इंटरनेट हे माध्यम?
खरं तर वृत्तपत्र काय किंवा दुरदर्शनची एखादी वाहिनी म्हणजे चॅनल काय, त्यांच्या प्रसारणाला मूळातच भौगोलिक मर्यादा असते. देशातले अगदी सर्वाधिक खपाचे वृत्तपत्र घेतले तरी ते जगातल्या प्रत्येक कानाकोपर्यात पोहोचू शकत नाही. ही व्यावहारिक मर्यादा जगातले प्रत्येक वृत्तपत्र मान्य करते. ह्याच मर्यादेवरचा एक उपाय म्हणून इंटरनेटवर वृत्तपत्रांच्या वेबसाईटस आपल्याला अपरिहार्यपणे दिसतात. वॉशिंग्टन पोस्ट किंवा न्युयॉर्क टाईम्स सारखं वृत्तपत्र मुंबई, पुणे गोव्यातल्या प्रत्येक इंग्रजी वाचकापर्यंत पोहोचणं जसं शक्य नसतं, तसच भारताचा टाईम्स ऑफ इंडिया किंवा लोकसत्ता वा गोमांतक न्यु जर्सीतल्या प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचणं अशक्य असतं. जगात कुठेही एखादं विशिष्ट वृत्तपत्र हाती पडलं नाही तरी त्या वृत्तपत्राची वेबसाईट त्या वाचकाची वाचनाची भूक भागवू शकते. म्हणजे, खरं तर इंटरनेट भौगोलिक दृष्ट्या वृत्तपत्राच्या एक पाऊल पुढेच असतं. वृत्तपत्राची ती मर्यादा त्याला कधीच अडवत नाही.जो प्रकार वृत्तपत्रांच्या बाबतीत तोच दुरदर्शनच्या बाबतीतही आहेच. आजकल किंवा स्टार माझा वा मी मराठी सारख्या वाहिन्या जगभर दिसत नसल्या तरी इंटरनेटवरून त्यांचे प्रसारण जगाच्या कानाकोपर्यापर्यंत पोहोचू शकते. दुरदर्शन वाहिन्यांना भौगोलिक मर्यादेबरोबर काळाची मर्यादाही असते. कालची बातमी पहायची तर एक दिवस अगोदरचा पेपर आपण रद्दीतून काढून पाहू शकतो. मात्र कालची बातमी आज पाहण्याची सोय दूरदर्शनवर नसते. कालची बातमी रेकॉर्डरवर रेकॉर्ड केलेली नसेल तर ती उपलब्ध होणं दुरापास्त आणि काही वेळा अशक्यच असतं. इंटरनेटवर ह्या उलट परिस्थिती असते. न्युयॉर्क टाईम्सच्या वेबसाईटवर आज १८५१ सालापासून ते आजतागायत म्हणजे २००८ सालापर्यंत प्रकाशित झालेल्या बातम्या तुम्ही पाहू शकता. थोडक्यात, काळ, वेळ आणि प्रदेशाच्या मर्यादा ओलांडून संपूर्ण पृथ्वीतल व्यापून राहिलेले आजचे इंटरनेट हे माध्यम, प्रेस आणि टीव्ही सारखे स्वतंत्र माध्यम मानायलाच हवे.
३१ ऑगस्ट १९२० रोजी अमेरिकेत डेट्रॉइट (मिशिगन) येथे जगातले रेडिओवरचे पहिले बातमीपत्र प्रसारित केले गेले. भारतात रेडिओची खरी सुरूवात १९३६ साली झाली. १९२० ते १९३६ हा काळ १६ वर्षांचा आहे. १९३६ ते १९४७ ह्या काळात भारतात केवळ ८ आकाशवाणी केंद्रे सुरू झाली होती. म्हणजेच रेडिओ माध्यमाचा प्रसार आपल्या देशात कुर्मगतीने झाला. इंटरनेट मात्र आज अतिशय सुसाट वेगाने भारतात पसरत आहे, आणि जगात होणारी प्रत्येक तांत्रिक प्रगती आपल्यामध्ये सामावून घेत आहे. १९२० किंवा त्या लगतचा अगदी कालपर्यंतच्या काळात ग्लोबल व्हिलेज ही संकल्पना कल्पनेतही आलेली नव्हती. आता ती भारतासह सर्वच राष्ट्रांमध्ये कमीअधिक झपाट्याने रूजते आहे. ह्या ग्लोबल व्हिलेजमध्ये एका गल्लीतला विकास दुसर्या गल्लीत व्हायला पूर्वीसारखा दशका दशकांचा वेळ लागत नाही. इंटरनेट हे भारतामध्ये १९९४-९५ मध्ये शहरी लोकांच्या घरात पोहोचले. पुढल्या दहा वर्षांत ते खेड्यापाड्यातही पोहोचले. आपल्याकडील इंटरनेटचा प्रसार हा वायर आणि तारांच्या तांत्रिकतेमध्ये अडलेला नाही. तो आपल्याकडील शिक्षणाच्या धीम्या गतीमुळे व ग्रामीण भागातील इंग्रजी भाषेच्या आकलनाच्या मर्यादांमुळे धीम्या गतीने होतो आहे.
सुपर माध्यमाची बीजे
छापलेले वृत्तपत्र हे कितीही गुळगुळीत आर्टपेपरवर छापलेले असले आणि डोळे दिपवणार्या बहुरंगी छायाचित्रांनी नटलेले असले तरी ते मुके असते. दुसरीकडे दुरदर्शन अगदी जिवंत दृश्य पहात आहोत एवढे प्रेक्षणीय असले तरी ती तशा दृश्यांची एक क्रमवारीने येणारी मालिका असते. न्युज अॅट टेन म्हणून बरोबर दहा वाजता सुरू झालेले दुरदर्शनवरचे वार्तापत्र काही मिनिटांनी पुढे गेले की ते मागे आणता येणे शक्य नसते. चुकलेली बातमी पुन्हा पंधरा मिनिटांनी वा अर्ध्या तासांनी जेव्हा पुन्हा दाखवली जाते तेव्हाच त्या दृश्यांचे दर्शन होते. दुरदर्शन संचावर अग्रलेख वाचता येत नाही, आणि घटना प्रत्यक्ष घडताना वृत्तपत्रात पहाता येत नाही. ह्या दोन्ही माध्यमांच्या त्या मर्यादा इंटरनेटच्या वेबसाईटला अडवू शकत नाहीत. वेबसाईटवर अग्रलेखही वाचता येतो आणि तीन मिनिटांपूर्वी दाखवले गेलेले दृश्य माऊसने एकदा क्लीक केलं की काही क्षणात डाऊनलोड होऊन समोर उलगडू लागते. म्हणजेच छापिल वृत्तपत्र आणि दुरदर्शन दोन्हींचे गुण एकत्र करणारे, व दोन्हींमधील दोषांना मागे सारून पुढे जाणारे माध्यम म्हणून इंटरनेट एकूण शर्यतीत पुढे येताना दिसते.इंटरनेट प्रेस वा टीव्ही माध्यमांच्या दोषांवर उपाय देत पुढे सरसावते म्हणून त्याला कोणी सुपर माध्यम म्हणेल असे मात्र नाही. इंटरनेट उद्याच्या सुपर माध्यमाच्या दिशेने निश्चित वाटचाल करू शकेल असा एक महत्वाचा गुण त्यात आहे, तो गुण म्हणजे त्याची इंटरॅक्टीव्हीटी. वाचकांच्या प्रतिक्रिया वृत्तपत्रे वा दुरदर्शनकडे जाण्यासाठी काही काळ जावा लागतो. वाचक कागदावर काहीतरी लिहील, तो कागद पोस्टाने वा फॅक्सने वृत्तपत्राकडे किंवा दुरदर्शनकडे पाठवील. त्यानंतर त्या वाचकाची ती प्रतिक्रिया जगापुढे येईल. वृत्तपत्र अशी किती पत्रे छापू शकेल, किंवा दुरदर्शन अशा किती पत्रांचा उल्लेख करू शकेल याला अनुक्रमे वृत्तपत्रातील जागा व दुरदर्शनवरील वेळेच्या मर्यादा आहेत. इंटरनेटवर बसलेला वाचक मात्र काही क्षणात कोणताही कागद न घेता, पोस्ट वा फॅक्सच्या नादी न लागता चटकन आपली प्रतिक्रिया (Comment) वेबसाईटवर नोंदवू शकेल. अशा असंख्य प्रतिक्रिया आल्या तरी त्यांना तिथे जागा कमी पडणार नाही, आणि कोणत्याही वेळी, कोणत्याही दिवशी कोणालाही कुठेही त्या प्रतिक्रिया वाचता येतील. वाचकांच्या प्रतिक्रियांना काही क्षणात उत्तर देणे हेही लेखकाला अशक्य नाही. वाचक वा दर्शक आणि इंटरनेटचे माध्यम यातली ही थेट संवादाची सोय इंटरनेटला सुपर माध्यमाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी खूपच उपयुक्त आहे.
भाषेच्या मर्यादाही मागे पडत आहेत..
इंटरनेट म्हंटलं की इंग्रजी अपरिहार्य आहे, आणि त्यामुळेच भारतासारख्या देशात त्यावर मर्यादा पडतील असं काल-परवापर्यंत वाटत होतं. मात्र हिंदी, मराठी किंवा अगदी बंगाली, तामिळ, तेलुगू सारख्या भाषांचे युनिकोड फाँटस उपलब्ध झाल्याने आज अक्षरशः हजारो वेबसाईटस आणि ब्लॉग्ज भारतीय भाषांतून सहजपणे तयार होताना दिसू लागले आहेत. मध्यंतरी जया बच्चन यांनी 'हम युपीवाले है, हम हिंदी में बोलेंगे' हे उदगार काढले आणि त्यावर गदारोळ उठला. ह्या प्रकरणात स्वतः अमिताभ बच्चनला काय म्हणायचय याबद्दल सर्वांनाच कुतूहल होते. अमिताभला जे म्हणायचे होते, ते अमिताभने भारताबाहेर असताना आपल्या ब्लॉगवर लिहीले. हा ब्लॉग अमिताभचा अधिकृत ब्लॉग असल्याने तो विश्वासार्ह होता. अमिताभ वृत्तपत्रांना वा वाहिन्यांना मुलाखतीसाठी उपलब्ध होऊ शकला नाही, तरी ब्लॉगवरील त्याच्या स्वगतावरून सर्व वृत्तपत्रांनी व वाहिन्यांनी सविस्तर बातम्या दिल्या. जगभरात अक्षरशः लाखो लोकांनी तो ब्लॉग वाचला. आपल्या हजारो प्रतिक्रिया त्यावर नोंदवल्या. अमिताभचा हा ब्लॉग इंग्रजीत होता. मात्र ज्यांना चांगले इंग्रजी येत नाही, असे महत्वाचे पुढारी वा तत्सम महत्वाच्या व्यक्तींना आज हिंदी, मराठी वा तत्सम भाषेत आपला ब्लॉग तयार करणे आज शक्य आहे. इंटरनेटने इंग्रजी भाषेचा अडथळा मागे टाकला आहे ही बाब भारतासारख्या बहुभाषी देशाच्या दृष्टीने खरोखरीच क्रांतीकारक आहे.इंटरनेटच्या बाबतीत डिजिटल डिव्हाईड च्या मुद्याबद्दल नेहमीच चर्चा होते. १९९५ साली भारतात आलेले इंटरनेट २००८ साली दुरदर्शनसारखे घराघरात गेलेले असेल असा दावा किंवा अपेक्षा कोणीच करणार नाही. त्यातही त्यातील भाषेचा वापर हा आजच्या पेक्षाही अधिक सुलभ होण्याची गरज आहे. भारतीय भाषांच्या युनिकोड तंत्राची प्रगती आजही पुढे सरकते आहे. २०१० सालापर्यंत तिला पुर्णत्व येईल अशी आशा बाळगली जात आहे.
सर्वसामान्यांची पत्रकारिता
वृत्तपत्रांतील वाचकांची पत्रे हा नेहमीच एक महत्वाचा भाग मानला जातो. कित्येकदा जेथे बातमीदार पोहोचत नाही अशा एखाद्या मुद्यापर्यंत एखादा वाचक पोहोचलेला असतो. तो पत्र लिहून ती बाब वृत्तपत्राला कळवतो तेव्हा आश्चर्याचे धक्के बसतात, आणि चक्रे वेगाने फिरतात. अशी उदाहरणे आपल्याला पहायला मिळतात. आता ह्या वाचकांच्या पत्राच्या पुढे नेणारी सर्वसामान्यांची पत्रकारिता किंवा सिटीझन्स जर्नालिझम जगभरात बहरताना दिसतो आहे. माध्यमांच्या दृष्टीने म्हंटले तर एकीकडे हे आव्हान आहे, तर दुसरीकडे ते एक वरदानही आहे. ज्या वृत्तपत्राकडे सिटीझन जर्नालिझमची जास्तीत जास्त शक्ती असेल, वा ज्या वाहिनीकडे जास्तीत जास्त संख्येने नागरिकांकडून प्रत्यक्ष घेतलेल्या व्हिडिओ क्लीप्स येत असतील अशा वाहिनींची ताकद इतरांपेक्षा अधिक असणार आहे. प्रगत होत चाललेले तंत्रज्ञान एकीकडे सोपे आणि दुसरीकडे किंमतीला अतिशय स्वस्त व परवडण्याजोगे असल्यानेच सिटीझन जर्नालिझमचा प्रवाह दुथडी भरून वाहू लागणार आहे. शे दोनशेला मिळणारा डिजिटल कॅमेरा शेकडो छायाचित्रे घेऊ शकेल व त्यातली अनेक छायाचित्रे इंटरनेटवरून अपलोड होऊन क्षणार्धात वृत्तपत्रे व वाहिन्यांकडे पोहोचू शकतील. हाच प्रकार काही फरकाने व्हिडिओ कॅमेर्यांच्या बाबतीतही होणार आहे.खर्या अर्थाने मल्टीमिडिया
सर्वसामान्यांची पत्रकारिता हे खरं तर उद्याचे एक स्वतंत्र माध्यम म्हणून उभं राहण्याची शक्यता आहे. आजचे ब्लॉग्ज हे त्याच दृष्टीने वाटचाल करीत आहेत. वृत्तपत्रे व वाहिन्या देऊ शकणार नाहीत एवढा मजकूर, चित्रे, छायाचित्रे, विचार असा समृद्ध ज्ञानखजिना ब्लॉगचे माध्यम जगापुढे ठेवत जाणार आहे. इंटरनेटच्या पोटात अशा प्रकारची छोटी मोठी माध्यमं नांदत राहणार आहेत. त्यांचा थेट परिणाम आज ज्यांना आपण माध्यमं म्हणतो त्यावर होत जाणार आहे. प्रगत राष्ट्रांतील कित्येक दैनिक वृत्तपत्रांमध्ये आज दररोज वैशिष्ट्यपूर्ण वेबसाईटस व ब्लॉग्जची माहिती वाचकांना दिली जात असते. भाषिक वृत्तपत्रे त्या दृष्टीने आज मागे दिसतात. पण उद्या त्यांना हा भाग ठळकपणे द्यावाच लागणार आहे.इंटरनेटच्या मर्यादा आणि उद्या
इंटरनेटचं ताकदवान माध्यम कोणत्याही मर्यादांविना उभं आहे असं चित्र मला इथे रंगवायचं नाही. हे मुद्दे निघाले की हमखास समोरून प्रश्न येतो, की आम्ही बसमध्ये वा रेल्वेगाडीत बसून वृत्तपत्र वाचत जातो. इंटरनेटचं तसं कुठे करता येतं? आरामखुर्चीत बसून इंटरनेटवरचा पेपर कुठे वाचता येतो? किंवा प्रकाशमान संगणकी स्क्रीनवरचं एक पान वाचलं की डोळ्यातून पाणी येऊ लागतं. ह्या इंटरनेटच्या आजच्या काही मर्यादा जरूर आहेत. मोबाईल फोनवर इंटरनेट दिसतं, ते कुठेही पहाता येतं असं मी म्हणणार नाही. कारण त्यात तर प्रचंड मर्यादा आहेत. पण एक लक्षात घ्यायला हवं की गरज ही शोधाची जननी असते. शास्त्रज्ञांचे आजचे प्रयत्न ई इंक आणि ई पेपर च्या दिशेने चालले आहेत. झेरॉक्स, मोटोरोला सारख्या कंपन्या गेली काही वर्षे अब्जावधी रूपये खर्च करून संशोधन करीत आहेत. ई पेपर २०१५ च्या आसपास प्रत्यक्षात येईल अशी चर्चा तज्ज्ञ आणि माहीतगार मंडळी करीत आहेत. ई पेपर असेल आपल्या रोजच्या पेपर सारखाच. संपूर्ण आकाराचा. उदबत्तीचा गोल आकाराचा सुरनळीसारखा बॉक्स असेल तशी सुरनळी ह्या पेपरची होईल. ती तुम्ही जवळ ठेवायची. दर पाच दहा मिनिटांनी त्यातला मजकूर व छायाचित्रे बदलत असतील. तुम्हाला वेळ मिळाला की पेपरची ती सुरनळी सरळ करायची. आलेली ताजी बातमी पहायची. सुरनळी परत ठेवून द्यायची. जे दैनिक हवे त्याची वर्गणी भरलेली असली की त्यावर त्या बातम्या आपोआप उमटत राहणार. ई इंक चे अतिसुक्ष्म कण त्या ई पेपरवर आपोआप इकडे तिकडे होऊन नवनवी अक्षरे, मथळे, छायाचित्रे रिमोट पद्धतीने त्यावर उमटणार. बातमीदार तसच काम करत असणार. अग्रलेख तसेच येत राहतील. लेख तसेच असतील. फक्त पेपर आणि इंक बदलेल.आज हा सारा प्रकार वाचताना स्वप्नवत आणि अशक्यप्राय वाटतोय. ते स्वाभाविक आहे. पण हे स्वप्न सत्याकडे वाटचाल करत हे देखील वास्तव आहे. ह्या दृष्टीने चाललेले अनेक प्रयोग यशस्वी होत आहेत. विज्ञानाची झेप मानवी मेंदूच्या पलिकडची असते. फॅक्स किंवा दुरदर्शनची कल्पना अठराव्या -एकोणीसाव्या शतकात अशक्यप्रायच वाटली होती. पण विसाव्या शतकात ते वास्तवात आलं. आपण माध्यमांची चर्चा आज करतोय ती आजचे संदर्भ डोक्यात घेऊन. उद्याचे प्रगत संदर्भ डोक्यात घेतले की वाटतं आपला ई पेपर उघडला की पहिल्या पानावर आलेली ताजी बातमी त्यावरची व्हिडिओ क्लीप पहात आपल्याला वाचता येईल. अशा वेळी प्रेस मिडीया विरूद्ध टीव्ही मिडीया अशी विसाव्या शतकात झालेली ऐतिहासिक चर्चा ऐकून हंसू आल्याशिवाय राहणार नाही.
एक मात्र नक्की, की माध्यमांचे दृश्य बदलले तरी त्याचा आत्मा बदलणं विज्ञानाच्या ताकदीबाहेरचं आहे. माणसाची चाल पायावरच राहणार आहे. आजचा कागदी पेपर असो की उद्याचा ई पेपर माणसाची चाल पायांनी आणि विचार डोक्यातूनच येत राहणार आहे. ई पेपर आल्याने माध्यमांच्या भूमिकेत मोठा बदल संभवतो अशी चर्चा मात्र जगभर कुठेही चाललेली दिसत नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा