इंटरनेट लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
इंटरनेट लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

१० मार्च, २०१२

हॅटस ऑफ टू क्रेग सिल्व्हरस्टीन!

क्रेग सिल्व्हरस्टीन.. गुगलमध्ये त्याचं पद फार मोठं होतं. 'डायरेक्टर, टेक्नॉलॉजी'. 1998 ते फेब्रुवारी 2012 हा सुमारे 14 वर्षांचा प्रदीर्घ काळ त्याने गुगलमध्ये काढला.  ताजी बातमी म्हणजे 10 फेब्रुवारी 2012 पासून त्याने गुगल कंपनी सोडली. राजीनामा देऊन तो बाहेर पडला...

२२ फेब्रु, २०१२

बिलंदर डॉटकॉमची थरारक कहाणी (भाग-5)

स्वतःच्या कार्टुनबरोबर कीम डॉटकॉम..
 कीमचं आयुष्य हे आता फक्त एक हॅकर म्हणून उरलेलं नव्हतं. हेराफेरी करणारा एक बीझनेसमन म्हणूनही त्याची ख्याती हळूहळू पसरू लागलेली होती. ह्या ख्यातीत तो स्वतःही भर घालत असे. 2001 मध्ये इंग्लंडमधल्या ‘गार्डियन’ ह्या सुप्रसिद्ध दैनिकाला मुलाखत देताना त्याने सांगितले की सिटीबँकेच्या सिस्टममध्ये घुसखोरी करून त्याने 20 दशलक्ष डॉलर्स काढून ते ग्रीनपीस ह्या सामाजिक संस्थेच्या बँक अकाउंटमध्ये जमा केले.

१३ फेब्रु, २०१२

बिलंदर डॉटकॉमची थरारक कहाणी (भाग-4)

कीम श्मिट म्हणजे फार मोठा गुंतवणूकदार अशी प्रतिमा आयती तयार होतीच. कीमनी letsbuyit.com मध्ये 3,75,000 युरोची गुंतवणूक केली. त्याच्या घोषणा मिडियात आल्या. कीमने मग मुलाखती दिल्या. “ही कंपनी मोठा धंदा आणि मोठा नफा मिळवणार असल्याचं” निवेदन कीमने पत्रकारांपुढे केलं. पुढे असंही सांगितलं की लवकरच तो आणखी 5 कोटी युरो letsbuyit.com मध्ये गुंतवणार आहे. बापरे, 5 कोटी युरो? म्हणजे 327 कोटी रूपये? काही जणांच्या मते ही घोषणा केली तेव्हा कीमच्या खिशात म्हणे दहा युरो सुद्धा नव्हते..

६ फेब्रु, २०१२

बिलंदर डॉटकॉमची थरारक कहाणी (भाग-3)

फेब्रुवारी 2012 चा पहिला आठवडा संपत आला तरी
 अजून जामिन नाही. 
 टेलीफोन लाईन आणि मॉडेमच्या सहाय्याने शहरातल्या इतर काँप्युटर्सशी संपर्क साधण्याचा झपाटा मग सुरू झाला. हॅकर बनण्याची बीजं त्यात होती. टेलीफोन कंपन्यांच्या संगणकात बिले कमी करण्यासाठी शिरायचं तर त्यांची सॉफ्टवेअर सुरक्षा तोडावी लागे. कीम त्याच पद्धतीने दुसऱ्या संगणकांमध्ये व नेटवर्क्समध्ये शिरू लागला. आता हॅकर म्हणूनही तो पक्का तयार झाला होता. हॅकींगसाठी त्याने टोपणनावही घेतलं – किंबल.  

३० जाने, २०१२

बिलंदर डॉटकॉमची थरारक कहाणी (भाग-2)

 आपण पाहिलं की कीम डॉटकॉम ह्या हॅकरच्या न्युझीलंडमधील हवेलीवर दोन हेलीकॉप्टर्स उतरली आणि त्यातून एकूण 76 पोलीस कमांडो उड्या टाकत त्याला पकडण्यासाठी सरसावले. हवेलीचे इलेक्ट्रॉनिक लॉकचे दरवाजे तोडत पोलीस आत शिरले. पोलीसांना हवेलीच्या आतला भाग हा एक भुलभुलैय्याच वाटला. बंद होणारे इलेक्ट्रॉनिक दरवाजे आणि एका आत एक भपकेबाज दालनं.
पोलीस कमांडो हातातल्या मशिनगन्स सरकवत एक एक दालन काबीज करीत होते. तर, आत कीम डॉटकॉम इकडून तिकडे सरकत होता. सहजासहजी हातात येत नव्हता. कुटुंबिय, स्टाफ, त्याचे पाहुणे आणि मित्र पोलीसांच्या ताब्यात आले होते. पण कीम डॉटकॉम दृष्टीपथात येत नव्हता.

बिलंदर डॉटकॉमची थरारक कहाणी (भाग-1)

2012 चा पहिला जानेवारी महिना नुकताच संपला. पण, ह्या वर्षातील सर्वांत वेधक घटनांपैकी एक ह्या महिन्यांत घडली आहे. ही ताजी बातमी आहे गेल्या शनिवारची म्हणजे 21 जानेवारी 2012 ची.
21 जानेवारी, वेळ सकाळी साडेसहा पावणेसातची. स्थळ न्युझीलंडमधला ऑकलंड हा अत्यंत निसर्गरम्य परिसर. ऑकलंडमध्ये डिसेंबर ते फेब्रुवारी हा उन्हाळ्याचा काळ. पण तापमान असतं जास्तीत जास्त 23 डिग्री सेल्सियस. म्हणजे उन्हाळा नव्हेच, सुखद हिवाळाच बारा महिने. अशा वातावरणात एखादा हिल स्टेशनसारखा हिरवागार परिसर डोळ्यासमोर आणा. ऑकलंड तसं आहे. अशा ऑकलंडमध्ये संपूर्ण न्युझीलंड देशातली सर्वांत आलिशान अशी हवेली आहे. राजवाड्यालाही लाजवील अशी. माणसांचा राहण्याचा कारपेट एरियाच 25,000 चौरस फुटांचा. आजूबाजूला सुंदर, विस्तीर्ण, हिरवं-पोपटी लॉन, त्यावर अनेक कारंजी, सर्वत्र सुंदर वनराई. असा एकूण सुमारे 26 लाख स्क्वेअर फुटांचा (म्हणजे 60 एकरांचा) ऐसपैस परिसर. अशा त्या हवेलीचे

१२ जून, २०११

भारतात आजही 11.5% युजर्स इंटरनेट एक्स्प्लोअरर 6 वापरतात..

मायक्रोसॉफ्टचा इंटरनेट एक्स्प्लोअरर 6.0 हा ब्राऊझर ऑगस्ट 2001 मध्ये आला.  त्याला आता जवळ जवळ 10 वर्षे झाली. आजमितीस इंटरनेट एक्स्प्लोअररची 9.0 ही आवृत्ती ताजी आहे. 2001 मध्ये 6.0 ही आवृत्ती आल्यानंतर पुढे 2006 मध्ये 7.0, 2009 मध्ये 8.0, मार्च 2011 मध्ये 9.0 आणि

१६ मार्च, २०११

एक झकास पुस्तक, गुगलकडून सर्वांसाठी...

मंडळी, हा लेख जरा काळजीपूर्वक वाचा. चटकन नजर फिरवून निघालात तर हातात काही पडणार नाही. पण नीट वाचत शेवटपर्यंत गेलात तर आयुष्यभरासाठी बरंच काही हातात आल्यासारखं वाटेल. रिअली, आय अॅम सिरीयस.
असं बघा की जेवायचं ताटात, आणि इंटरनेट पहायचं ब्राऊझरमध्ये. बरोबर? कोणी इंटरनेट एक्स्प्लोअरर मध्ये पाहील, कोणी फायरफॉक्स पसंत करील, कोणी क्रोम चांगलं आहे म्हणेल. ताटं वेगवेगळी पण इंटरनेट तेच. आता कल्पना करा की ताटाला संवेदना आहे. ताटाला चव कळते आहे. अशा बऱ्याच गोष्टी त्याला कळताहेत. तर ताट त्याच्यात वाढलेल्या पदार्थांबद्दल सर्वांत जास्त सांगू शकेल. आता अधिक जास्ती प्रस्तावना न करता मी थेट विषयाकडे येतो.

१४ मार्च, २०११

जपानमधील भीषण दृश्ये, गुगलने टिपलेली. अंगावर शहारे आणणारी..

जपानला कधी मानवी संहाराने हादरवले, तर कधी निसर्गाने त्याचा लावलेला संसार विस्कटून टाकला. देशालाही नशीबाचे फेरे चुकत नाहीत हेच खरं.
आपण वृत्तपत्रात बातम्या वाचतो, रंगीत फोटोही पाहतो. टीव्हीवरचे वृत्तांतही कधी आपल्या रिमोटच्या लहरीतून पाहता आले तर तेही पाहतो. पण सामान्यतः घरात पेपर आणि टीव्ही असूनही खरी स्थिती आपल्याला माहीत नसते.
गुगलने जपानला पाठवलेल्या मदतीच्या बातम्या तुम्ही वाचल्या असतील. पण गुगलने आपल्या उपग्रहाच्या माध्यमातून टिपलेला विध्वंसापूर्वीचा जपान

१२ मार्च, २०११

इंटरनेटने श्रीमंत केलेल्या व्यक्ती

संदर्भः फोर्बस मासिकातील श्रीमंतांची यादी.
ह्या सर्व कर्तृत्ववान व्यक्ती व त्यांच्या कामाचा तपशील तसेच त्यांच्या आयुष्यातील चढउताराच्या रोमांचक कथा लवकरच संगणक डॉट इन्फो वर क्रमशः वाचा. मराठीत हा तपशील प्रथमच येणार आहे. 

१० मार्च, २०११

मायक्रोसॉफ्टही घाईत...14 मार्चला इंटरनेट एक्स्प्लोअरर 9 येतोय..


पण थांबा, तुमच्या संगणकावर WINDOWS XP असेल तर तुम्हाला नवा कोरा इंटरनेट एक्स्प्लोअरर 9 लावता येणार नाही. कारण तो WINDOWS XP सपोर्ट करीत नाही.
तुम्हाला त्यासाठी WINDOWS VISTA अथवा WINDOWS 7 तुमच्या संगणकावर लावावं लागेल.
नवे IE9 हे  HTML 5 ने युक्त आहे. शिवाय नवे जावास्क्रीप्ट इंजिन (JSCRIPT) ची साथ त्याला असणार आहे. ह्या इंजिनचे नाव आहे CHAKRA.
गेल्या महिन्यात 10 फेब्रुवारी रोजी मायक्रोसॉफ्टने IE9 चा रिलीज कँडिडेट इंटरनेटवर सादर केला होता. आता 15 मार्चला येतेय ती अंतिम आवृत्ती, तुमच्या आमच्या सर्वांसाठी.
पण, आता विंडोज 7 कडे गेल्याशिवाय गत्यंतर नाही. कारण IE9 आणि HTML5 चा लाभ घ्यायचा असेल तर दुसरा मार्ग नाही. FACEBOOK, TWITTER वापरत असाल, YOU TUBE चे फॅन असाल तरी तुम्हाला लवकरच WINDOWS 7 चा आधार घ्यावा लागणार आहे.

फायरफॉक्स 4 आला...डाऊनलोडींगसाठी उपलब्ध झाला..

शेवटी वाट पहात असलेला फायरफॉक्स 4 आला. कालच 9 मार्च रोजी तो डाऊनलोडींगसाठी उपलब्ध झाला आहे. ज्यांना डाऊनलोड करायचा आहे त्यांनी ह्या दुव्यावर जावे. Firefox 4 RC मधल्या RC चा अर्थ आहे Release Candidate. ही आवृत्ती मुख्यत्वे जगभरच्या प्रोग्रामर्ससाठी आहे. त्यांनी चाचणी घेऊन सुचना कराव्यात अशी मोझीला कॉर्पोरेशन (फायरफॉक्सचे निर्माते) यांची अपेक्षा आहे. पण आपण प्रोग्रामर नसलो म्हणून काय झालं. आपल्याला हा रिलीज कँडिडेट वापरण्याचा हक्क आहे.
ह्या नव्या व्हर्जनची वैशिष्ट्ये ह्या दुव्यावर उपलब्ध आहेत.
फायरफॉक्स 4 मध्ये खूप सुधारणा (huge performance enhancements हे फायरफॉक्सचे दाव्यातले शब्द आहेत) केल्या आहेत असं मोझीलाचं म्हणणं आहे. HTML 5 ने ही आवृत्ती युक्त असल्याने इंटरनेटवरील व्हिडिओ उत्तम प्रकारे दिसतील असा त्यांचा आत्मविश्वास आहे.

५ मार्च, २०११

असाही एक सलमान खान - भाग 3

('असाही एक सलमानखान' एकूण तीन भागात आहे. हा भाग तिसरा आहे. आपण हे तिन्ही भाग क्रमाने वाचावे अशी विनंती आहे. पहिला भाग ह्या दुव्यावर, आणि दुसरा भाग येथे उपलब्ध आहे.)
आपल्या मुलासह सलमान खान
आज खान अॅकॅडमीचे व्हिडिओवरील सुमारे 2500 अभ्यासपाठ हे इंग्रजीत आहेत. त्यातला आवाज हा सलमान खानचा आहे. सलमानला फक्त इंग्रजीच बोलता येतं. मोडकं तोडकं बंगालीही येतं. पण इतर भाषा त्याला येत नाहीत. यासाठी त्याने खान अॅकॅडमीचा ट्रान्सलेशन प्रोजेक्ट जाहीर केला आहे. त्यामागील कल्पना जगाला भावणारी आहे. जे प्रत्येकी वीस वा पंचवीस मिनिटांचे पाठ सलमानने तयार केले आहेत, त्यातील धडे, व एकूण ढाचा तसाच ठेवून त्याचे भाषांतर इतर भाषांमध्ये करायचे. समजा, बीजगणिताचा एक पाठ आहे. तर आपल्या एखाद्या बीजगणिताच्या शिक्षकाने सलमानच्या ऐवजी बोलायचे, तो पाठ समजावून सांगताना फक्त रेकॉर्ड करायचा. मूळ पाठ तर तयार आहेच. फक्त इंग्रजीऐवजी नवी भाषा त्यात भरायची आहे. हा ट्रान्सलेशन प्रोजेक्ट सलमानने जगापुढे खुला केला आहे.  कोणीही त्यात सहभागी होऊ शकतं. त्याची माहिती ह्या दुव्यावर आहे. मराठीसाठी आपल्यापैकी कोणी ह्या प्रकल्पात सहभागी होत असेल तर त्याची माहिती संगणक डॉट इन्फो ला जरूर कळवा. त्याचा वृत्तांत आपण सर्वांच्या माहितीसाठी जरूर प्रकाशित करू. 
दुसरी गोष्ट सलमानने आपल्या वेबसाईटवर स्वतःशीच एक संवाद साधला आहे. त्याला म्हणताना FAQ म्हंटलं असलं तरी एखादी मुलाखत वाचावी असा तो संवाद आहे. एका मूळ इंग्रजी प्रश्नाचे हे भाषांतर पहाः
तुम्हाला ह्या उपक्रमाचे रूपांतर व्यवसायात करण्याची इच्छा आहे का? समजा एखाद्या व्हेंचर कॅपिटल कंपनीने तुम्हाला तशी ऑफर दिली वगैरे तर...?
सलमान खानः तशा ऑफर्स मला खूप आल्या. पण मलाच ते रूचत नाही. ज्यावेळी मी 80 वर्षांचा होईन, तेव्हा मला हे समाधान मिळालं की जगातील अब्जावधी विद्यार्थ्यांना मी उत्तम दर्जाचं शिक्षण उपलब्ध करून दिलं, तर ते मला अधिक आवडेल. शिक्षणाचा धंदा सुरू करण्यापेक्षा मला ते अधिक महत्त्वाचं वाटतं. जगातला असा वर्ग की जो अगोदरच पुढारलेला आहे, त्याच्याकडून दरमहा 19.99 डॉलर फी घ्यायची, धन कमवायचं, आणि मग शेवटी आपली कंपनी कुठल्या तरी मोठ्या कंपनीला प्रचंड किंमतीला विकून टाकायची यात ते समाधान नाही. मला काय कमी आहे, सुंदर बायको, ज्याच्या बरोबर रमून जावं असा मुलगा, दोन होंडा गाड्या, एक सुंदर घर माझ्याकडे आहे. आणखी काय हवं?
खान अॅकॅडमीचं भविष्यातील ध्येय्य काय आहे?
सलमान खानः माझी खान अॅकॅडमी हे जगातील पहिलं मोफत शिक्षण देणारं वर्ल्ड क्लास व्हर्च्युअल  स्कुल व्हावं हे माझं स्वप्न आहे. म्हणजे अशी शाळा की जिथे जगातील कोणालाही उत्तम दर्जाचं शिक्षण मोफत मिळेल. माझं ध्येय्य म्हणाल तर मरेपर्यंत असे शिक्षणासाठीचे व्हिडिओ तयार करत रहावं हे माझं ध्येय्य आहे. मी पुढली किमान 50-60 वर्षे तरी मरणार नाही असा माझा अंदाज आहे. इयत्ता पहिली ते बारावी साठीच्या प्रत्येक शाळकरी विषयावरचा व्हिडिओ मला तयार करायचा आहे. 
सलमानची ही मूळ प्रश्नोत्तरे इंग्रजीत वाचायची असतील तर ह्या दुव्यावर जरूर जा. 
तर असा हा सलमान खान. भविष्यातलं जग तरूणांचं आहे, म्हणजे नेमकं काय आहे हे तुमच्या मित्रमैत्रिणींना समजवायचं असेल तर, त्यांना असाही एक सलमान खान चे भाग एक ते तीन वाचायला सांगा. पुढे आणखी कोणताही प्रश्न शिल्लक राहणार नाही. 
  • (वाचकहो, आपल्याला सलमान खानच्या ह्या प्रयोगाबद्दल काय वाटले ते ह्या लेखाखालील कॉमेंटसच्या जागेचा उपयोग करून जरूर कळवा. कॉमेंटसविना कोणताही ब्लॉग हा पाण्याविना झा़डानं सुकावं तसा सुकत असतो. कॉमेंटसचे खत-पाणी संगणक डॉट इन्फो ला हवं आहे. - माधव शिरवळकर)

टर्कीत (तुर्कस्थान) ब्लॉगस्पॉट वर बंदी

कथा कुणाची व्यथा कुणा असा प्रकार 2 मार्चला तुर्कस्थानात घडला आहे.
फुटबॉलच्या सामन्यांमुळे ब्लॉगस्पॉट.कॉम वर बंदी आली आहे. झालं असं की तुर्कस्थानात डिजिटर्क नावाची सॅटेलाईट टीव्ही कंपनी आहे. त्यांच्याकडे तेथील स्पॉर टोटो सुपर लीग फुटबॉल सामन्यांच्या वृत्तप्रसारणाचे हक्क होते. पण तुर्कस्थानातील 6,00,000 (अबब..) ब्लॉगर्सपैकी अनेकांनी आपल्या ब्लॉगवर ते वृत्तांत देण्यास सुरूवात केल्याने डिजिटर्क कंपनी अडचणीत आली. परिणामी दाद मागण्यासाठी ते न्यायालयात गेले. न्यायालयाने मग थेट ब्लॉगस्पॉट.कॉम वरच बंदी आणली. त्यामुळे तुर्कस्थानातील सर्वच विषयांवरचे ब्लॉग बंद झाले आहेत. ब्लॉगस्पॉट.कॉम हे गुगलच्या मालकीचे आहे. गुगलच्या प्रवक्त्याने पत्रकारांशी बोलताना अशी बंदी आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
ह्या संदर्भातील BBC ने दिलेली बातमी ह्या दुव्यावर वाचा.

लिबियात इंटरनेट सुविधा बंद

Libya Telecom and Technology चे ltt.ly हे संकेतस्थळ आज 5 मार्च रोजी उपलब्ध नाही.
लिबियाचा हुकूमशहा मुहम्मर गडाफी याच्या विरोधात सुरू झालेले बंड मोडून काढण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून देशातील इंटरनेट यंत्रणा पूर्णपणे ठप्प करण्यांत आल्याच्या बातम्या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांनी दिल्या आहेत. लिबियाला इंटरनेट व टेलिकम्युनिकेशन सेवा पुरविणाऱ्या कंपन्या मुहम्मर गडाफीचा मुलगा महंमद याच्या मालकीच्या आहेत. एकाएकी संपर्क व्यवस्थाच थांबल्याने ईमेल पाठवणे तसेच कोणतीही डेटा ट्रान्सफर करणे ह्या प्रक्रियाच पूर्ण थांबल्या आहेत. 
गेला महिनाभर  लिबियात आंदोलनांनी जोर धरल्यानंतर लिबियातील इंटरनेटचा वापर प्रचंड वाढल्याचे गुगलने प्रसिद्ध केलेल्या आंकडेवारीत दिसून आले होते. लोक फार मोठ्या प्रमाणावर आपल्या डिजिटल कॅमेऱ्यांनी तसेच मोबाईल फोनच्या कॅमेऱ्यांनी आंदोलनाची क्षणचित्रे टिपत होते, व ती युट्युबवर प्रकाशित करीत होते. ह्या कारणाने लिबिया आणि मुहम्मर गडाफी यांच्या विरोधात एक आंतरराष्ट्रीय मत तयार होऊ लागले होते. कदाचित, त्याचा अंदाज आल्यानेच लिबियातील इंटरनेट सेवा पूर्णपणे थांबविण्याचा निर्णय गडाफी कुटुंबाने घेतला असावा असा अंदाज व्यक्त करण्यांत येतो. 

४ मार्च, २०११

डायबेटीसची माहिती देणाऱ्या दोन उत्तम लिंक्स

 निळं वर्तुळः मधुमेहाचं आंतरराष्ट्रीय प्रतीक
डायबेटीस किंवा मधुमेह हा आपल्या आजुबाजूला नेहमीच वावरत असतो. कधी कधी तर तो आपल्याच शरीरात असतो, किंवा आपले प्रियजन त्याच्याशी झगडत असलेले आपण पहात असतो.
आपली अशी कल्पना असते की आपल्याला डायबेटीस म्हणजे काय हे नीट माहित आहे. स्वादुपिंड, इन्शुलिन, शुगर लेव्हल्स, शुगर हाय होणं म्हणजे काय, डायबेटीसने जखम लवकर बरी होत नाही वगैरे ज्ञान वाचून, ऐकून किंवा टीव्हीवर पाहून आपल्याकडे जमा झालेलं असतं. पण ह्या बाबतीत धोक्याची सुचना ही की हे जमा झालेलं ज्ञान अपुरं, अर्धवट किंवा क्वचित गैरसमजावर आधारलेलंही असू शकतं.
डायबेटीस संबंधी, ज्या माहितीवर विसंबून राहता येईल, अशा दोन साईटस (खरं तर पेजलिंक्स) मी नेहमीच संदर्भासाठी वापरत असतो. त्यातली पहिली लिंक म्हणजे - How Diabetis works. ह्या पहिल्या लिंकमध्ये डायबेटीस म्हणजे नेमकं काय हे सांगितलेलं आहे. 300 पानी पुस्तक वाचून जे ज्ञान तुम्हाला मिळेल ते ह्या पाच पानी लेखात सामावलेले आहे. तुम्हा आम्हा सामान्यांना तेवढं ज्ञान पुरेसं असतं.
दुसरी लिंक आहे - How Diabetic Diets Work. ह्यात डायबेटीस संबंधी आहार आणि विहाराची चांगली माहिती आहे. हा लेख छोटा आहे. तो अमेरिकन लेखकाने लिहीलेला असल्याने त्यात आपले आयुर्वेदिक उपचार तसेच योगोपचाराची माहिती त्यात नाही. मात्र, त्यातील मुलभूत माहिती सर्वांनाच खूप उपयुक्त वाटेल.
ह्या दोन लिंक्स आपण जरूर वाचा. डायबेटीस संबंधी एखादा गैरसमज तुमच्या मनात वर्षोनुवर्षे रूजलेला असेल तर तो नक्कीच दूर होईल. 

३ मार्च, २०११

अहो, चिमुकली इसापनीती 100 वर्षांची झाली...

राम गणेश गडकरी यांची एकच प्याला पासून राजसन्यास पर्यंतची नाटके माहित नाहीत असा मराठी माणूस मिळणे नाही. गडकरी ऐन तारूण्यात वयाच्या 34 व्या वर्षी गेले. पण तेवढ्या अल्पायुष्यातही त्यांनी महाराष्ट्रासाठी प्रचंड साहित्य संपदा निर्माण केली.
मंगल देशा ! पवित्र देशा ! महाराष्ट्र देशा ।
प्रणाम घ्यावा माझा हा, श्रीमहाराष्ट्र देशा ॥

हे त्यांचे गीत महाराष्ट्राला आजही स्फुर्ती देत असते..
पण, गडकऱ्यांनी खास लहान मुलांसाठी लिखाण केले, आणि त्याचे एक पुस्तकही प्रकाशित झाले होते ही गोष्ट आज अनेकांना (अगदी मराठीच्या कितीतरी प्राध्यापकांनाही) ठाऊक नाही. ह्या पुस्तकाचे नाव, चिमुकली इसापनीती. गडकऱ्यांनी, परवडत नसतानाही, स्वखर्चाने ती प्रकाशित केली. हे पुस्तक फक्त 10 पानांचे आहे. त्यात इसापच्या जोडाक्षरविरहित लिहीलेल्या दहा गोष्टी आहेत.
ह्या दहा पानी पुस्तकाला गडकऱ्यांनी आवर्जुन प्रस्तावना लिहीली आहे. प्रस्तावनेच्या खाली तारीख आहेः 29/12/1910. म्हणजे 29 डिसेंबर 2010 रोजी चिमुकली इसापनीती ह्या पुस्तकाला 100 वर्षे पुर्ण झाली.
चिमुकली इसापनीतीच्या प्रस्तावनेत गडकरी काय लिहीतात पहाः

"... कोणाच्याही मदतीवाचून मुलांस हे पुस्तक वाचता येईल असा तर्क आहे. साध्या अक्षर ओळखीचा काळ तुलनात्मक दृष्टया थोडाच असल्यामुळे फक्त दहाच गोष्टी घेतल्या आहेत. वाचन सुलभ होण्यासाठी मुद्दाम मोठया टाईपाचा उपयोग केला आहे. चित्रेसुध्दा हवी होती; पण ते पडले जरा खर्चाचे काम. सुदैवाने पुढे मागे या पुस्तकाची दुसरी आवृत्ती निघण्याचा सुयोग आलाच तर पाहता येईल..."

वरील लाल अक्षरांत दिलेले गडकऱ्यांचे 1910 सालचे शब्द नीट वाचा. गडकऱ्यांना चिमुकली इसापनीती मध्ये  चित्रेसुध्दा हवी होती; पण चित्रे देणे त्यावेळी गडकऱ्यांना परवडणारे नव्हते. गडकरी म्हणतात,  ते पडले जरा खर्चाचे काम. सुदैवाने पुढे मागे या पुस्तकाची दुसरी आवृत्ती निघण्याचा सुयोग आलाच तर पाहता येईल.

गडकऱ्यांच्या दुर्दैवाने दुसऱ्या आवृत्तीचा सुयोग कधीच आला नाही. त्यामुळे चिमुकली इसापनीती पुढली 100 वर्षे चित्रांविनाच राहिली. पण गडकऱ्यांचे चित्रांचे ते स्वप्न चिमुकली इसापनीती 100 वर्षांची होता होता पूर्ण झाले. तो दिवस म्हणजे 25 डिसेंबर 2010. ह्या दिवशी ठाणे येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या प्रकाशन कट्ट्यावर प्रा. उषा तांबे यांच्या हस्ते www.ramganeshgadkari.com ह्या संकेतस्थळाचे प्रकाशन झाले. ह्या संकेतस्थळावर गडकऱ्यांचे समग्र साहित्य मोफत उपलब्ध आहे. समग्र साहित्यामध्ये अर्थातच ती  चिमुकली इसापनीतीही उपलब्ध आहे. संकेतस्थळावर चिमुकली इसापनीती प्रकाशित करताना प्रकाशक संगणक प्रकाशन यांनी त्या दहा गोष्टींना रंगीत चित्रांची जोड दिली. महाराष्ट्राच्या शेक्सपियरचे 100 वर्षांपूर्वीचे स्वप्न अशा प्रकारे पूर्ण झाले. मराठी साहित्य संमेलनाच्या प्रकाशन कट्ट्यावर हे स्वप्न पूर्ण झाले ही वृत्तपत्रांसाठी फार मोठी बातमी होती. पण दुर्दैवाने ही बातमी मराठी वृत्तपत्रांनीही दिली नाही. आज संगणक डॉट इन्फो वरून ती बातमी जगापुढे येत आहे.  
दुसरे दुर्दैव म्हणजे 2010 हे वर्ष जसे महाराष्ट्र राज्याचे सुवर्णमहोत्सवी वर्ष होते तसे ते गडकऱ्यांचे 125 वे जयंती वर्षही होते. गडकऱ्यांचा जन्म 24 मे 1885 चा. पण ज्या महाराष्ट्राला गडकऱ्यांनी गीतातून वंदन केले त्याला त्याची आठवण त्या सुवर्ण महोत्सवी वर्षभरात कधीच आली नाही. त्या वर्षात ramganeshgadkari.com इंटरनेटवर आले एवढेच एक समाधान.
ज्यांना चिमुकली इसापनीती आणि ती प्रस्तावना पूर्ण वाचायची आहे त्यांचेसाठी ती ह्या दुव्यावर उपलब्ध आहे. 

असाही एक सलमान खान - भाग 2

('असाही एक सलमानखान' एकूण तीन भागात आहे. हा भाग दुसरा आहे. आपण हे तिन्ही भाग क्रमाने वाचावे अशी विनंती आहे. पहिला भाग ह्या दुव्यावर उपलब्ध आहे.)

अगदी डावीकडे सलमान खान, आणि सोबत त्याचे सहकारी. अगदी उजवीकडे असलेला शंतनु, त्याने एम.आय.टी. मधून चार पदव्या घेतल्या आहेत. 
सलमान खानचा विवाह 2004 साली झाला. लग्नाच्या निमित्ताने सलमान खानच्या काकांचे कुटुंब त्याच्याकडे आले होते. थोडी उसंत मिळताच काकूने सलमान खानकडे आपल्या मुलीच्या - नादियाच्या - अभ्यासाचा विषय काढला. नादिया सातवीत शिकत होती. बाकी विषयात ती ठीक होती. पण गणितात विशेषतः Unit Conversion चा जो भाग होता त्यात ती कच्ची होती. त्यामुळे तिचे गुण कमी होत. सलमान खानच्या काकूला तिच्या मुलीच्या गणित विषयाची वाटणारी काळजी तिने चिंतातूरपणे बोलून दाखवली. आपल्या छोट्या चुलत बहिणीसाठी काहीतरी करावं असं सलमानला वाटलं, आणि तो नादियाला शिकवू लागला. नादिया काही दिवसांसाठीच त्याच्याकडे आली होती. ती परत गेल्यावर सलमान तिला कसा शिकवणार हा प्रश्न होता. सलमानने तो सोडवला इंटरनेटच्या मदतीने.
सलमानने गणिताचा एक एक छोटा धडा तयार केला. त्या धड्याचा व्हिडिओ तयार करून तो युट्युबवर टाकायचा आणि नादियाने त्यावरून अभ्यास करायचा असं सुरू झालं. हा व्हिडिओ तयार करण्यासाठी सलमानला कॅमेरा लागत नसे. केवळ आपल्या काँप्युटरचा उपयोग करून तो व्हिडिओ तयार करीत असे. नादियाला जे समजावून सांगायचं ते तो आपल्या संगणकाच्या स्क्रीनवर करून दाखवी. ही संगणकावरची जी कृती असे त्याचे व्हिडिओ रेकॉर्डींग कॅमटासिया स्टुडिओ नावाचे एक सॉफ्टवेअर करीत असे. समजावून सांगताना दुसरीकडे सलमानचा आवाजही रेकॉर्ड होई. एक पद्धतशीर ट्युटोरियल त्यातून तयार होई. कॅमेरा वापरात नसल्याने सलमानचा चेहेरा त्यात येत नसे पण विषय समजण्यासाठी सलमानचा चेहेरा दिसण्याची गरज कुठे होती?
हे व्हिडिओ पाहून नादियाचं गणित खूपच सुधारलं. तिचं यश पाहून तिच्या काही मैत्रिणी, इतर नातेवाईकही पुढे आले. सलमानला हे शिक्षणाचं कार्य भावलं. बघता बघता व्हिडिओ ट्युटोरियल्सची संख्या वाढू लागली. आज इंटरनेटमुळे ही संख्या 3000 व्हिडिओंच्या घरात गेली आहे. सलमानला आपलं उच्च शिक्षण ह्या कामी खूप उपयोगी पडलं. त्याचे विषय पहाः अंकगणित, बीजगणित, भूमिती, कॅलक्युलस, स्टॅटीस्टीक्स, अर्थशास्त्र, जीवशास्त्र, बँकींग, रसायनशास्त्र, खगोलशास्त्र, इतिहास, आय.आय.टी. जेईई परिक्षेची तयारी, पदार्थविज्ञान वगैरे. आता हे सारे विषय शाळा-कॉलेजच्या अभ्यासाचे. विद्यार्थी आणि पालकांना ते हवेहवेसे वाटले नाहीत तरच नवल.
तुम्हालाही सलमानचे हे व्हिडिओ पाहता येतील. विद्यार्थ्यांना ते नक्कीच उपयुक्त वाटतील. ते पूर्णपणे मोफतही आहेत. आपल्याकडे मोफत म्हंटलं की त्यांना थोडं कमी लेखलं जातं. सलमानने एका ट्युटोरियलला काही हजार लावले असते तर त्याला ते अशक्य नव्हतं. पण अमेरिकेत बिल गेटस सारख्या माणसानं आपल्या मुलांना शिकवण्यासाठी सलमानचे हे व्हिडिओ नियमितपणे वापरायचं ठरवलं आहे. मोफत म्हणून अर्थातच नाही, तर प्रचंड उपयोगी म्हणून..
सलमान खानचा हा सारा शैक्षणिक खजिना त्याच्या www.khanacademy.org वर मोफत उपलब्ध आहे. त्याची अनेक वैशिष्ट्ये आहेत. आज हिंदीसह अनेक भाषांमध्ये हे व्हिडिओ खान अकॅडमीने उपलब्ध केले आहेत. त्या भाषा कोणत्या? त्यात मराठी आहे का?  सलमान खान आपल्या अनुभवाबद्दल काय म्हणतो. त्याचे पुढले बेत काय आहेत? हा महत्त्वाचा तपशील पाहू - असाही एक सलमान खान (भाग 3 ) मध्ये...

मूठभर माणसं, आणि शेतभर कणसं.....


ह्या आकडेवारीची नोंद घेतलीत का? 



मूठभर माणसं जगाला गवसणी घालू शकतात एवढाच त्याचा बोध...

ब्लॉगच्या जगात - अफगाणिस्तान मध्ये...


गेल्या महिन्यातली गोष्ट. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात स्टीव्ह ग्रोव्ह अफगाणिस्तानात गेला होता. गुगलच्या युट्युबतर्फे त्याच्याकडे जी कामगिरी देण्यात आली होती ती थोडी जिकीरीची होती. अफगाणिस्तानात जाऊन तिथलं माध्यमाचं जग, आणि मुख्यत्वे तिथल्या इंटरनेटच्या संबंधातलं वातावरण त्याला अभ्यासायचं होतं. ह्या अभ्यासासाठी गुगलच्या प्रतिनिधींचं एक पथकच अफगाणिस्तानला गेलं होतं. त्यात स्टीव्ह होता.
अफगाणिस्तानातल्या आपल्या काही दिवसांच्या वास्तव्यात, आणि भटकंतीत, त्याला एक अफगाण तरूणी भेटली. तिचं नाव परी अकबर. अफगाणिस्तान सरकारी कार्यालयात परी नोकरी करीत होती. नुकतीच तिला तिची नोकरी गमवावी लागली आहे. त्याचं कारण एकच - परी ब्लॉग लिहीत होती. त्या ब्लॉगचं नाव मिलाद. ह्या वेब पत्त्यावर तुम्ही परीचा ब्लॉग पाहू शकता. तुम्हाला पर्शियन (दैरी) लिपी वाचता येत नसेल तर तो मजकूर तुम्ही वाचू शकणार नाही. पण मजकूराची लांबी तुमच्या डोळ्यात भरल्याशिवाय राहणार नाही. परी अकबर अफगाणिस्तानातल्या स्त्रियांचे प्रश्न आपल्या ब्लॉगमधून सातत्याने मांडत होती. तिच्या ब्लॉगला वाचकवर्गही लाभत होता. जसजशी वाचकसंख्या वाढत गेली तसतसा परीच्या मागे इतर सहकाऱ्यांचा ससेमिरा सुरू झाला. परीला तिचा ब्लॉग थांबवण्यासाठी सतवणं सुरू झालं. पण परी बधली नाही. तिने लिखाण चालूच ठेवलं. ब्लॉगची लोकप्रियता कमी होईना, ती वाढतच राहिली. शेवटी परीला धमक्या येऊ लागल्या. आता आपला जीव धोक्यात आला आहे हे परीनं जाणलं. तिने आपली सरकारी नोकरी सोडली..
परीसारखेच इतरही दहा-बारा ब्लॉगर्स स्टीव्हला अफगाणिस्तानात भेटले. आपण म्हणतो की 2011 मध्ये आता अफगाणिस्तान मुक्त आहे. पण परंपरेतही काही अदृश्य तालिबानी वृत्ती लपलेल्या असतात.
स्टीव्ह ग्रोव्हने ही सारी हकीगत युट्युब च्या अधिकृत ब्लॉगवर दिली आहे. ती ह्या पत्त्यावर तुम्हाला वाचता येईल.
गंमत पहा, की स्टीव्ह आणि गुगल - युट्युबच्या पथकाला अफगाणिस्तान सरकारने अधिकृतपणे आमंत्रण देऊन बोलावलं होतं. आपल्या देशातल्या माध्यम स्थितीचा आढावा ( to examine the content landscape in the region and look for ways to develop and promote more local media in the country) त्या पथकाने घ्यावा अशी अफगाण सरकारची अपेक्षा होती. पण....
मला वाटतं स्टीव्हने लिहीलेली सगळीच हकीगत मी सांगण्यापेक्षा तुम्ही त्याच्याच शब्दात वाचावी...