२१ फेब्रु, २०११

महाविद्यालय आणि मास कम्युनिकेशन

महाराष्ट्रातलं महाविद्यालय म्हंटलं की एक विशिष्ट चित्रफीत डोळ्यासमोरून सरकते. अगदी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारापासून ते आतल्या आवारानंतर कॉरीडॉर आणि वर्गांपर्यंत एक निश्चित सरासरी दृश्य आपण नकळत गृहित धरतो. महाविद्यालयाचा परिसर, वास्तू आणि वातावरण हा महाविद्यालयीन जीवनातल्या अनेक घटकांपैकी एक घटक झाला. मात्र सामाजिक घटकांमध्ये व्यवस्थापनातील पदाधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि त्यांचे पालक हे ओघाने येतात. ह्या सार्‍या सामाजिक घटकांचं क्षणिक प्रतिबिंब दोन ठिकाणी आवर्जुन दिसतं. एक महाविद्यालयाची वेबसाईट आणि दुसरं म्हणजे वर्षातून एकदा प्रकाशित होणारा स्मरणिकासदृश व बहुभाषिक निवेदन तसंच तत्सम साहित्याने नटलेला साधारणतः शंभर पानांचा छापिल अंक. आजकाल महाविद्यालयाची वेबसाईट ही युजीसीची देखील एक मागणी असते. खेरीज नॅकची वरची श्रेणी कायम राखण्यासाठी किंवा उंचावण्यासाठी तर ती नितांत आवश्यक असते. त्यामुळे सामान्यतः अगदी तुरळक अपवाद वगळता बहुसंख्य महाविद्यालयांचे स्वतंत्र व अधिकृत संकेतस्थळ आजकाल वेबवर दिसते.

वर उल्लेख केल्याप्रमाणे वार्षिक अंक व सतत स्थिर असलेले वेबवरील संकेतस्थळ हे दोन खांब महाविद्यालयाच्या संपूर्ण मास कम्युनिकेशनची गरज भागवण्याचा प्रयत्न करीत असतात. याला जोड असते महाविद्यालयाच्या भिंतीवर सर्वत्र दिसणार्‍या सूचनाफलकांची.. त्यावर मुख्यत्वे विद्यार्थीवर्गासाठी तात्कालिक माहिती देणार्‍या सुचनांचा नियमित ओघ चालू असतो. मास कम्युनिकेशन प्रक्रियेतील आपली माफक भूमिका त्या सुचना तशा समाधानकारकपणे बजावत असतात. महाविद्यालयीन अध्यापनाचे वेळापत्रक एवढे बांधीव असते की वर्षभरात वर उल्लेखलेले सर्वच सामाजिक घटक आपल्या शैक्षणिक उद्योगात गर्क असतात. त्यांचं गर्क असणं हे स्वाभाविकही असतं आणि खरं तर आवश्यकही असतं. मात्र ह्या एकूण वास्तवात महाविद्यालयाच्या मास कम्युनिकेशची गरज (खरं तर तहान) ही पूर्णपणे भागत नाही. एक अनामिक बॅकलॉग किंवा उणीव त्यात राहून जात असते. अर्थात त्याची सवय वर्षोनुवर्षे झाल्याने त्यात काही वावगं असं जाणवतही नाही.

मास कम्युनिकेशन आणि बजेट यांचं नातंही विचारात घेतल्यावाचून सुटका नसते. अगदी चार पानांचं छापिल नियतकालिक नियमित काढायचं म्हंटलं तरी त्यात अडचणी असतात. त्या अडचणी रास्तही असतात. बजेटचं सोंग आणणं शक्य नसतं. दुसरीकडे चार पानं नियमित काढायची म्हणजे व्यापही असतोच. त्यासाठी कोण किती वेळ देऊ शकेल हा प्रश्नच असतो. छापिल माध्यमाखेरीज इतर माध्यमं महाविद्यालयाच्या दिमतीला नसतात. जे अधिकृत स्थिर संकेतस्थळ असतं त्यात वेळोवेळी किरकोळ बदल वा भर घालणं व ते शक्य तेवढं ताजं ठेवणं हे आव्हान कुणीतरी एकीकडे पेलत असतं. त्यामुळे त्यात आणखी भर घालून नवं काही सदर सुरू करणं ही कल्पना रूजण्यासारखी नसते.

हे वातावरण एकीकडे असताना दुसरीकडे विद्यार्थी (जवळजवळ प्रत्येक विद्यार्थी व विद्यार्थिनी) आपल्या २४ तासांपैकी काही तास किंवा बर्‍यापैकी वेळ दररोज आणि नियमितपणे ऑर्कुट सारख्या सोशलनेटवर्कींग
संकेतस्थळाला अतिशय आवडीने देत असतात. फेसबुक, माय स्पेस, ट्विटर, वर्डप्रेस सारख्या साईटसवर देखील विद्यार्थ्यांची चांगली गर्दी असते. अनेकजण आपले स्वतःचे ब्लॉग्ज लिहीत असतात. काही जण ते स्वतःची रोजनिशी असावी अशा प्रकारे ब्लॉगवरचं आपलं लिखाण स्वतःपुरतंच ठेवत असतात. विद्यार्थ्यांमधली ही संगणक सक्रियता ढोबळ मानाने एकूण विद्यार्थ्यांच्या ७० टक्क्यांहून कमी नसते. अगदी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये ती यापेक्षा कमी दिसली तरी त्यांना त्याबद्दल कमालीचं औत्सुक्य असतं. अशा वातावरणात कॉलेजचा अधिकृत ब्लॉग प्रस्थापित होणं आणि त्यातून मास कम्युनिकेशनची तूट अर्थात डेफिसिट भरता येणं सहज शक्य आहे. ईमेलप्रमाणेच ब्लॉग्ज इंटरनेटवर मोफत आहेत हे आता सर्वांनाच माहीत आहे. ब्लॉग्जवर सर्व भाषांतील लिखाण शक्य आहे. रंगीत छायाचित्रेच केवळ नव्हेत तर आता व्हिडिओ क्लीप्स देखील ब्लॉग्जवर सहज शक्य आहेत. यात बजेटचा प्रश्न नाही. ह्या माध्यमाची आवड आणि तंत्रज्ञान विद्यार्थ्यांमध्ये मूळातच रूजलेलं आहे. कोणीही घरून वा सायबर कॅफेतून त्या संदर्भातलं काम कुठेही व कधीही करू शकतो, आणि त्यावर प्रसिद्ध झालेलं लिखाण, छायाचित्रे, व्हिडिओज कोणीही केव्हाही कुठेही पाहू वा वाचू शकतो. यात बजेट वा तत्सम अन्य अडचणी येण्याची शक्यता जवळ जवळ नसतेच. खेरीज परिक्षा वा तत्सम दिवसांमध्ये ब्लॉगवर फारसं काही येणार नाही, व त्यावेळी फारसं कोणी वाचणारही नाही याची कल्पना सर्वांना असते.

ब्लॉगचं माध्यम असं अनेक प्रकारे महाविद्यालयाला मास कम्युनिकेशनचं टूल म्हणून वापरता येणं सहज शक्य आहे. आजकाल अनेक विद्यार्थी इंटरनेटवरील फोरमवर किंवा ऑर्कुटसारख्या कम्युनिटीजवर मॉडरेटर किंवा सुपर मॉडरेटर म्हणून काम करीत असतात. कॉलेजच्या ब्लॉगवर अशा पद्धतीने विविध विद्यार्थ्यांचच मॉडरेशन असल्यावर त्यात गैरप्रकार होण्याची शक्यता जवळजवळ शुन्य आहे. वार्षिक अंकात पानांची संख्या मर्यादित असते. मात्र ब्लॉगवर कोणतीही मर्यादा नसल्याने सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे साहित्य त्यावर जाऊ शकते. उत्तम साहित्यासाठी वार्षिक किंवा अगदी तिमाही वा सहामाही पारितोषिके देणेही अशक्य नाही. हा ब्लॉग महाविद्यालयाचा अधिकृत असल्याने तसेच विद्यार्थी व त्याचे पालक तो फार मोठ्या प्रमाणावर पाहणार असल्याने एकूण वाचकांची संख्या फारच मोठी असणार यात शंका नाही. अशा ब्लॉगला जाहिराती वा देणग्या मिळणं देखील अशक्य नाही. म्हणजेच महाविद्यालयावर कोणताही बोजा न पडता त्याची मास कम्युनिकेशनची गरज पूर्णपणे भागविण्याची क्षमता ह्या माध्यमात आहे.

खरं तर शासन दरवर्षी ज्याप्रमाणे सर्वोत्कृष्ट पुस्तकांना पारितोषिके देते त्याप्रमाणे शासनातर्फे सर्वोत्कृष्ट महाविद्यालयीन ब्लॉग्जना पारितोषिके दिली जायला हवीत. त्यात काहीच अशक्य नाही. तसे झाल्यास सर्जनशील विद्यार्थ्यांच्या साहित्यासाठी ते एक फार मोठे व्यासपीठ ठरेल. मात्र यासाठी प्राचार्यांनी पहिले पाऊल टाकून सर्व संबंधितांना साद देणे ही पहिली गरज आहे. ते पाऊल ही केवळ त्या त्या महाविद्यालयाची नाही तर आजच्या काळाची गरज आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा