इतरांचे फोटो काढणं, काढलेले फोटो पहात बसणं, आपले फोटोही इतरांकडून काढून घेणं आणि ते आणखी इतरांना पहायला लावणं ही एकविसाव्या शतकातल्या माणसाची भूक आहे. ही भूक पूर्वी नव्हती असं नाही. पण फोटो ही चीज सामान्यतः लग्ना-मुंजीत आणि पुढे वाढदिवसांपुरती साधारणतः मर्यादित असायची. कॅमेरा ही घरोघर असणारी चीज तेव्हा नव्हती. फोटो काढायचे म्हणजे महागडा रोल आणायचा, फोटो काढायचे, फिल्म धुवायची (धुलाईच सगळी!), मग पोस्टकार्ड साईज प्रिंट मारून घ्यायच्या असा सारा व्याप. हौसेची बॅटरी फुल्ल चार्ज असल्याशिवाय आणि खिशाला चांगली ऊब असल्याशिवाय हे फोटो प्रकरण जमणं पूर्वी एकूण अवघड असायचं. साधा क्लीक कॅमेरा खरेदीला स्वस्त असला तरी मनासारखे स्वच्छ फोटो येत नसल्याने कोणी तो गळ्यात बांधून सर्रास फिरायचे नाहीत. महागड्या कॅमेर्यात फोटो छान येत असले तरी तेवढी गुंतवणूक हौसेसाठी केवळ करणारे अगदी थोडेच असायचे.
आता काळ बदलला आहे. ह्या एकविसाव्या शतकात अगदी गावागावात सुद्धा बर्याच घराघरातून डिजिटल कॅमेरा दिसू लागला आहे. शहरात तर तो जवळजवळ घराघरात आला आहे. शिवाय मोबाईल फोनच्या कॅमेर्यातूनही रोजच्या रोज शेकडो डिजिटल फोटो संगणकात जाताहेत आणि ईमेलने ते जगभर कुठेही पोहोचत आहेत. एकीकडे डिजिटल कॅमेरा अक्षरशः आश्चर्य वाटावं एवढ्या कमी किंमतीला उपलब्ध झाला आहे. तर, दुसरीकडे ब्रॉडबँड इंटरनेट गल्लीगल्लीत पोहोचतं आहे. हा तांत्रिक विकास होत असताना दुसरीकडे घरातली हुशार मुलं शिकून सवरून अमेरिका, इंग्लंड, जपान आणि कुठेकुठे जाऊ लागली आहेत. मग, परदेशात गेलेल्या मुलांशी भारतातल्या आई-बाबांनी, आजी-आजोबांनी इंटरनेटवर शब्दांचा चॅट, वॉईस चॅट करत विरंगुळा साधणं रोजचं होऊन गेलं आहे. आजोबांच्या सहस्त्रचंद्र दर्शन कार्यक्रमाला, कॅलिफोर्नियात नोकरीसाठी गेलेला राहुल येणं तसं शक्यच नव्हतं. मग घरच्यांनी अतिशय हौसेनं त्याला त्या कार्यक्रमाचे फोटो मेल केले. असे प्रकार हे आता दैनंदिन जीवनातला एक भाग बनू लागला आहे.
पोस्टकार्डाच्या आकाराच्या फोटोंचा गुळगुळीत गठ्ठा गच्च पाकिटांतून आला की बावन पत्ते पिसून हातात आल्यासारखं वाटतं. तेच फोटो झकास अशा अल्बममधून आले की ते पाहताना मात्र छान वाटतं. ईमेलला फोटोंची मालिका अॅटॅच करून पाठवणं हे पाकिटातून फोटो आल्यासारखं आहे. पण तेच अल्बमच्या सॉफ्टवेअरमधून सुंदर व रंगीत पार्श्वभूमीच्या कोंदणात बसून आले की बघावेसे वाटतात. आपल्यापैकी बरेच जण इंटरनेट आणि डिजिटल कॅमेर्याशी चांगले परिचित असतात. पण ते सुंदर व आकर्षक अल्बमचं सॉफ्टवेअर कुठून आणायचं, संगणकावर ते कसं लावायचं याचं गणित काही त्यांना जमण्यासारखं नसतं. अशांसाठी इंटरनेटवर एक खूप चांगली सोय आहे. ही सोय आपल्याला www.jalbum.net वर पहायला आणि सहजपणे अनुभवायला मिळते. तुम्ही ती आजपर्यंत अनुभवली नसेल तर jalbum.net वर जरूर जा.
Jalbum.net वर तुम्हाला तुमच्या डिजिटल फोटोंचा अल्बम करून देणारं सॉफ्टवेअर मोफत उपलब्ध आहे. मुख्य म्हणजे हे सॉफ्टवेअर वापरणं हे अक्षरशः बाये हाथका खेल आहे. मोफत आणि अगदी सोप असं हे जाल्बम सॉफ्टवेअर jalbum.net वरून डाऊनलोड करून घ्या. काही क्षणात पटकन ते संगणकावर चढवा. तुमच्या डिजिटल कॅमेर्यातील फोटो जाल्बमच्या स्क्रीनवर फक्त आणून टाका (म्हणजे ड्रॅग अँड ड्रॉप), तयार अल्बमचं एक डिझाईन निवडा आणि Make Album ह्या बटणावर फक्त क्लीक करा. झाला तुमचा अल्बम तयार. हा अल्बम तुम्हाला ईमेलने पाठवता येतोच, पण त्याही पलिकडे म्हणजे तो तुम्हाला इंटरनेटवर ठेवता येतो. अर्थातच मोफत. खरं तर गुगलचं पिकासा किंवा याहू चं Flickr सारख्या फोटो शेअरींगच्या सोयी देणार्या इतर साईटस एव्हाना चांगल्या लोकप्रिय झालेल्या आहेत. पण तरीही मला jalbum.net चं अप्रुप वाटतं याचं कारण त्यातला साधेपणा आणि सोपेपणा. जगभरातल्या चाळीस लाख लोकांनी हे जाल्बम सॉफ्टवेअर डाऊनलोड केलं आहे आणि आपले हजारो अल्बम जाल्बमच्या साईटवर मोफत ठेवले आहेत.
इंटरनेटवर तुमचा अल्बम ठराविक मंडळींनाच पाहता यावा यासाठी जाल्बमवर पासवर्ड लावण्याची सोयही उपलब्ध आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे मराठी युनिकोड फाँटस असतील तर तुमच्या प्रत्येक फोटोला मराठी कॅप्शन देखील तुम्हाला देता येते. एखादा फोटो चुकून अंधुक आला असेल तर तो सुधारण्याची सोयही जाल्बमच्या सॉफ्टवेअरमध्ये आहे. एखाद्या फोटोतला कडेचा किंवा वरचा वा खालचा नको असलेला भाग काढण्याची सोय (cropping) देखील जाल्बमने दिली आहे. फोटोवर संस्कार करणार्या Red eye, Levels, Gamma, Sharpen, Blur, Invert सारख्या सोयींसाठी आपल्याला फोटोशॉप सारखं महाग आणि वापरायला कठीण असं सॉफ्टवेअर वापरावं लागतं. पण जाल्बमने ह्या सोयी तयार दिल्या आहेत. जाल्बमने तुम्हाला काय काय दिलय हे लक्षात घ्या. एक - तुमच्या फोटोंचा आकर्षक व रंगीत अल्बम तयार करून देणारं सॉफ्टवेअर तुम्हाला दिलं आहे. तुमच्या फोटोंवर संस्कार करण्याची तांत्रिक सोय त्यांनी दिली आहे. एखादा रंगीत फोटो कृष्ण-धवल करून हवा असेल तर ती सोयही जाल्बमने उपलब्ध केली आहे.
सामान्यतः इंटरनेटवर मोफत म्हंटलं की तिथे आपल्याला नको त्या जाहिराती हमखास टाकलेल्या असतात. पण जाल्बम त्याला अपवाद आहे. आपला अल्बम स्वच्छ व कोणत्याही जाहिरातींचं ठिगळ न लावता पाहण्याची सोय जाल्बम देतो. आता हे सगळं वाचल्यानंतर एक प्रश्न सर्वांनाच स्वाभाविकपणे पडतो की हे सारं मोफत मोफत कोणी कसं देऊ शकतं? ह्या मागचं अर्थशास्त्र नेमकं कसं असतं? जाल्बमचे आर्थिक व्यवस्थापन दोन प्रकारे होताना दिसतं. एक म्हणजे जाल्बम देणग्या स्वीकारतं. आपला सुंदर अल्बम आपल्याला वेबसाईटचा कसलाही खर्च न पडता इंटरनेटवर प्रकाशित झाला याच्या समाधानापोटी जाल्बमला हजारो डॉलर्सच्या देणग्या देणारे लोक जगभर आहेत. ज्या चाळीस लाख लोकांनी जाल्बम डाऊनलोड केला आहे त्यापैकी दहा टक्के लोकांनी जरी कृतज्ञतेपोटी देणग्या दिल्या असतील तरी ती रक्कम उल्लेखनीय असू शकते. जाल्बम जरी आपल्या अल्बमवर जाहिराती टाकत नसला तरी त्यांच्या वेबसाईटवर इतरत्र जाहिराती स्वीकारण्याची सोय आहे. तो भागही जाल्बमची आर्थिक बाजू सांभाळणारा आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे आपल्या फोटो अल्बमसाठी जाल्बम आपल्याला कमाल ३० एम.बी. जागा देतो. खरं तर ही जागा एका छोट्या फोटो अल्बमसाठी पुरेशी होते. खेरीज आपण वेगवेगळ्या नावाने अनेक अल्बम्स देखील उघडू शकतो. पण ज्यांना शेकडो फोटोंसाठी ३० एम.बी. पेक्षा अधिक जागा लागणार आहे त्यांना ती जाल्बमकडून विकत घेता येते. ह्या तीन चाकांवर जाल्बमची आर्थिक गाडी चालत असते. जाल्बम आज जगातल्या एकूण ३२ भाषांमध्ये उपलब्ध आहे. बत्तीसचा हा आकडाही आपल्याला त्याची लोकप्रियता लक्षात येण्यासाठी पुरेसा आहे.
जाल्बम तयार करून जगाला मोफत देणारी ही कंपनी आणि त्यामागची माणसं कोणं हे जाणण्याची उत्सुकता तुम्हा आम्हाला असणं स्वाभाविक आहे. जाल्बमच्या मागची बहुतेक मंडळी ही स्वीडनमधील स्टॉकहोम शहरातली आहेत. त्यातले अनेक जण वेगवेगळ्या व्यवसायात आहेत. डेव्हिड एखोम हा जाल्बमचा संस्थापक. बर्फाळ प्रदेशात स्काईंग करणं हा त्याचा छंद. स्काईंगची एक सहल संपवून आणि भरपूर फोटो काढून डेव्हिड घरी परत आला. काढलेले फोटो त्याला इंटरनेटवर टाकायचे होते. त्यासाठी तो फोटो अल्बम तयार देणारी वेब साईट शोधत होता. ही गोष्ट २००२ सालची, म्हणजे साडेपाच-सहा वर्षांपूर्वीची. डेव्हिडला फोटो अल्बम तयार देणारी वेब साईट शोधूनही सापडली नाही, तेव्हा त्यानेच तशी वेबसाईट तयार करण्याचा संकल्प केला, आणि तो तडीस नेला. त्यातूनच जाल्बम डॉट नेट तयार झाली. ज्यांना संगणकाची फक्त वरवर माहिती आहे व ज्यांना फार कष्ट न घेता आणि जास्त वेळ न घालवता स्वतःच्या फोटोंचा अप्रतिम अल्बम इंटरनेटवर प्रकाशित करायचा आहे त्यांचेसाठी जाल्बम म्हणजे एक उत्तम सोय आहे यात शंका नाही.
thanks for your informetion and help
उत्तर द्याहटवा