गुगल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गुगल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

१० नोव्हें, २०१२

गुगल मराठी सर्च: एक नवी क्लुप्ती


 तुमच्या ज्या मित्रमंडळींना ही क्लुप्ती माहीत नाही त्यांना sanganak.info  वर जाऊन त्याची माहिती घ्यायला सांगा. किंवा तुमच्या फेसबुक पानावर ह्या पोस्टची लिंक तुमच्या मित्र परिवारासाठी अवश्य द्या. 

१८ मार्च, २०११

गुगलवर पब्लीक डोमेनमध्ये उपलब्ध चित्रे, फोटोंचे प्रमाण किती?

आपण ब्लॉग लिहीतो. त्यावरील लेखनाबरोबर छायाचित्रे, चित्रे वगैरे टाकली की आपल्या पोस्टस चांगल्या दिसतात. पण गुगल इमेजेसमध्ये सर्च केल्यावर उपलब्ध होणारी सगळीच चित्रे आपल्याला वापरता येत नाहीत. याचं कारण सरळ की ती चित्रे कॉपीरायटेड किंवा संबंधित कलावंताचा स्वामित्वहक्क राखलेली असतात. अशी हक्क राखून ठेवलेली चित्रे  ब्लॉग वा संकेतस्थळावर वापरणं हे बेकायदेशीर ठरतं. त्यामुळे आपण शोधात असतो ते पब्लीक डोमेनमधील चित्रांच्या.
हा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊ. समजा तुम्ही

७ मार्च, २०११

गुगलची वाटचालः क्षणचित्रे १९९८ ते २००३ (भाग पहिला)

गुगलचं सर्च इंजिन १९९८ साली कसं होतं? हे असः

तेव्हा गुगलचा पत्ता होता http://google.stanford.edu/ असा. कारण गुगलचे संस्थापक लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन हे १९९८ साली स्टॅनफोर्ड विद्यापीठात शिकत होते. अर्थात त्यामुळे गुगलचे सर्व हक्क तेव्हा स्टॅनफोर्ड विद्यापीठाकडे होते. मग पुढे काय झालं..
-----------------------------------------------------------------
पुढे Google.com वर ते हललं, असः


-----------------------------------------------------------------
नंतर, १९९९ चा अवतार असा होता.


बीटा व्हर्जन, पण आता कॉपीराईटस गुगल कंपनीकडे आले होते. स्टॅनफोर्ड पर्व मागे पडलं होतं...
-----------------------------------------------------------------
जून २००१ मध्ये पहा काय स्थिती होती..

२००१ साली गुगल तुम्हाला विचारत होतं की पहिल्यांदा गुगलवर आला आहात? आमची ओळख (क्वीक टूर) करून घ्या. पण तेव्हा Images, Groups वगैरे नव्हते. 
-----------------------------------------------------------------
२००२ मध्ये हा फरक झाला...

आता Images, Groups ह्या विभागांची भर पडली होती. एकूण वेब पेजेसची संख्या कशी वाढत चालली होती तो आकडा जरूर पहा. 
-----------------------------------------------------------------
२००३ मध्ये 'न्युज' ची भर पडली..

-----------------------------------------------------------------
२००४ ते २०११ दरम्यान काय काय घडत गेलं.. 
पाहू पुढल्या भागात.

३ मार्च, २०११

ब्लॉगच्या जगात - अफगाणिस्तान मध्ये...


गेल्या महिन्यातली गोष्ट. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात स्टीव्ह ग्रोव्ह अफगाणिस्तानात गेला होता. गुगलच्या युट्युबतर्फे त्याच्याकडे जी कामगिरी देण्यात आली होती ती थोडी जिकीरीची होती. अफगाणिस्तानात जाऊन तिथलं माध्यमाचं जग, आणि मुख्यत्वे तिथल्या इंटरनेटच्या संबंधातलं वातावरण त्याला अभ्यासायचं होतं. ह्या अभ्यासासाठी गुगलच्या प्रतिनिधींचं एक पथकच अफगाणिस्तानला गेलं होतं. त्यात स्टीव्ह होता.
अफगाणिस्तानातल्या आपल्या काही दिवसांच्या वास्तव्यात, आणि भटकंतीत, त्याला एक अफगाण तरूणी भेटली. तिचं नाव परी अकबर. अफगाणिस्तान सरकारी कार्यालयात परी नोकरी करीत होती. नुकतीच तिला तिची नोकरी गमवावी लागली आहे. त्याचं कारण एकच - परी ब्लॉग लिहीत होती. त्या ब्लॉगचं नाव मिलाद. ह्या वेब पत्त्यावर तुम्ही परीचा ब्लॉग पाहू शकता. तुम्हाला पर्शियन (दैरी) लिपी वाचता येत नसेल तर तो मजकूर तुम्ही वाचू शकणार नाही. पण मजकूराची लांबी तुमच्या डोळ्यात भरल्याशिवाय राहणार नाही. परी अकबर अफगाणिस्तानातल्या स्त्रियांचे प्रश्न आपल्या ब्लॉगमधून सातत्याने मांडत होती. तिच्या ब्लॉगला वाचकवर्गही लाभत होता. जसजशी वाचकसंख्या वाढत गेली तसतसा परीच्या मागे इतर सहकाऱ्यांचा ससेमिरा सुरू झाला. परीला तिचा ब्लॉग थांबवण्यासाठी सतवणं सुरू झालं. पण परी बधली नाही. तिने लिखाण चालूच ठेवलं. ब्लॉगची लोकप्रियता कमी होईना, ती वाढतच राहिली. शेवटी परीला धमक्या येऊ लागल्या. आता आपला जीव धोक्यात आला आहे हे परीनं जाणलं. तिने आपली सरकारी नोकरी सोडली..
परीसारखेच इतरही दहा-बारा ब्लॉगर्स स्टीव्हला अफगाणिस्तानात भेटले. आपण म्हणतो की 2011 मध्ये आता अफगाणिस्तान मुक्त आहे. पण परंपरेतही काही अदृश्य तालिबानी वृत्ती लपलेल्या असतात.
स्टीव्ह ग्रोव्हने ही सारी हकीगत युट्युब च्या अधिकृत ब्लॉगवर दिली आहे. ती ह्या पत्त्यावर तुम्हाला वाचता येईल.
गंमत पहा, की स्टीव्ह आणि गुगल - युट्युबच्या पथकाला अफगाणिस्तान सरकारने अधिकृतपणे आमंत्रण देऊन बोलावलं होतं. आपल्या देशातल्या माध्यम स्थितीचा आढावा ( to examine the content landscape in the region and look for ways to develop and promote more local media in the country) त्या पथकाने घ्यावा अशी अफगाण सरकारची अपेक्षा होती. पण....
मला वाटतं स्टीव्हने लिहीलेली सगळीच हकीगत मी सांगण्यापेक्षा तुम्ही त्याच्याच शब्दात वाचावी...

२१ फेब्रु, २०११

बहुगुणी गुगल कॅलेंडर

गुगल आणि जीमेलच्या सेवेशी आपण एव्हाना चांगले रूळलो आहोत. जीमेलमध्ये युनिकोडचे मराठी फाँट वापरून मराठी ईमेल पाठवता येते याचे प्रयोगही आपण बहुतेकांनी केलेले आहेत. आपण जेव्हा आपलं जीमेल अकाऊंट उघडतो तेव्हा त्या अकाऊंटच्या पोटात इतरही अनेक मोफत सेवा साठलेल्या आहेत याची कल्पना असूनही आपण त्यांच्या वाटेला फारसे गेलेलो नसतो. जीमेल अकाऊंट उघडून आपल्याला आलेल्या ईमेल पाहून झाल्या, किंवा फार तर पाठवायच्या ईमेल पाठवून झाल्या की आपण लॉगआऊट करून बाहेर पडतो. गुगलच्या सेवांपैकी फक्त जीमेल वापरणे आणि इतरांकडे फारसे न पाहणे म्हणजे आपल्या टीव्हीवर फक्त एकच चॅनेल बारा महिने पहात राहण्यासारखं आहे. आपल्या टीव्हीवर इतरही वेगवेगळ्या प्रकारचे चांगले-बरे-सोसो वगैरे वर्गीकरणात जाऊ शकणारे शेकडो चॅनेल्स असतात. ते न पहाता फक्त एकच चॅनेल पाहण्यात ज्या प्रकारचा तोटा आहे तोच तोटा आपण गुगलच्या अन्य सेवांचा लाभ न घेण्यात आहे.
गुगलच्या अनेक सेवांपैकी गुगल कॅलेंडर ह्या मोफत सेवेबद्दल मला आज खास करून बोलायचं आहे. ज्या मंडळींनी हे कॅलेंडर आजपर्यंत वापरलच नाही त्यांनी हा लेख वाचून ते वापरणं सुरू केलं तर एका कायम व उत्तम सुविधेचा अनुभव त्यांना येईल. इतर अनेक सेवांतून मी गुगल कॅलेंडर निवडलं याचं कारण हे कॅलेंडर आणि आपला मोबाईल फोन यांची अतिशय उपयुक्त सांगड आपल्याला घालता येते. उदाहरणार्थ पहा. रामरावांना डॉक्टरांनी त्यांचं दुपारचं आणि रात्रीचं जेवण वेळेवर घेण्याचा सल्ला दिला आहे. प्रकृतीला महत्व असल्याने रामरावांनीही दुपारी ठीक एक वाजता आणि रात्री ठीक आठ वाजता जेवायचच असा निश्चय केला आहे. रामराव तसे दिवसभर कामात गढलेले असतात. व्हिजिटर्स, मिटींग्ज, पत्रलेखन, ऑफिसच्या कामाचं वाचन यात पहिल्या दिवशी दुपारचे दोन कधी वाजले हे रामरावांना कळलच नाही. एक तास उशीर झाल्याने रामराव मनातल्या मनात चरफडले. कुणीतरी आपल्याला ठीक एक वाजता आठवण करायला हवी, आपण निदान मोबाईलवर अलार्म तरी लावायला हवा असं त्यांना वाटलं. पण पुढल्या काही दिवसांतही वेगवेगळ्या तर्‍हा होत राहिल्या. कधी ते अलार्म लावायलाच विसरायचे, कधी अलार्म लावलेल्या वेळी मोबाईल सायलेंट मोडवर असल्याने अलार्म कधी होऊन गेला हे कळायचं नाही. पुढे रामरावांची ती समस्या सुटली गुगल कॅलेंडरमुळे. रामरावांना ठीक बारा वाजून पंचावन्न मिनिटांनी लंच घेण्याची आठवण करणारा एक एस.एम.एस. गुगल कंपनीतर्फे मिळू लागला. दररोज न चुकता त्या ठरलेल्या वेळेला तो एस.एम. एस. येणार याची रामरावांना सवयच झाली. रामराव एव्हढे बेशिस्त की केवळ एका एस.एम.एस. ला ते दाद देईनात. तो एस.एम.एस. यायचा. ते तो पहायचे. पुन्हा जेवण वेळेवर घेण्याचं विसरून जायचे. यावर त्यांनी रिरिमाईंडरचा उपाय शोधला. त्यानुसार त्यांना पहिला एस.एम.एस. बारा वाजून पंचावन्न मिनिटांनी, दुसरा ठीक एक वाजता आणि तिसरा एक वाजून तीन मिनिटांनी मिळू लागला. हा उपाय मात्र बराचसा लागू पडला. तीन तीन वेळा त्यांच्या मोबाईलवर एस.एम.एस. आल्याने ते वेळेवर जेऊ लागले. ते तिन्ही एस.एम.एस. आता त्यांनी तीन महिन्यांसाठी कायम लावून ठेवून दिले आहेत. दररोज अलार्म लावण्याची कटकटही आता त्यांना नाही.
रामरावांनी हे आठवण करून देणारे एस.एम.एस. लावले ते गुगल कॅलेंडरवर. दिवसभरात ते असेच चहाच्या वेळेचे, ऑफिसमधून बाहेर पडण्याचे, एवढेच कशाला कुणाच्या वाढदिवसाचे, कुठल्या ठरलेल्या कार्यक्रमाचे, भेटीगाठींचे एस.एम.एस. वर्षभरासाठी लावून ठेवत असतात. हे एस.एम.एस. देखील ते तीन तीन वेळा रिरिमाईंडर पद्धतीने लावत असतात. त्यामुळे त्यांचा मोबाईल आता स्वस्थ नसतो. सारखा तो काही ना काही गोष्टींची आठवण करून देतच असतो. रामराव त्याप्रमाणे आपलं आयुष्य शिस्तबद्ध राखण्यात यशस्वीही होत असतात. आज तरी गुगल कॅलेंडरवर ही सेवा मोफत आहे. पुढेही ती मोफतच राहील असा विश्वास अनेकांना वाटतो आहे. रामरावांचं हे उदाहरण ऐकल्यावर काहींना प्रश्न पडेल की हे एस.एम.एस. रिमाईंडर भारतीय मोबाईल फोन्सवर लावता येतात का? ते आल्याबद्दल काही चार्ज आपल्याला द्यावा लागतो का? ह्या दोन प्रश्नांची उत्तरे प्रथम देतो आणि नंतर त्याच्या तंत्राकडे वळतो. पहिली गोष्ट म्हणजे गुगल कॅलेंडरची ही सेवा मोफत आहे. म्हणजे ह्या सेवेबद्दल गुगल कोणताही उघड वा हिडन चार्ज लावत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या मोबाईल कंपन्याही येणार्‍या एस.एम.एस. साठी कोणताही चार्ज लावत नाही. म्हणजेच आपल्याला गुगल कॅलेंडरवरून कितीही एस.एम.एस. आले तरी आपल्या खिशाला कसलीही चाट पडत नाही.
गुगल कॅलेंडरवरून आठवणींचे मोठे मोठे एस.एम.एस. पाठवणं शक्य असतं. म्हणजे उदाहरणार्थ, समजा २१ नोव्हेंबर २००८ रोजी तुमच्या अमुक तमुक मित्राचे लग्न पुण्यात आहे. तुम्ही आज सप्टेंबर २००८ मध्ये ( किंवा अगदी वर्ष दोन वर्ष अगोदर सुद्धा) तो एस.एम.एस. प्रोग्राम करू शकता. त्या एस.एम.एस. मध्ये त्या लग्नाचा तपशील, वधू-वरांची नावे, लग्नस्थळाचा पत्ता, मित्राचा व लग्नस्थळाचा दूरध्वनी क्रमांक, मुहुर्ताची वेळ असं सारं काही सप्टेंबरमध्ये टाकून ठेवलत आणि तो एस.एम.एस. तुम्हाला २० नोव्हेंबर २००८ रोजी सकाळी ९ वाजता मिळावा असं गुगल कॅलेंडरमध्ये प्रोग्राम करून ठेवलत की तुम्ही सगळं विसरायला मोकळे. बरं, हे सारं करणं अगदी सोपं. आपल्या संगणकावर जीमेल पहात असताना आपल्या कीबोर्डचा वापर करून काय हवा तो आणि हवा तेव्हढा तपशील टाईप करून ठेवायचा. मोबाईलवर अलार्म लावायचा तर आपण किती तपशील की ईन करू शकणार याला मर्यादा असते. शिवाय मोबाईलची बटणं दाबून तो सारा तपशील टाकत बसणं किती जिकीरीचं असेल याचा विचार तुम्हीच करा. त्यापुढे गुगल कॅलेंडरची ही एस.एम.एस. रिमाईंडर्स खूपच सोपी आणि सुलभ वाटतात.
कॅलेंडर म्हंटलं की आपल्याला अपुरी जागा, तो तारखेचा इंचभर चौकोन असं काहीतरी डोळ्यासमोर येतं. गुगल कॅलेंडरचं तसं नाही. तुम्ही आफिसचं कॅलेंडर वेगळं, व्यक्तीगत कॅलेंडर वेगळं, आणखीही इतर काही खात्यांची वा प्रकल्पांची कॅलेंडर्स वेगवेगळी ठेवू शकता. ही वेगवेगळी कॅलेंडर्स वेगवेगळीही पाहू शकता, किंवा हवी तर सगळी एकदमही पाहता येतात. हा मुद्दा थोडा अधिक स्पष्ट करून सांगतो. गुगल वेगवेगळ्या कॅलेंडरसाठी वेगवेगळा रंग तुम्हाला देते. समजा ऑफिस कॅलेंडरचा रंग हिरवा असेल आणि व्यक्तीगत कॅलेंडरचा रंग लाल असेल तर हिरवं आणि लाल कॅलेंडर वेगवेगळं पाहता येणं शक्य असतं. पण समजा एका विशिष्ट तारखेला एकूणच काय स्थिती आहे हे पहायचं असेल तर तेही पहाता येतं. उदाहरण समजा १ ऑक्टोबर २००८ चं घ्या. ह्या दिवशी कोणत्या वेळी ऑफिसच्या कामाची आणि आपल्या व्यक्तीगत कार्यक्रमांची काय स्थिती आहे हे एकदम पाहता येतं. १ ऑक्टोबर २००८ ह्या दिवशी हिरव्या रंगातील आणि लाल रंगातील अपॉइंटमेंटस वा रिमाईंडर्स एकदम दिसत असल्याने नियोजन करणं अगदी सोपं असतं. ह्या सार्‍या गोष्टी एस.एम.एस. रिमाईंडर्सनी युक्त असल्यास आपण संगणकाच्या समोर नसलो तरी कोणतीही गोष्ट विसरणं शक्य नसतं.
गुगल कॅलेंडरचा पुढला महत्वाचा भाग म्हणजे तुमच्या मोबाईल फोनवर इंटरनेट चालू करून तुमच्या गुगल कॅलेंडरमध्ये तुम्ही भर घालू शकता वा त्यात बदल करू शकता. गुगल कॅलेंडरमध्ये एस.एम.एस. ची सुविधा मिळविण्यासाठी तुम्हाला विशिष्ट सेटींग (आजकाल सेटींग म्हंटलं की लोकांना सरकारी चहापाणी वगैरे वाटतं, इथे ते सेटींग नव्हे) करावं लागतं. त्यासाठी जीमेलच्या स्क्रीनवर सर्वांत वर डावीकडे असलेल्या Calendar ह्या शब्दावर क्लीक करून गुगल कॅलेंडर उघडा. मग सर्वांत वर उजवीकडे Settings ह्या शब्दावर क्लीक करा. तुम्हाला तीन प्रकारची कॅलेंडर सेटींग्ज दिसतील. त्यातील Mobile Setup वर क्लीक करा. ज्या मोबाईल फोनवर तुम्हाला एस.एम.एस. हवे असतील तो मोबाईल नंबर गुगल व्हेरीफाय करते. त्यासाठी तो मोबाईल नंबर टाईप करा. त्यानंतर Send verification code वर क्लीक करा. क्लीक केल्यानंतर काही क्षणातच गुगल तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक एस.एम.एस. पाठवेल. त्या एस.एम.एस. मध्ये एक कोड दिलेला असेल. तो कोड Settings मध्ये टाईप करायचा व नंतर Finish Setup वर क्लीक करायचं. एवढं केलत की तुमचा मोफत एस.एम.एस. मिळण्याचा मार्ग खुला झाला. आता तुमच्या कॅलेंडरमध्ये विशिष्ट तारखेला तुम्ही जे टाईप कराल त्याचा एस.एम.एस. मिळण्यासाठी Option मध्ये Reminder च्या खाली Email,Pop up आणि SMS हे जे तीन पर्याय आहेत त्यातील SMS हा पर्याय निवडा. शेवटी तळाशी असलेल्या Save ह्या बटणावर क्लीक करायला विसरू नका.
तुम्हाला तुमचे हवे तेवढे रिमाईंडर अशा प्रकारे लावता येतील. गुगल कॅलेंडरमधील ही एक महत्वाची सुविधा झाली. पण ही सुविधा म्हणजे गुगल कॅलेंडर नावाच्या मालगाडीचा एक डब्बा झाला. इतर डबे हेही अशाच प्रकारच्या महत्वाच्या सुविधा आहेत. त्यांचा वापर करून पाहिलात तर एक प्रकारचा खजिनाच हातात आल्याचा आभास तुम्हाला होईल. तो अनुभव मी घेतला आहे. तुम्हीही तो घेऊ शकता.

'क्रोमा' तुझा रंग कसा?

गणेश चतुर्थी, ३ सप्टेंबर २००८ रोजी गुगल कंपनीने आपला 'क्रोम' नावाचा नवा कोरा वेब ब्राऊझर अचानक आणि अनपेक्षितपणे बाजारात आणला. सध्या क्रोम हा बीटा आवृत्तीत आहे. ' जन्मानंतर पोराचं बारसं झालय, पण अजून पाळण्यातले पाय नीटपणे दिसायलाही लागलेले नाहीत' अशा अर्भकावस्थेत गुगलचा आजचा क्रोम ब्राऊझर आहे. क्रोमच्या स्पर्धेत मुख्यत्वे इंटरनेट एक्स्प्लोअरर, फायरफॉक्स आणि ऑपेरा हे तीन गेली कित्येक वर्षे कुस्तीचे फड गाजवणारे व पट्टीचे म्हणावे असे पैलवान आहेत. क्रोम नावाचं कुक्कुलं बाळ विरूद्ध इंटरनेट एक्स्प्लोअरर, फायरफॉक्स व ऑपेरा ह्या सामन्यात कोण जिंकणार, कोण किती तुल्यबळ आहे वगैरे चर्चा एव्हाना जगभर सुरूही झाली आहे. एवढच नव्हे तर क्रोम चा पोर्टेबल अवतार आपल्या पेन ड्राईव्हसाठी एव्हाना तयारही झाला आहे. जन्माला आलेल्या बाळाच्या दंडाची बेडकी किती फुगतेय हे पाहण्यासाठी आज जगभरचे हजारो तज्ज्ञ अक्षरशः लाखो तास आपापल्या संगणकासमोर बसून क्रोमची चांचणी घेण्यात गुंग झाले आहेत.
क्रोम हा गुगल ह्या खाजगी कंपनीचा ब्राऊझर असला तरी तो 'ओपन सोर्स' प्रकारचा (म्हणजे 'फायरफॉक्स' सारखा खुला व सार्वजनिक म्हणता येईल असा) ब्राऊझर आहे. तुमच्या आमच्यासाठी मोफत डाऊनलोडींगसाठी आज तो सहजपणे http://www.google.com/chrome येथे उपलब्ध आहे. गुगलच्या होमपेजवरही त्याची लिंक आहे. आपल्यापैकी शेकडोंनी गेल्या आठवड्यात क्रोम डाऊनलोड केलाही असेल, आणि वापरूनही पाहिला असेल. ज्यांनी तो केला नसेल त्यांनी काही नाही तरी एक गंमत म्हणून तो वापरून पहायला हवा. मात्र एक लक्षात घ्या की क्रोम हा आज फक्त विंडोज (एक्सपी व विस्टा) सिस्टम्सवरच चालेल. मॅक आणि लिनक्स साठी क्रोम अजून गर्भावस्थेत आहे. म्हणजे, मॅक व लिनक्ससाठीचा क्रोम अजून जन्माला आलेलाच नाही.
गुगल कंपनीने सर्च इंजिनपासून ते गुगल अर्थपर्यंत अनेक उत्पादने व सेवा आजपर्यंत उपलब्ध केल्या आहेत. त्यात आता त्यांना ह्या क्रोम ब्राऊझरची भर का घालावीशी वाटली याचं स्पष्टीकरण गुगलने स्वतःच अधिकृतपणे केलं आहे. त्यात गुगलवाले म्हणतात, " आम्ही ब्राऊझरमध्ये काम करण्यात आमचा जास्तीत जास्त वेळ व्यतित करीत असतो… लोक आज वेबवर ज्या गोष्टी (व कामे) करतात त्यांची कल्पनाही पंधरा वर्षांपूर्वी जेव्हा वेब (इंटरनेट) सुरू झालं त्यावेळी कुणी केली नव्हती. आमच्या लक्षात आलं की ज्या वेब ब्राऊझरमध्ये आपण जास्तीत जास्त वेळ घालवतो त्याबद्दल अगदी मुलभूत विचार गंभीरपणे करण्याची गरज आहे. साधी वाचण्याची पानं ह्या स्वरूपात वेब सुरू झालं आणि आज ते अगदी आधुनिक अशा इंटरॅक्टीव्ह वेब अॅप्लीकेशन पर्यंत येऊन पोहोचलं आहे…" गुगलचं म्हणणं थोडक्यात असं की वेबचं जग सुरू झालं तेव्हा त्या सुरूवातीला अनुसरून असे ब्राऊझर तयार झाले. यथावकाश त्यात सुधारणा केल्या गेल्या. पण त्याचा मुलभूत गाभा हा जुनाच राहिला. त्या पार्श्वभूमीवर क्रोम हा नव्या जगाचा, नव्या मनूचा नवा दमदार अवतार आहे. त्यामुळे तो इतरांपेक्षा वेगळा आहे.
एखाद्या बंगल्याचा खुला व्हरांडा असावा तशी वेब ब्राऊझरची संगणकातली स्थिती असते. बंगल्याच्या व्हरांड्यात जसं बाहेरचं कोणीही येऊ शकतं. बसू शकतं. पोरं बाळं येऊन पकडापकडी खेळून जात असतात. तसंच, ब्राऊझरमध्ये जगभरच्या वेबसाईटस व त्यांचेशी संबंधित अप्लीकेशन्स वा लहानमोठी सॉफ्टवेअर येतात, सक्रिय होतात आणि निघून जातात. ह्याच प्रक्रियेत सुरक्षेची जोखीम असते. आजही अनेक स्पायवेअर्स, ट्रोजन्स वगैरे विघातक गँगस्टर्स आणि खतरनाक गुंड ब्राऊझर नावाच्या व्हरांड्यात वेष बदलून येतात, आणि हळूच आपल्या संगणकाच्या बंगल्यात कधी शिरतात हे आपलं आपल्यालाही कळत नाही. ब्राऊझर हा मूळात व्हरांडाच असल्याने इंटरनेट एक्स्प्लोअरर असो की फायरफॉक्स, आणि ऑपेरा असो की आणखी एखादा दुसरा ब्राऊझर असो सुरक्षेचा प्रश्न हा असतोच. व्हरांड्यात जमणारे सगळेच काही गुंड वा गँगस्टर नसतात. काही जण खरोखरीच सज्जन, विद्वान, ऋषी-मुनी असतात. ते बंगल्याला आणि व्हरांड्याला उपयुक्तही असतात. पण काही गुंड-पुंड हे सज्जनाच्या चेहेर्‍याने वा ऋषी-मुनींच्या वेषात व्हरांड्यात येतात. तेव्हा व्हरांड्याची सुरक्षा व्यवस्था उत्तम असणं गरजेचं असतं. आज मायक्रोसॉफ्टच्या इंटरनेट एक्स्प्लोअररचा आठवा अवतार उपलब्ध आहे. म्हणजे पुर्वीच्या सात अवतारांचा अनुभव इंटरनेट एक्स्प्लोअररच्या गाठीला आहे. जगातल्या शंभरातले सत्त्याण्णव लोक आजही इंटरनेट एक्स्प्लोअरर उघडून इंटरनेटवर मुशाफिरी करीत असतात. मायक्रोसॉफ्ट सारखी यंत्रणा, अनुभव मागे असतानाही आजही इंटरनेट एक्स्प्लोअरर (चा व्हरांडा) सुरक्षित नाही. तोच प्रकार कमी-अधिक फरकाने फायरफॉक्स व ऑपेराचाही आहे. थोडक्यात, वर्षो नु वर्षे जे ब्राऊझर्स विकसित होत आले आहेत, त्यांनीही अद्यापि इष्ट अशी विकासाची पातळी गाठलेली नाही. असं जर आहे, तर मग क्रोम नावाच्या त्या कुक्कुल्या बाळाचं काय? असा प्रश्न आहे. पण कृष्ण हे जसे देवकीचे बाळ होते, तसे क्रोम हे गुगलचे बाळ आहे. त्यामुळेच क्रोमभोवती एक वेगळे वलय आहे.
क्रोमचा विचार दोन पातळ्यांवर आपण करायला हवा. एक म्हणजे तुम्ही आम्ही युजर म्हणून क्रोममध्ये असे काय आहे की आपण तो वापरण्याचा विचार करावा? आज आपल्यापैकी बहुतेक जण एक तर इंटरनेट एक्स्प्लोअरर किंवा फायरफॉक्स हे ब्राऊझर वापरत आहेत. हे आपण महिने नु महिने करीत आलो आहोत. एकाएकी एका रात्री गुगलने नवा ब्राऊझर काढला म्हणून आपला नेहमीचा ब्राऊझर सोडून आपण आंधळेपणाने क्रोम वापरायला सुरूवात करायची का? पहिल्या पातळीवरचे हे दोन प्रश्न खूपच महत्वाचे आहेत. दुसरी पातळी आहे ती सुरक्षेची. हा भाग बराचसा तांत्रिक आहे. त्यात सहसा आपण डोकं घालत नाही. कारण आपली भूमिका इंटरनेट सर्फर इतकीच सरळ साधी असते. फार फार तर आपण ह्या बाबतीत अनुभवी वा तज्ज्ञांचा सल्ला अंगिकारत असतो. जरी आपल्याला सुरक्षेच्या बाबतीत खूप काही गम्य नसलं तरी क्रोमची परिस्थिती त्या बाबतीत कशी आहे? तज्ज्ञ मंडळी त्याबाबत काय म्हणताहेत? हे मुद्दे तुमच्या आमच्यासाठी महत्वाचे आहेत.
क्रोम मध्ये असं काही खास वा जास्त आहे का की कुणी सध्याचा ब्राऊझर सोडून क्रोम वापरायला लागावं. वेग व इंटरफेस (व्हरांड्याची मांडणी) ह्या बाबतीत क्रोममध्ये काही वैशिष्ट्ये आहेत एवढं नक्की. वेगाच्या बाबतीतल्या विश्वासार्ह चांचण्या अजून मोठ्या प्रमाणावर आलेल्या नसल्याने क्रोम त्या बाबतीत नेमका किती मागे वा पुढे आहे हे सांगणं थोडं जल्दबाजीचं होईल. पण एक मात्र नक्की की क्रोम हा कच्चा खिलाडू मात्र अजिबात नाही. जन्माला आल्या आल्या हनुमानाने सूर्यावर उ़डी घेतली अशी कथा आहे. क्रोमनेही आल्या आल्या इंटरनेट एक्स्प्लोअरर व ऑपेराच्या मार्केंट शेअरच्या दिशेने झेप घेतल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे. फायरफॉक्सचे युजर्स हे जगात एखादा भला मोठा खंड असावा एवढ्या मोठ्या संख्येत आहेत. तिथेही चलबिचल आहे. क्रोम आज बीटा आवृ्‌त्तीत आहे. एवढ्यात त्याच्याकडे वळण्याचं कारण नाही. आगे आगे देखते है, होता है क्या असा पवित्रा बहुतेकांनी आज घेतला आहे. क्रोम चा इंटरफेस वैशिष्ट्यपूर्ण म्हणावा लागेल. मूळात गुगलचे होम पेज जसे स्वच्छ, सुटसुटीत व शुभ्र पांढरे आहे, तसाच क्रोम आहे. गडबड-गचडी तिथे अजिबात नाही. FILE, EDIT, VIEW, TOOLS वगैरे तोच तो आणि तोच तो प्रकारचा मेनू त्यात नाही. प्रथमदर्शनी आवडेल असा क्रोमचा इंटरफेस आहे. अक्षरे, चित्रे, फोटो त्यात व्यवस्थित दिसतात. वेगात इतरांच्या मानाने फार मोठी तफावत नाही (निदान पिछाडी तरी नक्कीच जाणवत नाही). गुगलचं म्हणणं असं आहे की त्यांनी सुरक्षेची फार मोठी काळजी क्रोमच्या बाबतीत घेतली आहे. एकाच वेळी ब्राऊझरमध्ये अनेक साईटस अनेक टॅब्जमध्ये उघडलेल्या असताना एखादी साईट वाईट प्रकारची असल्यास संपूर्ण ब्राऊझरच मान टाकून बंद होतो, हा अनुभव तुम्हा आम्हा सर्वांना कधी ना कधी आलेला आहे. गुगल म्हणते की हा अनुभव क्रोममध्ये येणार नाही (किंवा खूपच कमी येईल) कारण प्रत्येक टॅब हा क्रोममध्ये एक सॅन्डबॉक्स (गुगलनेच हा Sandbox शब्द वापरलाय) आहे. एक कोसळल्यास दुसरा कोसळणार नाही. खेरीज जावास्क्रीप्टच्या हाताळणीसाठी V2 हे नवे इंजिन क्रोममध्ये गुगलने वापरले असल्याने त्यावर आधारित अप्लीकेशन्स क्रोममध्ये इतरांपेक्षा फास्ट चालतील असा गुगलचा दावा आहे.
क्रोम तयार करताना गुगलने मोझीला फायरफॉक्स व अॅपलच्या सफारी ह्या दोन ब्राऊजर्समधील काही तंत्रे वापरली आहेत याची कबुली जाहीरपणे दिली आहे. खेरीज जे काही आहे ते ओपन सोर्स म्हणजे खुले आहे. खुले असल्याने तुम्हाला त्यात काही बदल करणे, अथवा क्रोमसाठी इतर उपयुक्त असे प्लगिन्स वा टूल्स बनवणे शक्य आहे. फायरफॉक्ससाठी अशी शेकडो प्लगिन्स व टूल्स बनून त्यांच्या कित्येक सुधारित आवृत्त्या आज उपलब्ध आहेत. क्रोमच्या बाबतीतही अशी शेकडो प्लगिन्स व टूल्स उद्या बनणार यात शंका नाही. क्रोमचा आजचा रंग आणि उद्याचा रंग यात झपाट्याने प्रवास होणार आहे. क्रोमचा उद्याचा म्हणजे भविष्यातला रंग नेमका कसा असेल याचा अंदाज करणं फार अवघड आहे. एक मात्र नक्की की मायक्रोसॉफ्टचा इंटरनेट एक्स्प्लोअरर आणि गुगलचा क्रोम यांच्यात येत्या वर्षभरात एक जबरदस्त फ्री स्टाईल कुस्ती रंगणार आहे. ही कुस्ती आपण त्या दोन्ही ब्राऊझर्समध्ये पाहू शकू. देखने में क्या हर्ज है?

२० फेब्रु, २०११

गुगल पेजरँक म्हणजे काय?

http://www.smashingmagazine.com/2007/06/05/google-pagerank-what-do-we-really-know-about-it/
गुगल पेजरॅंक. एक महत्वाचा मुद्दा. पण गुगल पेजरॅंक म्हणजे नेमकं काय? बर्‍याच जणांना किंवा खरं तर बहुतेकांना ते माहीत नसतं. तुम्ही त्यापैकी एक आहात असं वाटत असेल तर हे पान वाचाच.

जीमेलच्या करामती

गेल्या वेळी आपण गुगलमध्ये माहिती शोधण्याचे काही तंत्र आणि मंत्र पाहिले. गुगलने जगाला उपलब्ध करून दिलेला 'सर्च' हा गुगलचे पायदळ किंवा आर्मी आहे असं म्हंटलं तर जीमेल ही गुगलने सर्वांना दिलेली ईमेल म्हणजे त्यांचा एअर फोर्स म्हणावा लागेल. गुगलचा सर्च आणि जीमेल ह्यात तुमच्या आमच्या बाबतीतलं साम्य हे की आपण ह्या दोन्हींचा उपयोग पारंपारिक पद्धतीने व मर्यादित चौकटीत करीत असतो. म्हणजे, जी माहिती पाहिजे त्या विषयीचे शब्द टाईप करून ढोबळ पद्धतीने माहिती शोधणे हा गुगल सर्चचा उपयोग; आणि ईमेल पाठवणे व आलेली ईमेल उघडून वाचणे हा जीमेलचा उपयोग. खरं तर ह्या मर्यादित चौकटीत आपली बरीचशी कामं होतही असतात. त्यामुळे आणखी खोलात जाण्याची आपल्याला तशी गरज नसते. गेल्या लेखात गुगल इमेज सर्च करताना त्याच्या अॅडव्हान्स्ड सर्च सुविधेचा उपयोग करून कृष्ण-धवल लाईन ड्रॉईंग्ज कशी शोधायची याची टीप अनेकांना आवडल्याच्या ईमेल मला भरपूर आल्या. गुगलने दिलेल्या सोयी वरकरणी दिसतात त्यापेक्षा आत खोलात जाऊन पाहिल्या तर त्याचे आणखी शेकडो उपयोग आहेत असं आपल्याला आढळतं. जीमेलची सोयही ह्या वस्तुस्थितीला अपवाद नाही.

ईमेल जोडी

गुगलची जीमेल आज आपल्याला जवळ जवळ ६ जीबी जागा मोफत देते. आपण जेव्हा जीमेलसाठी रजिस्टर करतो तेव्हा आपल्याला जीमेल डॉट कॉम ने शेवट होणारा ईमेल पत्ता मिळतो. xyz@gmail.com किंवा abc@gmail.com अशा प्रकारचे ईमेल पत्ते आपल्यापैकी हजारोंचे आहेत. पण त्या हजारोंपैकी फार कमी लोकांना हे माहीत आहे की ज्यावेळी आपल्याला gmail.com चा पत्ता मिळतो, त्याच वेळी गुगल आपल्याला आणखी एक ईमेल पत्ता देते. तो पत्ता असतोgooglemail.com चा. हे थोडं अधिक स्पष्ट करून सांगतो. समजा, तुमचा ईमेल पत्ता arun@gmail.com असा आहे. तर, त्याचा अर्थ गुगलने तुम्हालाarun@googlemail.com हा पत्ता तुम्ही न मागता gmail च्या जोडीने बहाल केलेला आहे. म्हणजे तुमच्याकडे गुगलच्या gmail.com आणि googlemail.com अशा दोन ईमेलच्या चाव्या आहेत. पण, तुम्ही वापरत असता तो फक्त gmail.com चा पत्ता. दुसरा googlemail.com चा पत्ता तुम्ही कधीच वापरत नाही. आपल्या उदाहरणाला चिकटून आपण थोडं आणखी पुढे जाऊ. समजा, तुमच्या arun@gmail.com ह्या ईमेल पत्त्याऐवजी तुमच्या मित्राने तुम्हाला arun@googlemail.comह्या पत्त्यावर ईमेल पाठवली, तर ती तुम्हाला कुठे मिळेल? ह्या प्रश्नाचं उत्तर सोपं आहे. पत्ते gmail.com आणि googlemail.com असे दोन वेगवेगळे दिलेले असले तरी तुमचं अकाउंट एकच असतं. म्हणजे दोन्ही पैकी कोणत्याही पत्त्यावर तुम्हाला ईमेल पाठवली तरी ती येऊन पडते तुमच्या नेहमीच्याच gmail.com च्या अकाऊंट मध्ये.

गुगलने दिलेल्या ईमेल जोडीचा हा मुद्दा आपल्या लक्षात आला. त्यानंतर मग दोन नवे प्रश्न आपल्या मनात डोकावू लागलेले असतात. जर अकाऊंट एकच आहे, तर मग गुगलने दोन ईमेल पत्ते का दिले? दुसरा प्रश्न, जर दोन्ही पत्त्यांच्या ईमेल एकाच अकाऊंटमध्ये येऊन पडणार आहेत, तर मग त्याचा नेमका उपयोग काय?

पहिल्या प्रश्नाचं उत्तर हे की एकाच ईमेल अकाऊंटसाठी दोन पत्ते देण्यामागे गुगलची एक तांत्रिक सोय आहे. जर्मनी आणि ब्रिटन (यु.के.) मध्ये जीमेल ह्या नावाची नोंदणी गुगलची जीमेल येण्यापूर्वी झाली असल्याच्या दाव्यामुळे ह्या दोन देशांमध्ये कायद्याच्या अडचणीमुळे gmail.com चे पत्ते गुगलला देता आले नव्हते. तेथे त्यांनी googlemail.com चे पत्ते वाटले आणि समस्या सोडवून टाकली. ह्या दुहेरी डावपेचातून मग gmail=googlemail आणि googlemail म्हणजेच gmail ही समीकरणे कायमची बनून गेली.

आता दुसर्‍या प्रश्नाचं उत्तर पाहू. एकच अकाऊंट आहे, पत्ते वेगवेगळे आहेत याचा उपयोग युक्तीने करणारी मंडळी काय करतात, पहा. हे लोक आपले कुटुंबिय आणि अगदी निवडक मंडळी यांना googlemail.com चा पत्ता देतात. इतर सर्वांना ते gmail.com चा पत्ता देतात. अशा Googlemail वरून आलेल्या मेल आणि gmailवरून आलेल्या मेल वेगळ्या काढणे वा वेगळ्या शोधणे त्यांना सहज शक्य होते. स्पॅम म्हणजे नको त्या लोकांच्या मेलला आळा घालण्यासाठीही काही जण ह्या युक्तीचा उपयोग करतात.

आणखी काही करामती

जीमेल पत्त्यात डॉट (.) चा उपयोगही फार खुबीने करता येतो. म्हणजे उदाहरणार्थ समजा तुमचा ईमेल पत्ता manmohansingh@gmail.com असा आहे. तर तुम्ही काही ठिकाणी तुमचा ईमेल पत्ता man.mohansingh@gmail.com असा देऊ शकता. किंवा आणखी काही जणांना तो manmohan.singh@gmail.com असाही देऊ शकता. किंवा अगदी पुढे जाऊन ma.n.mohansingh@gmail.com असाही किंवा m.a.n.mo.hansingh@gmail.com असाही आडवा तिडवा वाकवून देऊ शकता.तुमच्या नावात कुठेही आणि कितीही वेळा डॉट टाकला तरी ती मेल तुमच्या त्याच ईमेल अकाऊंटमध्ये येऊन पडत असते. काही जण अशा डॉटयुक्त ईमेल पत्त्यांचा उपयोग इंटरनेटवर मोफत रजिस्ट्रेशनसाठी वगैरे देण्यासाठी करतात.

दुसरी करामत + ह्या चिन्हाची. ही करामत समजून घेण्यासाठी आपण पूर्वीचा arun@gmail.com ह्या पत्त्याचा उपयोग करू. समजा ह्या अरूणसाहेबांना fun-karu.com नावाच्या अविश्वासार्ह वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर ते arun+ fun-karu@gmail.com असा पत्ता त्या साईटला देऊ शकतात. त्या साईटने त्या पत्त्यावर पाठवलेली मेल अरूणसाहेबांना मिळते ती arun@gmail.com ह्याच पत्त्यावर. तुम्हीही तुमच्या जीमेल पत्त्याच्या बाबतीत ह्या करामती करून पहा.अगदीच काही नाही तर टाईमपास किंवा करमणूक म्हणून हे करायला काहीच हरकत नाही.

कीबोर्ड शॉर्टकटस्

ज्यांनी जीमेल पत्ते घेतले आहेत ती मंडळी जवळ जवळ रोजच जीमेलवर जातात आणि आपल्याला कोणत्या मेल आल्या आहेत हे पाहतात. आलेल्या मेलना उत्तर पाठवणं हेही तसं रोजचच काम असतं. ही कामं रोज करताना आपण आपल्या माऊसला प्रचंड फिरवतो. क्लीक वर क्लीक करकरून माऊसक्लीकचा पाऊस पाडतो. जीमेल वापरणारांनी जर माऊस वापरण्याऐवजी कीबोर्ड शॉर्टकटसचा उपयोग केला तर भरपूर वेळेची बचत साधता येईल. उदाहरणार्थ तुम्ही नुसतं C हे कीबोर्डवरचं बटण दाबा, तुमच्यासमोर मेल कंपोज करण्याची विंडो हात जोडून उभी राहील. एरवी तुम्ही माऊसवर हात नेणार, मग त्याला Compose Message वर नेणार, तेथे कर्सर टेकवून तुम्ही क्लीक करणार. मग तुमच्यापुढे ती मेल कंपोजची विंडो येणार. नुसतं C दाबून तुम्ही झपाझप कंपोज विंडोशी पोहोचू शकता. समजा तु्म्हाला त्वरित इन बॉक्स मध्ये जायचं आहे, तर तुम्ही फक्त g i म्हणजे प्रथम जी आणि नंतर आय दाबा. तुम्ही क्षणात इन बॉक्समध्ये पोहोचता. असे जीमेलचे बरेच आणि खूपच उपयुक्त कीबोर्ड शॉर्टकटस आहेत. त्यांची प्रिंटेबल लीस्ट http://r.evhead.com/hodgepodge/gmail-shortcuts.html इथे उपलब्ध आहे.

कीबोर्ड शॉर्टकटस बद्दल मी अगदी उत्साहाने सांगितलं म्हणून तुम्ही पटकन आपल्या जीमेल अकाऊंटवर जाऊन ते वापरू पहाल, आणि नेमकं होईल असं की C हे बटण चार वेळा दाबलं तरी जीमेलवर त्याचा काही ढिम्म परिणाम दिसत नाही. असं होण्याची दाट शक्यता आहे. कारण जीमेलचे कीबोर्ड शॉर्टकटस हे अॅक्टीव्हेट करावे लागतात. जर ते अॅक्टीव्हेट केले नाहीत तर ते अर्थातच उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे जर ते अॅक्टीव्हेट नसले तर प्रथम तुमच्या जीमेलच्या Settings मध्ये जाऊन ते अॅक्टीव्हेट करा, आणि नंतरच C दाबून Compose Message ला जाता येतय का हे तपासून पहा.

तयार युक्त्या

http://www.autohotkey.com/download/ ह्या पत्त्यावर जाऊन Autohotkey हे मोफत आणि आकाराने फारच छोटे असलेले सॉफ्टवेअर डाऊनलोड करून घ्या.समजा तुम्हाला दररोज तीन मेल अशी टाईप करावी लागतात की ज्यात Thank you for your mail हे शब्द हटकून असतात. तेच तेच शब्द तीन तीन चार चार वेळा टाईप करण्यापेक्षा तुम्ही फक्त TYFM इतकच टाईप केलत आणि तुम्हाला ते Thank you for your mail हे शब्द आपोआप टाईप करून मिळाले तर किती बहार येईल. Autohotkey हा प्रोग्राम त्यासाठीच आहे. याची सविस्तर माहिती http://lifehacker.com/software/keyboard-shortcuts/

hack-attack-knock-down-repetitive-email-with-autohotkey-159785.php ह्या पत्त्यावर जाऊन अवश्य घ्या. Autohotkey कशी वापरायची याचं मार्गदर्शन तिथे आहे.

ह्या Autohotkey सारख्या जीमेलच्या बाबतीतल्या तयार आणि मोफत प्रोग्राम्सच्या अनेक युक्त्या आज उपलब्ध आहेत. तो एक स्वतंत्र विषयच आहे. त्याबाबत पुन्हा केव्हातरी सविस्तर बोलू. आपल्याला आलेल्या जीमेलवरच्या मेलमधून नेमकी आपल्याला हवी ती मेल कशी शोधायची, याच्या टीप्स खुद्द गुगलनेच आपल्याला दिल्या आहेत. ज्यांचे लक्ष अजून त्याकडे गेलेले नाही त्यांचेसाठी त्यातल्या काही टीप्स इथे देतो.

मेलच्या ढिगार्‍यातून टाचणी शोधायची?

अरूणरावांना आपल्या जीमेलच्या ढिगार्‍यातून रमेशरावांकडून आलेल्या मेल शोधायच्या आहेत. त्यांनी नुसतं रमेश म्हणून शोध घ्यायचा प्रयत्न केला तर त्यांचेकडून आलेल्या आणि त्यांना पाठवलेल्या दोन्ही ईमेलचं मिश्रण समोर येऊन गोंधळ होईल. त्यासाठी त्यांनी From: Ramesh असं करून शोध घ्यायला हवा. रमेशना पाठवलेल्या मेल शोधायच्या तर To: Ramesh असं देऊन शोधायला हवं. ज्या मेलना अटॅचमेंट आहेत अशा मेल शोधायच्या तर has:attachment असं म्हणून शोध घ्यायला हवा. विशिष्ट काळातील मेल शोधण्यासाठी after: किंवा before: असं म्हणून त्या हुडकायला हव्यात.

जीमेलची सोय मोफत असली तरी खूपच बहुगुणी आहे. त्या संदर्भातील खूपच माहिती अक्षरशः शेक़ड्याने इंटरनेटवर सगळीकडे विखुरलेली आहे. त्यातल्या फक्त चार-दोन मुद्यांकडेच फक्त मी तुमचं लक्ष इथे वेधलं आहे. ह्या लेखाचे प्रयोजन फक्त तुमचं लक्ष त्याकडे वेधणं इतकच आहे.

गुगलः काही तंत्र, काही मंत्र

'गुगल' हा शब्द शब्दकोशात येऊन आता पावणे दोन वर्षे होत आली. अगदी पक्कं सांगायचं तर १५ जून २००६ रोजी ''ऑक्सफर्ड इंग्लीश डिक्शनरी'' ने to google हे नवे क्रियापद आपल्या शब्दकोशात सामावले.त्यानंतर पुढे महिन्याभरातच म्हणजे जुलै २००६ ह्या महिन्यात वेबस्टर डिक्शनरीनेही गुगल नावाच्या क्रियापदाची भर आपल्या शब्दकोशात टाकली. To google चा अर्थ वेबस्टरने दिला - ' to use the Google search engine to obtain information about (as a person) on the World Wide Web'. एका खाजगी कंपनीचे नाव दोन दांडग्या आणि जगन्मान्य शब्दकोशांनी व्यवहारातले एक क्रियापद म्हणून जेव्हा जगाला बहाल केले तेव्हा जगाने त्या बातमीकडे आ वासून पाहिले. एका कंपनीचे नाव जेव्हा इंग्रजीसारख्या भाषेतले एक क्रियापद बनते तेव्हा त्या कंपनीची लोकप्रियता काय असेल हे वेगळे सांगावे लागत नाही.

खरं तर 'गुगल' हा शब्द त्या कंपनीच्या नावापेक्षा लोकांना अधिक माहीत आहे तो महाजालावरचे एक 'सर्च इंजिन' म्हणून. इंटरनेटवर मुशाफिरी करणारी आपण मंडळी दिवसभरात 'गुगल' वर गेलो नाही असं फार क्वचित होत असेल. 'गुगल' वर जाऊन आपल्याला काय हवं ते शोधायचं ही सवय नेटकरांच्या अंगी इतकी भिणली आहे की त्या क्रियेवर क्रियापद म्हणूनच भाषेने शिक्का मारून टाकला आहे. खरं तर १९९८ साली म्हणजे फक्त १० वर्षांपूर्वी केवळ तीन माणसांनी एका गॅरेजमध्ये ह्या कंपनीची स्थापना केली. आज तीच कंपनी एक क्रियापद बनली यामागे फार मोठे कर्तृत्व अर्थातच आहे. कर्तृत्व म्हंटले की आपल्याला व्यक्तीचे कर्तृत्व दिसते. गुगलचे संस्थापक लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन यांचे कर्तृत्व कंपनीच्या यशामागे आहे याबद्दल कोणीही शंका घेणार नाही. पण 'गुगल' च्या यशामागे खरे कर्तृत्व म्हणायचे तर ते वेब तंत्रज्ञानाचे आहे.

वेबचे तंत्रज्ञान हे तुम्हा आम्हा सामान्यांसाठी एखाद्या मानस सरोवरासारखे आहे. त्याचा आवाका प्रचंड आहे आणि खोली अफाट आहे. 'गुगल' सारखे 'सर्च इंजिन'घ्या. आपण सामान्यपणे त्याचा वापर करतो तो असतो केवळ वर वरचा. आपण नजर टाकतो ती 'गुगल' च्या पहिल्या पानावर. तेथे जे शोधायचे ते टाईप करून आपण गुगल नेईल तिथे प्रवास करीत राहतो. हरवून जातो. तशा प्रकारे हरवता हरवता बहुधा आपल्याला हवे ते गवसलेलेही असते. गुगल सर्च इंजिनचा हा उपयोग पृथ्वीवरच्या जमिनीवर फक्त एखादी झोपडी बांधण्याइतका मर्यादित आहे असं म्हंटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. माहितीचा शोध हा गुगल नावाच्या अथांग महासागराचा फक्त एक किनारा तेवढा आहे. हा किनारा तुम्हा आम्हा पामरांसाठी अगदी पुरेसा असला तरी जगात आपल्यापेक्षा अधिक चतुर असे जे पामर आहेत ते ह्या महासागराचा उपयोग कसा करतात हे आपण निदान पहायला तरी हवं. त्या पाहण्यासाठीच किंवा त्या उपयोगावर केवळ एक दृष्टीक्षेप टाकण्यासाठीच हा लेख आहे.

आता उदाहरणार्थ गुगलच्या वेब हिस्टरीचा उपयोग घ्या. गुगलवर आपला शोध बाराही महिने चालू असतो. आपल्या ह्या शोधाचा मागोवा आपल्या मागे गुगल घेत असतो आणि त्याची अतिशय पद्धतशीर अशी नोंद वेब हिस्टरी ह्या सदरात होत असते. समजा गेल्या नोव्हेंबर २००७ ह्या महिन्यात आपण पाब्लो पिकासो ह्या जगप्रसिद्ध चित्रकाराबद्दलच्या माहितीचा शोध घेतला होता. त्याला आता चार महिने उलटून गेले आहेत. आता आपण आहोत मार्च २००८ मध्ये. चार महिन्यापूर्वीचा आपला तो शोध नेमका काय होता हे जाणण्याची सोय गुगलने वेब हिस्टरीमध्ये केलेली आहे. त्यासाठी काय करायचं. अतिशय सोपं आहे. तुमचं जीमेलचं जे लॉगिन नेम आहे त्याचा पासवर्ड वापरून प्रथम लॉगिन करायचं. तुमचं जीमेल लॉगिन नसेल तर

https://www.google.com/accounts/NewAccount

ह्या लिंकवर जाऊन तुमचं गुगल अकाऊंट तुम्हाला मोफत उघडता येईल. ह्या नव्या अकाऊंटचा लॉगिन आणि पासवर्ड वापरून तुमच्या स्वतःच्या गुगल विश्वात तुम्हाला प्रवेश करता येईल. आता ह्या पुढे तुम्ही गुगलवर जो जो शोध घ्याल त्याची नोंद सतत आणि तारीखवार पद्धतीने गुगल घेत राहील. पुढे अगदी वर्षभरांनी सुद्धा तुम्हाला त्याचा लेखा जोखा कधीही आणि जगात कुठेही पाहता येईल. ह्यातली मुख्य गोम अशी की कोणत्या तारखेला, नेमक्या किती वाजून किती मिनीटे आणि किती सेकंदाचा वेळ असताना तुम्ही कोणत्या शब्दांचा शोध घेतला होतात याची नोंद तर तुम्हाला पहायला मिळतेच, पण अधिक महत्वाचं म्हणजे तुम्हाला जे सर्च रिझल्टस मिळाले होते त्यातल्या नेमक्या कोणत्या सर्च रिझल्टवर तुम्ही क्लीक केले होतेत हेही गुगलची वेब हिस्टरी तुम्हाला अचूक सांगते. अर्थात वेब हिस्टरीचा उपयोग हा इतकाच नाही. तुम्ही जो सर्च करता त्याचा अभ्यासही गुगल तुमच्या नकळत करीत असते. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही व्यवसायाने डॉक्टर असलात तर तुमचे शोध हे एका विशिष्ट चौकटीतले असतात. किंवा, तुमच्या स्वभाव आणि आवडीप्रमाणे वा तुमच्या विषयाप्रमाणे तुमचे शोध काय असणार हे ठरत असते. तुमच्या नेमक्या ह्या व्यक्तीगत चौकटीचा अभ्यास गुगल करते आणि तुम्हाला कोणते शोध अभिप्रेत आहेत हे जाणण्याचा प्रयासही ते करते. ह्यामुळे तुम्हाला हवा तो शोध अधिक वेगाने आणि कमीत कमी सेकंदात मिळायला निश्चितपणे मदत होते. आता ह्या वेब हिस्टरी नामक अगदी साध्या पण अतिशय गुणवान अशा सोयीचा उपयोग आपण आतापर्यंत किती वेळा केला? उत्तर येते, कधीच केला नाही. किंवा फारच क्वचित केला असेल. तुमच्या आमच्यापैकी जी मंडळी ह्या प्रकारात येतात त्यांच्यासाठीच हा वेब हिस्टरीचा मंत्र ह्या लेखात दिला आहे. ह्या संदर्भात आणखी एक महत्वाची गोष्ट जाता जाता सांगतो की वेब हिस्टरीची सोय तुम्हाला Enable करावी लागते. ती करण्यासाठी Enable Web History च्या लिंकवर केवळ एक माऊसक्लीक करायची असते. आपल्या शोधाची नोंद गुगलने आपोआप करू नये असे वाटत असेल तर तुम्ही ही सोय केव्हाही Disable करू शकता.

गुगलच्या संदर्भात असे फारसे माहीत नसलेले अक्षरशः शेकडो तंत्र आणि मंत्र आहेत. इंग्रजीत तर गुगलच्या टीप्स आणि ट्रीक्स वर पुस्तकेच्या पुस्तके लिहीली गेली आहेत. त्यावरून गुगलवर शोध घेणे हा प्रकारही किती व्यावसायिकपणे जगात पाहिला जातो हे आपल्या लक्षात येईल. आता आणखी एक, सर्वांना माहीत असलेलीGoogle Image Search ची नेहमीची सोय थोडी तपशीलात जाऊन पाहू. गुगलवर चित्रे किंवा छायाचित्रे आपण नेहमीच शोधतो. पण आपल्यापैकी बरेच जणांना हे माहीत नाही की आपल्याला काही विशिष्ट निकषावरची चित्रे वगैरे शोधण्याची सोय गुगलने केली आहे. उदाहरणार्थ, समजा तुम्हाला फक्त कृष्ण-धवल प्रकारातली लाईन ड्रॉईंग्ज तेवढी शोधायची आहेत. तर, त्यासाठी तुम्ही Advanced Image Search चा उपयोग करायला हवा. त्याचा वापर करून तुम्हाला हव्या त्या रंगातील चित्रे वगैरे मिळू शकतात. कृष्ण-धवल लाईन ड्रॉइंग्ज जशी वेगळी काढून शोधता येतात तसाच शोध कृष्ण-धवल ग्रे स्केल इमेजेसचाही करता येतो. यात तुम्हाला ब्लॅक अॅन्ड व्हाईट फोटोग्राफ्स मिळतील. तुम्हाला विशिष्ट प्रकारच्या इमेज फाईल्स, म्हणजे JPG, GIF, BMP, PNG वगैरे, तर त्याही वेगळ्या मिळू शकतील. तुम्हाला आकाराने मोठी चित्रे वा इमेजेस हव्या असतील तर तो ऑप्शनही आपल्याला एकाच वेळी निवडता येतो. म्हणजे आपल्याला GIF प्रकारातील कृष्ण-धवल लाईन ड्रॉईंग्ज पण त्यातली आकाराने मोठी अशी चित्रे निवडण्याची सोय गुगलच्या ADVANCED IMAGE SEARCH ने उपलब्ध करून दिलेली आहे. आपण त्याचा उपयोग कितपत करतो ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे.

आता हे आणखी काही साधे सोपे मंत्र पहाः ~ ह्या खुणेचा उपयोग करून तुम्ही एखादा शब्द गुगल सर्च केलात तर त्याचेशी संबंधित रिझल्टस तुम्हाला मिळतात.उदाहरणार्थ ~ nutrition असं टाईप करून तुम्ही शोध घेतलात तर nutrition शी संबंधित Food, Calories, Health अशा सर्व अंगांनी तुम्हाला माहिती देणारे सर्च रिझल्टस तुम्हाला गुगल देईल. Temp Mumbai म्हणून सर्च केलात तर ह्या क्षणाचे मुंबईतले तपमान तुम्हाला मिळेल. Time Pune म्हणून सर्च कराल तर पुण्यात आत्ता किती वाजलेत, कोणता वार आहे याचे घड्याळ तुमच्यापुढे येईल. अनेक हिशोब किंवा रूपांतराची गणिते गुगलवर करता येतात. उदाहरणार्थ 122 ft=?inchesअसं टाईप करून सर्च केलात तर 122 feet = 1 464 inches असं उत्तर तुम्हाला क्षणार्धात मिळेल. 2 000 Indian rupees = ? U.S. dollars असा सर्च प्रश्न केलात तर 2 000 Indian rupees = 49.20200 U.S. dollars असं उत्तर गुगलकडे तयार असेल.

गुगलमधलं I am feeling lucky म्हणजे नेमकं काय?

गुगल सर्चचं Home Page म्हणजे साधेपणाचा कळस आहे. शुभ्र पांढरी पार्श्वभूमी आणि त्यावर दररोज बदलती गुगल नावाची छबी ह्याच दोन गोष्टी त्यावर ठळकपणे दिसतात. इतर बाकी साध्या टायपातले काही बाही, पण आवश्यक शब्द. सर्च करण्यासाठी टाईप करायच्या शब्दांसाठी एक लांबलचक पट्टी आणि त्याखाली Google Search आणि I am feeling lucky ह्या नावाची दोन बटणं. त्यातलं Google Search हे बटण कशासाठी आहे हा प्रश्न कोणालाही पडत नाही. पण दुसरं बटण I am feeling lucky म्हणजे नेमकं काय, आणि ते बटण नेमकं करतं काय हा प्रश्न दहातल्या आठ जणांना पडतो.

गुगल सर्च करताना I am feeling lucky असं स्वतःबद्दल म्हणण्यासारखं काय आहे, असा सरळ आणि भाबडा प्रश्न येणं स्वाभाविक आहे.

ह्या प्रश्नाचं उत्तर समजावून घेण्यासाठी आपण एक साधी कृती करू, म्हणजे हा Lucky प्रकार काय आहे हे आपल्या लक्षात येईल. गुगलच्या सर्च टेक्स्ट फिल्डमध्ये (म्हणजे त्या लांबलचक पट्टीमध्ये Stanford हा शब्द टाईप करा. आता Google Search ह्या बटणावर क्लीक न करता, I am feeling lucky वर क्लीक करा. बघा काय झालं! कोणताही सर्च रिझल्ट समोर आला नाही. एरवी अमुक तमुक क्षुल्लक सेकंदात लाखो सर्च रिझल्ट देणार्‍या गुगलने काय केल? सर्च रिझल्ट न देता त्याने थेट stanford.edu ही वेबसाईट उघडली. याचाच अर्थ तुम्ही लक्की ठरलात. तुम्हाला सर्च रिझल्टमध्ये डोळे घुसवून हवं ते शोधावं लागलं नाही. तुम्हाला स्टॅनफोर्ड विद्यापीठाची वेबसाईट हवी होती, हे गुगलने जाणलं आणि तुम्हाला कोणताही त्रास होऊ न देता सुखाने हवी ती वेबसाईट तुमच्यापुढे उघडली.

आयुष्यात जे हवं ते कोणतीही तोशिस न पडता समोर येण्याचं भाग्य गुगलमध्येही असू शकतं ते हे असं. मराठीत म्हणूनच I am feeling lucky चं भाषांतर 'मी भाग्यवान' असं गुगलनेच केलं आहे. मराठी गुगलमध्ये जसं 'मी भाग्यवान' नावाचं बटण असतं तसं हिंदीत 'आज मेरी किस्मत अच्छी है' नावाचं बटण असतं. गुजरातीत "મારું નસીબ જોર કરે છે" नावाचं बटण आहे.

Stanford प्रमाणेच BBC, White House, Maharashtra हे शब्द टाकून Feeling Lucky दाबून काय होतं ते पहा. बीबीसीची, ओबामांच्या व्हाईट हाऊसची आणि महाराष्ट्र सरकारची वेबसाईट थेट उघडते. एवढं समजून घेतल्यानंतर आपण आजपर्यंत का लक्की ठरत नव्हतो हे आपल्या कायम लक्षात आल्याशिवाय राहणार नाही.

जीमेल आणि ऑनलाईन सिक्युरिटी

जीमेल वापरून ईमेल पाठवणारे आजकाल दहापैकी आठ इतके बहुसंख्येने दिसतात. जीमेलवर आपले अनेक पासवर्डस येऊन पडत असतात. कितीतरी गोपनीय किंवा व्यक्तीगत माहिती वा डेटा आपल्या ईमेलमधून जात-येत असतो. असा हा महत्वाचा जीमेल पत्ता कितपत सुरक्षित असतो? कुणी एखादा हॅकर आपली जीमेल हॅक करू शकतो का? आपल्या ईमेल जेव्हा जीमेलवरून जात येत असतात त्या ऑनलाईन प्रवासात मध्येच कुणी त्या टॅप करू शकेल का? हे प्रश्न आपण फारसे विचारात घेत नसतो.
ह्या पार्श्वभूमीवर आपण बॅंकांचं उदाहरण घेऊ. आजकाल बँकांच्या वेबसाईट आणि ऑनलाईन बँकींग सेवा सर्वत्र उपलब्ध झाली आहे.आपल्या अकाऊंटमधून पैसे काढणे, ट्रान्सफर करणे, अकाऊंटमधले पैसे वापरून ऑनलाईन खरेदी करणे हे आता दैनंदिन जीवनाचा भाग होऊन गेलय. अशा वेळी आपल्या बँक अकाऊंटचा पासवर्ड आणि एकूणच व्यवहार सुरक्षित रहावा यासाठी बँकांच्या वेबसाईटस विशेष ऑनलाईन सुरक्षा आपल्या अकाऊंटला देत असतात. हे नीट समजण्यासाठी आपण ICICI Bank च्या वेबसाईटचं उदाहरण घेऊ. तुम्ही तुमच्या इंटरनेट ब्राऊझरमध्ये http://icicibank.com असं टाईप करून एंटर बटण दाबलत तर तुम्ही बँकेच्या वेबसाईटवर जाता. तुमच्या ब्राऊझरमध्ये त्यावेळी खालीलप्रमाणे साईटचा पत्ता दिसत असतो.



आता तुम्ही बँकेच्या वेबसाईटवर लॉगिन करण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी सर्वात वर डावीकडे दिसणार्‍या लॉगिन विभागाकडे या.



तुम्ही जेव्हा लॉगिनच्या Personal किंवा Corporate वा तत्सम लिंकवर क्लीक करता तेव्हा तुमच्यासमोर लॉगिन नेम व पासवर्ड टाईप करावयाचे पान येते. इथून तुम्ही तुमचं अकाऊंट उघडणार असता. हे पान अतिशय सुरक्षित ठेवण्याची काळजी सर्वच बँकांप्रमाणे ICICI Bank ने देखील घेतली आहे. ह्या पानाचा तुमच्या ब्राऊझरवर असलेला पत्ता पहा. खालीलप्रमाणे दिसत आहे.



जेव्हा तुम्ही साधी साईट उघडलीत तेव्हा त्या पत्त्यात केवळ http अशी सुरूवात होती. जेव्हा तुम्ही लॉगिन व पासवर्डच्या पानावर गेलात त्यावेळी त्या पानाचा पत्ताhttp ऐवजी https ने सुरू होणारा होता. म्हणजेच लॉगिन-पासवर्डचे पान येताच http मध्ये s ची भर पडली आहे. हा s असतो विशेष सिक्युरिटीचा. ह्या पानावर जे टाईप होईल व जे व्यवहार होतील ते सारे विशेष सुरक्षित राहतील असा त्याचा अर्थ. आजकाल व्हीआयपींना झेड सिक्युरिटी दिली जाते. Https चा अर्थ तुमच्या पानाला अशी एक प्रकारची ऑनलाईन झेड सिक्युरिटी मिळालेली आहे.
आता आपल्या जीमेलकडे वळू. तुमच्या जीमेलवर लॉगिन करा. लॉगिन केल्यावर तुमच्या ब्राऊझरच्या पत्त्यात काय दिसते आहे? जर http असेल तर तुमचा लॉगिन आणि तुमच्या मेलना https ची विशेष सिक्युरिटी उपलब्ध नाही. त्यातही जर तुम्ही wi-fi झोन मध्ये असाल वा wi-fi इंटरनेट वापरत असाल तर तुमच्या झोनमधला इतर कोणी तुमचा ईमेल पत्ता तुमच्या नकळत पाहू शकतो. पॅरालल टेलिफोन लाईनवर टेलिफोनवरचं बोलणं ऐकणं असतं ना तसाच काहीसा हा प्रकार असतो. मात्र तुमचा लॉगिन https प्रकाराने युक्त असेल तर तुम्ही काळजी करण्याची गरज नसते. कारण तुमच्या ईमेलला वा त्या पानावरच्या ऑनलाईन व्यवहाराला विशेष सुरक्षा असते.
तुम्ही तुमची जीमेल उघडलीत. पत्ता पाहिलात. तो http प्रकारचा आहे का? असेल तर तो बदलून तुम्ही https करून तुमची ईमेल विशेष सुरक्षा कवचाच्या आत ठेवायल हवी. आता जीमेलने अशा सुरक्षेची सोय तुमच्या-आमच्यासाठी केली आहे. पण ती तुम्ही अक्टीव्हेट करायला हवी. जोपर्यंत तुम्ही ती अक्टीव्हेट करीत नाही,तोपर्यंत तुमचा पत्ता http चाच राहणार. अक्टीव्हेट करणं हे अगदी सोपं आहे. त्यासाठी प्रथम तुमच्या जीमेलवर लॉगिन करा. मग Settings वर क्लीक करा. सेटींग पानाच्या तळाशी पहा दोन पर्याय दिलेले आहेत. एक आहे - Always use https. दुसरा आहे - Don't always use https. खालील चित्रात दाखविल्याप्रमाणे तुमच्या जीमेलवर कोणताही पर्याय निवडलेला नाही.



जीमेलने खरं तर स्वतःच न विचारता https पर्याय निवडायला (by Default) हवा होता. पण त्यांनी तसे केलेले नाही. त्यामुळे आपण तो निवडणे भाग आहे. माऊसने क्लीक करून तो पर्याय निवडून घ्या. मग खालीलप्रमाणे चित्र दिसेल.



आता हे सेटींग सेव्ह करा आणि त्या पानावरून बाहेर पडा. आता पुन्हा लॉगिन करून पहा. तुम्हाला https चा लॉगिन पत्ता मिळालेला दिसेल. याचा अर्थ आता तुमची जीमेल विशेष सुरक्षा कवचाखाली आली आहे. इतरांना ती पासवर्डशिवाय ऑनलाईन हॅक करणं आता अगदी अशक्यप्राय आहे.
ही सुविधा जीमेलने अगदी अलिकडे देऊ केली आहे. त्यामुळे आपल्यापैकी १० तल्या ९ जणांना त्याची माहिती नसण्याची शक्यता आहे. तुमच्या सर्व मित्रांना आपण याची माहिती त्वरित द्या. आपली आणि आपल्या सर्वांची जीमेल सुरक्षित करणं महत्वाचं आहे. त्यासाठी इथे दिलेली टीप प्रत्येकाला सांगणं हे आपण कर्तव्य म्हणून करायला हवं.

Googleplex चा योगायोग

) Google हा शब्द इंग्रजी Googol ह्या शब्दावरून घेतला आहे.

) Googol म्हणजे १ ह्या आकड्यावर शंभर शुन्ये ठेवली असता येणारी संख्या. A cardinal number represented as 1 followed by 100 zeros (ten raised to the power of a hundred). माहितीचा प्रचंड स्त्रोत सांगण्यासाठीच मूळ Googol वरून Google असे नामकरण गुगलचे संस्थापक सर्जी ब्रिन आणि लॅरी पेज यांनी केले.
) Google कंपनीच्या मुख्य कार्यालयाच्या आवाराचे नाव ठेवताना Google आणि Complex ह्या दोन इंग्रजी शब्दांचा संयोग करून ते Googleplex असे ठेवण्यांत आले.


) Googolplex (स्पेलींग नीट पहा) हाही एक स्वतंत्र इंग्रजी शब्द आहेत्याचा अर्थ आहे १ ह्या आकड्यावर एक Googol शुन्य ठेवल्यानंतर येणारी संख्या. A cardinal number represented as 1 followed by a googol of zeros (ten raised to the power of a googol)

) Googleplex (अगदी तेच स्पेलिंग) शब्द पहिल्यांदा वापरात आला तो १९७७ सालीतेव्हा गुगलचे संस्थापक सर्जी ब्रिन आणि लॅरी पेज हे बोबडं बोलण्याच्या वयातले म्हणजे फक्त तीन साडेतीन वर्षांचे होते. Googleplex हे नाव बीबीसी रेडिओवर प्रसारित झालेल्या एका जगप्रसिद्ध मालिकेत १९७७ साली आलंती जगप्रसिद्ध रेडिओ मालिका म्हणजे डग्लस अडॅम्स लिखित The Hitchhiker's Guide to the Galaxy.

) The Hitchhiker's Guide to the Galaxy मध्ये जो अत्यंत शक्तीमान असा काँप्युटर दाखवला गेला आहे त्या काँप्युटरच्या भल्या मोठ्या नावाची अद्याक्षरेGOOGLEPLEX अशीच होती (होय अगदी तेच स्पेलींग)

) Hitchhiker's Guide मधला शक्तीमान संगणक GOOGLEPLEX आणि आजचे सर्वांत शक्तीमान सर्च इंजिन गुगलचे मुख्यालय आवार म्हणजेहीGOOGLEPLEX. दोन्हींचा संबंध शक्तीमान संगणकांशी आणि दोन्हींचे स्पेलींगही तंतोतंत सारखे असावे हा एक मोठाच योगायोग.

आणखी एक योगायोगाची गोष्ट म्हणजे google हा शब्द आता अधिकृतपणे क्रियापद म्हणून इंग्रजी शब्दकोशांनी स्वीकारला आहे. Googol आणि Googolplex हे दोन्ही इंग्रजी शब्दकोशातले शब्द आहेतआता Googleplex हे गुगलच्या मुख्य कार्यालय आवाराचे नावही इंग्रजी शब्दकोशात जाणार का? ह्या विषयी काही माहिती सापडत नाही.

ता.क. ९) अगदी ताजा योगायोग - गुगलचे एक संस्थापक मालक
 सर्जी ब्रिन हे म्हणे लवकरच पर्यटनासाठी अंतराळात जाणार आहेत. त्यासाठी त्यांनी  (११ जून २००८ रोजी) सुमारे २२ कोटी (५ दशलक्ष डॉलर्स ) रूपये भरून अंतराळयान बुक करून ठेवलेही आहे. सविस्तर व अधिकृत बातमीसाठी इथे क्लीक करासर्जी ब्रिनना गॅलक्सीत (अंतराळात) जावसं वाटलं याचं कारणही Googleplex आणि Hitchhikers Galaxy ह्या योगायोगात लपलं असेल कात्याचीही माहिती कुठे सापडत नाही.

वेलगुगलमध्ये शोधून पहायला हवी