जगभरातील भारतासह जवळजवळ सर्व देशांतील कागदी नोटांचे हे म्युझियमच आहे म्हणाना. ही साईट तयार केलीय एका माणसाने. त्याचं नाव टॉम चाओ. तो वंशाने चिनी आणि नागरिकत्वाने अमेरिकन आहे. साईटची माहिती देण्याऐवजी सुरूवातीला मी ह्या टॉम चाओबद्दल सांगतोय त्याला तसच कारण आहे. टॉम हा सेवानिवृत्त माणूस आहे. अमेरिकन नेव्हीमध्ये त्याने ३४ वर्षे इलेक्ट्रॉनिक इंजिनीयर म्हणून नोकरी केली आणि तो रिटायर झाला. रिटायर होईपर्यंत कुठलीही वेबसाईट त्याच्या डोक्यात नव्हती. जगभरातील नोटा जमवणंही त्याच्या डोक्यात नव्हतं. तो रिटायर झाला आणि वेळ घालवण्यासाठी काहीतरी छंद हवा म्हणून तो नोटा जमविण्याच्या छंदाकडे वळला. कुठे नोटांचा लीलाव असला की त्याचं त्याकडे लक्ष असे. कुठे जुन्या नोटा विकणारे विक्रेते किंवा इतर कुणी दिसले की तो तिथे जाई. ह्या नोटा जमवून त्या स्कॅन करून तो संग्रह त्याने आपल्याच नावाच्या म्हणजे टॉमचाओ.कॉम नावाच्या साईटवर त्याने ठेवला. हे सगळं केवळ वेळ जावा म्हणूनत्याने आनंदाने केलं. टॉमला दोन मुले आहेत. ती दोघेही अमेरिकेतच पण टॉमपासून लांब राहतात. एक मुलगा सॉफ्टवेअर इंजिनीयर आहे तो बोस्टनला, तर दुसरा कॉस्मेटिक सर्जन आहे तो बेवर्ली हिल भागात राहतो. स्वतः टॉम आणि त्याची बायको कनक्टीकटमध्ये राहतात. रिटायर झाल्यानंतर टॉमने चलनात नसलेल्या ५० नोटांचा एक संग्रह विकत घेतला. त्या त्याच्याकडल्या पहिल्या नोटा. नंतर हा संग्रह वाढत गेला. आज त्याच्या ह्या वेबसाईटवर ९९५ म्हणजे जवळजवळ हजारभर पानं आहेत. ३६०० चित्रे आहेत. त्याच्याकडल्या नोटांमध्ये टॉमच्या दृष्टीने ज्या टॉप ट्वेंटी आहेत त्यात चीनमध्ये १३६८ साली चलनात असलेली नोट आहे. खेरीज आयर्लंड (१८७०), सेनेगल (१९१७), तिबेट (१९२६), वेस्ट इंडिज (१९०५), अंटिग्वा (१९३८), अमेरिका (१८९९), झांजिबार (१९२०) वगैरेंचा समावेश आहे. भारताची १९३८ सालची ब्रिटनच्या राजाचा फोटो असलेली खाली दाखवलेली नोटही टॉमच्या संग्रहात आहे..
सेवानिवृत्त झाल्यानंतर एक माणूस काय करू शकतो हे पाहण्यासाठी सुद्धा ही साईट पहायला हवी. अगदी फुरसतीने..
सेवानिवृत्त झाल्यानंतर एक माणूस काय करू शकतो हे पाहण्यासाठी सुद्धा ही साईट पहायला हवी. अगदी फुरसतीने..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा