२० फेब्रु, २०११

लायब्ररी ऑफ काँग्रेस मधील ज्ञान खजिना

http://lcweb2.loc.gov/frd/cs/intoc.html

ब्रिटीशांच्या बाबतीत असं म्हंटलं जातं की ते एकवेळ इंग्लंड देतील पण शेक्सपियर देणार नाहीत. तसं अमेरिकनांच्या बाबतीत आपल्याला असं म्हणता येईल की ते त्यांच्या लायब्ररी ऑफ कॉंग्रेसला कसलाही धक्का लागू देणार नाहीत. जगातील सर्वांत मोठे असलेले हे ग्रंथालय. अमेरिकन सरकार त्याला आपल्या लष्कराइतकच महत्व देते. ह्या ग्रंथालयाची www.loc.gov ही साईट म्हणजे अनेक वेगवेगळ्या विषयांच्या साईटसचं एक पोळंच आहे. इथे मी सुचवत असलेली साईट म्हणजे त्या पोळ्यातला एक छोटासा कप्पा. यात भारताची माहिती एकूण १० प्रकरणांमध्ये दिलेली आहे. अत्यंत विश्वासार्ह, मुद्देसूद आणि परिपूर्ण असं त्या प्रकरणांचं वर्णन करता येईल. खरं तर हा एक उत्तम संदर्भ ग्रंथ आहे. भारताचा इतिहास, यात सुरूवात हडप्पा आर्य संस्कृतीपासून होते आणि पुढे मौर्य, गुप्त, हर्ष होत होत मुघल,मराठा, शीख, ब्रिटीश, १८५७ चं बंड, स्वातंत्र्य संग्राम, स्वतंत्र भारत, नेहरू, इंदिरा गांधी ते राजीव गांधी इथपर्यंत सारं एकत्र वाचायला मिळतं. 


पुढे दुसरं प्रकरण भारताच्या भूगोलाचं आहे. तिसरं धर्मासंबंधी तर चौथं भाषा, प्रदेश आणि वंशाच्या संदर्भातलं आहे. पाचव्यात जाती व ग्रामीण व्यवस्थेसह समाजशास्त्राचा भाग आहे.सहाव्यात अर्थव्यवस्था आहे. त्यात अर्थातच कामगार, आयात निर्यात, सरकारी धोरणं, उद्योग,जागतिकीकरण, खनिजे, पर्यटन, वाहतूक व संपर्क व्यवस्था असं सारं आहे. सातवं प्रकरण शेतीला वाहिलेलं आहे. जमिनी, बियाणं, खतं, हरित क्रांती, जंगलं, मासेमारी, शेतकी कर्जे वगैरेंचा तपशील आहे. आठव्या प्रकरणात सरकार आणि राजकारण आहे. त्यात, देशाची राज्यघटना,लोकसभा, राज्यसभा, सर्वोच्च न्यायालय, राजकीय पक्ष, हिंदू-मुस्लीम तणाव, पत्रकारिता व माध्यमांचे योगदान असे मुद्दे आहेत. नवव्या प्रकरणात, परराष्ट्र धोरण आणि परराष्ट्रांशी असलेले संबंध यांचा उहापोह आहे. दहावे प्रकरण अंतर्गत सुरक्षेला वाहिले आहे. त्यात पाकिस्तान, चीन, पंजाब, काश्मीर वगैरे मुद्दे तपशीलाने आलेले आहेत.

मूळातच अतिशय समृद्ध अशा माहितीचा हा खजिना आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा