५ मार्च, २०११

लहान मुलांसाठी धम्माल 'टक्सपेंट' : भाग -१

(एकूण तीन भागात टक्स पेंटची माहिती आली आहे. ही माहिती आपण भाग 1 ते भाग 3 अशी क्रमाने वाचावी अशी विनंती आहे.  हा पहिला भाग आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या भागाच्या लिंक्स त्या भागाच्या खाली दिल्या आहेत. त्यावर क्लीक करून पुढे जाता येईल. )

Tux Paint हा गेम आहे. वय वर्षे 3 आणि त्यावरील मुले हा गेम खेळण्यात प्रचंड रमतात. याचं कारण त्या कोवळ्या वयात त्यांची आपली म्हणून जी कल्पनाशक्ती असते, ती वापरण्याची भरपूर संधी त्यांना ह्या गेममध्ये मिळते. तशी मुलं आपल्या साध्या पेंट ब्रशमध्ये रेघोट्या मारण्यातही रमतात. त्या रेघोट्या मारायला एकदा त्यांनी सुरूवात केली की मग ते माऊस सोडायला तयार नसतात. आपलं ते रेघोट्या स्वातंत्र्या ते मनमुराद लुटतात.
पेंट ब्रश हे छोटसं पिल्लू मानलं तर टक्स पेंट त्याच्या पुढे हत्तीसारखा आहे. दोघांमध्येही भरपूर रंगपंचमी करता येते. कधी कधी तर मोठी माणसंही टक्स पेंट खेळता खेळता मुल होऊन रमलेली दिसतात.
पुढलं काही सांगण्याअगोदर हा टक्स पेंट प्रथम डाऊनलोड करून घ्या. त्यासाठी ह्या दुव्यावर क्लीक करा. टक्स पेंटचा डाऊनलोड दोन भागात आहे. पहिला भाग म्हणजे टक्स पेंट हे अॅप्लीकेशन अर्थात मूळ प्रोग्राम. तो 11 एम.बी. चा आहे. दुसरा भाग हा टक्स पेंट साठी अॅड ऑन म्हणजे त्यात भर टाकणे आहे. ह्या अॅड ऑनमध्ये वेगवेगळ्या प्राण्यांची, फुलांची, पदार्थांची, पक्षांची वगैरे वगैरे रेलचेल आहे. ती मुलांना खूप आवडते. हा अॅड ऑन मूळ प्रोग्रामच्या तिप्पट मोठा म्हणजे 39 एम.बी. चा आहे. तो डाऊनलोड करण्यासाठी ह्या दुव्यावरच उपलब्ध आहे. याच पानावर मूळ प्रोग्रामच्या उजवीकडे शेजारीच याच्या डाऊनलोडींगचीही लिंक दिलेली आहे.
थोडक्यात, 11 एम.बी. चा मूळ प्रोग्राम आणि 39 एम.बी. चे अॅड ऑन (याला रबर स्टॅंप्स असं म्हणतात) प्रथम डाऊनलोड करून घ्या.
टक्स पेंटचं वैशिष्ट्य म्हणजे तो अधिकृतपणे आणि पूर्णपणे मोफत आहे. दुसरी गोष्ट त्याचे कोड ओपन सोर्स प्रकारचे म्हणजे खुले आहे. जर तुम्ही संगणक व्यावसायिक वा प्रोग्रामर असाल तर टक्स पेंट ला तुम्ही तुम्हाला हवा तसा आकार देऊ शकता. समजा, प्रोग्रामर नसाल, तर टक्स पेंट जसा आहे तसा वापरा. त्यात मुलांसाठी प्रचंड आनंद भरलेला आहे.
टक्स पेंट ची आणखी माहिती घेऊ पुढल्या भागात, म्हणजे भाग - 2 मध्ये.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा