ट्युटोरियल्स (प्रशिक्षण/धडे) लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
ट्युटोरियल्स (प्रशिक्षण/धडे) लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

१६ मार्च, २०११

एक झकास पुस्तक, गुगलकडून सर्वांसाठी...

मंडळी, हा लेख जरा काळजीपूर्वक वाचा. चटकन नजर फिरवून निघालात तर हातात काही पडणार नाही. पण नीट वाचत शेवटपर्यंत गेलात तर आयुष्यभरासाठी बरंच काही हातात आल्यासारखं वाटेल. रिअली, आय अॅम सिरीयस.
असं बघा की जेवायचं ताटात, आणि इंटरनेट पहायचं ब्राऊझरमध्ये. बरोबर? कोणी इंटरनेट एक्स्प्लोअरर मध्ये पाहील, कोणी फायरफॉक्स पसंत करील, कोणी क्रोम चांगलं आहे म्हणेल. ताटं वेगवेगळी पण इंटरनेट तेच. आता कल्पना करा की ताटाला संवेदना आहे. ताटाला चव कळते आहे. अशा बऱ्याच गोष्टी त्याला कळताहेत. तर ताट त्याच्यात वाढलेल्या पदार्थांबद्दल सर्वांत जास्त सांगू शकेल. आता अधिक जास्ती प्रस्तावना न करता मी थेट विषयाकडे येतो.

११ मार्च, २०११

गोंधळात टाकणारे 200 इंग्रजी शब्द

इंग्रजी ही भाषा सरळ आहे. पण सरळ चालताना मध्येच निसरडं यावं, आणि घसरून पडण्याचा धोका वाटावा असे काही शब्द इंग्रजीत आहेत. ते कोड्यात टाकतात, आणि गोंधळवूनही टाकतात.
उदाहरणार्थ हे पहाः
LATER आणि LATTER
किंवा
MATERIAL आणि MATERIEL
आणखी एक पहा,
RIFFLE आणि RIFLE
आता नेहमीचे काही शब्द - PRINCIPAL आणि PRINCIPLE, किंवा QUIET आणि QUITE वगैरे आपण काळजी घेऊन लिहीत असतो. पण एवढ्या वर्षांच्या इंग्रजी वाचन, लेखन, संभाषण केल्यानंतरही त्यातले काही सटकलेले असतातच.
अशा शब्दांच्या 200 हून अधिक जोड्या ह्या संकेतस्थळावर दिल्या आहेत. त्यांचे अर्थ कसे वेगळे आहेत, आणि वाक्यात त्यांचा उपयोग कसा होत असतो हे नीट दाखवले आहे.
इंग्रजीची काळजी घेणाऱ्या मंडळींना ह्या लिंकवर निश्चितच जावसं वाटेल. त्या 200 जोड्यांपैकी किती आपल्याला माहीत होत्या, आणि किती माहीत नव्हत्या हे पहाणं म्हणजेही स्वतःची स्वतःच परीक्षा घेतल्यासारखंही आहे.
हे पाहता पाहता एकीकडे ज्ञानही मिळतं, आणि मनोरंजनही होतं.

५ मार्च, २०११

असाही एक सलमान खान - भाग 3

('असाही एक सलमानखान' एकूण तीन भागात आहे. हा भाग तिसरा आहे. आपण हे तिन्ही भाग क्रमाने वाचावे अशी विनंती आहे. पहिला भाग ह्या दुव्यावर, आणि दुसरा भाग येथे उपलब्ध आहे.)
आपल्या मुलासह सलमान खान
आज खान अॅकॅडमीचे व्हिडिओवरील सुमारे 2500 अभ्यासपाठ हे इंग्रजीत आहेत. त्यातला आवाज हा सलमान खानचा आहे. सलमानला फक्त इंग्रजीच बोलता येतं. मोडकं तोडकं बंगालीही येतं. पण इतर भाषा त्याला येत नाहीत. यासाठी त्याने खान अॅकॅडमीचा ट्रान्सलेशन प्रोजेक्ट जाहीर केला आहे. त्यामागील कल्पना जगाला भावणारी आहे. जे प्रत्येकी वीस वा पंचवीस मिनिटांचे पाठ सलमानने तयार केले आहेत, त्यातील धडे, व एकूण ढाचा तसाच ठेवून त्याचे भाषांतर इतर भाषांमध्ये करायचे. समजा, बीजगणिताचा एक पाठ आहे. तर आपल्या एखाद्या बीजगणिताच्या शिक्षकाने सलमानच्या ऐवजी बोलायचे, तो पाठ समजावून सांगताना फक्त रेकॉर्ड करायचा. मूळ पाठ तर तयार आहेच. फक्त इंग्रजीऐवजी नवी भाषा त्यात भरायची आहे. हा ट्रान्सलेशन प्रोजेक्ट सलमानने जगापुढे खुला केला आहे.  कोणीही त्यात सहभागी होऊ शकतं. त्याची माहिती ह्या दुव्यावर आहे. मराठीसाठी आपल्यापैकी कोणी ह्या प्रकल्पात सहभागी होत असेल तर त्याची माहिती संगणक डॉट इन्फो ला जरूर कळवा. त्याचा वृत्तांत आपण सर्वांच्या माहितीसाठी जरूर प्रकाशित करू. 
दुसरी गोष्ट सलमानने आपल्या वेबसाईटवर स्वतःशीच एक संवाद साधला आहे. त्याला म्हणताना FAQ म्हंटलं असलं तरी एखादी मुलाखत वाचावी असा तो संवाद आहे. एका मूळ इंग्रजी प्रश्नाचे हे भाषांतर पहाः
तुम्हाला ह्या उपक्रमाचे रूपांतर व्यवसायात करण्याची इच्छा आहे का? समजा एखाद्या व्हेंचर कॅपिटल कंपनीने तुम्हाला तशी ऑफर दिली वगैरे तर...?
सलमान खानः तशा ऑफर्स मला खूप आल्या. पण मलाच ते रूचत नाही. ज्यावेळी मी 80 वर्षांचा होईन, तेव्हा मला हे समाधान मिळालं की जगातील अब्जावधी विद्यार्थ्यांना मी उत्तम दर्जाचं शिक्षण उपलब्ध करून दिलं, तर ते मला अधिक आवडेल. शिक्षणाचा धंदा सुरू करण्यापेक्षा मला ते अधिक महत्त्वाचं वाटतं. जगातला असा वर्ग की जो अगोदरच पुढारलेला आहे, त्याच्याकडून दरमहा 19.99 डॉलर फी घ्यायची, धन कमवायचं, आणि मग शेवटी आपली कंपनी कुठल्या तरी मोठ्या कंपनीला प्रचंड किंमतीला विकून टाकायची यात ते समाधान नाही. मला काय कमी आहे, सुंदर बायको, ज्याच्या बरोबर रमून जावं असा मुलगा, दोन होंडा गाड्या, एक सुंदर घर माझ्याकडे आहे. आणखी काय हवं?
खान अॅकॅडमीचं भविष्यातील ध्येय्य काय आहे?
सलमान खानः माझी खान अॅकॅडमी हे जगातील पहिलं मोफत शिक्षण देणारं वर्ल्ड क्लास व्हर्च्युअल  स्कुल व्हावं हे माझं स्वप्न आहे. म्हणजे अशी शाळा की जिथे जगातील कोणालाही उत्तम दर्जाचं शिक्षण मोफत मिळेल. माझं ध्येय्य म्हणाल तर मरेपर्यंत असे शिक्षणासाठीचे व्हिडिओ तयार करत रहावं हे माझं ध्येय्य आहे. मी पुढली किमान 50-60 वर्षे तरी मरणार नाही असा माझा अंदाज आहे. इयत्ता पहिली ते बारावी साठीच्या प्रत्येक शाळकरी विषयावरचा व्हिडिओ मला तयार करायचा आहे. 
सलमानची ही मूळ प्रश्नोत्तरे इंग्रजीत वाचायची असतील तर ह्या दुव्यावर जरूर जा. 
तर असा हा सलमान खान. भविष्यातलं जग तरूणांचं आहे, म्हणजे नेमकं काय आहे हे तुमच्या मित्रमैत्रिणींना समजवायचं असेल तर, त्यांना असाही एक सलमान खान चे भाग एक ते तीन वाचायला सांगा. पुढे आणखी कोणताही प्रश्न शिल्लक राहणार नाही. 
  • (वाचकहो, आपल्याला सलमान खानच्या ह्या प्रयोगाबद्दल काय वाटले ते ह्या लेखाखालील कॉमेंटसच्या जागेचा उपयोग करून जरूर कळवा. कॉमेंटसविना कोणताही ब्लॉग हा पाण्याविना झा़डानं सुकावं तसा सुकत असतो. कॉमेंटसचे खत-पाणी संगणक डॉट इन्फो ला हवं आहे. - माधव शिरवळकर)

३ मार्च, २०११

असाही एक सलमान खान - भाग 2

('असाही एक सलमानखान' एकूण तीन भागात आहे. हा भाग दुसरा आहे. आपण हे तिन्ही भाग क्रमाने वाचावे अशी विनंती आहे. पहिला भाग ह्या दुव्यावर उपलब्ध आहे.)

अगदी डावीकडे सलमान खान, आणि सोबत त्याचे सहकारी. अगदी उजवीकडे असलेला शंतनु, त्याने एम.आय.टी. मधून चार पदव्या घेतल्या आहेत. 
सलमान खानचा विवाह 2004 साली झाला. लग्नाच्या निमित्ताने सलमान खानच्या काकांचे कुटुंब त्याच्याकडे आले होते. थोडी उसंत मिळताच काकूने सलमान खानकडे आपल्या मुलीच्या - नादियाच्या - अभ्यासाचा विषय काढला. नादिया सातवीत शिकत होती. बाकी विषयात ती ठीक होती. पण गणितात विशेषतः Unit Conversion चा जो भाग होता त्यात ती कच्ची होती. त्यामुळे तिचे गुण कमी होत. सलमान खानच्या काकूला तिच्या मुलीच्या गणित विषयाची वाटणारी काळजी तिने चिंतातूरपणे बोलून दाखवली. आपल्या छोट्या चुलत बहिणीसाठी काहीतरी करावं असं सलमानला वाटलं, आणि तो नादियाला शिकवू लागला. नादिया काही दिवसांसाठीच त्याच्याकडे आली होती. ती परत गेल्यावर सलमान तिला कसा शिकवणार हा प्रश्न होता. सलमानने तो सोडवला इंटरनेटच्या मदतीने.
सलमानने गणिताचा एक एक छोटा धडा तयार केला. त्या धड्याचा व्हिडिओ तयार करून तो युट्युबवर टाकायचा आणि नादियाने त्यावरून अभ्यास करायचा असं सुरू झालं. हा व्हिडिओ तयार करण्यासाठी सलमानला कॅमेरा लागत नसे. केवळ आपल्या काँप्युटरचा उपयोग करून तो व्हिडिओ तयार करीत असे. नादियाला जे समजावून सांगायचं ते तो आपल्या संगणकाच्या स्क्रीनवर करून दाखवी. ही संगणकावरची जी कृती असे त्याचे व्हिडिओ रेकॉर्डींग कॅमटासिया स्टुडिओ नावाचे एक सॉफ्टवेअर करीत असे. समजावून सांगताना दुसरीकडे सलमानचा आवाजही रेकॉर्ड होई. एक पद्धतशीर ट्युटोरियल त्यातून तयार होई. कॅमेरा वापरात नसल्याने सलमानचा चेहेरा त्यात येत नसे पण विषय समजण्यासाठी सलमानचा चेहेरा दिसण्याची गरज कुठे होती?
हे व्हिडिओ पाहून नादियाचं गणित खूपच सुधारलं. तिचं यश पाहून तिच्या काही मैत्रिणी, इतर नातेवाईकही पुढे आले. सलमानला हे शिक्षणाचं कार्य भावलं. बघता बघता व्हिडिओ ट्युटोरियल्सची संख्या वाढू लागली. आज इंटरनेटमुळे ही संख्या 3000 व्हिडिओंच्या घरात गेली आहे. सलमानला आपलं उच्च शिक्षण ह्या कामी खूप उपयोगी पडलं. त्याचे विषय पहाः अंकगणित, बीजगणित, भूमिती, कॅलक्युलस, स्टॅटीस्टीक्स, अर्थशास्त्र, जीवशास्त्र, बँकींग, रसायनशास्त्र, खगोलशास्त्र, इतिहास, आय.आय.टी. जेईई परिक्षेची तयारी, पदार्थविज्ञान वगैरे. आता हे सारे विषय शाळा-कॉलेजच्या अभ्यासाचे. विद्यार्थी आणि पालकांना ते हवेहवेसे वाटले नाहीत तरच नवल.
तुम्हालाही सलमानचे हे व्हिडिओ पाहता येतील. विद्यार्थ्यांना ते नक्कीच उपयुक्त वाटतील. ते पूर्णपणे मोफतही आहेत. आपल्याकडे मोफत म्हंटलं की त्यांना थोडं कमी लेखलं जातं. सलमानने एका ट्युटोरियलला काही हजार लावले असते तर त्याला ते अशक्य नव्हतं. पण अमेरिकेत बिल गेटस सारख्या माणसानं आपल्या मुलांना शिकवण्यासाठी सलमानचे हे व्हिडिओ नियमितपणे वापरायचं ठरवलं आहे. मोफत म्हणून अर्थातच नाही, तर प्रचंड उपयोगी म्हणून..
सलमान खानचा हा सारा शैक्षणिक खजिना त्याच्या www.khanacademy.org वर मोफत उपलब्ध आहे. त्याची अनेक वैशिष्ट्ये आहेत. आज हिंदीसह अनेक भाषांमध्ये हे व्हिडिओ खान अकॅडमीने उपलब्ध केले आहेत. त्या भाषा कोणत्या? त्यात मराठी आहे का?  सलमान खान आपल्या अनुभवाबद्दल काय म्हणतो. त्याचे पुढले बेत काय आहेत? हा महत्त्वाचा तपशील पाहू - असाही एक सलमान खान (भाग 3 ) मध्ये...

असाही एक सलमान खान...भाग 1


तुम्ही गुगल ईमेज सर्च वर इंग्रजीत सलमान खान असं सर्च केलत तर 0.18 सेकंदात (म्हणजे पाव सेकंदापेक्षाही कमी वेळात) एकूण 32 लाख 80 हजार फोटो उपलब्ध होतात. पण तो दबंगफेम अभिनेता सलमान खान. हा लेख त्या सलमान खान बद्दल नाही. मग ह्या लेखातला कोण हा सलमान?
हा सलमान खान आहे 32 वर्षांचा एक अमेरिकन तरूण. त्याची आई कलकत्त्याची, आणि वडील बांगला देशीय. दोघेही अमेरिकेत स्थलांतरीत झालेले. सलमान खान हार्वर्ड विद्यापीठाचा एम.बी.ए. शिवाय, गणित, इलेक्ट्रीकल इंजिनियरिंग, काँप्युटर सायन्स ह्या विषयाचा पदवीधर (B.S.) म्हणजे तीन डिग्र्या. पुढे, अमेरिकेतील प्रतिष्ठित MIT (Massachusetts Institute of Technology) मधून त्याने इलेक्ट्रीकल इंजिनियरिंग आणि काँप्युटर सायन्स मधील मास्टर्स डिग्रीही (M.S.) घेतलेली. खरं तर एखाद्या मोठ्या कंपनीचा सीईओ म्हणून नेमला जाण्यासाठी अतिशय लायक व्यक्ती. 
तसा सलमानखान चांगल्या नोकरीत होताही. करियरचा भला मोठा हायवे त्याला मोकळा होता. एक छंद किंवा आवड म्हणून फावल्या वेळात सलमान त्याच्या नात्यातल्या शाळकरी मुलांना गणित वगैरे शिकवायचा. शिक्षण हा त्याच्या व्यक्तिमत्तवाचा भाग कधीच नव्हता.  पण वयाच्या 29 व्या वर्षी म्हणजे सप्टेंबर 2009 मध्ये त्याने आपली लठ्ठ पगाराची नोकरी सोडली. त्याने अचानक शिक्षणाला वाहून घ्यायचं ठरवलं. 'हातचं सोडून पळत्याच्या मागे' ही मराठीतली म्हण त्याला बरोबर लागू होत होती. 
सप्टेंबर 2009 ते आता फेब्रुवारी 2011 हा काळ जेमतेम दीड वर्षांचा. अगदी अलिकडचा. ह्या काळात पळत्याच्या मागे धावून सलमानने काय मिळवलं?
सप्टेंबर  2010 मध्ये गुगल कंपनीने सलमानला 2 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 9 कोटी रूपये) देणगी म्हणून दिले. मायक्रोसॉफ्टचे मालक बिल गेटस सलमानला "धिस अमेझिंग गाय" असं म्हणतात. त्यांच्या गेटस फाऊंडेशननेही सलमानला असेच मोठ्या रक्कमेचे (किती ते कळलेले नाही) पारितोषिक दिले आहे. पण ह्या सर्वांवर कडी म्हणजे बिल गेटस यांनी आपल्या मुलीला शिक्षणासाठी सलमानच्या शाळेत प्रवेश घेऊन दिला आहे. 
हे सारं काय प्रकरण आहे?
वाचू, असाही एक सलमान खान...भाग 2 मध्ये...

२१ फेब्रु, २०११

महाविद्यालय आणि मास कम्युनिकेशन

महाराष्ट्रातलं महाविद्यालय म्हंटलं की एक विशिष्ट चित्रफीत डोळ्यासमोरून सरकते. अगदी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारापासून ते आतल्या आवारानंतर कॉरीडॉर आणि वर्गांपर्यंत एक निश्चित सरासरी दृश्य आपण नकळत गृहित धरतो. महाविद्यालयाचा परिसर, वास्तू आणि वातावरण हा महाविद्यालयीन जीवनातल्या अनेक घटकांपैकी एक घटक झाला. मात्र सामाजिक घटकांमध्ये व्यवस्थापनातील पदाधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि त्यांचे पालक हे ओघाने येतात. ह्या सार्‍या सामाजिक घटकांचं क्षणिक प्रतिबिंब दोन ठिकाणी आवर्जुन दिसतं. एक महाविद्यालयाची वेबसाईट आणि दुसरं म्हणजे वर्षातून एकदा प्रकाशित होणारा स्मरणिकासदृश व बहुभाषिक निवेदन तसंच तत्सम साहित्याने नटलेला साधारणतः शंभर पानांचा छापिल अंक. आजकाल महाविद्यालयाची वेबसाईट ही युजीसीची देखील एक मागणी असते. खेरीज नॅकची वरची श्रेणी कायम राखण्यासाठी किंवा उंचावण्यासाठी तर ती नितांत आवश्यक असते. त्यामुळे सामान्यतः अगदी तुरळक अपवाद वगळता बहुसंख्य महाविद्यालयांचे स्वतंत्र व अधिकृत संकेतस्थळ आजकाल वेबवर दिसते.

वर उल्लेख केल्याप्रमाणे वार्षिक अंक व सतत स्थिर असलेले वेबवरील संकेतस्थळ हे दोन खांब महाविद्यालयाच्या संपूर्ण मास कम्युनिकेशनची गरज भागवण्याचा प्रयत्न करीत असतात. याला जोड असते महाविद्यालयाच्या भिंतीवर सर्वत्र दिसणार्‍या सूचनाफलकांची.. त्यावर मुख्यत्वे विद्यार्थीवर्गासाठी तात्कालिक माहिती देणार्‍या सुचनांचा नियमित ओघ चालू असतो. मास कम्युनिकेशन प्रक्रियेतील आपली माफक भूमिका त्या सुचना तशा समाधानकारकपणे बजावत असतात. महाविद्यालयीन अध्यापनाचे वेळापत्रक एवढे बांधीव असते की वर्षभरात वर उल्लेखलेले सर्वच सामाजिक घटक आपल्या शैक्षणिक उद्योगात गर्क असतात. त्यांचं गर्क असणं हे स्वाभाविकही असतं आणि खरं तर आवश्यकही असतं. मात्र ह्या एकूण वास्तवात महाविद्यालयाच्या मास कम्युनिकेशची गरज (खरं तर तहान) ही पूर्णपणे भागत नाही. एक अनामिक बॅकलॉग किंवा उणीव त्यात राहून जात असते. अर्थात त्याची सवय वर्षोनुवर्षे झाल्याने त्यात काही वावगं असं जाणवतही नाही.

मास कम्युनिकेशन आणि बजेट यांचं नातंही विचारात घेतल्यावाचून सुटका नसते. अगदी चार पानांचं छापिल नियतकालिक नियमित काढायचं म्हंटलं तरी त्यात अडचणी असतात. त्या अडचणी रास्तही असतात. बजेटचं सोंग आणणं शक्य नसतं. दुसरीकडे चार पानं नियमित काढायची म्हणजे व्यापही असतोच. त्यासाठी कोण किती वेळ देऊ शकेल हा प्रश्नच असतो. छापिल माध्यमाखेरीज इतर माध्यमं महाविद्यालयाच्या दिमतीला नसतात. जे अधिकृत स्थिर संकेतस्थळ असतं त्यात वेळोवेळी किरकोळ बदल वा भर घालणं व ते शक्य तेवढं ताजं ठेवणं हे आव्हान कुणीतरी एकीकडे पेलत असतं. त्यामुळे त्यात आणखी भर घालून नवं काही सदर सुरू करणं ही कल्पना रूजण्यासारखी नसते.

हे वातावरण एकीकडे असताना दुसरीकडे विद्यार्थी (जवळजवळ प्रत्येक विद्यार्थी व विद्यार्थिनी) आपल्या २४ तासांपैकी काही तास किंवा बर्‍यापैकी वेळ दररोज आणि नियमितपणे ऑर्कुट सारख्या सोशलनेटवर्कींग
संकेतस्थळाला अतिशय आवडीने देत असतात. फेसबुक, माय स्पेस, ट्विटर, वर्डप्रेस सारख्या साईटसवर देखील विद्यार्थ्यांची चांगली गर्दी असते. अनेकजण आपले स्वतःचे ब्लॉग्ज लिहीत असतात. काही जण ते स्वतःची रोजनिशी असावी अशा प्रकारे ब्लॉगवरचं आपलं लिखाण स्वतःपुरतंच ठेवत असतात. विद्यार्थ्यांमधली ही संगणक सक्रियता ढोबळ मानाने एकूण विद्यार्थ्यांच्या ७० टक्क्यांहून कमी नसते. अगदी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये ती यापेक्षा कमी दिसली तरी त्यांना त्याबद्दल कमालीचं औत्सुक्य असतं. अशा वातावरणात कॉलेजचा अधिकृत ब्लॉग प्रस्थापित होणं आणि त्यातून मास कम्युनिकेशनची तूट अर्थात डेफिसिट भरता येणं सहज शक्य आहे. ईमेलप्रमाणेच ब्लॉग्ज इंटरनेटवर मोफत आहेत हे आता सर्वांनाच माहीत आहे. ब्लॉग्जवर सर्व भाषांतील लिखाण शक्य आहे. रंगीत छायाचित्रेच केवळ नव्हेत तर आता व्हिडिओ क्लीप्स देखील ब्लॉग्जवर सहज शक्य आहेत. यात बजेटचा प्रश्न नाही. ह्या माध्यमाची आवड आणि तंत्रज्ञान विद्यार्थ्यांमध्ये मूळातच रूजलेलं आहे. कोणीही घरून वा सायबर कॅफेतून त्या संदर्भातलं काम कुठेही व कधीही करू शकतो, आणि त्यावर प्रसिद्ध झालेलं लिखाण, छायाचित्रे, व्हिडिओज कोणीही केव्हाही कुठेही पाहू वा वाचू शकतो. यात बजेट वा तत्सम अन्य अडचणी येण्याची शक्यता जवळ जवळ नसतेच. खेरीज परिक्षा वा तत्सम दिवसांमध्ये ब्लॉगवर फारसं काही येणार नाही, व त्यावेळी फारसं कोणी वाचणारही नाही याची कल्पना सर्वांना असते.

ब्लॉगचं माध्यम असं अनेक प्रकारे महाविद्यालयाला मास कम्युनिकेशनचं टूल म्हणून वापरता येणं सहज शक्य आहे. आजकाल अनेक विद्यार्थी इंटरनेटवरील फोरमवर किंवा ऑर्कुटसारख्या कम्युनिटीजवर मॉडरेटर किंवा सुपर मॉडरेटर म्हणून काम करीत असतात. कॉलेजच्या ब्लॉगवर अशा पद्धतीने विविध विद्यार्थ्यांचच मॉडरेशन असल्यावर त्यात गैरप्रकार होण्याची शक्यता जवळजवळ शुन्य आहे. वार्षिक अंकात पानांची संख्या मर्यादित असते. मात्र ब्लॉगवर कोणतीही मर्यादा नसल्याने सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे साहित्य त्यावर जाऊ शकते. उत्तम साहित्यासाठी वार्षिक किंवा अगदी तिमाही वा सहामाही पारितोषिके देणेही अशक्य नाही. हा ब्लॉग महाविद्यालयाचा अधिकृत असल्याने तसेच विद्यार्थी व त्याचे पालक तो फार मोठ्या प्रमाणावर पाहणार असल्याने एकूण वाचकांची संख्या फारच मोठी असणार यात शंका नाही. अशा ब्लॉगला जाहिराती वा देणग्या मिळणं देखील अशक्य नाही. म्हणजेच महाविद्यालयावर कोणताही बोजा न पडता त्याची मास कम्युनिकेशनची गरज पूर्णपणे भागविण्याची क्षमता ह्या माध्यमात आहे.

खरं तर शासन दरवर्षी ज्याप्रमाणे सर्वोत्कृष्ट पुस्तकांना पारितोषिके देते त्याप्रमाणे शासनातर्फे सर्वोत्कृष्ट महाविद्यालयीन ब्लॉग्जना पारितोषिके दिली जायला हवीत. त्यात काहीच अशक्य नाही. तसे झाल्यास सर्जनशील विद्यार्थ्यांच्या साहित्यासाठी ते एक फार मोठे व्यासपीठ ठरेल. मात्र यासाठी प्राचार्यांनी पहिले पाऊल टाकून सर्व संबंधितांना साद देणे ही पहिली गरज आहे. ते पाऊल ही केवळ त्या त्या महाविद्यालयाची नाही तर आजच्या काळाची गरज आहे.

महाविद्यालय पातळीवरील ' युनिकोड '

पाणी ही जीवनावश्यक गोष्ट आहे तशी संगणक ही शिक्षणावश्यक गोष्ट आहे. शाळेत, महाविद्यालयात किंवा कोणत्याही शैक्षणिक संस्थेत ग्रंथालयाइतकेच तेथील संगणक आवश्यक बनले आहेत. संगणक म्हंटला की तो एकटा येत नाही. इंटरनेटच्या हातात हात घालूनच आजकाल तो येतो. संगणकाबरोबर इंटरनेटही आता अधिकाधिक जीवनावश्यक होते आहे. आताशा विद्यार्थ्यांची संगणकाशी गाठ पडते ती अगदी कोवळ्या वयात. इयत्ता तिसरी वा चौथीचा विद्यार्थीही आपलं ओर्कुट अकाऊंट किंवा इमेल पत्ता उघडून बसलेला दिसतो. पुढे दहावी-बारावी होताना तो संगणकाला पूर्ण सरावलेला असतो. तो त्याच्या आयुष्याचा भाग बनून गेलेला असतो. काही कारणाने एखादा दिवस जर इंटरनेट कनेक्शन नसले तर तो कासावीस होतो. आपल्याला लिहायचं असावं आणि आपलं पेन सापडत नसेल तर जी अस्वस्थता असते त्यापेक्षा ती अस्वस्थता वेगळी नसते. पेनाइतकंच संगणक आणि इंटरनेट हे विद्यार्थ्याचं अतिशय महत्त्वाचं असं शैक्षणिक अवजार आहे.

एका बाजूला संगणक आणि इंटरनेट शिक्षणावश्यक बनत असताना दुसर्‍या बाजूला 'युनिकोड' तंत्राची चर्चा सतत कानावर पडते आहे. ' हे तंत्र आपल्या मराठी, हिंदी वगैरे भारतीय लिप्यांशी संबंधित आहे, आणि त्याची आवश्यकता व वापर अतिशय महत्त्वाचा आहे' एवढा संदेश महाराष्ट्राच्या शैक्षणिक जगतात आज बर्‍यापैकी पसरलेला आहे. हा संदेश कानावर पडलेला असला तरी त्या संदर्भात नेमकी कृती काय करायला हवी, त्या संदर्भातले तंत्र आणि ज्ञान यांचा नेमका अवलंब आपल्या संगणकीय जीवनात कसा करावा याची माहिती नसलेली मंडळी आज शेकड्याने दिसतात. नुकताच एका महाविद्यालयात जाण्याचा योग आला. तेथील प्राचार्यांच्या चेंबरमध्ये बसलेलो असताना त्यांचा पत्रव्यवहार पाहणारा सहकारी तिथे आला. प्राचार्यांकडे पहात त्या सहकार्‍याने मला विचारलं की "आम्हाला तुम्ही पाठवलेल्या मराठी ईमेल मिळाल्या. त्या वाचता आल्या. पण आम्ही मराठी ईमेल पाठवल्या की पलिकडल्याला त्या वाचता येत नाहीत. असं का होतं?”

प्रश्न साधा आणि नेहमीचा होता. त्याचं उत्तर अर्थातच 'युनिकोड' तंत्रात दडलेलं होतं. मी त्या सहकार्‍याला विचारलं की "तुम्ही मराठी फाँट कोणते वापरता?” तो म्हणाला "आम्ही पुर्वी एपीएस आणि आकृती फाँट वापरायचो. पण आता 'युनिकोड' वापरतो. तरी असं का होतं?”

त्या प्रश्नाचं उत्तरही सरळ होतं. ईमेल पाठवताना ती UTF-8 एनकोडींगने पाठवायला हवी होती. तसं न केल्याने, म्हणजे फाँट 'युनिकोड' चा आणि एनकोडींग इंग्रजीसाठीचं असल्याने ती समस्या येत होती. त्या सहकार्‍याला 'युनिकोड' माहीत होतं, पण UTF-8 म्हणजे '8 Bit Unicode Transformation Format' ची माहिती नव्हती. ही माहिती घेण्यासाठी फक्त जिज्ञासेची गरज आहे. कोणतंही विशेष संगणकीय ज्ञान त्यासाठी लागत नाही. पण प्राचार्यांचा सहकारी 'युनिकोड' चा पहिला थर ओलांडून पुढे गेलेला नसल्याने त्याला UTF-8 माहीत नव्हते. परिणामी त्याची मराठी ईमेल पलिकडल्याला नीट दिसत नव्हती. मराठी भाषेतून संपर्क साधताना अडचण येत होती. त्या अडचणीवर उपाय शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्या सहकार्‍याने निश्चितच केला असावा. पण इंटरनेटवर मोठी मुशाफिरी केल्यानंतरही त्याला निश्चित उपाय मिळालेला नव्हता. मराठी ईमेलसाठी प्राचार्य आपल्या सहकार्‍यावरच मुख्यत्वे अवलंबून होते. 'मराठीत जात नसेल तर इंग्रजीतून ईमेल पाठव' ही परवानगी देऊन प्राचार्यांनी तात्पुरती ती समस्या बाजूस सारली होती. मराठी संपर्काची जागा इंग्रजी संपर्काला घ्यावी लागली याचं कारण मराठी 'युनिकोड' तंत्राचा पद्धतशीर प्रसार महाराष्ट्रात अद्यापि सुरू झालेला नाही. ग्रामीण भागात, तालुक्यांमध्ये आणि खरं तर मागास जिल्ह्यामध्येही संगणक पोहोचले आहेत हे खरे आहे. पण संगणक वापरणारी मंडळी इंग्रजीपेक्षा मराठीशी अधिक जवळीक असलेली आहेत. त्यांना इंग्रजी भाषेतून संपर्क अवघड वाटतो. मराठीतून ते कितीतरी अधिक चांगल्या प्रकारे संपर्क साधू शकतात. पत्रव्यवहार करू शकतात. पण त्यांना संगणकावर मराठी वापरणं अतिशय कटकटीचं वाटतं. इंग्रजीची स्पेलींग्ज आणि व्याकरण अवघड आणि दुसरीकडे संगणकावर मराठी टायपिंग अवघड. अशा स्थितीत ते शेवटी आपल्या बेताच्या इंग्रजीचा आधार घेतात, आणि मराठी बाजूस सारून इंग्रजीतून वेळ मारून नेतात. 'युनिकोड' तंत्राने खरं तर मराठी टायपिंगची आणि संगणकावरच्या मराठीची समस्या चांगल्या प्रकारे सोडवली आहे. पण आपल्याकडे 'युनिकोड' च्या वापराचे ज्ञान देणारी ज्ञानपोई सहजपणे उपलब्ध नाही. तहान आहे पण पिण्याचे स्वच्छ पाणी देणारी पाणपोई नसेल तर वाटसरूची जी अवस्था होईल तशी 'युनिकोड' तंत्राची आजची अवस्था आहे.

'युनिकोड' ची ज्ञानपोई उपलब्ध करणं ही फार मोठी किंवा फार अवघड अशी बाबच नाही. साधारणतः तासा-दोन तासात हे सारं आवश्यक ज्ञान संगणक वापरणारा कोणीही विद्यार्थी वा व्यक्ती आत्मसात करू शकते. त्यापेक्षा अधिक वेळ देण्याची खरंच गरज नाही. बरं, दोन तासात एकदा हे ज्ञान घेतलं की त्याचा उपयोग आपल्याला आयुष्यभरासाठी होतो. इंटरनेटवर जगातील अनेकांनी ह्या संदर्भातील सचित्र ट्युटोरियल्स उपलब्ध केली आहेत. त्यातील काही मराठीत देखील आहेत. पण स्क्रीनवर वाचून ते ज्ञान आत्मसात करणं अनेकांना जमत नाही हे मात्र खरं. आपल्या महाविद्यालयाच्या पातळीवर सर्वप्रथम प्राचार्यांनी 'युनिकोड' तंत्राची माहिती घेण्याची आवश्यकता आहे. प्राचार्यांना किंवा प्राध्यापकांना मराठी टायपिंग करण्याची गरज कधी लागत नाही, हे खरं आहे. पण गुगलमध्ये एखादा मराठी संदर्भ शोधायची वेळ आली तर केवळ तेवढ्यासाठी त्यांना सहकार्‍याला बोलवावं लागू नये, हेही तेवढच खरं आहे. मराठी टायपिंगसाठी Transliteration ची पद्धत उपलब्ध आहे. tatwadnyan असं इंग्रजीत टाईप केलं की मराठीत 'तत्त्वज्ञान' हा शब्द आपोआप टाईप होऊ शकतो अशी ती सोय आहे. रात्री किंवा वेळी अवेळी आपल्या संगणकावर अभ्यास वा संशोधनाचे काम करण्याची वेळ प्राध्यापकांवर नेहमीच येते. त्यावेळी तेथे सहकारी उपलब्ध नसतो. मराठी शब्द टाईप करून संदर्भ तर तातडीने शोधायचा असतो. अशा वेळी 'युनिकोड' चे ज्ञान उपयोगी पडते. टायपिंगचा स्पीड असण्याची गरज नाही. मराठी टायपिंग येण्याचीही आवश्यकता नाही. दोन तासात घेता येणारे 'युनिकोड' संबंधीचे आवश्यक ज्ञान घेतलेले असले की आपण संगणकावरच्या मराठी टायपिंगसाठी स्वावलंबी झालेलो असतो. एखादी खाजगी वा गोपनीय मराठी ईमेल पाठवायची तर ती आपली आपण पाठवू शकतो. त्यासाठी सहकार्‍याला पाचारण करून गोपनीयता घालवण्याची आवश्यकता नसते.

आपल्या महाविद्यालयातील प्राध्यापक मंडळींपर्यंत 'युनिकोड' चे हे पुरेसे ज्ञान पोहोचलेले आहे काय याची खात्री सर्व प्राचार्यांनी करून घ्यायला हवी असं मला वाटतं. जर ते ज्ञान पुरेसे पोहोचलेले असेल तर उत्तमच, पण काही कारणाने तसे नसेल तर मात्र त्यांचेसाठी दोन तासांचे 'युनिकोड' प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यासाठी प्राचार्यांनी पुढाकार घ्यायला हवा. ती एक राष्ट्रीय गरज आहे यात शंका नाही. भारतातील हिंदी, मराठी, गुजराती, कानडी, तेलुगू, मल्याळी, तामिळ, बंगाली, गुरूमुखी (पंजाबी), उडिया ह्या भाषांच्या संगणकीय टायपिंगची समस्या सोडवणं, आणि त्यासाठी उत्तम प्रमाणिकरणाचं काम करण्याचं काम जागतिक स्तरावरील 'युनिकोड' कन्सोर्शियमने केलं आहे. हा कन्सोर्शियम म्हणजे 'ना नफा' तत्त्वावर चालणारी संस्था आहे. त्याची अतिशय सविस्तर माहिती माझ्या 'युनिकोड' तंत्र आणि मंत्र ह्या मराठी पुस्तकात आली आहे. जिज्ञासूंनी ती पहावी असा सल्ला आत्मस्तुतीचा दोष पत्करून मला ह्या लेखात द्यावासा वाटतो. ते दोन तासांचे ज्ञान त्या पुस्तकाच्या २०० पानांत देण्याचा प्रयत्न मी केला आहे. असो. महाराष्ट्रात 'युनिकोड' मराठी रूजणं आज संपर्कासाठी अत्यंत आवश्यक आहे. काही चळवळी रस्त्यावरच्या असतात, पण 'युनिकोड' सारखी चळवळ त्यासाठीच्या ज्ञानपोया ठिकठिकाणी उघडून करण्याची आहे. प्राचार्यांना त्यासाठी फार मोलाचे योगदान देता येईल. ह्या संदर्भात व्यक्तिशः माझी मदत लागल्यास त्या देण्याची माझी तयारी आहे. त्याचा उपयोग प्राचार्यांना झाल्यास मला आनंद वाटेल. संपर्कासाठी माझा ईमेल पत्ता ms@pujasoft.net असा आहे. धन्यवाद.

२० फेब्रु, २०११

व्हिडिओंनी बनलेला ज्ञानकोश



वाचायला बुवा कंटाळा येतो. त्यात आणखी काँप्युटरच्या स्क्रीनवर वाचायचं म्हणजे तर बघायलाच नको. डोळ्याला त्रास वगैरे होतो. घरात पीसी किंवा लॅपटॉप वगैरे आलेला असतो. हौसेने इंटरनेटची व्यवस्थाही झालेली असते. ब्रॉडबँडच्या प्रसारामुळे इंटरनेटचा स्पीडही चांगला मिळत असतो. म्हणजे थोडक्यात सगळं असतं. पण वाचायला कंटाळा येत असतो. म्हणजे ज्ञान नको असतं असं नाही. ज्ञान, मीन्स नॉलेज, तर हवंच. त्याचं महत्व चांगलच कळत असतं. ज्ञानपिपासू वृत्तीही असते.वाचनातून ज्ञान मिळतं याबद्दल दुमत वगैरे नसतच. वाचन हवं हे कळत असतं पण वळत नसतं. जी मंडळी ह्या अशा काहीशा पेचातून चालली असतील (आणि एवढं असूनही सौजन्यपूर्वक हा लेख वाचायची तसदी घेत असतील) अशांसाठी इंटरनेटवरची एक वंडरफूल सोय सांगतो. इंटरनेटवरची सोय म्हणजे अर्थातच कुठली तरी साईट असणार हे तुम्ही एव्हाना ओळखलेलं आहे. तुमचा अंदाज बरोबर आहे. मी एका वेब साईटबद्दलच सांगतो आहे. त्या साईटचं नाव आहे - 'वंडर हाऊ टू डॉट कॉम'.

लक्षात घ्या की साईटच्या नावातच 'हाऊ टू' आहे. म्हणजे एखादी गोष्ट कशी करावी याचं ज्ञान देणारी ही वेब साईट आहे. पण साईटच्या नावात नुसतं 'हाऊ टू' नाही,तर त्या बरोबर 'वंडर' पण आहे. म्हणजे आश्चर्यकारकपणे शिकवणारी ही वेब साईट आहे. आता तुम्ही विचाराल की हा काय फंडा आहे? तर, त्याचं साधं सोपं उत्तर म्हणजे तुम्हाला काहीही वाचायला न लावता प्रत्यक्ष 'आंखो देखा हाल' पद्धतीने शिकवण्याची व्यवस्था ह्या साईटवर आहे. आता एवढी प्रस्तावना झाल्यानंतरही लक्षात न येण्याइतका तुमचा आयक्यू साधासुधा नाही हे सरळ आहे. तुमच्या लक्षात आलेली गोष्ट बरोबर आहे. ह्या साईटने 'हाऊ टू' हा प्रकार व्हिडीओच्या माध्यमातून तुम्हाला देऊ केला आहे. मुख्य म्हणजे तो मोफत आहे.

उदाहरणार्थ पहा - गणितातले अपूर्णांक तुम्हाला शिकता येतील ते ह्या साईटवरचा व्हिडीओ पाहून. किंवा आणखी इंटरेस्टींग सांगायचं तर डोकेदुखी घालवण्यासाठी मालीश कसं करायचं हे प्रत्यक्ष व्हिडीओ क्लीपमध्ये दिसलं तर वाचण्यापेक्षा सोपं आणि पक्क यात शंका नाही. ह्या खेरीज कॉंप्युटरशी संबंधित म्हणाल तर तुमच्या किबोर्डवरची विंडोज की कशी वापरायची किंवा विंडोज एक्सपी मध्ये एका कॉंप्युटरवर दोन मॉनिटर्स कसे लावायचे वगैरे. अशा प्रकारच्या विविध विषयावरच्या ९०,००० (नव्वद हजार फक्त) व्हिडिओ क्लीप्स http://www.wonderhowto.com/ वर आहेत.

महिलांसाठीचे विषय

इंटरनेटवरचं मल्टीमिडीयाचं तंत्र हा ह्या साईटचा आत्मा आहे. आपल्याला शिकायची ती गोष्ट किंवा ते तंत्र चित्रपट माध्यमातून प्रत्यक्ष दिसणं ही बाब वाचनातून शिकण्यापेक्षा अधिक प्रभावी आहे. उदाहरणार्थ ह्या साईटवरचे खास महिलांसाठीचे हे काही मुख्य विषय पहाः १) सौंदर्य कला २) घर आणि बगीचा ३) अन्नपदार्थ अर्थात स्वयंपाकघरातील टीप्स ४) कौटुंबिक आणि व्यक्तीगत बाबी वगैरे.

तुम्ही ब्युटी किंवा सौंदर्य कलेच्या विषयात शिरलात तर तेथे अनेक म्हणजे एकूण ८४८ उपयुक्त व्हिडीओज तुम्हाला दिसतील. त्यातले उदाहरणादाखल हे काही पहाः कोरड्या त्वचेची काळजी कशी घ्यावी, कुरळ्या केसांची हाताळणी कशी करावी, कोरड्या ओठांसाठी काय करावे, परफेक्ट पोनी टेल कशी बांधावी, स्वतःचा स्वतःच फेस मसाज कसा करावा, लिपस्टीक जास्त टिकण्यासाठी काय करावे असे एक ना अनेक विषय त्यात आहेत. प्रत्यक्ष दिसत असल्याने ते समजण्यात वा शिकण्यात काहीही अडचण येत नाही.

आता दुसरा विषय घर आणि बगीचा हा घ्या. यात एकूण ३२८५ व्हिडीओ क्लीप्स आहेत. हा विषय इतर अनेक उपविषयांमध्ये विभागला आहे. त्यातले काही उपविषय पहा - स्वच्छता टापटीप, इंटिरियर डेकोरेशन, बागकाम, फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक साधने वगैरे. यात इनडोअर गार्डन कसे करावे, तुमच्या एलसीडी स्क्रीनवर किंवा सीडीवर किंवा प्लास्टीकवर कुठेही चरे आले असतील तर ते काढण्यासाठी साधे अंडे कसे वापरता येते, टॉवेल्सची घडी उत्तम प्रकारे कशी घालावी, उत्तम फर्निचर कसं ओळखावं वगैरे अक्षरशः शेकड्यांनी टीप्स आणि ट्रीक्स शिकवणारी तंत्रे आपल्याला प्रत्यक्ष पहायला मिळतात.

पुढला विषय अन्नपदार्थ आणि स्वयंपाकघराचा. यात एकूण ५०७० व्हिडीओ आहेत. यामध्ये एकूण २३ उपविषय आहेत. त्यात भाजणं (बेकींग) पासून ते अंड्यापर्यंत आणि चिकन पासून ते मांसापर्यंत विभागणी आहे. अंडी ह्या एका उपविषयावर १३० तर भाज्यांवर ५७६ व्हिडीओ आपण पाहू शकतो. एग करी असो की एग भुर्जी असो, उकडलेलं अंडं असो की आम्लेट असो ते कुणी ना कुणी प्रत्यक्ष केलं आहे, ते करतानाचं छान शुटींग केलं आहे, आणि ती व्हिडीओ क्लीप आपल्याला इंटरनेटवर मोफत दिली आहे. भाज्या आणि अंडी वगळता वेगवेगळ्या प्रकारची सॉसेस, मसाले, पिझा, पास्ता, फळं, ज्युसेस, फिश, सुप्स वगैरे रेलचेल ह्या प्रकारात दिसून येते.

कौटुंबिक विषयातही ही साईट मागे नाही. एकूण ७१७ व्हिडीओज तिथे आहेत. त्यात नुकत्याच जन्मलेल्या बाळाच्या काळजीपासून ते ज्येष्ठ नागरिकांच्या शुश्रुषेपर्यंत अनेक गोष्टी आहेत. बाळंतपणापासून ते पालकत्वापर्यंतचे अनेक मुद्दे स्वतंत्र चित्रफितींतून आले आहेत.

वर मी फक्त महिलांशी संबंधित विषयांची झलक दिली आहे. पण महिलांबरोबरच पुरूषांसाठीही ते सारखेच महत्वाचे आहेत. स्वयंपाकघर आणि सौंदर्य हे आणि तत्सम विषय आता दोघांसाठीही सारखेच महत्वाचे आहेत.

इतर अनेक विषय

ह्या साईटवर सॉफ्टवेअर विषयक २६३२ व्हिडीओ आहेत. एमएस ऑफिस पासून ते फोटोशॉपपर्यंत आणि फ्लॅशपासून ते फाईलमेकर पर्यंत अनेकांची हाताळणी त्यात झालेली आहे. केवळ हार्डवेअर व तत्सम विषयक ८७० व्हिडीओंचा संग्रह इथे पहायला मिळतो. त्याखेरीज इलेक्ट्रॉनिक विषयाला वाहिलेल्या वेगळ्या ७३१ क्लीप्सही त्यात आहेत. यातील अनेक व्हिडीओ क्लीप्स विद्यार्थ्यांसाठीही खूप उपयुक्त आहेत.

डाएट आणि आरोग्य ह्या विषयावरील ११७०, नृत्यविषयक ४५१, विविध कलाविषयक ११०३, एक हजारांहून अधिक जादूचे प्रयोग, पाळीव प्राणी विषयक ६४२ वगैरे विषयांची यादी खरच न संपणारी आहे. ही साईट सापडल्यानंतर पुढले कितीतरी आठवडे यातले अनेक दर्जेदार व्हिडीओ पाहण्यात मी घालवले. इथे ९०००० व्हिडीओ आहेत असा ह्या साईटचा दावा आहे. तो खरा असेलही किंवा नसेलही. पण एक मात्र नक्की की विविध विषयांवरच्या उपयुक्त अशा व्हिडीओ क्लीप्सचा खजिना तिथे आहे. तुम्हाला यांतून एखादा विशिष्ट विषय शोधायचा असेल तर 'सर्च' ची सोय त्यात आहे. पण त्याही पलिकडे एकूण ५०० व्हिडीओ ह्या साईटने टॉप म्हणून निवडूनही दिले आहेत. त्यावर नजर टाकली तरी आपले डोळे दिपून जातात.

ही साईट अमेरिकन ढंगाची आहे. तेथील संस्कृतीचे प्रतिबिंब त्यात पुरेपूर पडलेले दिसते यात शंकाच नाही. म्हणूनच डिशवॉशर कसे वापरावेत, कसे मेंटेन करावेत वगैरे आपल्याला कदाचित अपरिचित वाटणारे व्हिडीओ त्यात दिसतात. मात्र आपल्याला उपयुक्त अशा शेकडो क्लीप्स त्यात असल्यानेच ह्या साईटला 'एंटर' मध्ये स्थान दिले.

कुठून येतात हे व्हिडीओ?

हा प्रश्न आपल्यापुढे येणं हे स्वाभाविक आहे. हे सारं प्रचंड काम कुणा एका माणसाचं खचितच नाही. खरं तर हे सारं हजारो माणसांचं मिळून झालेलं श्रमदान आहे.तुम्हीही त्यात सामील होऊ शकता. इंटरनेटवर मुशाफिरी करताना उद्या तुम्हाला एखादा हाऊ टू प्रकारातला व्हिडीओ दिसला (आणि तो मोफत असला) तर तुम्हीही तो ह्या साईटवर सबमिट करू शकता. मात्र तुम्ही कोणताही व्हिडीओ सबमिट करून चालणार नाही. तो हाऊ टू ह्या प्रकारातला असणं आवश्यक आहे.

जसजसे आपण ह्या वेबसाईटच्या अंतरंगात घुसत जातो तसतशी ही वेबसाईट एखाद्या ज्ञानकोशासारखी भासू लागते. हा ज्ञानकोश अनेक चित्रफित निर्मात्यांनी मिळून तयार केलेला आहे. अशा प्रकारचे काम हे इंटरनेटच्या माध्यमातूनच होऊ शकते. हे माध्यम अशा साईटस तयार करून वापरण्यासाठीचा प्रचंड आवाका इंग्रजीप्रमाणे आता मराठीसाठीही खुला आहे. आपण त्याचा लाभ कसा घेतो यावरच मराठीचे इंटरनेटवरील भवितव्य काय असेल हे ठरेल.

बीबीसी ची इंग्रजी शिकण्यासाठीची उत्तम साईट




आपण इंग्रजी ऐकतो, बोलतोही, निदान प्रयत्न करण्याची इच्छा आतून नक्कीच असते.
इंग्रजी सुधारलं पाहिजे ही आपली गरज निश्चितच असते.
अशा स्थितीत आपल्या सर्वांच्या मोफत आणि उत्तम मदतीला येते बीबीसीची इंग्रजी शिकविणारी वेबसाईट.

तिचा पत्ता आहेः

. साईटचा हा एवढा मोठा पत्ता लक्षात ठेवायला अवघड जात असेल तर त्यासाठी एक युक्ती आहे. तीन शब्द फक्त लक्षात ठेवा - बीबीसी, लर्निंग आणि इंग्लीश हे ते तीन शब्द. म्हणजेच - www.bbclearningenglish.com ही साईट फक्त लक्षात ठेवलीत तरी चालेल.

बीबीसीची ही सेवा संपूर्ण जगासाठी आहे. पण भारतातल्या आपल्या सारख्यांना, अगदी विशेषतः आपणा मराठी जनांसाठी तर ती खूपच उपयुक्त आहे.

व्याकरण, उच्चार आणि शब्दसंपत्तीवर खास पण सोपा फोकस

ह्या वेबसाईटवर ऑडिओ, व्हिडिओ आणि ताज्या बातम्यांचा वाचनीय मजकूर अशा तिन्ही माध्यमांचा इंग्रजी शिकण्याच्या दृष्टीने अप्रतिम उपयोग केला आहे.तुमच्यापुढे एक एक ताजी बातमी वाचण्यासाठी दिसते. त्या बातमीच्या मजकूरात जे इंग्रजी शब्द असतात त्यांचे नेमके अर्थ, त्यांचे उच्चार वेगळे काढून समजावून दिलेले असतात. बातमी संपूर्ण वाचून दाखविली जाते. त्यामुळे उच्चार कसे असावेत हे आपल्या लक्षात येतं. बातमीचा संदर्भ लक्षात असल्याने आपल्याला अर्थ आणि उच्चार दोन्ही आपोआपच लक्षात राहण्यासाठी मदत होते. हे सगळं आपण संगणकावर बसून कोणतीही वही किंवा पुस्तक न घेता शिकतो. व्याकरणाचा एक स्वतंत्र विभाग ह्या साईटवर आहे. पण तो विभाग नेहमीच्या पुस्तकात जसा कंटाळवाणा वाटतो, तसं इथे होत नाही. ताजी बातमी वाचल्याने आपल्या ज्ञानातही एकीकडे भर पडत असते. थोडक्यात इंग्रजीत व्हॅल्यू फॉर मनी म्हंटलं जातं तसं इथे व्हॅल्यू फॉर अवर टाईम असं नक्कीच म्हणता येईल.

इंग्रजीची कोडी आणि शब्दकोडी - मनोरंजनातून इंग्रजी

यातली कोडी सोपी आहेत. योग्य त्या उत्तरावर क्लीक करा. नंतर उत्तर बरोबर की चुकलं ते पहाण्याची सोय आहे तिथे पहा. उत्तर बरोबर असेल तर हिरव्या रंगात स्पष्टीकरण दिसेल. चुकलं तर ती चूक लाल रंगात दिसली तरी ती समजावून दिली जाईल. यामुळे जे चुकलं तेच समजावलं जातं. याचा खूपच उपयोग होतो.शब्दकोडी नेहमीच्या आपल्या शब्दकोड्यांसारखीच असतात. पण शब्द मिळत नसेल तर एखाद-दुसर्‍या अक्षराचा क्लू देण्याची सोय असल्याने आपण त्यात रमतो,आणि मनोरंजन होत होत इंग्रजी शिकतो.

सिक्स मिनीट इंग्लीश नावाचे सदर

ह्यात सहा मिनिटांची एक चर्चा आपल्याला ऐकायला मिळते. चर्चेत अर्थात शिकायलाही मिळतं. उदाहरणार्थ मोबाईल फोन ह्या विषयावरची चर्चा घ्या. चर्चा सुरू होण्यापूर्वी आपल्याला एक प्रश्न वाचायला मिळतो. ब्रिटनमध्ये (आणि भारतात सुद्धा) मोबाईल फोन असं म्हंटलं जातं. तर कॅनडा आणि अमेरिकेत त्याला वेगळे नाव सर्रास दिले जाते. ते नेमके कोणते. तीन पर्याय आहेतः एक सेल फोन. दुसरा सेल्युलर फोन. तिसरा सी फोन. आता ह्या तीन पर्यायातलं नेमकं उत्तर कोणतं, तर ते आपल्याला सहा मिनिटांची चर्चा ऐकताना त्या चर्चेतच मिळेल. ही चर्चा करणारेही वेगवेगळ्या देशांतील इंग्रजी शिकणारेच असतात. स्त्री पुरूष दोघेही. त्यांचे बरोबर एक शिक्षक असतो. तो त्यांना समजावून सांगत असतो. चर्चा चालू असते. विद्यार्थी चुकतात. शिक्षक त्यांची चूक सुधारून सांगतो. म्हणजे ही चर्चा कानावर पडता पडता आपण एकीकडे उच्चार पक्के करतो. दुसरीकडे त्या सहा मिनिटांत काही नवंही शिकतो. ही चर्चा साऊंड फाईल म्हणून किंवा वाचायला पीडीएफ फाईल म्हणून डाऊनलोडही करता येते. किंवा डाऊनलोड न करता थेट वेबसाईटवरच स्ट्रीमिंग ऑडिओ म्हणून लगेच ऐकताही येते.

शिक्षकांसाठीही लेसन प्लान्स

विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकविण्यासाठी वेगवेगळे लेसन प्लॅन्सही ह्या साईटवर उपलब्ध करण्यांत आले आहेत. त्या बरोबर लागणारं ऑडिओ-व्हिज्युअल साहित्यही त्या सोबत देण्यांत आलं आहे. बीबीसीसारख्या संस्थेने ते उपलब्ध केलेले असल्याने त्यांचा किमान दर्जा हा विशिष्ट उंचीचा असणार हे गृहित धरता येतं. शाळा किंवा सेवाभावी संस्थांतील शिक्षकांना हे लेसन प्लॅन्स निश्चितच उपयोगी पडतील.

आजही इंटरनेटवर उत्तम दर्जाचं आणि विश्वासार्ह शैक्षणिक साहित्य मोफत उपलब्ध आहे का, अशा प्रश्नाला होकारार्थी उत्तर देता येतं ते ह्या अशा वेबसाईटच्या अस्तित्वामुळेच.

MIT (USA) चे विविध विषयांवरचे मोफत कोर्सेस

http://ocw.mit.edu/index.html

अमेरिकेतील सुप्रसिद्ध Massachusetts Institute of Technology ची Open Courseware ची विद्यार्थीवर्गासाठी अतिशय उपयुक्त अशी साईट. किती विषयांवरचे मोफत कोर्सेस (आणि त्या संदर्भातील नोटस, लेसन्स वगैरे) इथे उपलब्ध आहेत पहाः

Aeronautics and Astronautics
Anthropology
Architecture
Athletics, Physical Education and Recreation
Biological Engineering
Biology
Brain and Cognitive Sciences
Chemical Engineering
Chemistry
Civil and Environmental Engineering
Comparative Media Studies
Earth, Atmospheric, and Planetary Sciences
Economics
Electrical Engineering and Computer Science
Engineering Systems Division
Experimental Study Group
Foreign Languages and Literatures
Health Sciences and Technology
History
Linguistics and Philosophy
Literature
Materials Science and Engineering
Mathematics
Mechanical Engineering
Media Arts and Sciences
Music and Theater Arts
Nuclear Science and Engineering
Physics
Political Science
Science, Technology, and Society
Sloan School of Management
Special Programs
Urban Studies and Planning
Women's Studies
Writing and Humanistic Studies

मला वाटतं एवढी प्रस्तावना ह्या साईटची महती कळायला पुरेशी आहे.

नवोदित वेब डिझायनर्स साठी विशेष उपयुक्त साईट

http://www.webdesignfromscratch.com/
वेब डिझायनर्ससाठी कायम संदर्भाची साईट. तसेच ज्यांना वेब डिझायनिंग अगदी पहिल्यापासून शिकायचं आहे त्यांच्यासाठीही ही उत्तम सोय आहे. Web 2.0 सह खूपच महत्वाची आणि अद्यावत माहिती देणारी ही साईट अतिशय विश्वासार्ह मानली जाते.
 

शेकडो उपयुक्त ट्युटोरियल्स, प्रॅक्टीकल्स, व्हिडिओ सहित..

http://www.instructables.com/

स्वतःचे केस कसे कापावेत पासून ते आपल्या LCD मॉनिटरचा उपयोग टीव्ही सेट म्हणून कसा करावा इथपर्यंत अक्षरशः शेकडो कृतींचा ज्ञानकोश म्हणजे ही साईट. प्रत्यक्ष पाहणं ही एक कृती आपण केली की ही साईट आपल्यापुढे घरगुती कृतींपासून ते कॉंप्युटर टेक्नॉलॉजीपर्यंत सारं काही 'प्रॅक्टीकली' पेश करते.