२० फेब्रु, २०११

जीमेलच्या करामती

गेल्या वेळी आपण गुगलमध्ये माहिती शोधण्याचे काही तंत्र आणि मंत्र पाहिले. गुगलने जगाला उपलब्ध करून दिलेला 'सर्च' हा गुगलचे पायदळ किंवा आर्मी आहे असं म्हंटलं तर जीमेल ही गुगलने सर्वांना दिलेली ईमेल म्हणजे त्यांचा एअर फोर्स म्हणावा लागेल. गुगलचा सर्च आणि जीमेल ह्यात तुमच्या आमच्या बाबतीतलं साम्य हे की आपण ह्या दोन्हींचा उपयोग पारंपारिक पद्धतीने व मर्यादित चौकटीत करीत असतो. म्हणजे, जी माहिती पाहिजे त्या विषयीचे शब्द टाईप करून ढोबळ पद्धतीने माहिती शोधणे हा गुगल सर्चचा उपयोग; आणि ईमेल पाठवणे व आलेली ईमेल उघडून वाचणे हा जीमेलचा उपयोग. खरं तर ह्या मर्यादित चौकटीत आपली बरीचशी कामं होतही असतात. त्यामुळे आणखी खोलात जाण्याची आपल्याला तशी गरज नसते. गेल्या लेखात गुगल इमेज सर्च करताना त्याच्या अॅडव्हान्स्ड सर्च सुविधेचा उपयोग करून कृष्ण-धवल लाईन ड्रॉईंग्ज कशी शोधायची याची टीप अनेकांना आवडल्याच्या ईमेल मला भरपूर आल्या. गुगलने दिलेल्या सोयी वरकरणी दिसतात त्यापेक्षा आत खोलात जाऊन पाहिल्या तर त्याचे आणखी शेकडो उपयोग आहेत असं आपल्याला आढळतं. जीमेलची सोयही ह्या वस्तुस्थितीला अपवाद नाही.

ईमेल जोडी

गुगलची जीमेल आज आपल्याला जवळ जवळ ६ जीबी जागा मोफत देते. आपण जेव्हा जीमेलसाठी रजिस्टर करतो तेव्हा आपल्याला जीमेल डॉट कॉम ने शेवट होणारा ईमेल पत्ता मिळतो. xyz@gmail.com किंवा abc@gmail.com अशा प्रकारचे ईमेल पत्ते आपल्यापैकी हजारोंचे आहेत. पण त्या हजारोंपैकी फार कमी लोकांना हे माहीत आहे की ज्यावेळी आपल्याला gmail.com चा पत्ता मिळतो, त्याच वेळी गुगल आपल्याला आणखी एक ईमेल पत्ता देते. तो पत्ता असतोgooglemail.com चा. हे थोडं अधिक स्पष्ट करून सांगतो. समजा, तुमचा ईमेल पत्ता arun@gmail.com असा आहे. तर, त्याचा अर्थ गुगलने तुम्हालाarun@googlemail.com हा पत्ता तुम्ही न मागता gmail च्या जोडीने बहाल केलेला आहे. म्हणजे तुमच्याकडे गुगलच्या gmail.com आणि googlemail.com अशा दोन ईमेलच्या चाव्या आहेत. पण, तुम्ही वापरत असता तो फक्त gmail.com चा पत्ता. दुसरा googlemail.com चा पत्ता तुम्ही कधीच वापरत नाही. आपल्या उदाहरणाला चिकटून आपण थोडं आणखी पुढे जाऊ. समजा, तुमच्या arun@gmail.com ह्या ईमेल पत्त्याऐवजी तुमच्या मित्राने तुम्हाला arun@googlemail.comह्या पत्त्यावर ईमेल पाठवली, तर ती तुम्हाला कुठे मिळेल? ह्या प्रश्नाचं उत्तर सोपं आहे. पत्ते gmail.com आणि googlemail.com असे दोन वेगवेगळे दिलेले असले तरी तुमचं अकाउंट एकच असतं. म्हणजे दोन्ही पैकी कोणत्याही पत्त्यावर तुम्हाला ईमेल पाठवली तरी ती येऊन पडते तुमच्या नेहमीच्याच gmail.com च्या अकाऊंट मध्ये.

गुगलने दिलेल्या ईमेल जोडीचा हा मुद्दा आपल्या लक्षात आला. त्यानंतर मग दोन नवे प्रश्न आपल्या मनात डोकावू लागलेले असतात. जर अकाऊंट एकच आहे, तर मग गुगलने दोन ईमेल पत्ते का दिले? दुसरा प्रश्न, जर दोन्ही पत्त्यांच्या ईमेल एकाच अकाऊंटमध्ये येऊन पडणार आहेत, तर मग त्याचा नेमका उपयोग काय?

पहिल्या प्रश्नाचं उत्तर हे की एकाच ईमेल अकाऊंटसाठी दोन पत्ते देण्यामागे गुगलची एक तांत्रिक सोय आहे. जर्मनी आणि ब्रिटन (यु.के.) मध्ये जीमेल ह्या नावाची नोंदणी गुगलची जीमेल येण्यापूर्वी झाली असल्याच्या दाव्यामुळे ह्या दोन देशांमध्ये कायद्याच्या अडचणीमुळे gmail.com चे पत्ते गुगलला देता आले नव्हते. तेथे त्यांनी googlemail.com चे पत्ते वाटले आणि समस्या सोडवून टाकली. ह्या दुहेरी डावपेचातून मग gmail=googlemail आणि googlemail म्हणजेच gmail ही समीकरणे कायमची बनून गेली.

आता दुसर्‍या प्रश्नाचं उत्तर पाहू. एकच अकाऊंट आहे, पत्ते वेगवेगळे आहेत याचा उपयोग युक्तीने करणारी मंडळी काय करतात, पहा. हे लोक आपले कुटुंबिय आणि अगदी निवडक मंडळी यांना googlemail.com चा पत्ता देतात. इतर सर्वांना ते gmail.com चा पत्ता देतात. अशा Googlemail वरून आलेल्या मेल आणि gmailवरून आलेल्या मेल वेगळ्या काढणे वा वेगळ्या शोधणे त्यांना सहज शक्य होते. स्पॅम म्हणजे नको त्या लोकांच्या मेलला आळा घालण्यासाठीही काही जण ह्या युक्तीचा उपयोग करतात.

आणखी काही करामती

जीमेल पत्त्यात डॉट (.) चा उपयोगही फार खुबीने करता येतो. म्हणजे उदाहरणार्थ समजा तुमचा ईमेल पत्ता manmohansingh@gmail.com असा आहे. तर तुम्ही काही ठिकाणी तुमचा ईमेल पत्ता man.mohansingh@gmail.com असा देऊ शकता. किंवा आणखी काही जणांना तो manmohan.singh@gmail.com असाही देऊ शकता. किंवा अगदी पुढे जाऊन ma.n.mohansingh@gmail.com असाही किंवा m.a.n.mo.hansingh@gmail.com असाही आडवा तिडवा वाकवून देऊ शकता.तुमच्या नावात कुठेही आणि कितीही वेळा डॉट टाकला तरी ती मेल तुमच्या त्याच ईमेल अकाऊंटमध्ये येऊन पडत असते. काही जण अशा डॉटयुक्त ईमेल पत्त्यांचा उपयोग इंटरनेटवर मोफत रजिस्ट्रेशनसाठी वगैरे देण्यासाठी करतात.

दुसरी करामत + ह्या चिन्हाची. ही करामत समजून घेण्यासाठी आपण पूर्वीचा arun@gmail.com ह्या पत्त्याचा उपयोग करू. समजा ह्या अरूणसाहेबांना fun-karu.com नावाच्या अविश्वासार्ह वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर ते arun+ fun-karu@gmail.com असा पत्ता त्या साईटला देऊ शकतात. त्या साईटने त्या पत्त्यावर पाठवलेली मेल अरूणसाहेबांना मिळते ती arun@gmail.com ह्याच पत्त्यावर. तुम्हीही तुमच्या जीमेल पत्त्याच्या बाबतीत ह्या करामती करून पहा.अगदीच काही नाही तर टाईमपास किंवा करमणूक म्हणून हे करायला काहीच हरकत नाही.

कीबोर्ड शॉर्टकटस्

ज्यांनी जीमेल पत्ते घेतले आहेत ती मंडळी जवळ जवळ रोजच जीमेलवर जातात आणि आपल्याला कोणत्या मेल आल्या आहेत हे पाहतात. आलेल्या मेलना उत्तर पाठवणं हेही तसं रोजचच काम असतं. ही कामं रोज करताना आपण आपल्या माऊसला प्रचंड फिरवतो. क्लीक वर क्लीक करकरून माऊसक्लीकचा पाऊस पाडतो. जीमेल वापरणारांनी जर माऊस वापरण्याऐवजी कीबोर्ड शॉर्टकटसचा उपयोग केला तर भरपूर वेळेची बचत साधता येईल. उदाहरणार्थ तुम्ही नुसतं C हे कीबोर्डवरचं बटण दाबा, तुमच्यासमोर मेल कंपोज करण्याची विंडो हात जोडून उभी राहील. एरवी तुम्ही माऊसवर हात नेणार, मग त्याला Compose Message वर नेणार, तेथे कर्सर टेकवून तुम्ही क्लीक करणार. मग तुमच्यापुढे ती मेल कंपोजची विंडो येणार. नुसतं C दाबून तुम्ही झपाझप कंपोज विंडोशी पोहोचू शकता. समजा तु्म्हाला त्वरित इन बॉक्स मध्ये जायचं आहे, तर तुम्ही फक्त g i म्हणजे प्रथम जी आणि नंतर आय दाबा. तुम्ही क्षणात इन बॉक्समध्ये पोहोचता. असे जीमेलचे बरेच आणि खूपच उपयुक्त कीबोर्ड शॉर्टकटस आहेत. त्यांची प्रिंटेबल लीस्ट http://r.evhead.com/hodgepodge/gmail-shortcuts.html इथे उपलब्ध आहे.

कीबोर्ड शॉर्टकटस बद्दल मी अगदी उत्साहाने सांगितलं म्हणून तुम्ही पटकन आपल्या जीमेल अकाऊंटवर जाऊन ते वापरू पहाल, आणि नेमकं होईल असं की C हे बटण चार वेळा दाबलं तरी जीमेलवर त्याचा काही ढिम्म परिणाम दिसत नाही. असं होण्याची दाट शक्यता आहे. कारण जीमेलचे कीबोर्ड शॉर्टकटस हे अॅक्टीव्हेट करावे लागतात. जर ते अॅक्टीव्हेट केले नाहीत तर ते अर्थातच उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे जर ते अॅक्टीव्हेट नसले तर प्रथम तुमच्या जीमेलच्या Settings मध्ये जाऊन ते अॅक्टीव्हेट करा, आणि नंतरच C दाबून Compose Message ला जाता येतय का हे तपासून पहा.

तयार युक्त्या

http://www.autohotkey.com/download/ ह्या पत्त्यावर जाऊन Autohotkey हे मोफत आणि आकाराने फारच छोटे असलेले सॉफ्टवेअर डाऊनलोड करून घ्या.समजा तुम्हाला दररोज तीन मेल अशी टाईप करावी लागतात की ज्यात Thank you for your mail हे शब्द हटकून असतात. तेच तेच शब्द तीन तीन चार चार वेळा टाईप करण्यापेक्षा तुम्ही फक्त TYFM इतकच टाईप केलत आणि तुम्हाला ते Thank you for your mail हे शब्द आपोआप टाईप करून मिळाले तर किती बहार येईल. Autohotkey हा प्रोग्राम त्यासाठीच आहे. याची सविस्तर माहिती http://lifehacker.com/software/keyboard-shortcuts/

hack-attack-knock-down-repetitive-email-with-autohotkey-159785.php ह्या पत्त्यावर जाऊन अवश्य घ्या. Autohotkey कशी वापरायची याचं मार्गदर्शन तिथे आहे.

ह्या Autohotkey सारख्या जीमेलच्या बाबतीतल्या तयार आणि मोफत प्रोग्राम्सच्या अनेक युक्त्या आज उपलब्ध आहेत. तो एक स्वतंत्र विषयच आहे. त्याबाबत पुन्हा केव्हातरी सविस्तर बोलू. आपल्याला आलेल्या जीमेलवरच्या मेलमधून नेमकी आपल्याला हवी ती मेल कशी शोधायची, याच्या टीप्स खुद्द गुगलनेच आपल्याला दिल्या आहेत. ज्यांचे लक्ष अजून त्याकडे गेलेले नाही त्यांचेसाठी त्यातल्या काही टीप्स इथे देतो.

मेलच्या ढिगार्‍यातून टाचणी शोधायची?

अरूणरावांना आपल्या जीमेलच्या ढिगार्‍यातून रमेशरावांकडून आलेल्या मेल शोधायच्या आहेत. त्यांनी नुसतं रमेश म्हणून शोध घ्यायचा प्रयत्न केला तर त्यांचेकडून आलेल्या आणि त्यांना पाठवलेल्या दोन्ही ईमेलचं मिश्रण समोर येऊन गोंधळ होईल. त्यासाठी त्यांनी From: Ramesh असं करून शोध घ्यायला हवा. रमेशना पाठवलेल्या मेल शोधायच्या तर To: Ramesh असं देऊन शोधायला हवं. ज्या मेलना अटॅचमेंट आहेत अशा मेल शोधायच्या तर has:attachment असं म्हणून शोध घ्यायला हवा. विशिष्ट काळातील मेल शोधण्यासाठी after: किंवा before: असं म्हणून त्या हुडकायला हव्यात.

जीमेलची सोय मोफत असली तरी खूपच बहुगुणी आहे. त्या संदर्भातील खूपच माहिती अक्षरशः शेक़ड्याने इंटरनेटवर सगळीकडे विखुरलेली आहे. त्यातल्या फक्त चार-दोन मुद्यांकडेच फक्त मी तुमचं लक्ष इथे वेधलं आहे. ह्या लेखाचे प्रयोजन फक्त तुमचं लक्ष त्याकडे वेधणं इतकच आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा