२० फेब्रु, २०११

गुगलः काही तंत्र, काही मंत्र

'गुगल' हा शब्द शब्दकोशात येऊन आता पावणे दोन वर्षे होत आली. अगदी पक्कं सांगायचं तर १५ जून २००६ रोजी ''ऑक्सफर्ड इंग्लीश डिक्शनरी'' ने to google हे नवे क्रियापद आपल्या शब्दकोशात सामावले.त्यानंतर पुढे महिन्याभरातच म्हणजे जुलै २००६ ह्या महिन्यात वेबस्टर डिक्शनरीनेही गुगल नावाच्या क्रियापदाची भर आपल्या शब्दकोशात टाकली. To google चा अर्थ वेबस्टरने दिला - ' to use the Google search engine to obtain information about (as a person) on the World Wide Web'. एका खाजगी कंपनीचे नाव दोन दांडग्या आणि जगन्मान्य शब्दकोशांनी व्यवहारातले एक क्रियापद म्हणून जेव्हा जगाला बहाल केले तेव्हा जगाने त्या बातमीकडे आ वासून पाहिले. एका कंपनीचे नाव जेव्हा इंग्रजीसारख्या भाषेतले एक क्रियापद बनते तेव्हा त्या कंपनीची लोकप्रियता काय असेल हे वेगळे सांगावे लागत नाही.

खरं तर 'गुगल' हा शब्द त्या कंपनीच्या नावापेक्षा लोकांना अधिक माहीत आहे तो महाजालावरचे एक 'सर्च इंजिन' म्हणून. इंटरनेटवर मुशाफिरी करणारी आपण मंडळी दिवसभरात 'गुगल' वर गेलो नाही असं फार क्वचित होत असेल. 'गुगल' वर जाऊन आपल्याला काय हवं ते शोधायचं ही सवय नेटकरांच्या अंगी इतकी भिणली आहे की त्या क्रियेवर क्रियापद म्हणूनच भाषेने शिक्का मारून टाकला आहे. खरं तर १९९८ साली म्हणजे फक्त १० वर्षांपूर्वी केवळ तीन माणसांनी एका गॅरेजमध्ये ह्या कंपनीची स्थापना केली. आज तीच कंपनी एक क्रियापद बनली यामागे फार मोठे कर्तृत्व अर्थातच आहे. कर्तृत्व म्हंटले की आपल्याला व्यक्तीचे कर्तृत्व दिसते. गुगलचे संस्थापक लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन यांचे कर्तृत्व कंपनीच्या यशामागे आहे याबद्दल कोणीही शंका घेणार नाही. पण 'गुगल' च्या यशामागे खरे कर्तृत्व म्हणायचे तर ते वेब तंत्रज्ञानाचे आहे.

वेबचे तंत्रज्ञान हे तुम्हा आम्हा सामान्यांसाठी एखाद्या मानस सरोवरासारखे आहे. त्याचा आवाका प्रचंड आहे आणि खोली अफाट आहे. 'गुगल' सारखे 'सर्च इंजिन'घ्या. आपण सामान्यपणे त्याचा वापर करतो तो असतो केवळ वर वरचा. आपण नजर टाकतो ती 'गुगल' च्या पहिल्या पानावर. तेथे जे शोधायचे ते टाईप करून आपण गुगल नेईल तिथे प्रवास करीत राहतो. हरवून जातो. तशा प्रकारे हरवता हरवता बहुधा आपल्याला हवे ते गवसलेलेही असते. गुगल सर्च इंजिनचा हा उपयोग पृथ्वीवरच्या जमिनीवर फक्त एखादी झोपडी बांधण्याइतका मर्यादित आहे असं म्हंटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. माहितीचा शोध हा गुगल नावाच्या अथांग महासागराचा फक्त एक किनारा तेवढा आहे. हा किनारा तुम्हा आम्हा पामरांसाठी अगदी पुरेसा असला तरी जगात आपल्यापेक्षा अधिक चतुर असे जे पामर आहेत ते ह्या महासागराचा उपयोग कसा करतात हे आपण निदान पहायला तरी हवं. त्या पाहण्यासाठीच किंवा त्या उपयोगावर केवळ एक दृष्टीक्षेप टाकण्यासाठीच हा लेख आहे.

आता उदाहरणार्थ गुगलच्या वेब हिस्टरीचा उपयोग घ्या. गुगलवर आपला शोध बाराही महिने चालू असतो. आपल्या ह्या शोधाचा मागोवा आपल्या मागे गुगल घेत असतो आणि त्याची अतिशय पद्धतशीर अशी नोंद वेब हिस्टरी ह्या सदरात होत असते. समजा गेल्या नोव्हेंबर २००७ ह्या महिन्यात आपण पाब्लो पिकासो ह्या जगप्रसिद्ध चित्रकाराबद्दलच्या माहितीचा शोध घेतला होता. त्याला आता चार महिने उलटून गेले आहेत. आता आपण आहोत मार्च २००८ मध्ये. चार महिन्यापूर्वीचा आपला तो शोध नेमका काय होता हे जाणण्याची सोय गुगलने वेब हिस्टरीमध्ये केलेली आहे. त्यासाठी काय करायचं. अतिशय सोपं आहे. तुमचं जीमेलचं जे लॉगिन नेम आहे त्याचा पासवर्ड वापरून प्रथम लॉगिन करायचं. तुमचं जीमेल लॉगिन नसेल तर

https://www.google.com/accounts/NewAccount

ह्या लिंकवर जाऊन तुमचं गुगल अकाऊंट तुम्हाला मोफत उघडता येईल. ह्या नव्या अकाऊंटचा लॉगिन आणि पासवर्ड वापरून तुमच्या स्वतःच्या गुगल विश्वात तुम्हाला प्रवेश करता येईल. आता ह्या पुढे तुम्ही गुगलवर जो जो शोध घ्याल त्याची नोंद सतत आणि तारीखवार पद्धतीने गुगल घेत राहील. पुढे अगदी वर्षभरांनी सुद्धा तुम्हाला त्याचा लेखा जोखा कधीही आणि जगात कुठेही पाहता येईल. ह्यातली मुख्य गोम अशी की कोणत्या तारखेला, नेमक्या किती वाजून किती मिनीटे आणि किती सेकंदाचा वेळ असताना तुम्ही कोणत्या शब्दांचा शोध घेतला होतात याची नोंद तर तुम्हाला पहायला मिळतेच, पण अधिक महत्वाचं म्हणजे तुम्हाला जे सर्च रिझल्टस मिळाले होते त्यातल्या नेमक्या कोणत्या सर्च रिझल्टवर तुम्ही क्लीक केले होतेत हेही गुगलची वेब हिस्टरी तुम्हाला अचूक सांगते. अर्थात वेब हिस्टरीचा उपयोग हा इतकाच नाही. तुम्ही जो सर्च करता त्याचा अभ्यासही गुगल तुमच्या नकळत करीत असते. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही व्यवसायाने डॉक्टर असलात तर तुमचे शोध हे एका विशिष्ट चौकटीतले असतात. किंवा, तुमच्या स्वभाव आणि आवडीप्रमाणे वा तुमच्या विषयाप्रमाणे तुमचे शोध काय असणार हे ठरत असते. तुमच्या नेमक्या ह्या व्यक्तीगत चौकटीचा अभ्यास गुगल करते आणि तुम्हाला कोणते शोध अभिप्रेत आहेत हे जाणण्याचा प्रयासही ते करते. ह्यामुळे तुम्हाला हवा तो शोध अधिक वेगाने आणि कमीत कमी सेकंदात मिळायला निश्चितपणे मदत होते. आता ह्या वेब हिस्टरी नामक अगदी साध्या पण अतिशय गुणवान अशा सोयीचा उपयोग आपण आतापर्यंत किती वेळा केला? उत्तर येते, कधीच केला नाही. किंवा फारच क्वचित केला असेल. तुमच्या आमच्यापैकी जी मंडळी ह्या प्रकारात येतात त्यांच्यासाठीच हा वेब हिस्टरीचा मंत्र ह्या लेखात दिला आहे. ह्या संदर्भात आणखी एक महत्वाची गोष्ट जाता जाता सांगतो की वेब हिस्टरीची सोय तुम्हाला Enable करावी लागते. ती करण्यासाठी Enable Web History च्या लिंकवर केवळ एक माऊसक्लीक करायची असते. आपल्या शोधाची नोंद गुगलने आपोआप करू नये असे वाटत असेल तर तुम्ही ही सोय केव्हाही Disable करू शकता.

गुगलच्या संदर्भात असे फारसे माहीत नसलेले अक्षरशः शेकडो तंत्र आणि मंत्र आहेत. इंग्रजीत तर गुगलच्या टीप्स आणि ट्रीक्स वर पुस्तकेच्या पुस्तके लिहीली गेली आहेत. त्यावरून गुगलवर शोध घेणे हा प्रकारही किती व्यावसायिकपणे जगात पाहिला जातो हे आपल्या लक्षात येईल. आता आणखी एक, सर्वांना माहीत असलेलीGoogle Image Search ची नेहमीची सोय थोडी तपशीलात जाऊन पाहू. गुगलवर चित्रे किंवा छायाचित्रे आपण नेहमीच शोधतो. पण आपल्यापैकी बरेच जणांना हे माहीत नाही की आपल्याला काही विशिष्ट निकषावरची चित्रे वगैरे शोधण्याची सोय गुगलने केली आहे. उदाहरणार्थ, समजा तुम्हाला फक्त कृष्ण-धवल प्रकारातली लाईन ड्रॉईंग्ज तेवढी शोधायची आहेत. तर, त्यासाठी तुम्ही Advanced Image Search चा उपयोग करायला हवा. त्याचा वापर करून तुम्हाला हव्या त्या रंगातील चित्रे वगैरे मिळू शकतात. कृष्ण-धवल लाईन ड्रॉइंग्ज जशी वेगळी काढून शोधता येतात तसाच शोध कृष्ण-धवल ग्रे स्केल इमेजेसचाही करता येतो. यात तुम्हाला ब्लॅक अॅन्ड व्हाईट फोटोग्राफ्स मिळतील. तुम्हाला विशिष्ट प्रकारच्या इमेज फाईल्स, म्हणजे JPG, GIF, BMP, PNG वगैरे, तर त्याही वेगळ्या मिळू शकतील. तुम्हाला आकाराने मोठी चित्रे वा इमेजेस हव्या असतील तर तो ऑप्शनही आपल्याला एकाच वेळी निवडता येतो. म्हणजे आपल्याला GIF प्रकारातील कृष्ण-धवल लाईन ड्रॉईंग्ज पण त्यातली आकाराने मोठी अशी चित्रे निवडण्याची सोय गुगलच्या ADVANCED IMAGE SEARCH ने उपलब्ध करून दिलेली आहे. आपण त्याचा उपयोग कितपत करतो ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे.

आता हे आणखी काही साधे सोपे मंत्र पहाः ~ ह्या खुणेचा उपयोग करून तुम्ही एखादा शब्द गुगल सर्च केलात तर त्याचेशी संबंधित रिझल्टस तुम्हाला मिळतात.उदाहरणार्थ ~ nutrition असं टाईप करून तुम्ही शोध घेतलात तर nutrition शी संबंधित Food, Calories, Health अशा सर्व अंगांनी तुम्हाला माहिती देणारे सर्च रिझल्टस तुम्हाला गुगल देईल. Temp Mumbai म्हणून सर्च केलात तर ह्या क्षणाचे मुंबईतले तपमान तुम्हाला मिळेल. Time Pune म्हणून सर्च कराल तर पुण्यात आत्ता किती वाजलेत, कोणता वार आहे याचे घड्याळ तुमच्यापुढे येईल. अनेक हिशोब किंवा रूपांतराची गणिते गुगलवर करता येतात. उदाहरणार्थ 122 ft=?inchesअसं टाईप करून सर्च केलात तर 122 feet = 1 464 inches असं उत्तर तुम्हाला क्षणार्धात मिळेल. 2 000 Indian rupees = ? U.S. dollars असा सर्च प्रश्न केलात तर 2 000 Indian rupees = 49.20200 U.S. dollars असं उत्तर गुगलकडे तयार असेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा