प्रत्येक घरात एक स्वयंपाकघर आणि एक शब्दकोश असतो. जगात असा एकही विद्यार्थी नाही की ज्याने कधी शब्दकोश उघडला नाही. नेपोलियन म्हणत असे की माझ्या शब्दकोशात 'अशक्य' हा शब्दच नाही. नेपोलियनला हे कळले कारण त्याने शब्दकोश नक्कीच उघडून बघितला असणार. असा हा शब्दकोश. आपणा प्रत्येकासाठी ती एक गरज असते. हे पिढ्यानुपिढ्या चालत आलं आहे. शब्दकोश हे एकच पुस्तक असे आहे की जे खर्या अर्थाने अमर असते. कधीतरी आजोबांच्या काळापासून जपलेला शब्दकोशाचा ग्रंथ नातवालाही उपयोगी पडताना दिसतो. कारण शब्दकोशात दिलेले अर्थ कधी बदलत नाहीत. शब्दकोश फाटला म्हणून नवा आणावा लागतो. अन्यथा त्यातले शब्दार्थ तेच असतात. काही नव्या शब्दांची शब्दकोशात भर जरूर पडते. ती भर हाच काय तो बदल.
घरातला शब्दकोश हातात घेऊन पहा. बिचारा आकाराने जाडजूड असतो, पण त्यातला शब्दांचा टाईप मात्र अगदी बारीक असतो. घरातले आजोबा किंवा कुणी ज्येष्ठ नागरिक असले तर त्यांना तो टाईप वाचण्यासाठी नुसता चष्मा पुरत नाही. चष्म्याबरोबर बहिर्गोल भिंगही लागते. मोठ्या टाईपातला शब्दकोश जगात कुठेच उपलब्ध नाही. त्याचे कारण सरळ आहे, शब्दांचा टाईप मोठा केला तर शब्दकोशाची पाने वाढणार म्हणजे तो आणखी जाडजूड होणार. मग तो हाताळायचा कसा? पाने वाढल्याने त्याची किंमतही वाढणार. ती कशी परवडणार? त्यामुळे शब्दकोश म्हंटला की तो बारीक टायपातला हे ओघानंच आलं.
बारीक टाईप हा शब्दकोशाचा एक न टाळता येण्याजोगा भाग जसा आहे, तसा दुसरा भाग म्हणजे शब्दकोशाचं बाईंडिंग. जा़डजूड शब्दकोश सारखा उघड-बंद करता करता त्याचं बाईंडिंग म्हातारं होऊ लागतं आणि कोंबडीची पिसं गळू लागावी तशी शब्दकोशाची पानं गळू लागतात. ती पानं सांभाळणं म्हणजे एक मोठं दिव्य असतं. शिवाय शब्दकोशाची पानं कालांतरानं पिवळी पडू लागतात.
बारीक टाईप, सुटणारं बाईंडिंग आणि पिवळी पडणारी पानं ह्या समस्यांपासून मात्र आता आपल्याला मुक्ती मिळाली आहे. ही मुक्ती आपल्या संगणकाने म्हणजे काँप्युटरने दिली आहे. संगणकावरच्या शब्दकोशातील टाईप आपल्याला मोठा करून पाहण्याची सोय असते. त्याला बाईंडिंग नसल्याने त्याची पाने सुटत नाहीत, किंवा कालांतराने ती पिवळीही पडत नाहीत. अशी ऑक्सफर्ड किंवा वेबस्टर डिक्शनरी आता सीडीवर उपलब्ध आहे. त्यात आपल्याला गुगलच्या पद्धतीने शब्द शोधता येतात. अशी डिक्शनरी सीडीवर उपलब्ध असल्याने ती कुठेही नेता येते. पटकन लॅपटॉपमध्ये घातली की कुठेही ती उघडता येते. संगणकाने हा जो सीडीवरचा शब्दकोश दिला आहे ते खरंच आपणा सर्वांसाठी एक मोठं वरदान आहे.
मला माहीत आहे की ह्या टप्प्यावर तुम्ही मला हमखास एक ठरलेला प्रश्न विचारणार आहात. इंग्रजी शब्दांचा अर्थ इंग्रजीत देणार्या डिक्शनरीज सीडीवर उपलब्ध आहेत. पण मराठी शब्दाचा इंग्रजीत अर्थ देणारी म्हणजे मराठी इन टू इंग्लीश डिक्शनरी सीडीवर उपलब्धच नाही. ज्यांना मराठी - इंग्रजी शब्दकोशाची सीडी हवी आहे, त्यांनी काय करायचं? तुमचा हा प्रश्न अगदी शंभर नंबरी खरा आहे. वाचकहो, आजपर्यंत मूळातच अशी मराठी - इंग्रजी शब्दकोशाची सीडी कुठे उपलब्ध नव्हतीच. पण आता युनिकोड फाँटच्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे ते शक्य झाले आहे. नवी मुंबईतील संगणक प्रकाशन ह्या संस्थेने मोल्सवर्थकृत इंग्रजी मराठी शब्दकोश नुकताच सीडीवर आणला आहे. ह्या सीडीची संपूर्ण माहिती www.molesworth.sanganak.in ह्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
हा शब्दकोश अनेक दृष्टींनी उपयुक्त आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. पहिली गोष्ट म्हणजे त्याची किंमत वाजवी म्हणजे फक्त रू.१००/- (टपाल खर्चासह) आहे. त्यात एकूण ६०,००० शब्दांचे अर्थ आहेत. युनिकोड फाँट वापरून त्यात मराठी शब्दांचा सर्च देखील उपलब्ध करण्यांत आला आहे. स्क्रीनवर वाचण्यासाठी टाईप लहान मोठा करण्याची सोय त्यात दिली आहे. मुख्य म्हणजे हा शब्दकोश मोल्सवर्थ यांचा म्हणजे जगप्रसिद्ध असा शब्दकोश आहे. मोल्सवर्थ हे एक ब्रिटीश सैन्याधिकारी. जन्माने ब्रिटीश असले तरी ते मराठी भाषेचे तज्ज्ञ होते. कित्येक वर्षे परिश्रम करून व कित्येक तज्ज्ञ व विद्वानांची मदत घेऊन त्यांनी हा शब्दकोश इंग्रजांच्या काळात तयार केला. १८५७ मध्ये त्याची दुसरी आवृत्ती प्रसिद्ध झाली. ती अतिशय लोकप्रियही झाली. मराठी शब्दांचा इंग्रजीत अर्थ देणारे शब्दकोश हाताच्या बोटावर मोजावे एवढे कमी आहेत. जे आहेत त्यांची तुलना मोल्सवर्थ शब्दकोशाशी केली तर दिसतं की मोल्सवर्थ शब्दकोश हा मराठी - इंग्रजी शब्दकोशांचा राजा आहे. त्याला पर्याय नाही. १८५७ नंतर मोल्सवर्थ शब्दकोशाच्या आवृत्त्या पुस्तक रूपाने प्रकाशित होत राहिल्या. आज मात्र त्या आवृत्त्या दुर्मिळ झाल्या आहेत. सहजासहजी त्या उपलब्ध होत नाहीत. शेवटची आवृत्ती ग्रंथरूपात सुमारे दहा वर्षांपूर्वी प्रकाशित झाली होती. मात्र त्याची किंमत रू.५५०/- असल्याने बहुधा तिचा प्रचार सर्वदूर झाला नाही.
मात्र आता २००९ मध्ये मोल्सवर्थ मराठी - इंग्रजी शब्दकोश सीडी रूपात प्रकाशित झाल्याने वाचक आणि विद्यार्थी दोघांनाही फार मोठा दिलासा मिळाला आहे. संगणक प्रकाशनाकडील ह्या शब्दकोश सीडींचा साठा संपण्या अगोदर आपली स्वतःची एक प्रत नोंदवायलाच हवी. ही सीडी ते पोस्टाने पाठवतात. त्याची माहिती www.molesworth.sanganak.in ह्या साईटवर उपलब्ध आहे. मराठीतला हा पहिला शब्दकोश आहे. शिवाय तो वापरायलाही सोपा आहे. कायम स्वरूपी उपयोगी पडणारा हा शब्दकोश आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा