इतिहासावर दृष्टीक्षेप लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
इतिहासावर दृष्टीक्षेप लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

१२ ऑक्टो, २०११

स्टीव्ह जॉब्स वर एक तासाची डॉक्युमेंटरी 'डिस्कव्हरी चॅनेल' वर पहा..

 "iGenius: How Steve Jobs Changed The World" 
वरील शीर्षकाची  एक तासाची नवी कोरी डॉक्युमेंटरी फिल्म 'डिस्कव्हरी चॅनेल' तर्फे तातडीने तयार करण्यांत आली असून ती येत्या रविवारी म्हणजे 16 ऑक्टोबर 2011 रोजी रात्री 8.00 वाजता पहायला मिळणार आहे. 16 ऑक्टोबर (रविवार) रात्री 8.00 ही वेळ अमेरिकन डिस्कव्हरी चॅनेलची असून ती ह्या डॉक्युमेंटरी फिल्मच्या प्रिमियर शोची मूळ तारीख आणि वेळ आहे. तेथील प्रक्षेपण संपल्यानंतर जगातील एकूण 210 देशांतील डिस्कव्हरी चॅनेल्सवर देखील ती दाखविण्यांत येणार असल्याची माहिती 'डिस्कव्हरी चॅनेल' ने दिली आहे.
अमेरिकेतील 16 ऑक्टोबरची रात्री 8.00 ते 9.00 ही एक तासांची वेळ म्हणजे भारतात 17 ऑक्टोबरच्या भल्या सकाळची 5.30 ते 6.30 ची वेळ. ह्या नंतर डिस्कव्हरी इंडियावर भारतीय वेळेनुसार

७ ऑक्टो, २०११

स्टीव्ह जॉब्सः एक शापित यक्ष

जी अॅपल कंपनी आपण एका गॅरेजमध्ये चालू केली, जिला उभं करण्यासाठी आपण घाम गाळला, जिचे आपण आज चेअरमन आणि सर्वेसर्वा आहोत तीच अॅपल कंपनी आपल्याला पुढल्या दीड पावणेदोन वर्षांत चक्क काढून टाकेल हे मात्र स्टीव्हच्या स्वप्नातही नव्हतं. पण खुद्द स्टीव्हला स्वतःलाच आपल्या आयुष्यातील चढउतार इतके टोकाचे असतील असं बहुधा वाटलं नसावं. पण तसं घडलं...

२० मार्च, २०११

IBM चा शतक महोत्सव, आणि इतिहास

IBM अर्थात International Business Machines यंदा आपला शतक महोत्सव साजरा करीत आहे. यात लक्षात घेण्याजोगी बाब ही की कंपनीला यंदा म्हणजे 2011 साली 100 वर्ष होत असली तरी IBM ह्या नावाला अजून शंभर वर्षे झालेली नाहीत. जून 16, 1911 ह्या तारखेला Computing-Tabulating-Recording Company (C-T-R) स्थापन झाली. ह्या कंपनीने पुढे आपलं नाव बदललं आणि ते International Business Machines (IBM) असं केलं. CTR कंपनीची IBM झाली ती तारीख आहे फेब्रुवारी 14, 1924.
म्हणजे, जून 1911 ते फेब्रुवारी 1924 ही एकूण जवळ जवळ पावणेतेरा वर्षे CTR कंपनीची कारकीर्द आहे. पण जून 1911 ते येता जून 2011 ही IBM कंपनीची सलग 100 वर्षे कंपनीने मानणं हे अगदी योग्य आहे याचे कारण

१३ मार्च, २०११

सन 1955, महिना मार्च, तारीख 13. पं. नेहरूंवर नागपूरमध्ये चाकूहल्ला

आज 13 मार्च 2011. बरोब्बर 65 वर्षांपूर्वी म्हणजे 13 मार्च 1955 रोजी नागपूर शहरात भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आले होते. सोनेगाव विमानतळावरून ते मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री रविशंकर शुक्ल यांच्या घरी निघाले होते. नागपूर तेव्हा मध्य प्रदेशचा भाग होते. तो काळ आजच्या सारखा झेड सिक्युरिटीचा नव्हता. नेहरू उघड्या मोटारीतून नागपूरच्या रस्त्यावरून प्रवास करीत होते. लोकप्रियतेच्या शिखरावर असणाऱ्या जवाहरलाल नेहरूंवर हल्ला होईल असं कोणाच्या स्वप्नातही नव्हतं. पण, अचानक एक 32 वर्षांचा तरूण नेहरूंच्या त्या गाडीच्या दिशेने गेला. त्याच्या हातात चाकू होता.

७ मार्च, २०११

गुगलची वाटचालः क्षणचित्रे १९९८ ते २००३ (भाग पहिला)

गुगलचं सर्च इंजिन १९९८ साली कसं होतं? हे असः

तेव्हा गुगलचा पत्ता होता http://google.stanford.edu/ असा. कारण गुगलचे संस्थापक लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन हे १९९८ साली स्टॅनफोर्ड विद्यापीठात शिकत होते. अर्थात त्यामुळे गुगलचे सर्व हक्क तेव्हा स्टॅनफोर्ड विद्यापीठाकडे होते. मग पुढे काय झालं..
-----------------------------------------------------------------
पुढे Google.com वर ते हललं, असः


-----------------------------------------------------------------
नंतर, १९९९ चा अवतार असा होता.


बीटा व्हर्जन, पण आता कॉपीराईटस गुगल कंपनीकडे आले होते. स्टॅनफोर्ड पर्व मागे पडलं होतं...
-----------------------------------------------------------------
जून २००१ मध्ये पहा काय स्थिती होती..

२००१ साली गुगल तुम्हाला विचारत होतं की पहिल्यांदा गुगलवर आला आहात? आमची ओळख (क्वीक टूर) करून घ्या. पण तेव्हा Images, Groups वगैरे नव्हते. 
-----------------------------------------------------------------
२००२ मध्ये हा फरक झाला...

आता Images, Groups ह्या विभागांची भर पडली होती. एकूण वेब पेजेसची संख्या कशी वाढत चालली होती तो आकडा जरूर पहा. 
-----------------------------------------------------------------
२००३ मध्ये 'न्युज' ची भर पडली..

-----------------------------------------------------------------
२००४ ते २०११ दरम्यान काय काय घडत गेलं.. 
पाहू पुढल्या भागात.

३ मार्च, २०११

राष्ट्रपतींची खास गाडी

आपल्या राष्ट्रपतींचा आलिशान प्रवास. प्रेसिडेन्शियल सलून मधील एक कोपरा. 
राजधानी एक्सप्रेसपासून ते पॅलेस ऑन व्हील्सपर्यंत आणि फ्लाईंग राणीपासून ते डेक्कन क्वीनपर्यंत अनेक रेल्वे गाड्या आपण ऐकल्या आहेत. त्यांना इतिहास वगैरे असू शकतो असं कधी आपल्या मनात आलेलं नसतं. पण एक खास ऐतिहासिक म्हणावी अशी गाडी मात्र आपण फारशी ऐकलेली नाही. ती गाडी म्हणजे 'प्रेसिडेन्शियल सलून' अर्थात फक्त भारताच्या राष्ट्रपतींची आणि फक्त त्यांच्यासाठीच सदैव राखीव असलेली गाडी. ही गाडी फक्त दोन डब्यांची आहे. १९५६ साली बांधण्यात आलेले हे आलिशान डबे नवी दिल्ली स्टेशनात कायम उभे असतात. ह्या दोन डब्यांमध्ये राष्ट्रपतींची बेडरूम, लाँजरूम, व्हिजिटर्स रूम, कॉन्फरन्स रूम असा लवाजमा एकीकडे आहे. दुसरीकडे राष्ट्रपतींचे सचिव व इतर कर्मचारी यांचेसाठी काही केबीन्स आहेत. हे दोन्ही डबे सागाच्या फर्निचरने तसेच रेशमी पडद्यांनी सजवण्यांत आले आहेत. 'प्रेसिडेन्शियल सलून' ची परंपरा फार जुनी आहे. १९ व्या व २० व्या शतकात भारताच्या इंग्रज व्हाईसरॉयने त्याचा उपयोग केला होता. १९२७ पर्यंत इंग्रजांची भारतीय राजधानी कलकत्ता येथे असल्याने हा 'प्रेसिडेन्शियल सलून' कलकत्त्यात उभा असे. १९२७ मध्ये इंग्रजांनी राजधानी दिल्लीत हलवल्यानंतर तो दिल्ली येथे आणण्यात आला. अत्यंत आलिशान अशा ह्या गाडीत पर्शियन गालिचे वगैरे वैभवी सजावट होती. ही गाडी वातानुकूलित नव्हती, पण आत गारवा कायम रहावा यासाठी त्यात खास पद्धतीचे पडदे लावण्यांत आले होते. गाडीत चोवीस तास गरम व थंड पाण्याची सोय करण्यांत आली होती. ही गाडी स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी १९५० साली प्रथमच वापरली. त्यानंतर आलेल्या राष्ट्रपतींनीही त्याचा वापर केला. राष्ट्रपतींची मुदत संपल्यानंतर त्या गाडीतून त्यांना त्यांच्या गावापर्यंत सोडण्याचा एक प्रघात त्यानंतर पडला. ह्या प्रघातानुसार गाडी वापरणारे शेवटचे राष्ट्रपती म्हणजे डॉ. संजीव रेड्डी. त्यांनी १९७७ साली राष्ट्रपती भवनाचा निरोप घेताना ही गाडी वापरली. त्यानंतरच्या काळात सुरक्षेच्या कारणास्तव ही गाडी राष्ट्रपतींनी वापरली नाही. १९७७ ते २००३ ह्या २६ वर्षांच्या काळात ही गाडी नुसती उभी होती. नुसती उभी असली तरी तिची निगा उत्तम प्रकारे सांभाळण्याची पद्धत आहे. आपले मागील राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांनी ही गाडी हरनौत ते पटणा ह्या ६० किलोमीटरच्या प्रवासासाठी वापरली. त्यासाठी ह्या गाडीच्या सजावटीचे खास नूतनीकरण करण्यांत आले होते. त्याचाच एक भाग म्हणून गाडीत प्रगत तंत्रज्ञानाने व उपग्रह यंत्रणेने युक्त अशी आधुनिक संपर्क साधनेही डॉ. कलाम यांच्यासाठी बसविण्यांत आली होती. त्यानंतर मात्र आता गेली सुमारे ५ वर्षे 'प्रेसिडेन्शियल सलून' नवी दिल्लीत शांतपणे उभे आहे. नव्या राष्ट्रपती महाराष्ट्राच्या प्रतिभाताई पाटील ह्या 'प्रेसिडेन्शियल सलून' मध्ये कधी बसतील का हे पहायचं.
(अधिक माहितीसाठी ह्याच ब्लॉगवरील हा दुवा पहा)

२० फेब्रु, २०११

ताजमहालची माहिती देणारी उत्तम साईट

http://www.pbs.org/treasuresoftheworld/taj_mahal/tmain.html
ताजमहालची माहिती देणारी उत्तम साईट. अमेरिकेच्या सुप्रसिद्ध पब्लीक ब्रॉडकास्टींग सर्व्हीसच्या साईटमधील हा एक भाग. माहिती विश्वासार्ह आणि मांडणी उत्तम.ताजमहालच्या सर्व बाजू पुढे आणणारी ही साईट.

जगातल्या वृत्तपत्रांचा इतिहास

http://newspapers.bl.uk/blcs/start.do

हा जगातल्या वृत्तपत्रांचा इतिहास. ही साईट ब्रिटीश लायब्ररीची. म्हणजे विश्वासार्ह. त्यांनी परिश्रमपूर्वक जमवलेल्या ज्ञानातून हा इतिहास मांडला गेला आहे. त्यामुळेत्याला अनन्यसाधारण महत्व आहे.

जुनी सॉफ्टवेअर्स इथे मिळतात...

http://www.oldapps.com/

साईटच्या नावाप्रमाणेच इथे जुने प्रोग्राम्स आहेत. एकूण १८९ प्रोग्राम्सची २२६८ जुन्या आवृत्त्या इथे उपलब्ध आहेत. ह्या साईटचा समावेश इथे अशासाठी केला की ही चाकोरीबाहेरची साईट आहे. काही वेळा विद्यार्थ्यांना वा अभ्यासकांना जुने प्रोग्राम्स लागतात. ते इथे मिळण्याची शक्यता आहे.

लायब्ररी ऑफ काँग्रेस मधील ज्ञान खजिना

http://lcweb2.loc.gov/frd/cs/intoc.html

ब्रिटीशांच्या बाबतीत असं म्हंटलं जातं की ते एकवेळ इंग्लंड देतील पण शेक्सपियर देणार नाहीत. तसं अमेरिकनांच्या बाबतीत आपल्याला असं म्हणता येईल की ते त्यांच्या लायब्ररी ऑफ कॉंग्रेसला कसलाही धक्का लागू देणार नाहीत. जगातील सर्वांत मोठे असलेले हे ग्रंथालय. अमेरिकन सरकार त्याला आपल्या लष्कराइतकच महत्व देते. ह्या ग्रंथालयाची www.loc.gov ही साईट म्हणजे अनेक वेगवेगळ्या विषयांच्या साईटसचं एक पोळंच आहे. इथे मी सुचवत असलेली साईट म्हणजे त्या पोळ्यातला एक छोटासा कप्पा. यात भारताची माहिती एकूण १० प्रकरणांमध्ये दिलेली आहे. अत्यंत विश्वासार्ह, मुद्देसूद आणि परिपूर्ण असं त्या प्रकरणांचं वर्णन करता येईल. खरं तर हा एक उत्तम संदर्भ ग्रंथ आहे. भारताचा इतिहास, यात सुरूवात हडप्पा आर्य संस्कृतीपासून होते आणि पुढे मौर्य, गुप्त, हर्ष होत होत मुघल,मराठा, शीख, ब्रिटीश, १८५७ चं बंड, स्वातंत्र्य संग्राम, स्वतंत्र भारत, नेहरू, इंदिरा गांधी ते राजीव गांधी इथपर्यंत सारं एकत्र वाचायला मिळतं. 


पुढे दुसरं प्रकरण भारताच्या भूगोलाचं आहे. तिसरं धर्मासंबंधी तर चौथं भाषा, प्रदेश आणि वंशाच्या संदर्भातलं आहे. पाचव्यात जाती व ग्रामीण व्यवस्थेसह समाजशास्त्राचा भाग आहे.सहाव्यात अर्थव्यवस्था आहे. त्यात अर्थातच कामगार, आयात निर्यात, सरकारी धोरणं, उद्योग,जागतिकीकरण, खनिजे, पर्यटन, वाहतूक व संपर्क व्यवस्था असं सारं आहे. सातवं प्रकरण शेतीला वाहिलेलं आहे. जमिनी, बियाणं, खतं, हरित क्रांती, जंगलं, मासेमारी, शेतकी कर्जे वगैरेंचा तपशील आहे. आठव्या प्रकरणात सरकार आणि राजकारण आहे. त्यात, देशाची राज्यघटना,लोकसभा, राज्यसभा, सर्वोच्च न्यायालय, राजकीय पक्ष, हिंदू-मुस्लीम तणाव, पत्रकारिता व माध्यमांचे योगदान असे मुद्दे आहेत. नवव्या प्रकरणात, परराष्ट्र धोरण आणि परराष्ट्रांशी असलेले संबंध यांचा उहापोह आहे. दहावे प्रकरण अंतर्गत सुरक्षेला वाहिले आहे. त्यात पाकिस्तान, चीन, पंजाब, काश्मीर वगैरे मुद्दे तपशीलाने आलेले आहेत.

मूळातच अतिशय समृद्ध अशा माहितीचा हा खजिना आहे.

१९४६ सालचा ENIAC संगणक

जगप्रसिद्ध ENIAC संगणक १९४६ च्या फेब्रुवारी महिन्यात तयार झाला. त्याने १००० चौरस फूटांची जागा व्यापली होती. आजच्या नॅनो तंत्रज्ञानाच्या काळात एवढ्या प्रचंड आकाराचा संगणक ऐकल्यावर कुणाला हंसूही येईल. १९४३ ते १९४६ असं सुमारे तीन वर्ष हा संगणक उभारण्याचं आणि बांधण्याचं काम चाललं होतं. एका सेकंदाला ५००० OPERATIONS करण्याची क्षमता ENIAC मध्ये होती. आज हा ५००० चा आकडा ऐकला तरी हंसू फुटतं. पण त्या काळात तो आकडा फार मोठा वाटणाराच होता. खरं तर १९४५ च्या सुमारास जे संगणक वा त्या सदृश्य यंत्रे उपलब्ध होती त्यापेक्षा ENIAC ची क्षमता १००० पटींनी (अबब..) जास्त होती. त्यामुळेच ENIAC चं मोठच कौतुक होतं.
ENIAC उभारण्याचं काम जॉन मॉक्ली (John Mouchley) आणि जे प्रेस्पर इकर्ट यांनी केलं. ते दोघेही ENIAC प्रकल्पाचे प्रमुख (Director) होते.

पहिले नाव कोणाचे? पॅकार्ड की हॅवलेट?

सन १९३९
एच.पी. कंपनीचे पहिले उत्पादन
हॅवलेट पॅकार्ड (HP) कंपनीची स्थापना १ जानेवारी १९३९ रविवार रोजी झाली.
डेव्हिड पॅकार्ड आणि बिल हॅवलेट ह्या दोघांनी पालो अल्टो (कॅलिफोर्निया, अमेरिका) येथे एका गॅरेजमध्ये कंपनीची स्थापना केली.दोघांच्या नावाने कंपनी ठेवायची हे ठरले. पण, पहिले नाव कोणाचे?
 पॅकार्ड की हॅवलेट? हा प्रश्न होता. दोघांनी त्याचा निर्णय घेतला नाणे फेकून. त्या नाणेफेकीने ठरविले की पहिले नाव हॅवलेट, नंतर पॅकार्ड. 
ज्या गॅरेजमध्ये कंपनीची स्थापना झाली त्या जागेत लग्नापूर्वी बिल हॅवलेट रहायला होते. पहिल्या मजल्यावर डेव्हिड पॅकार्ड पत्नीसह रहात, तर त्यावर दुसर्‍या मजल्यावर त्यांचा घरमालक रहात असे.
ह्या गॅरेजचे छायाचित्र ह्या लिंकवर उपलब्ध आहे. ह्या गॅरेजला सिलीकॉन व्हॅली चे जन्मस्थळ मानले जाते. त्यासाठी ह्या गॅरेजचे रितसर जतन एक स्मारक म्हणून करण्यांत आले आहे. ह्या जतन केलेल्या गॅरेजच्या बाहेर डेव्हीड हेवलेट व बिल पॅकार्ड यांचे घेतलेले छायाचित्र आपण ह्या लिंकवर पाहू शकाल.
कंपनीचे पहिले उत्पादन होते एचपी 200 ए ऑडिओ ऑसिलेटर. ह्या उत्पादनाचे छायाचित्र ह्या लिंकवर पहा.
१९४० सालचा वॉल्ट डिस्ने पिक्चर्सचा चित्रपट Fantasia मध्ये साऊंड इफेक्टससाठी एचपी २०० बी ऑडिओ ऑसिलेटरचे आठ नग विकत घेतले.
आज आपण एचपी लेझर प्रिंटर्स सर्रास वापरतो. पण त्या कंपनीची सुरूवात १९३९ साली एका गॅरेजात झाली हे अतिशय प्रेरणादायी आहे.