१० मार्च, २०११

मायक्रोसॉफ्टही घाईत...14 मार्चला इंटरनेट एक्स्प्लोअरर 9 येतोय..


पण थांबा, तुमच्या संगणकावर WINDOWS XP असेल तर तुम्हाला नवा कोरा इंटरनेट एक्स्प्लोअरर 9 लावता येणार नाही. कारण तो WINDOWS XP सपोर्ट करीत नाही.
तुम्हाला त्यासाठी WINDOWS VISTA अथवा WINDOWS 7 तुमच्या संगणकावर लावावं लागेल.
नवे IE9 हे  HTML 5 ने युक्त आहे. शिवाय नवे जावास्क्रीप्ट इंजिन (JSCRIPT) ची साथ त्याला असणार आहे. ह्या इंजिनचे नाव आहे CHAKRA.
गेल्या महिन्यात 10 फेब्रुवारी रोजी मायक्रोसॉफ्टने IE9 चा रिलीज कँडिडेट इंटरनेटवर सादर केला होता. आता 15 मार्चला येतेय ती अंतिम आवृत्ती, तुमच्या आमच्या सर्वांसाठी.
पण, आता विंडोज 7 कडे गेल्याशिवाय गत्यंतर नाही. कारण IE9 आणि HTML5 चा लाभ घ्यायचा असेल तर दुसरा मार्ग नाही. FACEBOOK, TWITTER वापरत असाल, YOU TUBE चे फॅन असाल तरी तुम्हाला लवकरच WINDOWS 7 चा आधार घ्यावा लागणार आहे.

फायरफॉक्स 4 आला...डाऊनलोडींगसाठी उपलब्ध झाला..

शेवटी वाट पहात असलेला फायरफॉक्स 4 आला. कालच 9 मार्च रोजी तो डाऊनलोडींगसाठी उपलब्ध झाला आहे. ज्यांना डाऊनलोड करायचा आहे त्यांनी ह्या दुव्यावर जावे. Firefox 4 RC मधल्या RC चा अर्थ आहे Release Candidate. ही आवृत्ती मुख्यत्वे जगभरच्या प्रोग्रामर्ससाठी आहे. त्यांनी चाचणी घेऊन सुचना कराव्यात अशी मोझीला कॉर्पोरेशन (फायरफॉक्सचे निर्माते) यांची अपेक्षा आहे. पण आपण प्रोग्रामर नसलो म्हणून काय झालं. आपल्याला हा रिलीज कँडिडेट वापरण्याचा हक्क आहे.
ह्या नव्या व्हर्जनची वैशिष्ट्ये ह्या दुव्यावर उपलब्ध आहेत.
फायरफॉक्स 4 मध्ये खूप सुधारणा (huge performance enhancements हे फायरफॉक्सचे दाव्यातले शब्द आहेत) केल्या आहेत असं मोझीलाचं म्हणणं आहे. HTML 5 ने ही आवृत्ती युक्त असल्याने इंटरनेटवरील व्हिडिओ उत्तम प्रकारे दिसतील असा त्यांचा आत्मविश्वास आहे.

PDFESCAPE: वेब अॅपचा वापर (भाग 2)

PDFESCAPE वेब अॅपचा आतला भाग असा आहे. एक तीन पानी पीडीएफ फाईल तिथे उघडली.
 त्यातील पहिल्या पानावर एक स्टीकी नोट टाकली. ती वरील चित्रात दिसत आहे. 
PDFESCAPE सध्या वापरण्यासाठी उपलब्ध आहे. मात्र अजुनीही त्याचा विकास चालू आहे. सध्या ते बीटा म्हणजे चांचणी आवृत्ती म्हणून इंटरनेटवर आलं आहे. तुम्हाला अपेक्षित असलेली प्रत्येक गोष्ट ह्या पीडीएफ एडिटर मध्ये आज नाही हे खरं असलं तरी ज्या सोयी आज उपलब्ध आहेत त्या अतिशय उपयुक्त आहेत. 
PDFESCAPE मध्ये तुम्ही काय करू शकताः
1) तुमच्या पीडीएफ फाईलमधील कोणताही भाग (अक्षरे, शब्द, चित्र वगैरे) तुम्ही पांढरा करू शकता. आपण कागदावर व्हाईट फ्लुईड लावून करेक्शन करतो, तसलाच हा प्रकार.
2) पांढऱ्या केलेल्या भागावर तुम्ही हवा तो शब्द टाईप करू शकता. म्हणजेच तुम्ही अंतिमतः टेक्स्ट एडिटींग करू शकता. मात्र थेट शब्दावर टेक्स्ट कर्सर आणून एडिटींगची सोय अजून आलेली दिसत नाही.
3) तुमच्या पीडीएफ फाईलमध्ये तुमची कॉमेंट म्हणून तुम्ही एखादी यलो स्टीकी नोट लावून त्यावर शेरा देऊ शकता. ही सोय कार्यालयांसाठी फारच चांगली आहे.
4) पीडीएफ पानावर एखादे वा अनेक चित्रे (फोटो वगैरे ग्राफीकही) टाकू शकता.
5) कोणत्याही शब्दाला वा चित्राला हायपरलिंक देऊ शकता.
6) पीडीएफ मधला एखादा फॉर्म भरू शकता. किंवा एखादा फॉर्म तयार करू शकता.
7) हे बदल करता करता ते सेव्हही करू शकता.
8) पीडीएफ पाने उभी आडवी (रोटेट लेफ्ट/राईट) करू शकता. पाने डिलीट करू शकता. पानांची जागा आतल्या आत  बदलू शकता.
9) युनिकोड मराठीची सोय आहे. मी मराठी मजकूर जोडाक्षरांसहित टाईप करू शकलो.
10) पीडीएफ रीडर म्हणून म्हणजे केवळ पीडीएफ फाईल वाचनासाठीही PDFESCAPE वापरता येईल.
ह्या साऱ्या सोयी मोफत उपलब्ध आहेत.
काही लक्षात ठेवण्याजोग्या गोष्टी अशाः
1) काही मर्यादा आहेत. उदाहरणार्थ पीडीएफ फाईल 50 पानांच्या पेक्षा अधिक असेल तर ती उघडता येत नाही.
2) क्रोम ब्राऊझर मध्ये हे वेब अॅप वापरू नका. ते फक्त इंटरनेट एक्स्प्लोअरर वा फायरफॉक्स मध्ये वापरा. क्रोममध्ये अनेक बग्ज दिसून येतात.
3) असा अन्य पीडीएफ एडिटर (वेब अॅप) इंटरनेटवर उपलब्ध असल्याचे माझ्या माहितीत नाही. आपणास माहित असल्यास वाचकांनी कृपया कॉमेंटद्वारा ती माहिती द्यावी.
राहुलने गावातल्या सायबरकॅफेत बसून PDFESCAPE वापरून ऑफिसची पीडीएफ फाईल एडिट करून पाठवली. एक चांगलं वेब अॅप म्हणून त्याची माहिती मला ईमेल करून कळवली. मी ती तुमच्याशी शेअर केली. तुम्हीही PDFESCAPE वापरून पहा. अनुभव मला कॉमेंटस देऊन जरूर कळवा.

वेगवेगळे संगणकः नामे आणि कारनामे

एक वर्क स्टेशन, पीसी, डेस्क टॉप वगैरे...

पीसी, वर्क स्टेशन, डेस्क टॉप, सर्व्हर, मेनफ्रेम, सुपर काँप्युटर ही आणि आणखीही काही संगणकाचीच नावे. इथून तिथून ती सारखी कानावर पडत असतात. एकाच संगणकाची ही सारी नावे आहेत, की प्रत्येक नाव हे वेगळ्या संगणकाचे आहे? हा प्रश्न बरेचदा आपल्या मनात रेंगाळत असतो. त्याचं उत्तर मिळवावसं वाटतं, पण ह्या ना त्या कारणाने ते राहून गेलेलं असतं. संगणकइन्फो मध्ये आज त्या उत्तरावर कटाक्ष टाकूः

1) पीसीः अर्थात पर्सनल काँप्युटर. फार पूर्वी खोलीएवढे अवाढव्य संगणक होते. असे संगणक वापरण्यासाठी अनेक माणसे असत. पुढे प्रगती होत गेली आणि संगणक आकाराने लहान झाले. लहान संगणकांना मग मायक्रो-काँप्युटर्स म्हणण्याची पद्धत पडली. हे लहान म्हणजे मायक्रो-काँप्युटर्स मोठ्या संगणकाप्रमाणेच सर्व कामे करू शकत असत. मात्र त्यांना फार थोडी जागा लागे, आणि त्यावर काम करण्यासाठी फारच कमी माणसे लागत. मायक्रो-काँप्युटर्समधूनच नंतर पर्सनल काँप्युटर उदयाला आला. टेबलावर राहू शकेल इतक्या लहान आकाराचा, आणि एका माणसाला सहजपणे वापरता येण्याजोगा. हा पीसी. व्यक्तीगत संगणक. तो लॅप टॉप प्रकारचाही असू शकेल, किंवा टेबलावर कायम असलेला, सहजी हलविता न येणारा डेस्कटॉपही असू शकेल. 
2) वर्क स्टेशनः हाही टेबलावरचाच संगणक. एका माणसाने वापरण्याचाच. म्हणजे खरं तर पी.सी.च. पण त्याला पी.सी. म्हणायच्या ऐवजी वर्क स्टेशन म्हंटलं जातं, याचं कारण त्याची क्षमता आणि तुलनेने मोठा आकार. अधिक क्षमतेचा प्रोसेसर त्यात असणार हे ओघानच आलं. मेमरीही घसघशीत असणारच. गेम्स तयार करण्यासाठी, थ्रीडी ग्राफीक्ससाठी किंवा अॅनीमेशनसाठी असे तगडे संगणक लागतात. खूपदा त्यांचे मॉनिटर्स देखील चांगलेच मोठे असतात. तुमच्या घरच्या संगणकात प्रोसेसर, मेमरी वगैरे प्रचंड क्षमतेची असेल आणि तुम्ही त्यावर मोठ्या आकाराच्या फाईल्सचे काम करीत असाल तर तुमचा संगणकही वर्क स्टेशन प्रकारातच येईल. 
3) डेस्क टॉपः तुमच्या टेबलावर कायम विसावलेला संगणक. डेस्क हा शब्द टेबल ह्या अर्थाचाच. डेस्क टॉप संगणक हा मोठ्या क्षमतेचा असेल किंवा मध्यम वा कमी क्षमतेचाही असेल. पी.सी. हा एकाच वेळी डेस्क टॉप आणि वर्क स्टेशनही असू शकेल. मात्र लॅपटॉप टेबलावर कायम ठेवून वापरलात तरी त्याला डेस्क टॉप म्हणता येणार नाही. 
4) मेन फ्रेमः जुन्या काळात मोठ्या कंपन्यांमध्ये असलेले प्रचंड आकाराचे संगणक. हे एकेका खोलीइतकेही असत. किंवा, चक्क एखादा मजलाच्या मजला त्यांनी व्यापलेला असे. पुढे संगणक आकाराने लहान आणि क्षमतेने मात्र कितीतरी अफाट होत गेले. पण सवयीने आजही कितीतरी कंपन्यांमध्ये मेन फ्रेम हे शब्द वापरले जाताना दिसतात. लाखो उलाढाली करणारा संगणक, बहुधा तो एखाद्या टेबलावरच स्थानापन्न असतो. पण त्याच्या राक्षसी क्षमतेमुळे त्याला आपलं मेनफ्रेम म्हणायचं, इतकच. बाकी जुन्या काळातली आकाराची अवाढव्यता केव्हाच इतिहासात जमा झालीय.
5) सुपर काँप्युटरः भारताचा 'परम' हा सुपर काँप्युटर घ्या. आपल्या डॉ. विजय भटकरांच्या नेतृत्वाखाली तो तयार झाला हे आपण नेहमीच वाचतो आणि ऐकतो. सुपर काँप्युटर हा संख्येने एक असेल किंवा एकाच वेळी तो अनेक संगणकांचा पुंजकाही असेल. सामान्यतः सुपर काँप्युटर प्रकारातील संगणक हा मोठ्या गुंतवणूकीने तयार झालेला असतो. पीसी हा एका पेठेएवढा असला तर सुपर काँप्युटर हा खंडप्राय वा एखाद्या ग्रहाएवढा असल्यासारखा आहे. 
सर्व्हरः असा संगणक की जो त्याच्याशी जोडलेल्या इतर संगणकांना काही तरी सेवा पुरवतो. जोडलेले जे संगणक सर्व्हरची सेवा घेतात त्यांना क्लायंट असं म्हणण्याचीही पद्धत आहे. इतर संगणकांशी जोडलेला असल्याने सर्व्हर हा नेहमी नेटवर्कमध्येच असतो. थोडक्यात, एकमेकांशी जोडलेल्या अनेक संगणकांमधील जो मायबाप दाता संगणक असतो त्याला सर्व्हर असं म्हणतात. 
1980 सालचा एक मेनफ्रेम संगणक
पुढील एका पोस्टमध्ये आपण लॅपटॉप, नोटबुक, नेटबुक, पीडीए, टॅब हे कुठेही सहज नेता-आणता येणारे संगणक नेमके एकमेकांपासून कसे वेगळे असतात याची माहिती घेऊ.