उपयुक्त प्रश्नोत्तरे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
उपयुक्त प्रश्नोत्तरे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

१० मार्च, २०११

वेगवेगळे संगणकः नामे आणि कारनामे

एक वर्क स्टेशन, पीसी, डेस्क टॉप वगैरे...

पीसी, वर्क स्टेशन, डेस्क टॉप, सर्व्हर, मेनफ्रेम, सुपर काँप्युटर ही आणि आणखीही काही संगणकाचीच नावे. इथून तिथून ती सारखी कानावर पडत असतात. एकाच संगणकाची ही सारी नावे आहेत, की प्रत्येक नाव हे वेगळ्या संगणकाचे आहे? हा प्रश्न बरेचदा आपल्या मनात रेंगाळत असतो. त्याचं उत्तर मिळवावसं वाटतं, पण ह्या ना त्या कारणाने ते राहून गेलेलं असतं. संगणकइन्फो मध्ये आज त्या उत्तरावर कटाक्ष टाकूः

1) पीसीः अर्थात पर्सनल काँप्युटर. फार पूर्वी खोलीएवढे अवाढव्य संगणक होते. असे संगणक वापरण्यासाठी अनेक माणसे असत. पुढे प्रगती होत गेली आणि संगणक आकाराने लहान झाले. लहान संगणकांना मग मायक्रो-काँप्युटर्स म्हणण्याची पद्धत पडली. हे लहान म्हणजे मायक्रो-काँप्युटर्स मोठ्या संगणकाप्रमाणेच सर्व कामे करू शकत असत. मात्र त्यांना फार थोडी जागा लागे, आणि त्यावर काम करण्यासाठी फारच कमी माणसे लागत. मायक्रो-काँप्युटर्समधूनच नंतर पर्सनल काँप्युटर उदयाला आला. टेबलावर राहू शकेल इतक्या लहान आकाराचा, आणि एका माणसाला सहजपणे वापरता येण्याजोगा. हा पीसी. व्यक्तीगत संगणक. तो लॅप टॉप प्रकारचाही असू शकेल, किंवा टेबलावर कायम असलेला, सहजी हलविता न येणारा डेस्कटॉपही असू शकेल. 
2) वर्क स्टेशनः हाही टेबलावरचाच संगणक. एका माणसाने वापरण्याचाच. म्हणजे खरं तर पी.सी.च. पण त्याला पी.सी. म्हणायच्या ऐवजी वर्क स्टेशन म्हंटलं जातं, याचं कारण त्याची क्षमता आणि तुलनेने मोठा आकार. अधिक क्षमतेचा प्रोसेसर त्यात असणार हे ओघानच आलं. मेमरीही घसघशीत असणारच. गेम्स तयार करण्यासाठी, थ्रीडी ग्राफीक्ससाठी किंवा अॅनीमेशनसाठी असे तगडे संगणक लागतात. खूपदा त्यांचे मॉनिटर्स देखील चांगलेच मोठे असतात. तुमच्या घरच्या संगणकात प्रोसेसर, मेमरी वगैरे प्रचंड क्षमतेची असेल आणि तुम्ही त्यावर मोठ्या आकाराच्या फाईल्सचे काम करीत असाल तर तुमचा संगणकही वर्क स्टेशन प्रकारातच येईल. 
3) डेस्क टॉपः तुमच्या टेबलावर कायम विसावलेला संगणक. डेस्क हा शब्द टेबल ह्या अर्थाचाच. डेस्क टॉप संगणक हा मोठ्या क्षमतेचा असेल किंवा मध्यम वा कमी क्षमतेचाही असेल. पी.सी. हा एकाच वेळी डेस्क टॉप आणि वर्क स्टेशनही असू शकेल. मात्र लॅपटॉप टेबलावर कायम ठेवून वापरलात तरी त्याला डेस्क टॉप म्हणता येणार नाही. 
4) मेन फ्रेमः जुन्या काळात मोठ्या कंपन्यांमध्ये असलेले प्रचंड आकाराचे संगणक. हे एकेका खोलीइतकेही असत. किंवा, चक्क एखादा मजलाच्या मजला त्यांनी व्यापलेला असे. पुढे संगणक आकाराने लहान आणि क्षमतेने मात्र कितीतरी अफाट होत गेले. पण सवयीने आजही कितीतरी कंपन्यांमध्ये मेन फ्रेम हे शब्द वापरले जाताना दिसतात. लाखो उलाढाली करणारा संगणक, बहुधा तो एखाद्या टेबलावरच स्थानापन्न असतो. पण त्याच्या राक्षसी क्षमतेमुळे त्याला आपलं मेनफ्रेम म्हणायचं, इतकच. बाकी जुन्या काळातली आकाराची अवाढव्यता केव्हाच इतिहासात जमा झालीय.
5) सुपर काँप्युटरः भारताचा 'परम' हा सुपर काँप्युटर घ्या. आपल्या डॉ. विजय भटकरांच्या नेतृत्वाखाली तो तयार झाला हे आपण नेहमीच वाचतो आणि ऐकतो. सुपर काँप्युटर हा संख्येने एक असेल किंवा एकाच वेळी तो अनेक संगणकांचा पुंजकाही असेल. सामान्यतः सुपर काँप्युटर प्रकारातील संगणक हा मोठ्या गुंतवणूकीने तयार झालेला असतो. पीसी हा एका पेठेएवढा असला तर सुपर काँप्युटर हा खंडप्राय वा एखाद्या ग्रहाएवढा असल्यासारखा आहे. 
सर्व्हरः असा संगणक की जो त्याच्याशी जोडलेल्या इतर संगणकांना काही तरी सेवा पुरवतो. जोडलेले जे संगणक सर्व्हरची सेवा घेतात त्यांना क्लायंट असं म्हणण्याचीही पद्धत आहे. इतर संगणकांशी जोडलेला असल्याने सर्व्हर हा नेहमी नेटवर्कमध्येच असतो. थोडक्यात, एकमेकांशी जोडलेल्या अनेक संगणकांमधील जो मायबाप दाता संगणक असतो त्याला सर्व्हर असं म्हणतात. 
1980 सालचा एक मेनफ्रेम संगणक
पुढील एका पोस्टमध्ये आपण लॅपटॉप, नोटबुक, नेटबुक, पीडीए, टॅब हे कुठेही सहज नेता-आणता येणारे संगणक नेमके एकमेकांपासून कसे वेगळे असतात याची माहिती घेऊ. 

२५ फेब्रु, २०११

माधव शिरवळकर यांची ध्वनीमुद्रित मुलाखत (पॉडकास्टींग)

महाराष्ट्र मंडळ, लॉस अँजेलिस, अमेरिका, यांनी घेतलेली मुलाखत खालील दुव्यावर ऐकता येईल. सदर मुलाखत ही पॉडकास्टींग प्रकारची म्हणजे ध्वनीमुद्रित आहे.
http://www.mmla.org/mmla/June2010

२० फेब्रु, २०११

नवोदित ब्लॉगर्ससाठी उत्तम साईट

http://www.problogger.net/archives/2006/02/14/blogging-for-beginners-2/

ब्लॉग म्हणजे नेमकं काय? ब्लॉगचा इतिहास वगैरे चांगली माहिती इथे आहे. ही साईट कदाचित तुम्हाला बुकमार्क करावीशी वाटेल.

गुगल पेजरँक म्हणजे काय?

http://www.smashingmagazine.com/2007/06/05/google-pagerank-what-do-we-really-know-about-it/
गुगल पेजरॅंक. एक महत्वाचा मुद्दा. पण गुगल पेजरॅंक म्हणजे नेमकं काय? बर्‍याच जणांना किंवा खरं तर बहुतेकांना ते माहीत नसतं. तुम्ही त्यापैकी एक आहात असं वाटत असेल तर हे पान वाचाच.

तुमचा अँटी व्हायरस तपासून पहायचाय?

माझ्या संगणकावर अँटी व्हायरस प्रोग्राम असूनही व्हायरस लागला होता. त्यामुळे मी पीसी पूर्ण फॉर्म्याट केला, आणि सर्व प्रोग्राम पुन्हा लावले. आता अँटी व्हायरस देखील मी नव्याने लावला आहे. पण तो नीट काम करतो आहे की नाही हे कसं टेस्ट करायचं?

- ह्यासाठी एक खास पद्धत आहे.

तिला EICAR test असं म्हणतात.EICAR म्हणजे European Institute for Computer Antivirus Research. ह्या संस्थेने खालील कोड तयार केले आहे.

X5O!P%@AP[4\PZX54(P^)7CC)7}$EICAR-STANDARD-ANTIVIRUS-TEST-FILE!$H+H*

तुम्ही इतकच करायचं. Notepad किंवा Wordpad किंवा कोणताही Text Editor उघडा. त्यात वरील कोड टाईप करा (किंवा इथून कट - पेस्ट करा). नंतर Save as.. वर क्लीक करून ही फाईल EICAR.COM ह्या नावाने सेव्ह करा. (EICAR.COM फाईल सेव्ह करण्यासाठी All files हा पर्याय Notepad किंवा Wordpad मध्ये निवडावा लागेल.) हीफाईल सेव्ह केल्या केल्या तुमचा अँटी व्हायरस लगेच अलार्म देईल की तो EICAR TEST SIGNATURE व्हायरस आहे. पण काळजी करू नका. तो व्हायरस नाही. त्या फाईलने तुमच्या संगणकाला काहीही होणार नाही. ही फाईल ज्या अर्थी तुमच्या अँटी व्हायरसने ओळखली त्या अर्थी तुमचा अँटी व्हायरस नीट काम करतो आहे असं मानायला हरकत नाही.

ह्या संदर्भात अधिक माहिती तुम्हाला www.eicar.com. ह्या वेबसाईटवर मिळेल. ज्यांना वरील कोड टाईप करणे किंवा फाईल सेव्ह करणे नको असेल अशांसाठी EICAR.COM ही फाईल देखील ह्या वेबसाईटवर डाऊनलोडींगसाठी ठेवली आहे.

गुगलमधलं I am feeling lucky म्हणजे नेमकं काय?

गुगल सर्चचं Home Page म्हणजे साधेपणाचा कळस आहे. शुभ्र पांढरी पार्श्वभूमी आणि त्यावर दररोज बदलती गुगल नावाची छबी ह्याच दोन गोष्टी त्यावर ठळकपणे दिसतात. इतर बाकी साध्या टायपातले काही बाही, पण आवश्यक शब्द. सर्च करण्यासाठी टाईप करायच्या शब्दांसाठी एक लांबलचक पट्टी आणि त्याखाली Google Search आणि I am feeling lucky ह्या नावाची दोन बटणं. त्यातलं Google Search हे बटण कशासाठी आहे हा प्रश्न कोणालाही पडत नाही. पण दुसरं बटण I am feeling lucky म्हणजे नेमकं काय, आणि ते बटण नेमकं करतं काय हा प्रश्न दहातल्या आठ जणांना पडतो.

गुगल सर्च करताना I am feeling lucky असं स्वतःबद्दल म्हणण्यासारखं काय आहे, असा सरळ आणि भाबडा प्रश्न येणं स्वाभाविक आहे.

ह्या प्रश्नाचं उत्तर समजावून घेण्यासाठी आपण एक साधी कृती करू, म्हणजे हा Lucky प्रकार काय आहे हे आपल्या लक्षात येईल. गुगलच्या सर्च टेक्स्ट फिल्डमध्ये (म्हणजे त्या लांबलचक पट्टीमध्ये Stanford हा शब्द टाईप करा. आता Google Search ह्या बटणावर क्लीक न करता, I am feeling lucky वर क्लीक करा. बघा काय झालं! कोणताही सर्च रिझल्ट समोर आला नाही. एरवी अमुक तमुक क्षुल्लक सेकंदात लाखो सर्च रिझल्ट देणार्‍या गुगलने काय केल? सर्च रिझल्ट न देता त्याने थेट stanford.edu ही वेबसाईट उघडली. याचाच अर्थ तुम्ही लक्की ठरलात. तुम्हाला सर्च रिझल्टमध्ये डोळे घुसवून हवं ते शोधावं लागलं नाही. तुम्हाला स्टॅनफोर्ड विद्यापीठाची वेबसाईट हवी होती, हे गुगलने जाणलं आणि तुम्हाला कोणताही त्रास होऊ न देता सुखाने हवी ती वेबसाईट तुमच्यापुढे उघडली.

आयुष्यात जे हवं ते कोणतीही तोशिस न पडता समोर येण्याचं भाग्य गुगलमध्येही असू शकतं ते हे असं. मराठीत म्हणूनच I am feeling lucky चं भाषांतर 'मी भाग्यवान' असं गुगलनेच केलं आहे. मराठी गुगलमध्ये जसं 'मी भाग्यवान' नावाचं बटण असतं तसं हिंदीत 'आज मेरी किस्मत अच्छी है' नावाचं बटण असतं. गुजरातीत "મારું નસીબ જોર કરે છે" नावाचं बटण आहे.

Stanford प्रमाणेच BBC, White House, Maharashtra हे शब्द टाकून Feeling Lucky दाबून काय होतं ते पहा. बीबीसीची, ओबामांच्या व्हाईट हाऊसची आणि महाराष्ट्र सरकारची वेबसाईट थेट उघडते. एवढं समजून घेतल्यानंतर आपण आजपर्यंत का लक्की ठरत नव्हतो हे आपल्या कायम लक्षात आल्याशिवाय राहणार नाही.

Tiff, JPG, GIF फाईल्सच्या अद्याक्षरांचा अर्थ नेमका काय?

Tiff म्हणजे Tagged Image File Format. JPG म्हणजे Joint Photographers Group. GIF म्हणजे Graphical Interchange Format. ह्यातील प्रत्येक प्रकाराचे आपले म्हणून असे एक किंवा अनेक वैशिष्ट्ये आहेत. ग्राफीक वापरणारांना किंवा ग्राफीकशी संबंधित विद्यार्थ्यांना ती माहीत हवीत. ते ज्ञान मिळविण्यासाठी खालील तीन लिंक्स उपयुक्त आहेत.

http://kb.iu.edu/data/adpn.html (इथे GIF बाबतची माहिती आहे)
http://kb.iu.edu/data/afjn.html (इथे TIFF ची माहिती मिळेल)
http://kb.iu.edu/data/adqe.html (इथे JPG बद्दलची माहिती मिळेल)

वेबसाईटचे नाव नेहमी lowercase मध्येच लिहीले पाहिजे का?

मूळ वेबसाईटचे नाव, जसे www.google.com हे तुम्ही lowercase मध्ये लिहीता की UPPERCASE मध्ये लिहीता याने काहीही फरक पडत नाही. तुम्ही जरी ते पूर्ण कॅपिटल लेटरमध्ये WWW.GOOGLE.COM असं लिहीलत तरी शेवटी ते www.google.comअसंच होणार. वेबसाईटच्या नावात मोकळी जागा किंवा space ला स्थान नसते. वेब अड्रेस हा सलगच असावा लागतो.

वेबसाईटच्या मूळ Domain Name (जसे www.google.com) नंतर येणारा भाग मात्र case sensitive असतो. वेबसर्व्हरवरील एखादी डिरेक्टरी Google किंवा gooGle अशी असेल तर ती तशीच टाईप करावी लागेल. तसे न केल्यास ते विशिष्ट पान दिसणार नाही व Page cannot be displayed असा किंवा तत्सम संदेश समोर येईल

ब्लू रे डिस्क बाजारात आल्या आहेत, त्या संदर्भात सविस्तर माहिती कुठे मिळेल?

Blu (Blue नव्हे) Ray Disk ह्या DVD च्या पुढलं पाऊल म्हणून ओळखल्या जातात. दोघांचा वापर, आकार आणि दिसणं सारख्याच पद्धतीचं असल तरी क्षमता आणि इतर काही मुद्दे यात खूप फरक आहे. आजच्या Singe sided DVD वर ४.७ जी.बी. चा डेटा राहू शकतो, किंवा साधारणतः दोन तासाचा चित्रपट त्यात मावू शकतो. Single sided Blu Ray Disk त्या तुलनेत एखाद्याडायनॉसोरससारखी आहे. त्यावर २७ जी.बी.चा डेटा किंवा तेरा तासांचा व्हिडीओ त्यात मावू शकतो.

डीव्हीडी १९९७ साली, तर ब्लू रे डिस्क २००६ साली बाजारात आली.
डीव्हीडी मध्ये लाल (Red) रंगाचे लेसर किरण डिस्क वाचण्यासाठी वापरले जातात. ब्लू रे डिस्कमध्ये मात्र निळ्या रंगाचे लेसर किरण वापरले जातात. त्यावरूनचत्याला Blu हे नाव मिळाले. वस्तुतः Blue Ray चे ट्रेड मार्क म्हणून रजिस्ट्रेशन करावयाचे होते. पण नियमाप्रमाणे शब्दकोशातील शब्दाचे ट्रेड मार्क म्हणून रजिस्ट्रेशन होऊ शकत नसल्याने Blue मधील e काढून टाकण्यात आला. Blu ह्या स्पेलींगमागील गोम ही अशी आहे.

अधिक माहिती http://www.blu-ray.com/ ह्या साईटवर उपलब्ध आहे.

Windows चे व्हर्जन कोणते हे कसे ओळखावे?

Start - Run याप्रमाणे क्लीक करून Run च्या बॉक्समध्ये खालील दाखविल्याप्रमाणे winver शब्द टाईप करा आणि Enter दाबा (किंवा चित्रात दाखवल्याप्रमाणे OKवर क्लीक करा.).



OK वर क्लीक करताच तुमच्यासमोर Windows चे नेमके व्हर्जन कोणते आहे हे दाखविणारी विंडो (खाली दाखवल्याप्रमाणे) अवतरेल.

LCD Monitors हे गेम्ससाठी योग्य नसतात असं का म्हणतात?

आज हा एक गैरसमज मानायला हवा. तो गैरसमज पसरला याला LCD मॉनिटर्सचा भूतकाळ कारणीभूत आहे. पूर्वीच्या LCDमॉनिटर्सचा Response Time (त्याला आता Refresh Rate म्हणतात) खूपच जास्त होता. म्हणजे स्क्रीनवर ग्राफीक्स (चित्रे, फोटो,चलत्चित्र आदि) अवतरायला अधिक वेळ लागत असे, व मध्ये मध्ये चित्रेही blur होत असत. जास्त Response Time ने शब्द,अक्षरं किंवा स्थिर चित्रांना अडचण येत नसे. मात्र, गेम्समधील चित्रे खूपच वेगाने येणे-जाणे आवश्यक असल्याने तिथे अडचण येई.त्यामुळे सुरूवातीच्या विकासाच्या टप्प्यात असताना गेम्स खेळणारे LCD मॉनिटर्सपेक्षा साधे मॉनिटर्स निवडत असत.

पण आता परिस्थिती बदलली आहे. आजचे LCD मॉनिटर्स चांगले प्रगत आहेत. त्यांचा Refresh Rate खूपच चांगला आहे. त्यामुळे आज LCD मॉनिटर्सवरही गेम्स उत्तम रितीने खेळता येतात.

Response Time हा मिलीसेकंदांमध्ये मोजला जातो. तो जेवढा कमी तेवढे तुमच्या मॉनिटरवर ग्राफीक्स त्वरेने येतात आणि जातात. त्यामुळे मॉनिटर विकत घेताना त्याचा Response Time अवश्य लक्षात घ्यावा. ३५ मिलीसेकंदाच्या मॉनिटरपेक्षा ८ मिलीसेकंद Response Time असलेला मॉनिटर गेम्ससाठी अधिक चांगला असणार हे ओघानेच आलं.

मॅक काँप्युटर्सना व्हायरस लागू शकत नाही असं म्हणतात, ते खरं आहे काय?

Mac काँप्युटर्सनाही व्हायरस लागू शकतो. मॅक ला व्हायरस लागत नाही अशी दंतकथा पसरली यामागे काही कारणं आहेत. Appleकंपनीचा मॅक हा काँप्युटर पीसीपेक्षा अधिक बुद्धीमान म्हणून ओळखला जातो. पण व्हायरस न लागण्याची दंतकथा पसरण्यामागचं कारण ते नव्हे. मॅक ज्या ऑपरेटींग सिस्टमवर चालतो (Mac OS X वगैरे) ती जुन्या Unix ह्या ऑपरेटींग सिस्टमवर आधारलेली आहे. युनिक्स ही सुरक्षिततेच्या दृष्टीने जगातील सर्वांत कार्यक्षम ऑपरेटींग सिस्टम आहे. त्याचा लाभ मॅकला मिळतो.

Windows ही IBM वर आधारलेली ऑपरेटींग सिस्टम आहे. व्हायरस तयार करणारी बहुसंख्य मंडळी ह्या ऑपरेटींग सिस्टमशी परिचित असणारे आहेत. तसेच मॅक आणि पीसी वापरणारांमध्ये विंडोजवर आधारित पीसी वापरणारांची संख्या कितीतरी पटीने अधिक म्हणजे लाखोंच्या संख्येत आहे. पीसींची संख्या एवढी प्रचंड असल्याने व्हायरस पसरवण्याचे काम वेगाने व परिणामकारकपणे होऊ शकते. मॅकची संख्या लहान असल्याने त्यातून व्हायरस पसरवण्यावर खूपच मर्यादा पडतात. त्यामुळे व्हायरस तयार करणारे नेहमीच पीसी ची निवड करतात.

ह्या कारणांमुळेच मॅकला व्हायरसची भिती पीसीच्या तुलनेत खूपच कमी असते. त्यामुळे मॅक युजर्स व्हायरसच्या बाबतीत बिनधास्त असतात. कित्येक मॅक युजर्स हे अन्टी व्हायरस वापरतही नाहीत. ह्या सर्व कारणांमुळेच मॅकला व्हायरस लागत नाही अशी वदंता पसरलेली दिसते. नॉर्टन,सोफोस वगैरे अन्टी व्हायरस प्रोग्राम्स पीसी व मॅक अशा दोन्हींसाठी आज उपलब्ध आहेत

Recycle Bin मधून डिलीट झालेल्या फाईल्स परत मिळू शकतात का?

Recycle Bin मधून फाईल्स डिलीट झाल्या तर त्या परत मिळवता येत नाहीत अशी बर्‍याच जणांची समजूत असते. Recycle Binही Windows ची एक डिरेक्टरी आहे. डिलीट केलेल्या फाईल्स इथे आणल्या जातात. जेव्हा आपण Recycle Bin मोकळी म्हणजेEmpty करतो तेव्हा त्या Windows मधून काढून टाकल्या जातात. मात्र त्यांची मुळे संगणकावर अस्तित्वात असतात. ज्यावेळी ह्या मुळांवर दुसर्‍या फाईल्स चढतात तेव्हा ती मुळे नाहीशी होतात. त्यानंतर मात्र फाईल्स परत मिळू शकणं अतिशय दुरापास्त किंवा जवळजवळ अशक्य असतं.Recycle Bin मधूनही गेलेल्या तुमच्या फाईल्स परत मिळविण्यासाठी Undelete Plus नावाचा मोफत उपलब्ध असणारा प्रोग्राम तुम्ही वापरायला हवा. http://www.undelete-plus.com/ ह्या साईटवरून तुम्ही तो डिलीट करू शकता.

RSS Feed म्हणजे नेमके काय?

RSS म्हणजे Really Simple Syndication. त्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी अर्थातच काही संबंध नाही. तो केवळ संगणक तंत्रज्ञानाचा एक प्रकार आहे. यातला Syndication हा शब्द बोलका आहे. त्याचा अर्थ (व्याख्या) शब्दकोशामध्ये - "selling (an article or cartoon) for publication in many magazines or newspapers at the same time" असा सापडतो. म्हणजे एखादा लेख एकाच वेळी वेगवेगळ्या नियतकालिकांमध्ये वा वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्धीस देण्याची पद्धत.
एखाद्या वेबसाईटसवरील नवे लेख वा नव्याने भर पडलेल्या बाबी (लेख चित्र वा तत्सम) याबाबत इतर ठिकाणी (मुख्यत्वे इतरवेबसाईटसवर किंवा थेट तुमच्या काँप्युटरवर) एकाच वेळी कळवणे ही RSS ची प्रक्रिया आहे. एक काल्पनिक उदाहरण घेऊ, म्हणजे RSS मागील संकल्पना स्पष्ट होईल. समजा xyz.com ह्या वेबसाईटवर मुंबईच्या विकासाबद्दलचा एक लेख नुकताच नव्याने आला आहे. अशा वेळी त्या लेखाची लिंक एखादा बातमीचा मथळा असावा अशा पद्धतीने xyz.com वर प्रकाशित केली जाते. xyz.com वर जे काही नवे येईल त्यात अनेकांना रस असतो. तसेच, दुसरीकडे खुद्द xyz.com ला आपल्या लेखांचा प्रचार होण्यात रस असतो. xyz.com ने नव्या लेखाच्या लिंकचा फीड दिला की त्याची RSS file वेबसाईट (आपल्या उदाहरणात xyz.com) तयार करते. हा फीड इतर अनेक वेबसाईटना वा युजर्सना एकाच वेळी व त्वरीत मिळतो. आपल्याला Subscribe to RSS feed वगैरे शब्दप्रयोग अनेक साईटसवर दिसतात. त्यामागे ही Syndication ची कल्पना आहे.
RSS ची संकल्पना XML (Extensible Mark-up Language) ह्या संगणकी भाषेवर आधारलेली आहे. RSS हे उपयुक्त आहे याबद्दल सर्वांचे एकमत असले तरी त्या संदर्भातील अनेक मुद्यांवर मत-मतांतरे आहेत. खुद्द RSS ला Really Simple Syndication म्हणायचे की Rich Site Summary म्हणायचे? त्यापेक्षा Rich Site Syndication किंवा Rich Syndication Standard का म्हणू नये याबद्दल मतभेद व्यक्त करणारे आहेत. पण RSS ला सर्व जण RSS च म्हणतात हे मात्र नक्की. तसच RSS चा सर्वांना अभिप्रेत असलेला अर्थ आणि तंत्रज्ञानही तेच आहे हेही नक्की.
XML, RSS Readers वगैरेंबद्दल पूर्ण आणि सर्वांगीण माहिती एका प्रश्नाच्या उत्तरात सामावणे अशक्य आहे. ह्या उत्तरात केवळ वरवरची माहिती RSS संकल्पनेचाथोडक्यात परिचय व्हावा इतपतच आली आहे याची नोंद वाचकांनी घ्यावी. ज्यांना ह्या विषयासंबंधी सविस्तर वा सखोल माहिती हवी आहे त्यांनीhttp://www.voidstar.com/module.php?mod=book&op=feed&id=129 ह्या लिंकवरचा RSS FAQ (Frequently Asked Questions) अवश्य वाचावा.

Windows मधील Start Menu A to Z अकारविल्हे प्रमाणे कसा करायचा?

Start - Programs या प्रमाणे क्लीक करून तुमचा Start Menu उघडा.


आता कोणत्याही एका Menu Item वर राईट क्लीक करा. त्यातून निघणार्‍या Dropdown Menu मधून Sort by name वर क्लीक करा.

झाला तुमचा अस्ताव्यस्त झालेला Start Menu अकारविल्हे

फाईल डिलीट करताना File is in use by some application असा संदेश येतो तेव्हा काय करावे?

व्हायरस, स्पायवेअर  वा अन्य कारणामुळे हे होऊ शकतं. सर्वांना ही समस्या कधी ना कधी भेडसावलेली असते. प्रथंम त्यामागे स्पायवेअर वा व्हायरसचे कर्तृत्व तर नाही ना हे अगोदर तपासून पहा. ते नाही याची खात्री झाली तर http://www.dr-hoiby.com/WhoLockMe/ ह्या लिंकवर जा. तेथे Who lock me नावाचे २३ के साईजचे एक टूल (Freeware) आहे. ते वापरून तुम्हाला तुमची समस्या सोडवता येईल.

काँप्युटर योग्य पद्धतीने शटडाऊन होत नसेल तर काय करावे?

तुमचा काँप्युटर योग्य पद्धतीने शटडाऊन होत नाही यामागे अनेक कारणांपैकी कोणतेही वा कोणतीही असू शकतात. त्यातलं नेमकंकोणतं हे काँप्युटर न पाहता सांगणं अवघड आहे. Spybot सारखा Anti Spyware प्रोग्राम वापरून एखादे स्पायवेअर तर त्यामागे नाही ना याची खात्री करून घ्या. Spybot पूर्ण अपडेट असेल याची काळजी घ्या. त्याच प्रमाणे Anti Virus Scan देखील पूर्ण करून घ्या. CCleaner सारखा प्रोग्राम वापरून संगणकातील Temp Files वगैरे कचरा काढून घ्या. तसेच Registry cleaning देखील करून घ्या. Registry तील Errors मुळे देखील शटडाऊनच्या समस्या उद्भवू शकतात. हे सारं करूनही जर शटडाऊनची समस्या कायम असेल तर तुमच्या संगणकातले एखादे सॉफ्टवेअर तर याला कारणीभूत नाही ना हे तपासावे लागेल. वारंवार Not responding चा संदेश देणारे सॉफ्टवेअर काढून पहा. यानेही समस्या सुटली नाही तर मायक्रोसॉफ्टच्या

http://www.microsoft.com/downloads/details.aspx?familyid=1B286E6D-8912-4E18-B570-42470E2F3582&displaylang=en

ह्या लिंकवर जा. तेथे A service to help with slow log off and unreconciled profile problems. साठी एक डाऊनलोड दिले आहे. ते वापरून पहा.

फोर्स शटडाऊन कसे करावे हे शिकवणारे एक ट्युटोरियल http://www.leeindy.com/forcedshutdown.shtml
ह्या लींकवर आहे. त्याचा काही उपयोग होतोय का ते पहा.

संगणकावर फाईल्स वा फोल्डर पासवर्ड प्रोटेक्ट कसे करावे?

तुम्हाला तुमच्या संगणकावरील डेटा पासवर्ड प्रोटेक्ट करता येईल. पण पासवर्ड विसरलात तर अवघड होईल. त्यामुळे पासवर्ड लक्षातठेवण्याचं तेवढं लक्षात ठेवा.
तुम्ही जर Windows XP वापरत असाल (आणि तुमची फायलींग सिस्टम NTFS प्रकारची असेल) तर खुद्द विंडोजमध्ये तुम्ही तुमच्या फाईल्स पासवर्ड प्रोटेक्ट करू शकता. त्यासाठी खालील कृती कराः
- जो फोल्डर पासवर्ड प्रोटेक्ट करायचा त्यावर राईट क्लीक करा.
- राईट क्लीक केल्यानंतर येणार्‍या ड्रॉप डाऊन मेनूतील Properties वर क्लीक करा. तुमच्यापुढे खालील विंडो येईल. ह्या विंडोमधीलSharing ह्या टॅबवर क्लीक करा.


त्यानंतर Local Sharing and Security च्या खालील Make this folder private च्या छोट्या बॉक्समध्ये क्लीक करून तो सिलेक्ट करा.
- त्यानंतर Apply वर क्लीक करून OK करा.
टीपः Make this folder private हे शब्द आणि त्याचा बॉक्स वरील विंडोत दिसत असल्याप्रमाणे ग्रेआऊट झालेला दिसतो आहे का? म्हणजे, त्यावर क्लीक होऊ शकत नसेल तर तुमची फायलींग सिस्टम Fat 32 प्रकारची आहे. NTFS प्रकारची नाही. तसं असल्यास तुम्हाला ह्या पद्धतीने फोल्डर्स पासवर्ड प्रोटेक्ट करता येणार नाहीत.
तसं असल्यास, MaxCrypt हे सॉफ्टवेअर वापरून फोल्डर वा फाईल्स पासवर्ड प्रोटेक्ट करता येतील.
http://www.kinocode.com/download/MSS_v2_Setup.exe
वरील लींकवर क्लीक करा म्हणजे MaxCrypt 2.0 डाऊनलोड होईल. ते इन्स्टॉल करा. त्यानंतर राईट क्लीक करून तुम्हाला फाईल्स व/वा फोल्डर्स पासवर्ड प्रोटेक्ट करता येतील. ३.८ एम.बी. आकाराचं हे सॉफ्टवेअर फाईल्स व फोल्डर्स Encrypt करतं. पासवर्ड दिल्याशिवाय ते Decrypt होऊ शकत नाही. ह्या संदर्भातील अधिक माहिती http://www.kinocode.com वर मिळू शकेल.

वेब २.० ची संकल्पना

Web 2.0 बद्दल जी चर्चा आज ऐकायला मिळते ती उंबरठ्यावर उभ्या असलेल्या उद्याच्या Web जगताबद्दलची चर्चा आहे. गुगलने वेब २.० ची व्याख्या दिली आहे. ती अशीः
Web 2.0 is a term often applied to a perceived ongoing transition of the World Wide Web from a collection of websites to a full-fledged computing platform serving web applications to end users. Ultimately Web 2.0 services are expected to replace desktop computing applications for many purposes.
ही व्याख्या भविष्याचा वेध घेते. एके काळी Web म्हंटलं की हजारो वेब साईटसचं/वेब पानांचं एक प्रचंड आणि जगद्व्यापी पोळं किंवा जाळं इतकच अभिप्रेत होतं. त्या स्थितीपासून पुढे विकसित होत होत Web हे संगणक वापरणारांसाठी एक परिपूर्ण व्यासपीठ बनेल अशी विचारधारणा Web 2.0 च्या मागे आहे. आज आपल्याला संगणकावर वेगवेगळी सॉफ्टवेअर (applications) लावावी लागतात. पुढचा काळ (म्हणजे Web 2.0 चा काळ) असा असेल की ही सॉफ्टवेअर आपल्याला इंटरनेटवरच वापरायला मिळतील. गुगलने त्याची थोडी झलक दाखवायला सुरूवातही केली आहे. Google Docs आणि Spreadsheetsम्हणजे Word आणि Excel सारखे Programmes इंटरनेटवर उपलब्ध झाल्यासारखे आहेत. थोडक्यात, उद्याचा तुमचा संगणक तुमच्या घरातल्या हार्ड डिस्क पेक्षा इंटरनेटच्या सर्व्हरवर अधिक असणार आहे. याला इंटरनेटची दुसरी पिढी असे म्हंटले जाते.
२००३ साली O'Reilly Media ह्या प्रकाशन संस्थेच्या अधिवेशनात प्रथम Web 2.0 ची संकल्पना मांडली गेली. ह्या अधिवेशनात O'Reilly Media चे प्रमुख टीम ओरीली यांनी त्याचा प्रथमोच्चार केला. टीम ओरीलीच्या शब्दातली वेब २.० ची व्याख्या अशीः
"Web 2.0 is the business revolution in the computer industry caused by the move to the internet as platform, and an attempt to understand the rules for success on that new platform."
त्याच्या पुढल्या वर्षी म्हणजे २००४ साली झालेल्या त्यांच्या अधिवेशनानंतर ही संकल्पना बरीच रूढ झाली. आज Web 2.0 बद्दल उलट सुलट चर्चा आहे. अनेक तज्ज्ञांनी त्यावर टीकेचा माराही केला आहे. सर्वसाधारणतः Blogs, social bookmarking, wikis, podcasts, RSS feeds, social software, Web APIs, वगैरे घटकWeb 2.0 चा भाग मानले गेले आहेत.

ह्या संदर्भात विकीपेडियाच्या http://en.wikipedia.org/wiki/Web_2.0 ह्या लींकवर अधिक माहिती जिज्ञासूंसाठी उपलब्ध आहे

भारतातील शहरांचे वा विविध ठिकाणांचे अक्षांश व रेखांश कुठे मिळतील?

ह्या साठी http://www.indiapress.org/horoscope/ ह्या साईटवर जा. ह्या पानावर तळाशी पहा खालील चित्रात दाखविल्याप्रमाणे A to Z पर्यंत लिंक्स आहेत. तुम्हाला मिरज शहराचे अक्षांश रेखांश हवे आहेत. ते अद्याक्षरावर क्लीक केल्यानंतर मिळतील. तसेच तुमच्या बोरिवलीचे अक्षांश रेखांश अर्थातच वर क्लीक केल्यावर उपलब्ध होतील. 

भारताबाहेरील स्थळांचे अक्षांश रेखांश दाखविणार्‍या वेबसाईटस तर
 फारच मोठ्या प्रमाणावर आहेत. त्याची माहिती www.earthtools.org ह्या लिंकवर मिळू शकेल.