५ मार्च, २०११

टक्स पेंटची सही धम्माल. भाग - 3


(एकूण तीन भागात टक्स पेंटची माहिती आली आहे. ही माहिती आपण भाग 1 ते भाग 3 अशी क्रमाने वाचावी अशी विनंती आहे.  हा तिसरा भाग आहे.पहिल्या आणि दुसऱ्या भागाच्या लिंक्स इथे आणि त्या त्या  भागाच्या खाली दिल्या आहेत. त्यावर क्लीक करून पुढे जाता येईल. )
  • मुलांनो,
    तुम्ही छान चित्र काढलीत तर ती सेव्ह करायला विसरू नका.
    सेव्ह केलीत की तुमच्या चित्राची फाईल अटॅच करून आपल्या संगणक डॉट इन्फो कडे sanganakinfo@gmail.com ह्या ईमेलवर जरूर पाठवा. सोबत तुमचा एक छान फोटो सुद्धा पाठवा.
    छान चित्रे काढणाऱ्या मुलांची नावे आणि त्यांचे फोटोसुद्धा आपण संगणक डॉट इन्फो वर प्रसिद्ध करणार आहोत. आहे ना धम्माल...
    आणि हो, ही चित्रे तुम्ही केव्हाही पाठवू शकता. पुढल्या महिन्यात किंवा त्याच्या पुढल्या महिन्यात सुद्धा. शिवाय कितीही चित्रे तुम्ही पाठवू शकता. त्यामुळे आता आपली स्कुलची परीक्षा असेल तर घाई करू नका. आता परिक्षेची तयारी करा. परीक्षा संपली की मगच टक्स पेंट उघडा. आता सगळा वेळ अभ्यास करा. सुट्टीत आपला संगणक आणि आपला टक्स पेंट, करा हवा तेवढा एंजॉय..
  • सो, सगळं जग तुमचं चित्र आणि तुमचा फोटो पहायला उत्सुक आहे. आहे ना मज्जा!! चला तर, लागा कामाला! हॅप्पी टक्स पेंट टू यू ऑल कीडस..
  • आणि, बेस्ट ऑफ लक फॉर युवर एक्झाम्स... बाय

एंजॉय टक्सपेंटः मुलांसाठी धम्माल गेमः भाग - 2

(एकूण तीन भागात टक्स पेंटची माहिती आली आहे. ही माहिती आपण भाग 1 ते भाग 3 अशी क्रमाने वाचावी अशी विनंती आहे.  हा दुसरा भाग आहे.पहिल्या आणि तिसऱ्या भागाच्या लिंक्स इथे आणि त्या त्या  भागाच्या खाली दिल्या आहेत. त्यावर क्लीक करून पुढे जाता येईल. )

पहिल्या भागात आपण टक्स पेंट डाऊनलोड केला. आता तो आपल्या संगणकावर इन्स्टॉल करू. इन्स्टॉलेशन फार सोपं आणि बिन बोभाट होतं. प्रथम मूळ प्रोग्राम इन्स्टॉल करा. त्यासाठी tuxpaint-0.9.21c-win32-installer.exe ह्या तुम्ही डाऊनलोड केलेल्या फाईलवर क्लीक करा. तुमच्या संगणकावर फायरवॉल लावलेली असेल (बहुधा असणारच) तर ती वॉल टक्स पेंटला पुढे जाण्याची परवानगी द्यायची की नाही असा संदेश तुम्हाला देईल. ती परवानगी द्या आणि इन्स्टॉलेशन पूर्ण होऊ द्या. हे इन्स्टॉलेशन पूर्ण झाले की प्रोग्राम न उघडता (आणि उघडला असेल तर तो बंद करून) पुढला रबर स्टॅपचा अॅड ऑनही इन्स्टॉल करा. ही दोन्ही इन्स्टॉलेशन्स पूर्ण झाली की तुम्ही तुमच्या मुलांसाठी, नातवांसाठी, आणि एकूणच बच्चे कंपनीसाठी टक्स पेंट वापरायला मोकळे झालात.
तुमच्या संगणकाच्या डेस्कटॉपवर टक्स पेंट चा शेजारी दाखवलेला आयकॉन आला आहे. त्यावर डबल क्लीक करून टक्स पेंट चालू करा. 
टक्स पेंट उघडताच प्रोग्रामचे चित्र तुमच्या समोर येईल. त्यावर एकदा क्लीक करा.  खाली दाखवलेली विंडो तुमच्या समोर हाजिर होईल.
 आता ह्या विंडोत तुम्हाला हवं ते करण्याची मुभा आहे. बाकी सारं आपल्या नेहमीच्या पेंट ब्रश सारखंच आहे. फक्त आपल्याकडे असलेले वेगवेगळे रबर स्टॅप्स वापरून वेगवेगळी मजा आपल्याला आणि आपल्या बच्चे कंपनीला करता येते. 
वरील Paint टूल वर क्लीक करा आणि रेघोट्या मारा. किंवा, Stamp टूलवर क्लीक करून उजवीकडे कोणकोणती चित्रे उपलब्ध होतात ते पहा. आता त्यातून मुलांच्या डोक्यातून कशा वेगवेगळ्या कल्पना तयार झाल्या ते खालील चित्रांवरून तुमच्या लक्षात येईल. 

पूर्ण आकारात ही आणि आणखी शेकडो चित्रे पहायची असतील तर टक्स पेंटच्या साईटवरील गॅलरी पहायला हवी. त्यात वरील चित्र तुम्हाला पूर्ण आकारात पाहता येईल.
आणि, हो, आणखी एक गंमत आहे. ती पाहू टक्स पेंट धम्माल च्या भाग 3 मध्ये. 

लहान मुलांसाठी धम्माल 'टक्सपेंट' : भाग -१

(एकूण तीन भागात टक्स पेंटची माहिती आली आहे. ही माहिती आपण भाग 1 ते भाग 3 अशी क्रमाने वाचावी अशी विनंती आहे.  हा पहिला भाग आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या भागाच्या लिंक्स त्या भागाच्या खाली दिल्या आहेत. त्यावर क्लीक करून पुढे जाता येईल. )

Tux Paint हा गेम आहे. वय वर्षे 3 आणि त्यावरील मुले हा गेम खेळण्यात प्रचंड रमतात. याचं कारण त्या कोवळ्या वयात त्यांची आपली म्हणून जी कल्पनाशक्ती असते, ती वापरण्याची भरपूर संधी त्यांना ह्या गेममध्ये मिळते. तशी मुलं आपल्या साध्या पेंट ब्रशमध्ये रेघोट्या मारण्यातही रमतात. त्या रेघोट्या मारायला एकदा त्यांनी सुरूवात केली की मग ते माऊस सोडायला तयार नसतात. आपलं ते रेघोट्या स्वातंत्र्या ते मनमुराद लुटतात.
पेंट ब्रश हे छोटसं पिल्लू मानलं तर टक्स पेंट त्याच्या पुढे हत्तीसारखा आहे. दोघांमध्येही भरपूर रंगपंचमी करता येते. कधी कधी तर मोठी माणसंही टक्स पेंट खेळता खेळता मुल होऊन रमलेली दिसतात.
पुढलं काही सांगण्याअगोदर हा टक्स पेंट प्रथम डाऊनलोड करून घ्या. त्यासाठी ह्या दुव्यावर क्लीक करा. टक्स पेंटचा डाऊनलोड दोन भागात आहे. पहिला भाग म्हणजे टक्स पेंट हे अॅप्लीकेशन अर्थात मूळ प्रोग्राम. तो 11 एम.बी. चा आहे. दुसरा भाग हा टक्स पेंट साठी अॅड ऑन म्हणजे त्यात भर टाकणे आहे. ह्या अॅड ऑनमध्ये वेगवेगळ्या प्राण्यांची, फुलांची, पदार्थांची, पक्षांची वगैरे वगैरे रेलचेल आहे. ती मुलांना खूप आवडते. हा अॅड ऑन मूळ प्रोग्रामच्या तिप्पट मोठा म्हणजे 39 एम.बी. चा आहे. तो डाऊनलोड करण्यासाठी ह्या दुव्यावरच उपलब्ध आहे. याच पानावर मूळ प्रोग्रामच्या उजवीकडे शेजारीच याच्या डाऊनलोडींगचीही लिंक दिलेली आहे.
थोडक्यात, 11 एम.बी. चा मूळ प्रोग्राम आणि 39 एम.बी. चे अॅड ऑन (याला रबर स्टॅंप्स असं म्हणतात) प्रथम डाऊनलोड करून घ्या.
टक्स पेंटचं वैशिष्ट्य म्हणजे तो अधिकृतपणे आणि पूर्णपणे मोफत आहे. दुसरी गोष्ट त्याचे कोड ओपन सोर्स प्रकारचे म्हणजे खुले आहे. जर तुम्ही संगणक व्यावसायिक वा प्रोग्रामर असाल तर टक्स पेंट ला तुम्ही तुम्हाला हवा तसा आकार देऊ शकता. समजा, प्रोग्रामर नसाल, तर टक्स पेंट जसा आहे तसा वापरा. त्यात मुलांसाठी प्रचंड आनंद भरलेला आहे.
टक्स पेंट ची आणखी माहिती घेऊ पुढल्या भागात, म्हणजे भाग - 2 मध्ये.

असाही एक सलमान खान - भाग 3

('असाही एक सलमानखान' एकूण तीन भागात आहे. हा भाग तिसरा आहे. आपण हे तिन्ही भाग क्रमाने वाचावे अशी विनंती आहे. पहिला भाग ह्या दुव्यावर, आणि दुसरा भाग येथे उपलब्ध आहे.)
आपल्या मुलासह सलमान खान
आज खान अॅकॅडमीचे व्हिडिओवरील सुमारे 2500 अभ्यासपाठ हे इंग्रजीत आहेत. त्यातला आवाज हा सलमान खानचा आहे. सलमानला फक्त इंग्रजीच बोलता येतं. मोडकं तोडकं बंगालीही येतं. पण इतर भाषा त्याला येत नाहीत. यासाठी त्याने खान अॅकॅडमीचा ट्रान्सलेशन प्रोजेक्ट जाहीर केला आहे. त्यामागील कल्पना जगाला भावणारी आहे. जे प्रत्येकी वीस वा पंचवीस मिनिटांचे पाठ सलमानने तयार केले आहेत, त्यातील धडे, व एकूण ढाचा तसाच ठेवून त्याचे भाषांतर इतर भाषांमध्ये करायचे. समजा, बीजगणिताचा एक पाठ आहे. तर आपल्या एखाद्या बीजगणिताच्या शिक्षकाने सलमानच्या ऐवजी बोलायचे, तो पाठ समजावून सांगताना फक्त रेकॉर्ड करायचा. मूळ पाठ तर तयार आहेच. फक्त इंग्रजीऐवजी नवी भाषा त्यात भरायची आहे. हा ट्रान्सलेशन प्रोजेक्ट सलमानने जगापुढे खुला केला आहे.  कोणीही त्यात सहभागी होऊ शकतं. त्याची माहिती ह्या दुव्यावर आहे. मराठीसाठी आपल्यापैकी कोणी ह्या प्रकल्पात सहभागी होत असेल तर त्याची माहिती संगणक डॉट इन्फो ला जरूर कळवा. त्याचा वृत्तांत आपण सर्वांच्या माहितीसाठी जरूर प्रकाशित करू. 
दुसरी गोष्ट सलमानने आपल्या वेबसाईटवर स्वतःशीच एक संवाद साधला आहे. त्याला म्हणताना FAQ म्हंटलं असलं तरी एखादी मुलाखत वाचावी असा तो संवाद आहे. एका मूळ इंग्रजी प्रश्नाचे हे भाषांतर पहाः
तुम्हाला ह्या उपक्रमाचे रूपांतर व्यवसायात करण्याची इच्छा आहे का? समजा एखाद्या व्हेंचर कॅपिटल कंपनीने तुम्हाला तशी ऑफर दिली वगैरे तर...?
सलमान खानः तशा ऑफर्स मला खूप आल्या. पण मलाच ते रूचत नाही. ज्यावेळी मी 80 वर्षांचा होईन, तेव्हा मला हे समाधान मिळालं की जगातील अब्जावधी विद्यार्थ्यांना मी उत्तम दर्जाचं शिक्षण उपलब्ध करून दिलं, तर ते मला अधिक आवडेल. शिक्षणाचा धंदा सुरू करण्यापेक्षा मला ते अधिक महत्त्वाचं वाटतं. जगातला असा वर्ग की जो अगोदरच पुढारलेला आहे, त्याच्याकडून दरमहा 19.99 डॉलर फी घ्यायची, धन कमवायचं, आणि मग शेवटी आपली कंपनी कुठल्या तरी मोठ्या कंपनीला प्रचंड किंमतीला विकून टाकायची यात ते समाधान नाही. मला काय कमी आहे, सुंदर बायको, ज्याच्या बरोबर रमून जावं असा मुलगा, दोन होंडा गाड्या, एक सुंदर घर माझ्याकडे आहे. आणखी काय हवं?
खान अॅकॅडमीचं भविष्यातील ध्येय्य काय आहे?
सलमान खानः माझी खान अॅकॅडमी हे जगातील पहिलं मोफत शिक्षण देणारं वर्ल्ड क्लास व्हर्च्युअल  स्कुल व्हावं हे माझं स्वप्न आहे. म्हणजे अशी शाळा की जिथे जगातील कोणालाही उत्तम दर्जाचं शिक्षण मोफत मिळेल. माझं ध्येय्य म्हणाल तर मरेपर्यंत असे शिक्षणासाठीचे व्हिडिओ तयार करत रहावं हे माझं ध्येय्य आहे. मी पुढली किमान 50-60 वर्षे तरी मरणार नाही असा माझा अंदाज आहे. इयत्ता पहिली ते बारावी साठीच्या प्रत्येक शाळकरी विषयावरचा व्हिडिओ मला तयार करायचा आहे. 
सलमानची ही मूळ प्रश्नोत्तरे इंग्रजीत वाचायची असतील तर ह्या दुव्यावर जरूर जा. 
तर असा हा सलमान खान. भविष्यातलं जग तरूणांचं आहे, म्हणजे नेमकं काय आहे हे तुमच्या मित्रमैत्रिणींना समजवायचं असेल तर, त्यांना असाही एक सलमान खान चे भाग एक ते तीन वाचायला सांगा. पुढे आणखी कोणताही प्रश्न शिल्लक राहणार नाही. 
  • (वाचकहो, आपल्याला सलमान खानच्या ह्या प्रयोगाबद्दल काय वाटले ते ह्या लेखाखालील कॉमेंटसच्या जागेचा उपयोग करून जरूर कळवा. कॉमेंटसविना कोणताही ब्लॉग हा पाण्याविना झा़डानं सुकावं तसा सुकत असतो. कॉमेंटसचे खत-पाणी संगणक डॉट इन्फो ला हवं आहे. - माधव शिरवळकर)

टर्कीत (तुर्कस्थान) ब्लॉगस्पॉट वर बंदी

कथा कुणाची व्यथा कुणा असा प्रकार 2 मार्चला तुर्कस्थानात घडला आहे.
फुटबॉलच्या सामन्यांमुळे ब्लॉगस्पॉट.कॉम वर बंदी आली आहे. झालं असं की तुर्कस्थानात डिजिटर्क नावाची सॅटेलाईट टीव्ही कंपनी आहे. त्यांच्याकडे तेथील स्पॉर टोटो सुपर लीग फुटबॉल सामन्यांच्या वृत्तप्रसारणाचे हक्क होते. पण तुर्कस्थानातील 6,00,000 (अबब..) ब्लॉगर्सपैकी अनेकांनी आपल्या ब्लॉगवर ते वृत्तांत देण्यास सुरूवात केल्याने डिजिटर्क कंपनी अडचणीत आली. परिणामी दाद मागण्यासाठी ते न्यायालयात गेले. न्यायालयाने मग थेट ब्लॉगस्पॉट.कॉम वरच बंदी आणली. त्यामुळे तुर्कस्थानातील सर्वच विषयांवरचे ब्लॉग बंद झाले आहेत. ब्लॉगस्पॉट.कॉम हे गुगलच्या मालकीचे आहे. गुगलच्या प्रवक्त्याने पत्रकारांशी बोलताना अशी बंदी आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
ह्या संदर्भातील BBC ने दिलेली बातमी ह्या दुव्यावर वाचा.

लिबियात इंटरनेट सुविधा बंद

Libya Telecom and Technology चे ltt.ly हे संकेतस्थळ आज 5 मार्च रोजी उपलब्ध नाही.
लिबियाचा हुकूमशहा मुहम्मर गडाफी याच्या विरोधात सुरू झालेले बंड मोडून काढण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून देशातील इंटरनेट यंत्रणा पूर्णपणे ठप्प करण्यांत आल्याच्या बातम्या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांनी दिल्या आहेत. लिबियाला इंटरनेट व टेलिकम्युनिकेशन सेवा पुरविणाऱ्या कंपन्या मुहम्मर गडाफीचा मुलगा महंमद याच्या मालकीच्या आहेत. एकाएकी संपर्क व्यवस्थाच थांबल्याने ईमेल पाठवणे तसेच कोणतीही डेटा ट्रान्सफर करणे ह्या प्रक्रियाच पूर्ण थांबल्या आहेत. 
गेला महिनाभर  लिबियात आंदोलनांनी जोर धरल्यानंतर लिबियातील इंटरनेटचा वापर प्रचंड वाढल्याचे गुगलने प्रसिद्ध केलेल्या आंकडेवारीत दिसून आले होते. लोक फार मोठ्या प्रमाणावर आपल्या डिजिटल कॅमेऱ्यांनी तसेच मोबाईल फोनच्या कॅमेऱ्यांनी आंदोलनाची क्षणचित्रे टिपत होते, व ती युट्युबवर प्रकाशित करीत होते. ह्या कारणाने लिबिया आणि मुहम्मर गडाफी यांच्या विरोधात एक आंतरराष्ट्रीय मत तयार होऊ लागले होते. कदाचित, त्याचा अंदाज आल्यानेच लिबियातील इंटरनेट सेवा पूर्णपणे थांबविण्याचा निर्णय गडाफी कुटुंबाने घेतला असावा असा अंदाज व्यक्त करण्यांत येतो.