीन जणांनी केवळ गंमत म्हणून सुरू केलेला एक ग्रुप आज हजार पटींनी वाढला आहे. इंटरनेटवर होणारी वाढ अक्षरशः हजारो आणि खूपदा लाखो पटींचीही असू शकते. जेव्हा मनुष्यबळ हजार पटींनी वाढतं तेव्हा ज्ञानाची गंगा दुथडी भरून वाहू लागते. IRFCA चंही तसच झालं आहे. www.irfca.org ही वेबसाईट म्हणजे आज भारतीय रेल्वेचा एक समग्र ज्ञानकोश बनते आहे. ह्या वेबसाईटवर भारतीय रेल्वेसंबंधी अतिशय समृद्ध आणि सचित्र असा माहितीसंग्रह आहे. वाफेच्या रेल्वेगाडीपासून ते आजच्या आधुनिक गाडीपर्यंतच्या शिट्या कशा वाजतात हे दाखवणारा मल्टीमिडीया विभाग सुद्धा त्यात आहे. बोगद्यातून जाणार्‍या, डोंगर-दर्‍यांतून नागमोडी जाणार्‍या गाड्यांच्या व्हिडीओ क्लीप्स, रेल्वेसंबंधी अनेक छायाचित्रे हे सारे मल्टीमिडीयात आहे. भारतभरातल्या सर्व राज्यांतील रेल्वेमार्गांचे नकाशे, गाड्यांच्या आकृत्या (डायग्रॅम्स), भारतीय रेल्वेशी संबंधित पुस्तकांची यादी, आतापर्यंत आलेले रेल्वेविषयक पोस्टाची तिकीटे वगैरे वगैरे यादी करावी तेवढी थोडी आहे. १९३७ साली आलेले ब्रिटीश राजे किंग जॉर्ज (सहावे) यांचे चित्र असलेले रेल्वेविषयक पोस्टाचे दुर्मिळ तिकीट येथे पहायला मिळते. रेल्वे मॉडेलिंगच्या छंदाशी संबंधित संस्था व व्यक्तींची सविस्तर माहितीही इथे आहे. भारतीय रेल्वेचा इतिहास १८३२ सालापासून ते आजतागायत अतिशय सविस्तर असा येथे उपलब्ध आहे. 
ही साईट इतकी वेगवेगळी आणि एवढी आश्चर्यकारक माहिती देते की कुणीही प्रभावित व्हावं. मुंबईत बॅलार्ड पियर नावाचं एक रेल्वे स्टेशन कधी काळी होतं हे वाचून अचंबित व्हायला होतं. ह्या स्टेशनचे छायाचित्र आपण कौतुकाने पहात राहतो. कधी काळी मद्रास (आजचं चेन्नई) ते श्रीलंका (सिलोन) अशी रेल्वे असायची ही माहितीही चक्रावणारी आहे. रेल्वेशी संबंधित प्रवासापासून ते माल वाहतूकीपर्यंतचे आणि अपघातापासून ते सोयी-सुविधांपर्यंतचे सारे नियम इथे वाचायला मिळतात. A पासून ते Z पर्यंतची रेल्वेसंबंधीच्या Abbreviations ची सूचीही इथे तयार आहे. भारतातल्या सर्व रेल्वे स्टेशन्सचे कोडही देण्यांत आले आहेत. आपल्या रेल्वेशी संबंधित तांत्रिक माहितीचीही इथे रेलचेल आहे. ब्रॉ़डगेज, मीटरगेज आणि नॅरोगेज लाईन्सचे स्लीपर्स काय मापाचे (dimensions) असतात इथपासून ते दोन स्लीपर्समध्ये किती अंतर असतं इथपर्यंतची माहिती त्यात आहे. आपल्याला हे कुठे माहित असतं की सामान्यतः ब्रॉडगेज रेल्वेच्या रूळाची जास्तीत जास्त लांबी १३ मीटर (४२ फूट ८ इंच) एवढी असते? मात्र क्वचित काही वेळा २६ मीटर लांबीचे रूळही वापरले जातात.
विशेष गाड्यांचा एक विभाग ह्या साईटवर आहे. त्यात राजधानी एक्सप्रेसपासून ते पॅलेस ऑन व्हील्सपर्यंत आणि फ्लाईंग राणीपासून ते डेक्कन क्वीनपर्यंत अनेक गाड्यांचा इतिहास वगैरे आहे. पण ह्या विभागातील एक गाडी आपलं खास लक्ष वेधून घेते. ती गाडी म्हणजे 'प्रेसिडेन्शियल सलून' अर्थात फक्त भारताच्या राष्ट्रपतींची आणि फक्त त्यांच्यासाठीच सदैव राखीव असलेली गाडी. ही गाडी फक्त दोन डब्यांची आहे. १९५६ साली बांधण्यात आलेले हे आलिशान डबे नवी दिल्ली स्टेशनात कायम उभे असतात. ह्या दोन डब्यांमध्ये राष्ट्रपतींची बेडरूम, लाँजरूम, व्हिजिटर्स रूम, कॉन्फरन्स रूम असा लवाजमा एकीकडे आहे. दुसरीकडे राष्ट्रपतींचे सचिव व इतर कर्मचारी यांचेसाठी काही केबीन्स आहेत. हे दोन्ही डबे सागाच्या फर्निचरने तसेच रेशमी पडद्यांनी सजवण्यांत आले आहेत. 'प्रेसिडेन्शियल सलून' ची परंपरा फार जुनी आहे. १९ व्या व २० व्या शतकात भारताच्या इंग्रज व्हाईसरॉयने त्याचा उपयोग केला होता. १९२७ पर्यंत इंग्रजांची भारतीय राजधानी कलकत्ता येथे असल्याने हा 'प्रेसिडेन्शियल सलून' कलकत्त्यात उभा असे. १९२७ मध्ये इंग्रजांनी राजधानी दिल्लीत हलवल्यानंतर तो दिल्ली येथे आणण्यात आला. अत्यंत आलिशान अशा ह्या गाडीत पर्शियन गालिचे वगैरे वैभवी सजावट होती. ही गाडी वातानुकूलित नव्हती, पण आत गारवा कायम रहावा यासाठी त्यात खास पद्धतीचे पडदे लावण्यांत आले होते. गाडीत चोवीस तास गरम व थंड पाण्याची सोय करण्यांत आली होती. ही गाडी स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी १९५० साली प्रथमच वापरली. त्यानंतर आलेल्या राष्ट्रपतींनीही त्याचा वापर केला. राष्ट्रपतींची मुदत संपल्यानंतर त्या गाडीतून त्यांना त्यांच्या गावापर्यंत सोडण्याचा एक प्रघात त्यानंतर पडला. ह्या प्रघातानुसार गाडी वापरणारे शेवटचे राष्ट्रपती म्हणजे डॉ. संजीव रेड्डी. त्यांनी १९७७ साली राष्ट्रपती भवनाचा निरोप घेताना ही गाडी वापरली. त्यानंतरच्या काळात सुरक्षेच्या कारणास्तव ही गाडी राष्ट्रपतींनी वापरली नाही. १९७७ ते २००३ ह्या २६ वर्षांच्या काळात ही गाडी नुसती उभी होती. नुसती उभी असली तरी तिची निगा उत्तम प्रकारे सांभाळण्याची पद्धत आहे. आपले मागील राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांनी ही गाडी हरनौत ते पटणा ह्या ६० किलोमीटरच्या प्रवासासाठी वापरली. त्यासाठी ह्या गाडीच्या सजावटीचे खास नूतनीकरण करण्यांत आले होते. त्याचाच एक भाग म्हणून गाडीत प्रगत तंत्रज्ञानाने व उपग्रह यंत्रणेने युक्त अशी आधुनिक संपर्क साधनेही डॉ. कलाम यांच्यासाठी बसविण्यांत आली होती. त्यानंतर मात्र आता गेली सुमारे ५ वर्षे 'प्रेसिडेन्शियल सलून' नवी दिल्लीत शांतपणे उभे आहे. नव्या राष्ट्रपती महाराष्ट्राच्या प्रतिभाताई पाटील ह्या 'प्रेसिडेन्शियल सलून' मध्ये कधी बसतील का हे येणारा काळच ठरवील.
थोडक्यात, मुद्दा काय तर www.irfca.org ही लक्षात ठेवून पहावी अशी वेबसाईट आहे. भारतीय रेल्वेचा असा ज्ञानकोश अन्यत्र शोधूनही सापडेल असे वाटत नाही. अवश्य बुकमार्क करावी अशी ही उपयुक्त वेबसाईट आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा