२१ फेब्रु, २०११

महिमा २०११ चा

हे नवे वर्ष मागील नऊ नव्या वर्षांपेक्षा वेगळे आहे. २००२, २००३, २००४ करत २०१० पर्यंतची वर्षे त्यांच्या त्यांच्या एक जानेवारीला नवी वर्षे होती. पण त्यांच्या पेक्षा हे २०११ साल वेगळे आहे. ह्या वर्षी भारताची लोकसंख्या मोजली जाणार आहे. महाराष्ट्रात १ मे २०११ रोजी जी लोकसंख्या असेल ती राज्याची लोकसंख्या म्हणून धरली जाणार आहे. लोकसंख्या मोजणीला शिरगणती, जनगणना वगैरे शब्दही आहेत. इंग्रजीत त्याला सेंसस म्हणतात. भारताची लोकसंख्या ऐकली की माणसाचा सेंस जागेवर रहात नाही, म्हणून त्याला इंग्रजीत सेंसस म्हणत असावेत असा पीजे चिमणराव काऊसमोर पूर्वी करत असत. जाऊ द्या, तो पीजे सोडा. मुद्दा हा की दर दहा वर्षांनी हे भलं मोठं गणित सरकारतर्फे होत असतं. ह्यापूर्वी २००१ साली आणि त्यापूर्वी १९९१ साली जनगणना झाली होती.

जनगणनेनंतर त्याचा तपशील आणि आकडेवारी असलेली पुस्तके सरकार प्रकाशित करतं. त्या पुस्तकांची जाडी आणि आतील आकड्यांच्या मुंग्या पाहिल्यावर तुम्ही आम्ही सामान्यजन ती वारूळं घरी आणत नाहीत. पण त्यामुळे खूप महत्त्वाच्या माहितीला आपण मुकतो आहोत हे आपल्या गावीही नसतं.

गावावरून आठवलं, जनगणनेत गावांची गणनाही होते. आपला गाव वगळता इतर गावे आपल्याला सामान्यतः भेंड्यांच्या वेळी लागतात. साधारणतः गणपतीत, दिवाळीच्या सुट्टीत, भरपूर वेळ असल्यावर आणि सगळे जमल्यावर हमखास पत्ते, इतर खेळ सुरू होतात. त्या खेळात गावाच्या भेंड्या आणि र वरून गावांच्या नावाचा रतीब पडतो. भेंड्या चढतात त्या र वरच्या गावांमुळे. जनगणनेत गावे आणि त्यांची नावे नोंदली जातात. संपूर्ण भारतातील सर्व गावांची नावे त्यात येत असल्याने त्यांची यादी त्यात असते. त्यात र वरून सुरू होणारी पण आजपर्यंत न ऐकलेली गावे शेकड्याने मिळतात. शिवाय असं गाव नाहीच असा चॅलेंज (आव्हानपेक्षा चॅलेंज हा शब्द अधिक आव्हानात्मक वाटतो, है नं?) कोणी दिला तर त्याला भारत सरकारची ही यादी दाखवून गावाच्या नावाचा पुरावा दाखवून समोरच्याला भेंड्याची भाजी भरवता येते. पण त्यासाठी जनगणनेचा तो ग्रंथ विकत घ्यावा लागेल का? तर नाही. आता घरोघर इंटरनेट आहे. तुम्हाला ही गावांची यादी इंटरनेटवर तयार मिळते. तीही भारत सरकारच्या सेंससच्या अधिकृत संकेतस्थळावर. त्या संकेतस्थळाचा पत्ता आहे www.censusindia.gov.in. त्यातल्या http://www.censusindia.gov.in/2011-VillageDirectory/Directory/short_code_rural_27.pdf ह्या संकेतस्थळ पत्त्यावर महाराष्ट्रातील गावांची यादी तुम्हाला पाहता येईल, किंवा डाऊनलोडही करता येईल. डाऊनलोड केलीत तर एक पीडीएफ फाईल मिळेल. त्यात एकूण ८०२ पाने आहेत. प्रत्येक पानावर ५० वा त्यापेक्षा अधिक गावांची नावे आहेत. म्हणजेच एकूण ८०२ पानांमध्ये किमान ४०,००० गावे आहेत. हा झाला फक्त महाराष्ट्र. अशी भारतातील सर्व गावे. म्हणजे मिळून किती गावे होतील याचा अंदाज घ्या. तो घेतलात की मग तुम्हाला कळेल की भारताला गावांचा देश का म्हणतात.

यंदा एका बाजूला जनगणना होत असताना त्याची सांगड Unique ID शी घातली जाणार आहे. इन्फोसिस कंपनीचे पूर्वीचे प्रमुख आणि ह्या UID राष्ट्रीय प्रकल्पाचा नंदन नीलेकणींच्या नेतृत्वाखालील सरकारी विभाग हे २०११ मध्ये हातात हात घालून काम करणार आहेत. २०११ ह्या नव्या वर्षांत आपल्याला भारताचे नागरिक म्हणून एक कायमचा क्रमांक आणि ओळखपत्र मिळण्याची शक्यता आहे. तुमचे गाव समुद्र किनाऱ्यालगत असेल तर हे ओळखपत्र लवकर मिळण्याची शक्यता आहे. किनाऱ्यापासून लांब असाल तर मात्र काही महिने आणखी किंवा कदाचित पुढल्या वर्षापर्यंत त्यासाठी थांबावं लागेल.

२०११ चा विशेष महिमा आहे तो हा असा...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा