२० फेब्रु, २०११

बीबीसी ची इंग्रजी शिकण्यासाठीची उत्तम साईट




आपण इंग्रजी ऐकतो, बोलतोही, निदान प्रयत्न करण्याची इच्छा आतून नक्कीच असते.
इंग्रजी सुधारलं पाहिजे ही आपली गरज निश्चितच असते.
अशा स्थितीत आपल्या सर्वांच्या मोफत आणि उत्तम मदतीला येते बीबीसीची इंग्रजी शिकविणारी वेबसाईट.

तिचा पत्ता आहेः

. साईटचा हा एवढा मोठा पत्ता लक्षात ठेवायला अवघड जात असेल तर त्यासाठी एक युक्ती आहे. तीन शब्द फक्त लक्षात ठेवा - बीबीसी, लर्निंग आणि इंग्लीश हे ते तीन शब्द. म्हणजेच - www.bbclearningenglish.com ही साईट फक्त लक्षात ठेवलीत तरी चालेल.

बीबीसीची ही सेवा संपूर्ण जगासाठी आहे. पण भारतातल्या आपल्या सारख्यांना, अगदी विशेषतः आपणा मराठी जनांसाठी तर ती खूपच उपयुक्त आहे.

व्याकरण, उच्चार आणि शब्दसंपत्तीवर खास पण सोपा फोकस

ह्या वेबसाईटवर ऑडिओ, व्हिडिओ आणि ताज्या बातम्यांचा वाचनीय मजकूर अशा तिन्ही माध्यमांचा इंग्रजी शिकण्याच्या दृष्टीने अप्रतिम उपयोग केला आहे.तुमच्यापुढे एक एक ताजी बातमी वाचण्यासाठी दिसते. त्या बातमीच्या मजकूरात जे इंग्रजी शब्द असतात त्यांचे नेमके अर्थ, त्यांचे उच्चार वेगळे काढून समजावून दिलेले असतात. बातमी संपूर्ण वाचून दाखविली जाते. त्यामुळे उच्चार कसे असावेत हे आपल्या लक्षात येतं. बातमीचा संदर्भ लक्षात असल्याने आपल्याला अर्थ आणि उच्चार दोन्ही आपोआपच लक्षात राहण्यासाठी मदत होते. हे सगळं आपण संगणकावर बसून कोणतीही वही किंवा पुस्तक न घेता शिकतो. व्याकरणाचा एक स्वतंत्र विभाग ह्या साईटवर आहे. पण तो विभाग नेहमीच्या पुस्तकात जसा कंटाळवाणा वाटतो, तसं इथे होत नाही. ताजी बातमी वाचल्याने आपल्या ज्ञानातही एकीकडे भर पडत असते. थोडक्यात इंग्रजीत व्हॅल्यू फॉर मनी म्हंटलं जातं तसं इथे व्हॅल्यू फॉर अवर टाईम असं नक्कीच म्हणता येईल.

इंग्रजीची कोडी आणि शब्दकोडी - मनोरंजनातून इंग्रजी

यातली कोडी सोपी आहेत. योग्य त्या उत्तरावर क्लीक करा. नंतर उत्तर बरोबर की चुकलं ते पहाण्याची सोय आहे तिथे पहा. उत्तर बरोबर असेल तर हिरव्या रंगात स्पष्टीकरण दिसेल. चुकलं तर ती चूक लाल रंगात दिसली तरी ती समजावून दिली जाईल. यामुळे जे चुकलं तेच समजावलं जातं. याचा खूपच उपयोग होतो.शब्दकोडी नेहमीच्या आपल्या शब्दकोड्यांसारखीच असतात. पण शब्द मिळत नसेल तर एखाद-दुसर्‍या अक्षराचा क्लू देण्याची सोय असल्याने आपण त्यात रमतो,आणि मनोरंजन होत होत इंग्रजी शिकतो.

सिक्स मिनीट इंग्लीश नावाचे सदर

ह्यात सहा मिनिटांची एक चर्चा आपल्याला ऐकायला मिळते. चर्चेत अर्थात शिकायलाही मिळतं. उदाहरणार्थ मोबाईल फोन ह्या विषयावरची चर्चा घ्या. चर्चा सुरू होण्यापूर्वी आपल्याला एक प्रश्न वाचायला मिळतो. ब्रिटनमध्ये (आणि भारतात सुद्धा) मोबाईल फोन असं म्हंटलं जातं. तर कॅनडा आणि अमेरिकेत त्याला वेगळे नाव सर्रास दिले जाते. ते नेमके कोणते. तीन पर्याय आहेतः एक सेल फोन. दुसरा सेल्युलर फोन. तिसरा सी फोन. आता ह्या तीन पर्यायातलं नेमकं उत्तर कोणतं, तर ते आपल्याला सहा मिनिटांची चर्चा ऐकताना त्या चर्चेतच मिळेल. ही चर्चा करणारेही वेगवेगळ्या देशांतील इंग्रजी शिकणारेच असतात. स्त्री पुरूष दोघेही. त्यांचे बरोबर एक शिक्षक असतो. तो त्यांना समजावून सांगत असतो. चर्चा चालू असते. विद्यार्थी चुकतात. शिक्षक त्यांची चूक सुधारून सांगतो. म्हणजे ही चर्चा कानावर पडता पडता आपण एकीकडे उच्चार पक्के करतो. दुसरीकडे त्या सहा मिनिटांत काही नवंही शिकतो. ही चर्चा साऊंड फाईल म्हणून किंवा वाचायला पीडीएफ फाईल म्हणून डाऊनलोडही करता येते. किंवा डाऊनलोड न करता थेट वेबसाईटवरच स्ट्रीमिंग ऑडिओ म्हणून लगेच ऐकताही येते.

शिक्षकांसाठीही लेसन प्लान्स

विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकविण्यासाठी वेगवेगळे लेसन प्लॅन्सही ह्या साईटवर उपलब्ध करण्यांत आले आहेत. त्या बरोबर लागणारं ऑडिओ-व्हिज्युअल साहित्यही त्या सोबत देण्यांत आलं आहे. बीबीसीसारख्या संस्थेने ते उपलब्ध केलेले असल्याने त्यांचा किमान दर्जा हा विशिष्ट उंचीचा असणार हे गृहित धरता येतं. शाळा किंवा सेवाभावी संस्थांतील शिक्षकांना हे लेसन प्लॅन्स निश्चितच उपयोगी पडतील.

आजही इंटरनेटवर उत्तम दर्जाचं आणि विश्वासार्ह शैक्षणिक साहित्य मोफत उपलब्ध आहे का, अशा प्रश्नाला होकारार्थी उत्तर देता येतं ते ह्या अशा वेबसाईटच्या अस्तित्वामुळेच.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा