आवाज हा आपल्या आयुष्यातला एक नैसर्गिक भाग आहे. हवा आणि प्राणवायू आपण नाकाने जसा सहज आणि नकळत घेत असतो तसच आवाजाचही आहे. सकाळचा दिवस सुरू होताना तो गजराचा कर्कश्श आवाज. तिथून झोप झटकून जागं व्हावं तर पहाटेची पक्षांची मंजूळ किलबिल. दिवस सुरू होताच आवाज जे आपल्या कानाला चिकटतात ते अगदी मध्यरात्र झाली तरी रातकिड्यांचे किर्रर्र आवाज चालूच असतात. आज हा आवाजाचा विषय मुद्दाम काढण्याचं कारण म्हणजे आपलं मल्टीमिडिया तंत्रज्ञानाचं विश्व. मल्टीमिडिया ह्या शब्दाचा पाया मूळातच आवाजाच्या आधारावर उभा आहे. आवाज नाही तर मल्टीमिडिया व्यर्थ आहे.
अगदी आपल्या साध्या पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनचं उदाहरण घ्या. आवाजाशिवाय तुम्हाला तुमच्या स्लाईडस किंवा एखादं प्रेझेंटेशन दाखवता येणार नाही असं नाही. पण जर ते प्रेझेंटेशन म्युझिक ट्रॅकने युक्त असेल किंवा त्यात काही योग्य असे साऊंड इफेक्टस असतील तर प्रेझेंटेशन अधिक प्रभावी होतं. पॉवरपॉईंटच्याच जोडीने दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर फ्लॅश मुव्हीजचं देता येईल. अडोबी कंपनीचं फ्लॅश हे सॉफ्टवेअर आज अतिशय लोकप्रिय आहे. वेबसाईटस सुरू होताना आपण जो इंट्रो बघतो त्यातले बहुसंख्य इंट्रोज हे फ्लॅशमध्ये केलेले असतात. ह्या इंट्रोजसाठी देखील विविध प्रकारचे आवाज वा साऊंड इफेक्टस वापरले जातात. अनीमेशनसाठी देखील फ्लॅश तंत्राचा वापर करण्यांत येतो. एक साधं आणि छोटं उदाहरण सांगतो. एक विदूषक उड्या मारत येतो आणि एका घराचा दरवाजा ठोठावतो. तो दरवाजा किरकिरत आपोआप उघडला जातो. विदूषक दारातून आत जाताच एक कुत्रा त्याच्या अंगावर भुंकत झेपावतो. आता हे सारं दृश्य फ्लॅश तंत्राने साधी चित्रे वापरून तयार करता येतं. मात्र अशा फ्लॅश मुव्हीसाठी विविध आवाजांची गरज लागते. विदूषक जेव्हा उड्या मारत असतो तेव्हा त्या उड्यांना साजेसा साऊंड इफेक्ट हवा. दरवाजा ठोठावण्याचा आवाज हवा. पुढे दरवाजाचं किरकिरत उघडणं. मग कुत्र्याचं भुंकणं. हे सारे आवाज मिळतील तेव्हा आपला फ्लॅश मुव्ही तयार होणार. हे आवाज मिळवण्यासाठी म्हणजे डाऊनलोड करण्यासाठी मग आपण गुगलवर जातो. तिथे आवाज मोफत डाऊनलोड करू देणारी साईट शोधू लागतो. हे शोधणं खूप वेळ खातं. आपल्या संयमाचा अंतही कधीकधी पहातं.
आवाज शोधण्यासाठी गुगलवर जाणं म्हणजे एखाद्या मोठ्या सुपरमार्केटमध्ये सुई शोधायला जाण्यासारखं आहे. सुपर मार्केटमध्ये सगळेच विभाग असतात. कपड्यांपासून भांड्यांपर्यंत आणि धान्यापासून ते टीव्ही-फ्रीजसारख्या इलेक्ट्रॉनिक यंत्रांपर्यंत सारं काही तिथं दिसतं. आपल्याला ते नको असतं. आपल्याला हवी आहे फक्त सुई. अशा वेळी आपल्याला विविध प्रकारच्या फक्त सुया उपलब्ध करून देणारं एखादं मार्केट मिळालं तर? गुगलवर एखादा आवाज किंवा साऊंड इफेक्ट शोधायचा म्हणजे जर सुपर मार्केट पालथं घालणं असेल, तर मग फक्त आवाज शोधून देणारं गुगलइतकं कार्यक्षम असं एखादं स्पेशलाईज्ड सर्च इंजिन आज अस्तित्वात आहे का? असा प्रश्न एव्हाना तुमच्या मनात स्वाभाविकच तयार झाला असेल. तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे - होय. फक्त साऊंडस व साऊंड इफेक्टस शोधून देणारं एक स्पेशलाईज्ड सर्च इंजिन आज इंटरनेटवर अस्तित्वात आहे. तेथे तुम्ही हवा तो आवाज शोधू शकता. तो ऐकू शकता. योग्य वाटला तर तो डाऊनलोड करून घेऊ शकता. नंतर अर्थातच तुमच्या पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनसाठी किंवा फ्लॅश मुव्हीसाठी वापरूही शकता. त्या स्पेशलाईज्ड सर्च इंजिनच्या साईटचा पत्ता आहे www.findsounds.com
Findsounds.com म्हणते की त्यांच्या साईटवर दर महिन्याला २० लाख साऊंड सर्च होत असतात. एकूण अडीच लाख व्यक्ती हे वीस लाख आवाज शोधत असतात. ही साईट तशी अगदी साधी आणि सरळ आहे. गुगलसारखी सर्च करण्याची एक लांबी चौकट त्यात मधोमध आहे. तिथे आपल्याला हवा तो शब्द वा सर्च कीवर्डस तिथे फक्त टाईप करायचे आणि एंटर बटण दाबायचं किंवा Search बटणावर क्लीक करायचं. अशा प्रकारे एंटर दाबण्यापूर्वी किंवा Search वर क्लीक करण्यापूर्वी हवं तर काही विशिष्ट पर्याय अर्थात ऑप्शन्स हवं तर आपण निवडू शकतो. म्हणजे समजा तुम्हाला फक्त mp3 फाईल हवी असेल तर केवळ तोच पर्याय तुम्ही निवडू शकता. अशा वेळी तुमच्यासमोर फक्त mp3 च्या लिंक्सच फक्त येतील. Findsounds.com चार प्रकारच्या साऊंड फाईल्स तुम्हाला शोधून देते. एक mp3, दुसरं wav, तिसरं au आणि चौथा प्रकार aiff. यापैकी mp3 आणि wav ह्या साऊंड फाईल्स आज विशेषत्वाने वापरल्या जातात.
गुगलप्रमाणे सर्च करण्याची ही जशी सोय आहे, तशी त्याच्या जोडीला विशिष्ट प्रकारचे आवाज शोधण्यासाठी वर्गीकरणाची सोयही findsounds.com ने केली आहे. त्यासाठी www.findsounds.com/types ह्या लिंकवर तुम्ही जायला हवं. तिथले हे प्रकार पहाः Animals, Birds, Holidays, Household, Insects, Mayhem, Miscellaneous, Musical Instruments, Nature, Noise makers, Office, People, Sports and Recreation, TV and Movies, Vehicles. हे झाले मुख्य प्रकार. आता त्या प्रत्येक मुख्य प्रकारात एक भली मोठी यादी दिलेली आहे. कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज हवा म्हंटल्यावर तुम्ही Animals मध्ये जाऊन Dog वर क्लीक करणार हे ओघानं आलच. तिथे आज कुत्र्याचे आवाज देणार्या एकूण २०० आवाजांच्या फाईल्स डाऊनलोडीगसाठी उपलब्ध आहेत. एक लक्षात घ्या की हे आवाज किंवा ह्या साऊंड फाईल्स findsounds.com ने संपूर्ण वेब धुंडाळून तुम्हाला शोधून दिल्या आहेत. म्हणजे त्यांनी फक्त सर्च इंजिनचं काम केलं आहे. ह्या फाईल्स अर्थातच वेगवेगळ्या वेबसाईटवरील आहेत.
आपलं वरचं उदाहरण घेऊन आपण पुढे जाऊ. विदूषक उड्या मारत येतो आहे. त्याच्या उड्यांसाठी आपल्याला योग्य तो साऊंड इफेक्ट हवा आहे. तर त्यासाठी People वर क्लीक करून नंतर Footsteps वर क्लीक करा. पहा, १०६ प्रकारची पावलं आपल्यापुढे आवाज करण्यासाठी सिद्ध आहेत. ह्याच पद्धतीने दरवाजा ठोठावण्याचा आवाज शोधायचा तर सरळ door knock हे शब्द टाईप करून एंटर दाबा. २०० प्रकारचे ठोठावण्याचे आवाज मिळतील. थोडक्यात ज्यांना अनीमेशन्स तयार करायची आहेत, किंवा आपल्याच ईमेलमधून एक गंमतीदार आवाज कुणाला पाठवायचा आहे अशांसाठी findsounds.com हे एक वरदानच आहे.
अशा प्रकारची specialised म्हणता येतील अशी शेकडो सर्च इंजिन्स आज इंटरनेटवर उपलब्ध आहेत. ती माहित असतील तर आपला वेळ तर वाचतोच, पण ती पाहता पाहता काही नव्या कल्पनाही डोक्यात येऊ लागतात. एखादी गोष्ट सापडली वा दिसली की मग त्याचा वापर कसा करता येईल याकडे मानवी मन झेपावू लागतं. ही अगदी नैसर्गिक म्हणावी अशीच प्रक्रिया आहे. Findsounds.com ची दखल न्युयॉर्क टाईम्स पासून ते पीसी वर्ल्ड पर्यंत सर्वांनी घेतलेली आहे. आवाजासाठी एक उत्तम वेबसाईट असा गौरव ह्या साईटच्या वाट्याला आलेला आहे. पीसी वर्ल्ड ने आपल्या Best of the web ह्या सदरात त्याचा समावेश केला आहे. न्युयॉर्क टाईम्सने त्याला Impressive Technology म्हणून गौरवलं आहे. याहूने त्याला Incredibly Useful असं म्हंटलं आहे.
असच आणखी एक आवाजी सर्च इंजिन म्हणजे www.soundsnap.com. ही वेबसाईटही findsounds.com सारखी असली तरी इथला फरक म्हणजे जगभरचे लोक इथे वेगवेगळे आवाज अपलोड करत असतात. इथेही सर्च आहे आणि इथेही टाईप्स आहेत. हे दुसरं आवाजी सर्च इंजिन मी मुद्दाम देत आहे ते अशासाठी की कधी findsounds.com वर तुम्हाला हवा तो आवाज सापडला नाही, तर हा पर्याय चाचपडून पहायला हरकत नाही.
ह्या टप्प्यापर्यंत आपण आलो आणि हवा तो आवाज मिळविण्यासाठी findsounds.com किंवा soundsnap.com वापरण्याची नोंद आपण घेतली. संगणकावरील आवाजाच्या बाबतीत वेगवेगळ्या प्रक्रिया करण्याची वेळ खूपदा येते. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याकडे wav फाईल असते, आणि आपल्याला त्याची mp3 करायची असते. आपल्याला कुणीतरी au किंवा aiff प्रकारची साऊंड फाईल पाठवतं, आणि आपल्याकडे ती उघडत नसते. आपल्याला मिळालेली आवाजाची फाईल मोठी किंवा लांबीने अधिक असते. ती लहान करून हवी असते. उदाहरण घेऊन सांगतो. समजा तुमच्याकडे एका पाठोपाठ एक अशी दहा पावले टाकण्याच्या आवाजाची फाईल आहे. तुम्हाला दहा पावलं नको आहेत. फक्त एकाच पावलाचा आवाज तुम्हाला हवा आहे. अशा वेळी दहा पैकी एक पाऊल कापून घेण्याची म्हणजचे Audio Editing ची सोय तुम्हाला हवी असते. ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी मी Audacity ह्या अधिकृतपणे मोफत असणार्या ओपन सोर्स सॉफ्टवेअरची शिफारस करीन. Audacity बद्दलची अधिक माहिती आणि तो प्रोग्राम डाऊनलोड करण्यासाठी http://audacity.sourceforge.net/ ह्या वेब लिंक वर जा. आवाज की दुनिया वर राज्य करण्याची ताकद Audacity मध्ये कितपत आहे याची चाहूल तुम्हाला त्या लिंकवरच लागेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा