वेध भविष्यकाळाचा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
वेध भविष्यकाळाचा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२१ फेब्रु, २०११

माध्यम इंटरनेट

पत्रकारिता, जाहिरात आणि जनसंपर्काशी संबंधित चर्चा किंवा अभ्यासक्रम असला की त्याची सुरूवात हमखास उपलब्ध माध्यमांच्या प्रस्तावनेने होते. छापिल माध्यम अर्थात प्रेस वा प्रिंट मिडीया, मग रेडिओ, त्यानंतर दूरदर्शन, आणि पुढे अगदी चित्रपटापर्यंतच्या विविध माध्यमांचा उल्लेख त्या प्रस्तावनेत अपरिहार्यपणे होतो. वृत्तपत्रांचा जनमानसावरील प्रभाव, दूरदर्शनच्या प्रभावातून उद्भवलेले परिणाम वगैरे विषय अगदी शाळकरी प्रश्नपत्रिकेत सुद्धा निबंध लिहीण्याचे विषय म्हणून डोकावताना दिसतात. बातम्यांची माध्यमं म्हणून वृत्तपत्रे आणि दूरदर्शन पटकन आपल्या डोळ्यासमोर येतात. ह्या व अशासारख्या चर्चेच्या ओघात 'मेरा नंबर कब आयेगा' म्हणत हमखास दरवाजाबाहेर ताटकळत असतं ते इंटरनेट.
इंटरनेट हे माध्यम? 
खरं तर वृत्तपत्र काय किंवा दुरदर्शनची एखादी वाहिनी म्हणजे चॅनल काय, त्यांच्या प्रसारणाला मूळातच भौगोलिक मर्यादा असते. देशातले अगदी सर्वाधिक खपाचे वृत्तपत्र घेतले तरी ते जगातल्या प्रत्येक कानाकोपर्‍यात पोहोचू शकत नाही. ही व्यावहारिक मर्यादा जगातले प्रत्येक वृत्तपत्र मान्य करते. ह्याच मर्यादेवरचा एक उपाय म्हणून इंटरनेटवर वृत्तपत्रांच्या वेबसाईटस आपल्याला अपरिहार्यपणे दिसतात. वॉशिंग्टन पोस्ट किंवा न्युयॉर्क टाईम्स सारखं वृत्तपत्र मुंबई, पुणे गोव्यातल्या प्रत्येक इंग्रजी वाचकापर्यंत पोहोचणं जसं शक्य नसतं, तसच भारताचा टाईम्स ऑफ इंडिया किंवा लोकसत्ता वा गोमांतक न्यु जर्सीतल्या प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचणं अशक्य असतं. जगात कुठेही एखादं विशिष्ट वृत्तपत्र हाती पडलं नाही तरी त्या वृत्तपत्राची वेबसाईट त्या वाचकाची वाचनाची भूक भागवू शकते. म्हणजे, खरं तर इंटरनेट भौगोलिक दृष्ट्या वृत्तपत्राच्या एक पाऊल पुढेच असतं. वृत्तपत्राची ती मर्यादा त्याला कधीच अडवत नाही.
जो प्रकार वृत्तपत्रांच्या बाबतीत तोच दुरदर्शनच्या बाबतीतही आहेच. आजकल किंवा स्टार माझा वा मी मराठी सारख्या वाहिन्या जगभर दिसत नसल्या तरी इंटरनेटवरून त्यांचे प्रसारण जगाच्या कानाकोपर्‍यापर्यंत पोहोचू शकते. दुरदर्शन वाहिन्यांना भौगोलिक मर्यादेबरोबर काळाची मर्यादाही असते. कालची बातमी पहायची तर एक दिवस अगोदरचा पेपर आपण रद्दीतून काढून पाहू शकतो. मात्र कालची बातमी आज पाहण्याची सोय दूरदर्शनवर नसते. कालची बातमी रेकॉर्डरवर रेकॉर्ड केलेली नसेल तर ती उपलब्ध होणं दुरापास्त आणि काही वेळा अशक्यच असतं. इंटरनेटवर ह्या उलट परिस्थिती असते. न्युयॉर्क टाईम्सच्या वेबसाईटवर आज १८५१ सालापासून ते आजतागायत म्हणजे २००८ सालापर्यंत प्रकाशित झालेल्या बातम्या तुम्ही पाहू शकता. थोडक्यात, काळ, वेळ आणि प्रदेशाच्या मर्यादा ओलांडून संपूर्ण पृथ्वीतल व्यापून राहिलेले आजचे इंटरनेट हे माध्यम, प्रेस आणि टीव्ही सारखे स्वतंत्र माध्यम मानायलाच हवे.
३१ ऑगस्ट १९२० रोजी अमेरिकेत डेट्रॉइट (मिशिगन) येथे जगातले रेडिओवरचे पहिले बातमीपत्र प्रसारित केले गेले. भारतात रेडिओची खरी सुरूवात १९३६ साली झाली. १९२० ते १९३६ हा काळ १६ वर्षांचा आहे. १९३६ ते १९४७ ह्या काळात भारतात केवळ ८ आकाशवाणी केंद्रे सुरू झाली होती. म्हणजेच रेडिओ माध्यमाचा प्रसार आपल्या देशात कुर्मगतीने झाला. इंटरनेट मात्र आज अतिशय सुसाट वेगाने भारतात पसरत आहे, आणि जगात होणारी प्रत्येक तांत्रिक प्रगती आपल्यामध्ये सामावून घेत आहे. १९२० किंवा त्या लगतचा अगदी कालपर्यंतच्या काळात ग्लोबल व्हिलेज ही संकल्पना कल्पनेतही आलेली नव्हती. आता ती भारतासह सर्वच राष्ट्रांमध्ये कमीअधिक झपाट्याने रूजते आहे. ह्या ग्लोबल व्हिलेजमध्ये एका गल्लीतला विकास दुसर्‍या गल्लीत व्हायला पूर्वीसारखा दशका दशकांचा वेळ लागत नाही. इंटरनेट हे भारतामध्ये १९९४-९५ मध्ये शहरी लोकांच्या घरात पोहोचले. पुढल्या दहा वर्षांत ते खेड्यापाड्यातही पोहोचले. आपल्याकडील इंटरनेटचा प्रसार हा वायर आणि तारांच्या तांत्रिकतेमध्ये अडलेला नाही. तो आपल्याकडील शिक्षणाच्या धीम्या गतीमुळे व ग्रामीण भागातील इंग्रजी भाषेच्या आकलनाच्या मर्यादांमुळे धीम्या गतीने होतो आहे.
सुपर माध्यमाची बीजे 
छापलेले वृत्तपत्र हे कितीही गुळगुळीत आर्टपेपरवर छापलेले असले आणि डोळे दिपवणार्‍या बहुरंगी छायाचित्रांनी नटलेले असले तरी ते मुके असते. दुसरीकडे दुरदर्शन अगदी जिवंत दृश्य पहात आहोत एवढे प्रेक्षणीय असले तरी ती तशा दृश्यांची एक क्रमवारीने येणारी मालिका असते. न्युज अॅट टेन म्हणून बरोबर दहा वाजता सुरू झालेले दुरदर्शनवरचे वार्तापत्र काही मिनिटांनी पुढे गेले की ते मागे आणता येणे शक्य नसते. चुकलेली बातमी पुन्हा पंधरा मिनिटांनी वा अर्ध्या तासांनी जेव्हा पुन्हा दाखवली जाते तेव्हाच त्या दृश्यांचे दर्शन होते. दुरदर्शन संचावर अग्रलेख वाचता येत नाही, आणि घटना प्रत्यक्ष घडताना वृत्तपत्रात पहाता येत नाही. ह्या दोन्ही माध्यमांच्या त्या मर्यादा इंटरनेटच्या वेबसाईटला अडवू शकत नाहीत. वेबसाईटवर अग्रलेखही वाचता येतो आणि तीन मिनिटांपूर्वी दाखवले गेलेले दृश्य माऊसने एकदा क्लीक केलं की काही क्षणात डाऊनलोड होऊन समोर उलगडू लागते. म्हणजेच छापिल वृत्तपत्र आणि दुरदर्शन दोन्हींचे गुण एकत्र करणारे, व दोन्हींमधील दोषांना मागे सारून पुढे जाणारे माध्यम म्हणून इंटरनेट एकूण शर्यतीत पुढे येताना दिसते.
इंटरनेट प्रेस वा टीव्ही माध्यमांच्या दोषांवर उपाय देत पुढे सरसावते म्हणून त्याला कोणी सुपर माध्यम म्हणेल असे मात्र नाही. इंटरनेट उद्याच्या सुपर माध्यमाच्या दिशेने निश्चित वाटचाल करू शकेल असा एक महत्वाचा गुण त्यात आहे, तो गुण म्हणजे त्याची इंटरॅक्टीव्हीटी. वाचकांच्या प्रतिक्रिया वृत्तपत्रे वा दुरदर्शनकडे जाण्यासाठी काही काळ जावा लागतो. वाचक कागदावर काहीतरी लिहील, तो कागद पोस्टाने वा फॅक्सने वृत्तपत्राकडे किंवा दुरदर्शनकडे पाठवील. त्यानंतर त्या वाचकाची ती प्रतिक्रिया जगापुढे येईल. वृत्तपत्र अशी किती पत्रे छापू शकेल, किंवा दुरदर्शन अशा किती पत्रांचा उल्लेख करू शकेल याला अनुक्रमे वृत्तपत्रातील जागा व दुरदर्शनवरील वेळेच्या मर्यादा आहेत. इंटरनेटवर बसलेला वाचक मात्र काही क्षणात कोणताही कागद न घेता, पोस्ट वा फॅक्सच्या नादी न लागता चटकन आपली प्रतिक्रिया (Comment) वेबसाईटवर नोंदवू शकेल. अशा असंख्य प्रतिक्रिया आल्या तरी त्यांना तिथे जागा कमी पडणार नाही, आणि कोणत्याही वेळी, कोणत्याही दिवशी कोणालाही कुठेही त्या प्रतिक्रिया वाचता येतील. वाचकांच्या प्रतिक्रियांना काही क्षणात उत्तर देणे हेही लेखकाला अशक्य नाही. वाचक वा दर्शक आणि इंटरनेटचे माध्यम यातली ही थेट संवादाची सोय इंटरनेटला सुपर माध्यमाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी खूपच उपयुक्त आहे.
भाषेच्या मर्यादाही मागे पडत आहेत.. 
इंटरनेट म्हंटलं की इंग्रजी अपरिहार्य आहे, आणि त्यामुळेच भारतासारख्या देशात त्यावर मर्यादा पडतील असं काल-परवापर्यंत वाटत होतं. मात्र हिंदी, मराठी किंवा अगदी बंगाली, तामिळ, तेलुगू सारख्या भाषांचे युनिकोड फाँटस उपलब्ध झाल्याने आज अक्षरशः हजारो वेबसाईटस आणि ब्लॉग्ज भारतीय भाषांतून सहजपणे तयार होताना दिसू लागले आहेत. मध्यंतरी जया बच्चन यांनी 'हम युपीवाले है, हम हिंदी में बोलेंगे' हे उदगार काढले आणि त्यावर गदारोळ उठला. ह्या प्रकरणात स्वतः अमिताभ बच्चनला काय म्हणायचय याबद्दल सर्वांनाच कुतूहल होते. अमिताभला जे म्हणायचे होते, ते अमिताभने भारताबाहेर असताना आपल्या ब्लॉगवर लिहीले. हा ब्लॉग अमिताभचा अधिकृत ब्लॉग असल्याने तो विश्वासार्ह होता. अमिताभ वृत्तपत्रांना वा वाहिन्यांना मुलाखतीसाठी उपलब्ध होऊ शकला नाही, तरी ब्लॉगवरील त्याच्या स्वगतावरून सर्व वृत्तपत्रांनी व वाहिन्यांनी सविस्तर बातम्या दिल्या. जगभरात अक्षरशः लाखो लोकांनी तो ब्लॉग वाचला. आपल्या हजारो प्रतिक्रिया त्यावर नोंदवल्या. अमिताभचा हा ब्लॉग इंग्रजीत होता. मात्र ज्यांना चांगले इंग्रजी येत नाही, असे महत्वाचे पुढारी वा तत्सम महत्वाच्या व्यक्तींना आज हिंदी, मराठी वा तत्सम भाषेत आपला ब्लॉग तयार करणे आज शक्य आहे. इंटरनेटने इंग्रजी भाषेचा अडथळा मागे टाकला आहे ही बाब भारतासारख्या बहुभाषी देशाच्या दृष्टीने खरोखरीच क्रांतीकारक आहे.
इंटरनेटच्या बाबतीत डिजिटल डिव्हाईड च्या मुद्याबद्दल नेहमीच चर्चा होते. १९९५ साली भारतात आलेले इंटरनेट २००८ साली दुरदर्शनसारखे घराघरात गेलेले असेल असा दावा किंवा अपेक्षा कोणीच करणार नाही. त्यातही त्यातील भाषेचा वापर हा आजच्या पेक्षाही अधिक सुलभ होण्याची गरज आहे. भारतीय भाषांच्या युनिकोड तंत्राची प्रगती आजही पुढे सरकते आहे. २०१० सालापर्यंत तिला पुर्णत्व येईल अशी आशा बाळगली जात आहे.
सर्वसामान्यांची पत्रकारिता 
वृत्तपत्रांतील वाचकांची पत्रे हा नेहमीच एक महत्वाचा भाग मानला जातो. कित्येकदा जेथे बातमीदार पोहोचत नाही अशा एखाद्या मुद्यापर्यंत एखादा वाचक पोहोचलेला असतो. तो पत्र लिहून ती बाब वृत्तपत्राला कळवतो तेव्हा आश्चर्याचे धक्के बसतात, आणि चक्रे वेगाने फिरतात. अशी उदाहरणे आपल्याला पहायला मिळतात. आता ह्या वाचकांच्या पत्राच्या पुढे नेणारी सर्वसामान्यांची पत्रकारिता किंवा सिटीझन्स जर्नालिझम जगभरात बहरताना दिसतो आहे. माध्यमांच्या दृष्टीने म्हंटले तर एकीकडे हे आव्हान आहे, तर दुसरीकडे ते एक वरदानही आहे. ज्या वृत्तपत्राकडे सिटीझन जर्नालिझमची जास्तीत जास्त शक्ती असेल, वा ज्या वाहिनीकडे जास्तीत जास्त संख्येने नागरिकांकडून प्रत्यक्ष घेतलेल्या व्हिडिओ क्लीप्स येत असतील अशा वाहिनींची ताकद इतरांपेक्षा अधिक असणार आहे. प्रगत होत चाललेले तंत्रज्ञान एकीकडे सोपे आणि दुसरीकडे किंमतीला अतिशय स्वस्त व परवडण्याजोगे असल्यानेच सिटीझन जर्नालिझमचा प्रवाह दुथडी भरून वाहू लागणार आहे. शे दोनशेला मिळणारा डिजिटल कॅमेरा शेकडो छायाचित्रे घेऊ शकेल व त्यातली अनेक छायाचित्रे इंटरनेटवरून अपलोड होऊन क्षणार्धात वृत्तपत्रे व वाहिन्यांकडे पोहोचू शकतील. हाच प्रकार काही फरकाने व्हिडिओ कॅमेर्‍यांच्या बाबतीतही होणार आहे.
खर्‍या अर्थाने मल्टीमिडिया 
सर्वसामान्यांची पत्रकारिता हे खरं तर उद्याचे एक स्वतंत्र माध्यम म्हणून उभं राहण्याची शक्यता आहे. आजचे ब्लॉग्ज हे त्याच दृष्टीने वाटचाल करीत आहेत. वृत्तपत्रे व वाहिन्या देऊ शकणार नाहीत एवढा मजकूर, चित्रे, छायाचित्रे, विचार असा समृद्ध ज्ञानखजिना ब्लॉगचे माध्यम जगापुढे ठेवत जाणार आहे. इंटरनेटच्या पोटात अशा प्रकारची छोटी मोठी माध्यमं नांदत राहणार आहेत. त्यांचा थेट परिणाम आज ज्यांना आपण माध्यमं म्हणतो त्यावर होत जाणार आहे. प्रगत राष्ट्रांतील कित्येक दैनिक वृत्तपत्रांमध्ये आज दररोज वैशिष्ट्यपूर्ण वेबसाईटस व ब्लॉग्जची माहिती वाचकांना दिली जात असते. भाषिक वृत्तपत्रे त्या दृष्टीने आज मागे दिसतात. पण उद्या त्यांना हा भाग ठळकपणे द्यावाच लागणार आहे.
इंटरनेटच्या मर्यादा आणि उद्या 
इंटरनेटचं ताकदवान माध्यम कोणत्याही मर्यादांविना उभं आहे असं चित्र मला इथे रंगवायचं नाही. हे मुद्दे निघाले की हमखास समोरून प्रश्न येतो, की आम्ही बसमध्ये वा रेल्वेगाडीत बसून वृत्तपत्र वाचत जातो. इंटरनेटचं तसं कुठे करता येतं? आरामखुर्चीत बसून इंटरनेटवरचा पेपर कुठे वाचता येतो? किंवा प्रकाशमान संगणकी स्क्रीनवरचं एक पान वाचलं की डोळ्यातून पाणी येऊ लागतं. ह्या इंटरनेटच्या आजच्या काही मर्यादा जरूर आहेत. मोबाईल फोनवर इंटरनेट दिसतं, ते कुठेही पहाता येतं असं मी म्हणणार नाही. कारण त्यात तर प्रचंड मर्यादा आहेत. पण एक लक्षात घ्यायला हवं की गरज ही शोधाची जननी असते. शास्त्रज्ञांचे आजचे प्रयत्न ई इंक आणि ई पेपर च्या दिशेने चालले आहेत. झेरॉक्स, मोटोरोला सारख्या कंपन्या गेली काही वर्षे अब्जावधी रूपये खर्च करून संशोधन करीत आहेत. ई पेपर २०१५ च्या आसपास प्रत्यक्षात येईल अशी चर्चा तज्ज्ञ आणि माहीतगार मंडळी करीत आहेत. ई पेपर असेल आपल्या रोजच्या पेपर सारखाच. संपूर्ण आकाराचा. उदबत्तीचा गोल आकाराचा सुरनळीसारखा बॉक्स असेल तशी सुरनळी ह्या पेपरची होईल. ती तुम्ही जवळ ठेवायची. दर पाच दहा मिनिटांनी त्यातला मजकूर व छायाचित्रे बदलत असतील. तुम्हाला वेळ मिळाला की पेपरची ती सुरनळी सरळ करायची. आलेली ताजी बातमी पहायची. सुरनळी परत ठेवून द्यायची. जे दैनिक हवे त्याची वर्गणी भरलेली असली की त्यावर त्या बातम्या आपोआप उमटत राहणार. ई इंक चे अतिसुक्ष्म कण त्या ई पेपरवर आपोआप इकडे तिकडे होऊन नवनवी अक्षरे, मथळे, छायाचित्रे रिमोट पद्धतीने त्यावर उमटणार. बातमीदार तसच काम करत असणार. अग्रलेख तसेच येत राहतील. लेख तसेच असतील. फक्त पेपर आणि इंक बदलेल.
आज हा सारा प्रकार वाचताना स्वप्नवत आणि अशक्यप्राय वाटतोय. ते स्वाभाविक आहे. पण हे स्वप्न सत्याकडे वाटचाल करत हे देखील वास्तव आहे. ह्या दृष्टीने चाललेले अनेक प्रयोग यशस्वी होत आहेत. विज्ञानाची झेप मानवी मेंदूच्या पलिकडची असते. फॅक्स किंवा दुरदर्शनची कल्पना अठराव्या -एकोणीसाव्या शतकात अशक्यप्रायच वाटली होती. पण विसाव्या शतकात ते वास्तवात आलं. आपण माध्यमांची चर्चा आज करतोय ती आजचे संदर्भ डोक्यात घेऊन. उद्याचे प्रगत संदर्भ डोक्यात घेतले की वाटतं आपला ई पेपर उघडला की पहिल्या पानावर आलेली ताजी बातमी त्यावरची व्हिडिओ क्लीप पहात आपल्याला वाचता येईल. अशा वेळी प्रेस मिडीया विरूद्ध टीव्ही मिडीया अशी विसाव्या शतकात झालेली ऐतिहासिक चर्चा ऐकून हंसू आल्याशिवाय राहणार नाही.
एक मात्र नक्की, की माध्यमांचे दृश्य बदलले तरी त्याचा आत्मा बदलणं विज्ञानाच्या ताकदीबाहेरचं आहे. माणसाची चाल पायावरच राहणार आहे. आजचा कागदी पेपर असो की उद्याचा ई पेपर माणसाची चाल पायांनी आणि विचार डोक्यातूनच येत राहणार आहे. ई पेपर आल्याने माध्यमांच्या भूमिकेत मोठा बदल संभवतो अशी चर्चा मात्र जगभर कुठेही चाललेली दिसत नाही.

वेबचे संदर्भशास्त्र

ग्रंथालय आणि तेथील ग्रंथ व तत्सम सामग्री ह्या परंपरेने चालत आलेल्या संदर्भांच्या मुख्य खाणी.एखाद्या विषयाचा नव्याने अभ्यास सुरू केलेला कोवळा विद्यार्थी असो की संशोधनात गुंतलेला एखादा पीएच.डी. किंवा एम.फील. चा विद्वत्तेची झालर प्राप्त झालेला अध्यापक असो, संदर्भाच्या खाणीत गेल्याशिवाय विषयाला खोली आणि समृद्धी लाभणं अवघडच. संदर्भासाठी 'पावले चालती ग्रंथालयाची वाट' आणि 'बोटे चाळिती पुस्तकांची पानं' हे नेहमीचच. एरवी महाविद्यालय प्रशासनात व्यस्त झालेल्या प्राचार्यांचीही अध्यापन आणि संशोधनाशी असलेली नाळ कायम असते. मग संदर्भांसाठी केबिनमध्ये ग्रंथ मागवणं, किंवा काही वेळा चक्क केबिन सोडून ग्रंथालयात जाऊन बसणं ज्यांना चुकलं असे प्राचार्य असणं दुर्मिळच. संदर्भ हे पुस्तकाच्या किंवा माणसाच्या माध्यमातून उपलब्ध होणं ही विसाव्या शतकापर्यंतची परंपरा आज एकविसाव्या शतकातही तशीच, तेवढच महत्व असलेली दिसून येते. जेव्हा एखादा संदर्भ पुस्तकात सापडत नाही तेव्हा हमखास एखाद्या अनुभवी ज्ञानवंताला दुरध्वनी करायचा, किंवा अगदी भेटायला जाऊन त्यांचा सल्ला घ्यायचा हे नेहमीच घडतं. असं न घडता डॉक्टरेट पदरात पडलेला संशोधक सापडणार नाही. पुस्तक आणि माणसं ह्या संदर्भाच्या दोन आद्य स्त्रोतांमध्ये आता भर पडली आहे ती वेबची अर्थात इंटरनेटची. पुस्तकं ही साधी सरळ, गरीब स्वभावाची, गंभीर, काहीशी पोक्त आणि आज्ञाधारक विद्यार्थ्यांसारखी असतात. संदर्भ देऊन ती पळून जात नाहीत. किंवा, संदर्भ देताना थट्टामस्करी करून अवसानघात करत नाहीत. त्यांची ही अशी खात्री देता येत असल्याने पुस्तकांतल्या संदर्भांवर अवलंबून राहता येतं.
पण वेब उर्फ इंटरनेट नामक संदर्भस्त्रोत हा पुस्तकाच्या अगदी उलटा वाटतो. वेब म्हणजे खट्याळ स्वभावाचा, काहीतरी संदर्भ दिला आणि तो संदर्भासहित वेबसाईटच गायब झाली हा अनुभव अशक्य नसतो. चुकीचे संदर्भ छातीठोकपणे देऊन नंतर पुढे त्यात परस्पर दुरूस्ती अपलोड करून टाकणं हे पुस्तकांत घडणं अशक्य, पण वेबमध्ये सर्रास घडू शकतं. कुणातरी तिसर्‍याच्या नावे चौथ्याने काहीतरी संदर्भ सांगून टाकून वेबवर थरार निर्माण करून थट्टामस्करी करणार्‍या साईटस् आणि ब्लॉगची तर रेलचेलच असते. अशा ह्या वेबच्या संदर्भांवर किती अवलंबून रहायचं. हा मोठाच प्रश्न संदर्भाच्या ग्राहकांपुढे असतो.
संदर्भ ही एक वस्तू (कमोडिटी) मानून ह्या प्रश्नाचा विचार केला तर त्यातून थोडा मार्ग सापडतो. संदर्भाची मग एक बाजारपेठ कल्पनेत तयार होते. बाजारपेठ म्हंटलं की मग निरनिराळे प्रवाह असणार हे ग्राहकाला गृहित धरायचच असतं. पुस्तकांतील संदर्भ ही एक बाजारपेठ आणि वेबवरील संदर्भ ही दुसरी वेगळी बाजारपेठ धरून विचार करीत थो़डं आणखी पुढे गेलं की काही मुद्दे स्पष्ट होऊ लागतात. पुस्तकांच्या बाजारपेठेतही काही उत्पादने दर्जाच्या दृष्टीने निकृष्ट मानून त्यातून संदर्भ उचलणं आपण टाळत असतो. हे इतकं अंगवळणी पडून गेलेलं असतं की त्या बाबतीत हंसाचं नीरक्षीरविवेकाचं तंत्र आपण नकळत अवलंबत असतो. त्यात आपली सहसा चूक होत नाही. वेबच्या बाबतीत मात्र चूक होते. याचं कारण पुस्तकांची आणि आपली ओळख पिढ्या न पिढ्यांची आहे, आणि वेबचं कार्ट आपल्या टेबलावर काल-परवाचं आलय. त्याची आपली तेवढी घसट नाही. त्यात पुन्हा त्याची वरवर दिसणारी लक्षणं काही ठीक नाहीत. त्यामुळे त्याच्याकडून काही संदर्भ उचलायचे तर आपल्यापुढे भरपूर प्रश्नचिन्ह असतात. काही वेळा ती प्रश्नचिन्ह इतकी नको वाटतात की वेबच्या संदर्भांवर नकळत अघोषित बहिष्कार टाकून आपण केवळ पुस्तकांतील संदर्भांवर गुजराण करतो. ते सोयीचही असतं आणि खात्रीचंही असतं.
पण वेबला संदर्भांच्या बाबतीत असं वाळीत टाकणं एकविसाव्या शतकात परवडणारं राहिलेलं नाही. वेब लायब्ररीयनची संकल्पना आता रूजली आहे. लायब्ररी म्हणजे फक्त पुस्तकं ही पारंपारिक संकल्पनाही आता नदीचं पात्र विशाल व्हावं तशी प्रचंड रूंदावलेली आहे. लायब्ररीत आता ईबुक्स, सीडीज, डीव्हीडीज स्थिरावल्या आहेत. त्यांची उपयुक्तता स्वीकारली गेली आहे. त्या ईबुक्स, सीडीज आणि एकूणच ईसंदर्भांचं मूळ बीज आपल्याला वेबवर कुठेतरी सापडतं. लायब्ररीतली एकूणच ईसामग्री वेबच्या ऐरणीवर ठाकून ठोकून पाहून तपासणं शक्य असतं. वेब हे द्वाड कार्ट असलं तरी ते फार हुशार, प्रचंड स्मरणशक्तीची क्षमता असलेलं, रोजच्या रोज येऊन पडणारी नवनवी माहिती आत्मसात करून ती ज्ञानदूताच्या भूमिकेतून उपलब्ध करणारं असं गुणी पोरंही आहे. प्रश्न इतकाच की त्यातला द्वाडपणा पारखून आणि ज्ञानाची शक्तीस्थळे ओळखून त्याला संदर्भाच्या कामाला नेमकं कसं लावायचं?
प्रिंट बुक आणि ईबुकचा विषय नेहमी निघतो. तो निघाला की पहिला मुद्दा मी तरी मांडतो तो हा की प्रिंट बुक्स म्हणजे मुक बधिर विद्वानासारखी आहेत. तुमचं काही ऐकून घ्यावं किंवा तुमच्याशी काही संवाद साधावा यासाठीची इंटरॅक्टीव्ह क्षमता त्यांच्याकडे नाही. छापिल पुस्तकांतील पानं ही जुन्या तोफा आणि रणगाड्यांसारखी. ईबुक्समधील ऑडिओ, व्हिडिओ आणि सर्चची क्षमता आजच्या अत्याधुनिक दूर पल्ल्याच्या अचूक क्षेपणास्त्रांसारखी. त्यांना जोड रोजच्या रोज अपडेट होणार्‍या वेबची. अशा ह्या अफाट शक्तीमान तंत्रज्ञानाच्या मुसक्या बांधून त्याला आपल्या संदर्भाच्या कामासाठी लावणं, आणि ते काम त्याच्याकडून पूर्ण विश्वासार्हतेनं करून घेणं हे आजचं आव्हान आहे. वेबचं संदर्भशास्त्र Referology किंवा Science of Web Referencingहा त्यामुळेच आजचा एक स्वतंत्र आणि आव्हानात्मक विषय आहे. हे काम केवळ वेब लायब्ररीयनवर सोपवून मोकळं होणं ही चूक ठरेल. कारण वेब लायब्ररीनच्या कामाचा आवाकाही काही कमी नाही. वेबवर येणारं सारं केवळ गुगल सारख्या सर्च इंजिनवरूनच शोधून मिळेल हा भोळा समज आहे हे आता आपल्या लक्षात येतय. गुगलला मानवी मेंदूचे म्हणजे वेब लायब्ररीयनचे हात लागणं आवश्यकच आहे. त्यातून सुटका नाही. गुगल सारखी सर्च इंजिन्स ही ज्ञानप्रलयाचे लोंढे आपल्यावर आणून आदळत असतात. आपण त्या पाण्यातून विशिष्ट शिंपले आणि मोती शोधू पहात असतो, पण होतं असं की ज्ञानप्रलयाचा लोंढा इतका भीषण असतो की त्यात आपणच वाहून जातो. शिंपले, मोती तर कुठल्या कुठे जातात. ह्या लोंढ्यातून आपल्याला सावरण्याचं काम वेब लायब्ररीयन बरच करू शकेल. पण त्याच्या शक्तीलाही मर्यादा पडणारच. कुठे काय आहे, हे तो सांगेल. पण कुठलं विश्वासार्ह आहे, ते तपासण्याचे मार्ग कोणते, संदर्भाचे शोध घेण्याच्या नवनव्या क्लृप्त्या कोणत्या, तंत्रज्ञान कोणतं हे संदर्भशास्त्रज्ञ सांगू शकेल.
माझ्यापुढे lii.org नावाची वेबसाईट आहे. Librarians Index to Internet म्हणजे L I I. ही साईट संदर्भशास्त्राच्या दिशेने काम करणारी एक नमुना वेबसाईट आहे असं मला वाटतं. संदर्भाची खाण म्हणून तर ती काम करतेच. पण जगातले अनेक क्रियाशील वेब लायब्ररीयन्स मिळून वेबवरील विश्वासार्ह संदर्भस्थळे जोखतात आणि ती आपल्यापुढे पेश करतात, अशी ह्या साईटची भूमिका आहे. उद्याच्या वेब संदर्भशास्त्राच्या सुरूवातीच्या धड्यांची ही केवळ सुरूवातीची पाने आहेत. त्यात अनेक बदल होत जातील. नवनवी तंत्रे त्यात येऊन मिळतील. वेबवरील 'पॉझिटीव्ह ग्लोबल ग्रुपिझम' केवळ लिनक्ससारखी ऑपरेटींग सिस्टमच तयार करू शकेल असं नाही, तर तो विश्वासार्ह संदर्भस्थळांची मांदियाळीही निर्माण करू शकेल. उद्या असं होऊ शकतं याची जाणीव आज ठेवणं हे आपल्याला क्रमप्राप्त आहे. महाविद्यालयातले अध्यापक आणि ग्रंथपाल काही विद्यार्थी हाताशी धरून आणि वेबसारखे जगव्यापक माध्यम कामाला लावून ह्या दृष्टीने लहान मोठे प्रकल्प आपल्या स्तरावर हातात घेऊ शकतात. वेबचे संदर्भशास्त्र आकार घेण्यासाठी असे प्रकल्प फार उपयुक्त ठरतील यात शंका नाही. वेबचे संदर्भशास्त्र जेवढे आणि जेवढ्या त्वरेने आकार घेईल तेवढे तेथील संदर्भ मानवाच्या कामी येऊ लागतील. वेबच्या आजच्या ज्ञानप्रलयात हिरे-माणकंही वहात आहेत, आणि गटारगंगेचे प्रवाहही उसळ्या घेत आहेत. संदर्भाच्या बाजारपेठेत आज मंदीचे नाही खरे आव्हान तेजीचे आहे.

इंटरनेटच्या भविष्यकाळाची चाचपणी

इंटरनेटला चाळीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दलचे लेख गेल्या दोन महिन्यांतील वृत्तपत्रे आणि नियतकालिकांमध्ये वाचायला मिळाले. त्या निमित्ताने गेल्या चाळीस वर्षांवर एक दृष्टीक्षेप टाकला गेला. त्या चाळीस वर्षांमध्ये १९९९ आणि २००० ही वर्षेही आहेत. ह्या वर्षांमध्ये इंटरनेट जगताचा प्रचंड बोलबाला झाला. १९९९ नंतर संगणकी जगताचे घड्याळ ९९ नंतरचे पुढचे दोन आकडे शुन्य शुन्य होऊन १९०० होणार काय, आणि इयर २के च्या समस्येने जगात काय काय अघटित घडणार याची चर्चा झाली. १ जानेवारी २००० नंतर त्या ताणतणावातून हळूहळू जग मुक्त झालं. त्यालाही आता ९ वर्षे झाली. पुढे सन २००० मध्ये डॉट कॉम चा बुडबुडा फुटला आणि जगातल्या अनेक डॉट कॉम कंपन्यांना आपला गाशा त्या काळात गुंडाळावा लागला होता. तेव्हा इंटरनेटचं आता पुढे काय होणार अशीही भितीयुक्त चर्चा ऐकू येत असे.
१९९९ साली जे झालं ते होऊन गेलं. २००९ मध्ये जे चाललय ते आपल्याला दिसतय. ह्याच क्रमाने पुढे जाऊन २०१५ ते २०१९ ह्या दरम्यान संगणकीय आणि इंटरनेटचं जग कसं असेल याविषयी सर्वांनाच उत्सुकता आहे. मूळात (आणि मुख्यतः) ज्या अमेरिकेतून इंटरनेटचं तंत्र विकसित होत गेलं तेथे तर ही उत्सुकता अधिकच असणार हे ओघानच आलं. भविष्यकाळातील इंटरनेट ह्या विषयाचा अतिशय खोलवर विचार करणारा एक अहवाल अमेरिकेतील एलॉन विद्यापीठ आणि प्यु इंटरनेट ही संशोधन संस्था ह्या दोघांनी संयुक्तपणे तयार केला आहे. येत्या १५० वर्षांत इंटरनेट कोणकोणते अवतार धारण करेल याचे अतिशय शास्त्रशुद्ध अंदाज ह्या अहवालात मांडण्यात आले आहेत. एलॉन विद्यापीठ आणि प्यु इंटरनेट ह्या दोन्ही संस्था असा अहवाल तयार करण्यासाठी अत्यंत सक्षम आहेत. इंटरनेट ह्या विषयाच्या सर्व अंगांच्या तज्ज्ञांचा ताफा ह्या दोघांकडेही आहे. अशा मोठ्या अभ्यास प्रकल्पांसाठी जी आर्थिक ताकद लागते तीही त्यांच्याकडे आहे. त्यामुळेच त्यांचा हा अहवाल महत्वाचा मानला जातो.
ह्या अभ्यास प्रकल्पाने २००० साली कामास सुरूवात केली. फ्युचर ऑफ इंटरनेट हे त्यांच्या प्रकल्पाचं नाव होतं. ह्या प्रकल्पाचा पहिला सर्व्हे हा २००४ ते २०१४ ह्या काळाबद्दल होता. ह्या दहा वर्षांच्या काळात इंटरनेटचं नेमकं काय होईल यासंबंधी त्यांनी जगातल्या तमाम संशोधक व तज्ज्ञांची मते मागवली होती. एकूण १३०० जणांनी आपली मते ह्या प्रकल्पाकडे पाठवली. २००४ ते २०१४ ह्या दशकात इंटरनेट, आपली कामाची जागा (वर्क प्लेस), कौटुंबिक जीवन, शिक्षण आणि अशाच आणखी काही विषयांवर नेमका कोणता परिणाम करेल ह्या प्रश्नाचं उत्तर त्या १३०० तज्ज्ञांनी दिलं होतं. ह्या आणि अशा प्रकारच्या सातत्याच्या अभ्यासातून आता ह्या प्रकल्पाने काही पुस्तकेही प्रकाशित केली आहेत. ते काम आजही अखंड चालू आहे. येत्या १५० वर्षांत इंटरनेटचं काय होणार हा प्रश्न फार मोठा आहे. १५० वर्षांचा काळ हा तर कल्पनातीत आहे. ज्यांना इंटरनेटच्या येत्या १५० वर्षांबद्दल जाणून घ्यायचं आहे त्यांनी http://www.elon.edu/predictions/ ह्या वेबसाईटला अवश्य भेट द्यावी. येत्या १५० वर्षांत काय होईल याची झलक ह्या साईटने एका २१ पानी सचित्र पुस्तिकेत दिली आहे. ही पुस्तिका पीडीएफ स्वरूपात उपलब्ध असून ती http://www.elon.edu/e-web/predictions/forward150years.pdf ह्या पत्त्यावर वाचता येईल किंवा डाऊनलोड करता येईल. प्यु इंटरनेटची माहिती www.pewinternet.org ह्या वेबसाईटवर वाचता येईल.
२०१० ते २०१९ ह्या येत्या दहा वर्षांच्या काळात इंटरनेटचं नेमकं काय होईल असं ह्या प्रकल्पाला वाटतं? कोणती भाकितं त्यांनी वर्तवली आहेत? ह्या प्रश्नांची उत्तर घेण्यासाठी त्या २१ पानी पुस्तिकेवर नुसती नजर टाकली तरी आपण अचंबित होतो. खरंच असं होईल, हो असं शक्य आहे? की ह्या नुसत्याच कल्पना आहेत? अशी आश्चर्यमिश्रित प्रतिक्रिया आपल्या तोंडून बाहेर पडते. त्यातल्या काही भाकितांकडे ह्या लेखात कटाक्ष टाकू. मूळातच ही २१ पानी पुस्तिका वाचण्यासारखी आहे याचा उल्लेख येथे पुन्हा करावासा वाटतो.
२०१० हे वर्ष सुधारित इंटरनेटचं असेल हे पहिलं भाकित त्यांनी केलं आहे. पुढल्या पिढीचं इंटरनेट हे प्रचंड संख्येने जगभरचे लोक वापरणार आहेत. त्यात फार मोठ्या प्रमाणावर व्हिडिओ तंत्राचा वापर असणार आहे. त्यासाठी आजचं इंटरनेट तंत्र सुधारण्याची गरज आहे. म्हणूनच त्या कामासाठी अमेरिकेच्या नॅशनल सायन्स फाऊंडेशनने फार मोठी आर्थिक तरतूद आज केली आहे. Global Environment for Networking Investigations (GENI) जेनी असं ह्या प्रकल्पाचं नाव आहे. केवळ संगणकच नव्हे तर मोबाईल फोनसारख्या साधनावरील इंटरनेटही ह्या नव्या तंत्राने सुधारेल याकडे लक्ष दिलं जाणार आहे. पूर्वीच्या तंत्राची जागा नवं तंत्र घेताना त्यात सुरक्षिततेचा चोख विचार जेनी करीत आहे. GPS/RFID अर्थात ग्लोबल पोझीशनिंग सिस्टम व रेडिओ फ्रिक्वेंसी आयडेंटीफिकेशन डिटेक्टर्सचे तंत्र अमुलाग्र सुधारणार आहे. काही व्यक्ती व प्राणी हे नेमके कुठे आहेत हे एका क्षणात त्यामुळे जाणता येणार आहे.
२०११ मध्ये अमेरिकेत एक नवा सुपर काँप्युटर जन्म घेत आहे. तो एका सेकंदाला 1,000,000,000,000,000,000,000,000 एवढी ऑपरेशन्स करू शकेल. ह्या मापाला एक पेटाफ्लॉप असं म्हणतात. जपानचं तंत्र मंत्रालय २०११ मध्ये १० पेटाफ्लॉप क्षमतेचा संगणक तयार करण्याच्या प्रयत्नात आहे. ही क्षमता मानवी मेंदूएवढी आहे. ह्याच काळात, मानवी मेंदूच्या क्षमतेच्या पलिकडे लवकरच संगणक जाईल असं अनेक तज्ज्ञांच मत आहे.
२०१२ मध्ये आपण खातो त्या अन्नपदार्थांच्या बाबतीत संगणक क्रांती करेल. गाई म्हशींसारख्या प्राण्यांना किंवा झाडे व पिकांना विशिष्ट इंजिक्शन्स देऊन त्यातील माणसाला अॅलर्जी ठरू शकणारे घटक थांबवता येतील. ज्या वस्तू खायच्या त्यांतच औषधांचे अंश तयार होतील अशा प्रकारे फळे, भाज्या वगैरे बनू शकतील. २०१० ते २०१४ ह्या काळात काय काय होऊ शकेल याची एक भली मोठी यादी एलॉन विद्यापीठ व प्यु इंटरनेटच्या अहवालात आहे. त्यापैकी ह्या काही शक्यता पहाः
  • माणसाच्या अंगातले कपडे त्याच्या शरीराचे तपमान जाणतील व त्याप्रमाणे रूममधील वातानुकुलित यंत्रणा तपमानाचे नियमन करेल.
  • रूममधील माणसाच्या मूडनुसार तेथील प्रकाश कमी वा जास्त होईल.
  • आर्टिफिशियल इंटेलिजन्स (ए आय) च्या सहाय्याने फुटबॉल व सॉकरच्या कृत्रिम टीम्स तयार होतील. त्यांच्यातील सामने हे टीव्हीवर प्रचंड लोकप्रिय होतील.
  • अंगावरचे टॅटुज हे आज मुक्या चित्रांच्या स्वरूपात असतात. ते चालते बोलते म्हणजे व्हिडिओवर आधारित असतील.
  • बहुसंख्य घरांमध्ये वायरलेस नेटवर्क असेल.
  • टीव्हीवर मॅच पाहताना दर्शकाला मैदानातील हवा तो कोपरा बटणाने फिरवून पाहता येईल.
  • १०० जीबीचे पेन ड्राईव्हज सर्रास वापरात असतील.
  • स्फोटके शोधण्याच्या कामात बॅक्टेरिया (सुक्ष्म जंतू) चा उपयोग होऊ लागेल.
  • संगणकाचा मॉनिटर एखाद्या कागदाएवढा बारीक असेल. तो गुंडाळून कुठेही नेता येणे शक्य होईल. अशा कागदवजा मॉनिटरचा वापर वृत्तपत्रासारखा होईल. केव्हाही हा कागद उघडला तर त्यावर ताज्या बातम्या कुठेही बसून वाचता येतील. ई पेपर व ई इंक ची संकल्पना साकार होऊ लागेल.
२०१५ ते २०१९ ह्या पुढल्या पाच वर्षांत तर चमत्कार वाटाव्या अशा गोष्टी साध्य होऊ लागतील. त्या नेमक्या कोणत्या हे यथावकाश एका स्वतंत्र लेखात पाहू. एक लक्षात घ्यायला हवं की हा अहवाल विश्वासार्ह संस्थांनी तयार केलेला आहे. तो जाहीरपणे इंटरनेटवर प्रकाशितही केला आहे. त्याप्रमाणेच नेमकं घडेल की आणखी काही वेगळं चित्र आपल्याला २०१० ते २०१४ ह्या काळात अनुभवायला मिळेल हे सांगणं अवघड आहे. पण हे सारं येत्या पाच वर्षांतच आपल्याला पहायला मिळेल. घोडं मैदान खरंच फार लांब नाही.

ओसीआर तंत्राच्या प्रतिक्षेत मराठी

 तंत्रज्ञानाचे संदर्भ येतात तेव्हा इंग्रजी भाषा ही इंजिनाच्या ठिकाणी असते, आणि जगातल्या इतर भाषांचे डबे इंग्रजी इंजिनाच्या मागे किंवा त्याचे अनुकरण करीत धावत असतात. ओसीआर अर्थात 'ऑप्टीकल कॅरॅक्टर रेकग्नीशन' हे असंच एक संगणकीय तंत्रज्ञान. जगात आज Abby आणि Nuance ह्या दोन कंपन्या ह्या तंत्रज्ञानाशी संबंधित सॉफ्टवेअर पुरविणार्‍या आघाडीच्या कंपन्या आहेत. ह्या कंपन्यांनी आपल्या कामाचा भाग म्हणून जगभरातील विविध भाषांचा संगणकीय अभ्यास केला आहे. त्यात कोरियन, जपानी. चिनी भाषेपासून ते रशियन आणि सोमाली भाषेपर्यंत एकूण १८६ भाषा आहेत. ह्या १८६ भाषांमध्ये आज तरी आपल्या मराठी भाषेचा समावेश नाही. ओसीआरचे तंत्र आणि मराठीच्या नात्याची अधिक माहिती घेण्यापूर्वी हे ओसीआर प्रकरण नेमकं काय आहे हे प्रथम समजून घेऊ.

'ओसीआर ' म्हणजे 'ऑप्टीकल कॅरॅक्टर रेकग्नीशन'. हे तिन्ही शब्द महत्वाचे आणि तेवढेच अर्थपूर्णही. आपल्याकडे चष्म्याच्या दुकानांच्या नावात 'ऑप्टीशियन्स ' हा शब्द सर्रास दिसतो. त्याच अर्थाची छटा पहिल्या 'ऑप्टीकल' ह्या शब्दात आहे. इंग्रजीत Optic ह्या शब्दाचा अर्थ शब्दकोशाने relating to eye or vision असा दिला आहे. भाषेमध्ये eye or vision हे शब्द लिपी अथवा अक्षरांच्या संदर्भात येणार हे उघड आहे. ओसीआर मधला पुढला शब्द कॅरॅक्टर (अक्षर) हाही त्याला पुष्टी देतो. भाषेतले अक्षर डोळ्याला दिसणे (वा भासणे) याच्याशी Optical Character हे दोन शब्द थेट संबंधित आहेत. त्याच्या पुढे 'रेकग्नीशन' हा शब्द आहे. अक्षर डोळ्याला भासणं आणि त्याचे रेकग्नीशन म्हणजे ओळखणं हे सारं इथे संगणकीय तंत्राच्या संदर्भात आलं आहे. माणसाच्या डोळ्याशी वा त्याला दिसण्याशी त्याचा संबंध नाही.

आजकाल स्कॅनर्स घरोघर येऊ लागलेत. स्कॅनरमध्ये पुस्तकाचे एखादे पान घातले की स्कॅनरचे डोळे ते पान पाहतात व त्याची प्रतिमा आपल्या संगणकाच्या पडद्यावर आणून ठेवतात. एक प्रकारे स्कॅनर त्या पुस्तकाच्या पानाचे छायाचित्रच घेत असतो. हे छायाचित्र घेताना त्या पुस्तकाच्या पानावरील मजकूर कोणत्या भाषेत आहे याच्याशी स्कॅनरला देणे-घेणे नसते. स्कॅनरच्या दृष्टीने मजकूर किंवा त्यातले प्रत्येक अक्षर हा चित्राचा एक भाग असतो. स्कॅनरने पुस्तकाच्या पानाची व त्यावरच्या मजकूराची जी प्रतिमा घेतली त्यातला एखादा शब्द वेगळा काढण्याची वा बदलण्याची सोय नसते. कारण सारा मजकूर मिळून एक संपूर्ण चित्र आपल्या स्क्रीनवर आलेले असते. ओसीआर तंत्रज्ञानाची एन्ट्री ह्या टप्प्यावर होते.

स्कॅन केलेल्या पानावर केवळ चित्र म्हणून दिसणारा जो मजकूर असतो त्यातले प्रत्येक अक्षर ओळखून त्याचे रूपांतर अक्षरात (टायपात किंवा फाँटमध्ये) करण्याचे काम ओसीआर तंत्रज्ञान करते. म्हणूनच त्याला ऑप्टीकल कॅरॅक्टर रेकग्नीशन असे म्हंटले जाते. हे अधिक स्पष्ट करण्यासाठी आपण एक साधे उदाहरण घेऊ. समजा राम गणेश गडकरी यांच्या एकच प्याला ह्या नाटकाचे एक पान आहे. त्यावर सिंधू आणि सुधाकर यांचे मराठी लिपीतील संवाद छापलेले आहेत. नाटकाच्या पुस्तकाची छपाई तीस वर्षांपूर्वी झाल्याने संगणकाच्या फाँटमध्ये ते संवाद उपलब्ध नाहीत. मराठी भाषेत जर ओसीआर तंत्राची सोय असती तर काय होऊ शकले असते पहाः एकच प्याला चे ते पान प्रथम स्कॅन करण्यांत आले असते. स्कॅनिंग केल्यानंतर जी प्रतिमा मिळाली असती त्या प्रतिमेतील शब्द व अक्षरांचे रूपांतर मराठी टायपात (फाँटमध्ये) केले गेले असते. तीस वर्षांपूर्वी राहून गेलेली एखादी प्रुफरिडींगची चूक दुरूस्त करून त्या पानावरचा तो शब्द पुन्हा बिनचूक टाईप करता आला असता. त्या पानावरचा एखादा परिच्छेद वेगळा काढणं शक्य झालं असतं. पानावरील मांडणी बदलता आली असती. मूळ पानावरचा टाईप वाचायला लहान आहे असं वाटल्यानंतर तो मोठा करता आला असता. त्याही पेक्षा नाटकातला एखादा संदर्भ शोधण्यासाठी अभ्यासकांना आणि विद्यार्थ्यांना 'सर्च ' ची सुविधा उपलब्ध झाली असती.

इंग्रजीसाठीचं प्रगत ओसीआर तंत्र 

इंग्रजीसाठी उपलब्ध असलेलं ओसीआर तंत्र आज अतिशय प्रगत आहे. स्कॅन करून ओसीआर केलेल्या इंग्रजी मजकूरातील अचूकता आज ९५ टक्क्यांहून अधिक असते. संगणक जेव्हा मजकूर ओसीआर करतो आणि अक्षर ओळखतो तेव्हा इंग्रजीत अनेक ठिकाणी संगणकाची कसोटी लागते. इंग्रजीतला लोअर केस मधलं एल (l) हे अक्षर आकड्यातल्या एक (1) सारखं आहे. शब्दातलं अक्षर हे एल आहे की एक आकडा आहे हे ओळखण्याइतका आजचा संगणक बुद्धीमान आहे. अगदी बारीक अक्षर ओसीआर करताना इंग्रजी h च्या जागी n येण्याने चूक होऊ शकते. ओसीआर मधील अशा चुकांचे प्रमाण आज १ किंवा २ टक्के इतकेच उरले आहे. इंग्रजी ओसीआर मध्ये इतकी प्रगती झाल्याने जुने इंग्रजी ग्रंथ अतिशय झपाट्याने ओसीआर होत आहेत व इंटरनेटवरही सर्च सुविधेसह येत आहेत. ज्या १ किंवा २ टक्के चुका इंग्रजी ओसीआर मधून सुटतात त्या सुधारण्यासाठी इंग्रजीचे प्रगत शब्दकोश व दुरूस्त्या कोश उपलब्ध असल्याने इंग्रजीत गेली काही वर्षे ओसीआर तंत्र चांगले स्थिरावले आहे. आपल्या मराठीच्या नशिबात मात्र आज २०१० मध्येही अजून ते स्थिरावणं आलेलं नाही.

मराठी ओसीआर ची स्थिती 

संस्कृत, मराठी आणि हिंदी ह्या भाषांतील सर्व अक्षरे (काही अपवाद वगळता) बहुतांशी सारखी आहेत. एखादं 'ळ' अक्षर वेगळं काढून तिन्ही भाषांसाठी देवनागरी ही एकच लिपी सामायिक ठेवणं तांत्रिक दृष्ट्या सामान्यतः सोयीचं जातं. मराठीतला ओसीआर अडकून पडला आणि हिंदीसाठी किंवा देवनागरी साठी मात्र तो तयार झाला तरी तांत्रिक उसनवारी करून मराठीतलं ओसीआरचं काम होणं शक्य आहे. मात्र मराठी आणि हिंदी दोन्हींसाठी किंवा एकूण देवनागरीसाठी वापरण्यास सोयीचे व स्वीकारार्ह असे ओसीआर सॉफ्टवेअर आज तरी शोधूनही सापडत नाही. जगात आणि भारतातल्या विविध विद्यापीठांमध्ये अनेक संशोधक आणि तंत्रज्ञ त्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत. भारत सरकारच्या अधिपत्याखालील सीडॅकनेही त्यासाठी महत्वपूर्ण काम केले आहे. मराठीसाठी सीडॅकने चित्रांकन नावाचे एक ओसीआर सॉफ्टवेअर आणले आहे. मात्र आजही त्यातल्या बिनचूकपणाच्या मर्यादांमुळे त्याचा वापर वाढलेला दिसत नाही.

मराठीतली जोडाक्षरे, काना-मात्रा, रफार-वेलांट्या, पाय मोडणे, अनुस्वार-चंद्र, र्‍हस्व-दीर्घ वगैरे ओसीआर तंत्रज्ञानापुढील अवघड आव्हाने आहेत. मूळात आत्ता आत्ता कुठे आपण फाँटच्या गोंधळाचा दोन दशकांचा प्रवास करून युनिकोडच्या स्थानकात उतरत आहोत. युनिकोडच्या नव्या गावाचं पाणी आपल्या दैनिक वृत्तपत्रांना अगदी अलिकडे पचू लागलय. काही जण तर अजून त्यासाठी धडपडताहेत. अशा स्थितीत, ओसीआर आणि युनिकोड यांचा मेळ बसून ते इंग्रजीप्रमाणे ९५ टक्क्यांपर्यंत प्रगत होण्यासाठी कदाचित आणखी काही महिने वाट पहावी लागण्याची शक्यता आहे.

मराठी ओसीआर च्या मार्गातील संभाव्य अडचणी 

ओसीआर चे तंत्र मुख्यत्वे जुने मराठी ग्रंथ व कागदपत्रांच्या डिजिटायझेशनसाठी वापरले जाणार आहे. असं समजूया की येत्या काही महिन्यांत मराठी ओसीआरचे एक उत्तम सॉफ्टवेअर आपल्या हाती आले व त्यातील बिनचूकपणा हा ९० टक्क्यांच्या आसपास साध्य झाला आहे. तरीही, इतर काही अडचणी मराठी ओसीआर च्या मार्गात येण्याची शक्यता आहे. त्यातली एक महत्वाची अडचण म्हणजे पूर्वी मुद्रणासाठी विशेषतः हँड कंपोजिंगमध्ये वापरला गेलेला टाईप. मराठी मुद्रणात पूर्वी वापरून वापरून झिजलेला टाईप पुन्हा पुन्हा वापरणे हे नेहमीचे होते. वाचकांनाही तेव्हा तसा झिजलेला टाईप वाचताना अडचण येत नसे. पण तशा टाईपात छापली गेलेली पुस्तके वा कागदपत्रे ही ओसीआर तंत्रासमोर एक मोठे आव्हान ठरणार आहेत. इंग्रजीत जोडाक्षरे नाहीत. प्रत्येक अक्षर हे स्वतंत्र आहे. त्यामुळे ओसीआर साठी ते खूपच सुकर ठरले. एच (h) आणि एन (n) किंवा e,o, Q, c सारखी इंग्रजी अक्षरे आकारांनी एकमेकांशी साधर्म्य राखणारी असली तरी ती एकमेकांत जोडलेली वा अर्धी नाहीत. तसेच इंग्रजीत अक्षराच्या वर रेघ नाही. मराठीत ही गुंतागुंत एकीकडे आहे, तर दुसरीकडे झिजलेला टाईप. यामुळे मराठीत ओसीआरमध्ये अनेक प्रमाद दिसून येतील व बिनचूकपणाचे प्रमाण खाली येईल. 'र' सारख्या अक्षराची खाली येणारी शेपटी झिजलेली असेल तर तो अर्धा 'ग' होईल. किंवा ध, भ किंवा थ मधील वरचे गोळे झिजले असतील तर अनुक्रमे ते घ, म आणि य होतील. स अक्षराच्या पोटातील आडवी रेघ झिजली असेल तर स चा रा होईल. झिजलेल्या टाईपात छापला गेलेला मजकूर हा ओसीआरसाठी एक आव्हान ठरेल यात शंका नाही.

मराठी ओसीआर आणि राज्य सरकार 

मराठी ओसीआर साठी चांगले सॉफ्टवेअर उपलब्ध होणे ही राज्य सरकारचीही गरज असणार यात शंका नाही. कारण १९६० किंवा तत्पूर्वीपासूनची गॅझेटसची पाने जर सर्चेबल करावयाची असतील तर ओसीआरला पर्याय नाही. ओसीआर उपलब्ध झाल्यास कितीतरी कागदपत्रे पुन्हा टाईप करावी न लागता केवळ स्कॅन करून उपलब्ध होऊ शकतील. ओसीआरसाठीचे संशोधन आय.आय.टी. तसेच केंद्र सरकारच्या सीडॅक व तत्सम संस्थांमध्ये चाललेले असले तरी तेथे सर्व भारतीय भाषांचा विचार केला जात असतो. मराठी ही त्यातील एक भाषा असते. राज्य सरकारने मराठी ओसीआर साठी तातडीने एक अभ्यास गट नेमणे व त्या अभ्यास गटाला संशोधनासाठी व ओसीआर विकासासाठी साधनसामुग्री उपलब्ध करून देणे अत्यावश्यक आहे. महाराष्ट्रात आज अनेक ठिकाणी संगणकविषयक उच्च शिक्षण देणार्‍या संस्था आहेत. त्यांनीही मराठी युनिकोड व ओसीआर चा अभ्यास करणारे सेल स्थापन करावयास हवेत. मराठी हस्ताक्षराचे ओसीआर करण्याच्या विषयात मराठी कॅलिग्राफीसाठी प्रसिद्ध असलेले कै. र.कृ. जोशी यांचेही महत्वाचे योगदान आहे. आजच्या घडीला अमेरिकेत न्युयॉर्कच्या बफेलो विद्यापीठात देवनागरी ओसीआर साठी सातत्याने संशोधन करणारे एक स्वतंत्र केंद्र (Center of Excellence for Document Analysis and Recognition (CEDAR) आहे. त्याची माहिती जिज्ञासूंना http://www.cedar.buffalo.edu/script/Doverview.html ह्या संकेतस्थळावरून घेता येईल. भारताबाहेर देवनागरी ओसीआरसाठी काम करणार्‍या बफेलो विद्यापीठासारख्या इतरही काही संस्था व व्यक्ती आहेत. महाराष्ट्र सरकारने व मराठीशी संबंधित महामंडळांनी ह्या सर्वांशी सतत संपर्कात असायला हवे.

जगात ३० कोटी लोकांना ओसीआरची प्रतिक्षा 

आजमितीस हिंदी, मराठी, संस्कृत ह्या तीन मुख्य भाषांशी संबंधित जगातले ३० कोटी लोक देवनागरी ओसीआरची प्रतिक्षा करीत आहेत. हिंदी हा त्यातला सर्वांत मोठा घटक असला तरी मराठी ही जगातील १५ व्या क्रमांकाची भाषा आहे. महाराष्ट्र हा जगातल्या कितीतरी देशांच्या तोडीचा आहे. सुवर्ण महोत्सवी वर्षांत पदार्पण करणार्‍या महाराष्ट्राकडूनही जगातले हे ३० कोटी लोक अपेक्षा ठेवून आहेत. मराठी व देवनागरी ओसीआर साठी आपले योगदान देणे हे महाराष्ट्रानेही आपले एक कर्तव्य मानायला हवे.

२०१५ नंतरचं इंटरनेट

अमेरिकेतील एलॉन विद्यापीठ आणि प्यु इंटरनेट ह्या दोन संस्थांनी येत्या १५० वर्षांतील म्हणजे भविष्यकाळातील इंटरनेट कसे असेल याचा अंदाज घेणारे अहवाल तयार केले आहेत. ह्या अहवालाची माहिती गेल्या लेखात आपण घेतली. २००९ ते २०१४ ह्या काळातील संभाव्य विकासाचा तपशीलही आपण गेल्या लेखात पाहिला. ह्या लेखात २०१५ ते २०२४ ह्या दहा वर्षांचा काळ कसा असेल याचे ह्या अहवालातील तपशीलांवर नजर टाकू. 

२०१५ ते २०२० चा वेध 

पौराणिक सिनेमांमध्ये नारद मुनी "नारायण नारायण" म्हणतात आणि क्षणार्धात एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी प्रकट होतात हे दृश्य अगदी नेहमीचे आहे. पुराणकाळातले हे चमत्कार केवळ दैवी म्हणून आपण सिनेमापुरते स्वीकारतो. मानवी आयुष्यात हे अशक्य आहे याची जाणीव आपल्याला असते. माणसाला एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जायचे असेल तर त्याला प्रवास करावा लागतो. नारदमुनींसारखे एका ठिकाणाहून दुसरीकडे क्षणार्धात प्रकट होणे माणसाला शक्य नाही हे लहान मुलालाही कळते. मात्र ह्या अशक्यप्राय चमत्काराला प्रत्यक्षात आणण्याची प्रक्रिया इसवी सन २०१५ मध्ये सुरू झालेली असेल असे एलॉन विद्यापीठ आणि प्युइंटरनेटचा अहवाल म्हणतो. तंत्रज्ञानाच्या भाषेत याला 'टेलिपोर्टेशन' असे म्हणतात.

टेलिपोर्टेशन नेमके कसे असेल? ह्या क्षणाला दिल्लीत असणारा माणूस अमेरिकेत न्युयॉर्कला पोहोचणार असेल तर अनेक तासांचा विमानप्रवास अपरिहार्य आहे. हा माणूस भारताचा पंतप्रधान आहे, अमेरिकेचा अध्यक्ष आहे की सामान्य माणूस आहे यावर विमानप्रवासाचे अंतर कमी-जास्त होऊ शकत नाही. काही तासांचा विमानप्रवास हा अपरिहार्य ठरतो. पण टेलिपोर्टेशनमध्ये हे काही तासांचे अंतर काही क्षणांचे होईल. हे नेमकं कसं घडेल हा पाहणं मनोरंजक आहे. दिल्लीत असणारा माणूस एका भल्या मोठ्या कपाटात जाईल. आत गेल्यावर कपाट बंद होईल. विशिष्ट बटण दाबल्यानंतर कपाटातील माणसाच्या शरीरातला प्रत्येक अणूरेणू वेगळा होऊ लागेल. संपूर्ण शरीराचे अणूरेणू वेगळे झाले की ते तसेच्या तसे न्युयॉर्कमधील त्या विशिष्ट स्थळी असलेल्या कपाटात पाठवले जातील. न्युयॉर्कच्या त्या कपाटातील अणूरेणू एकत्र झाले की कपाट उघडले जाईल. आतून दिल्लीतला माणूस बाहेर पडेल.

आज हा सारा प्रकार एखाद्या काल्पनिक विज्ञानकथेतला वाटतो. असं कसं शक्य आहे असा प्रश्न स्वाभाविकच आपल्याला पडतो. ह्या संदर्भात २००५ साली प्रसिद्ध झालेल्या 'टेलिपोर्टेशन - दि इंपॉसिबल लीप' ह्या डेव्हीड डार्लींग नामक ब्रिटीश संशोधकाने लिहीलेल्या इंग्रजी पुस्तकाचा उल्लेख अहवालात आला आहे. डेव्हीड यांनी आपल्या पुस्तकात आत्मविश्वासाने लिहीले आहे की माणसाच्या शरीरातले अणू (Atom) आणि रेणू (Molecules) एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी पाठवण्याचे प्रयोग म्हणजे मानवी शरीराचे अदृश्य वहन करण्याच्या क्रियेचे पहिले पाऊल आहे. त्यानंतर लवकरच अतिसुक्ष्म विघटित अणू रेणू (Micromolecules व Microbes) यांचे अदृश्य वहन करण्याची पायरी असेल.

टेलिपोर्टेशनचा भाग हा माणसाला केवळ दिल्ली ते न्युयॉर्क पाठवण्याइतका मर्यादित मात्र नाही. परग्रहावर पाठवायचे एखादे यान वा यांत्रिक मानव (रोबो) हेही पृथ्वीवरून पाठवले जाऊ शकेल. अंतराळ प्रवास संपूर्णपणे टाळता येणे त्यामुळे शक्य होईल. आज अर्भकावस्थेत असलेली नॅनो टेक्नॉलॉजी त्यासाठी पूर्ण प्रगत होण्याची मात्र गरज आहे. आज रंगीत फॅक्स हा अगदी नेहमीचा झाला आहे. पण चाळीस वर्षांपूर्वी एका ठिकाणी ठेवलेला मजकूर वा चित्र दुसर्‍या खंडातल्या ठिकाणी जसाच्या तसा आणि तोही काही क्षणात उमटू शकेल ही कल्पना परिकथेतच शोभून दिसणारी होती. तेव्हा मुद्दा एका ठिकाणचे चित्र वा मजकूर दुसर्‍या ठिकाणी पाठवण्याचा विषय होता. आज टेलिपोर्टेशनचा विषय आहे इतकाच फरक लक्षात घ्यावा लागेल.

स्वयंचलित वाहनांचे युग 

वाहनचालक नसलेली वाहने हे २०१५ सालामधील एक वास्तव असू शकते असा अंदाज हा अहवाल व्यक्त करतो. त्यासाठी जीपीएस म्हणजे ग्लोबल पोझीशनिंग सिस्टम, सॅटेलाईट नेव्हीगेशन, सेंसर्स, लेझर्स, व्हिडीओ कॅमेरे यांचा उपयोग मोठ्या प्रमाणावर होईल असं शास्त्रज्ञांना वाटतं. ही साधने प्रवासात समोर येणारे अडथळे वा माणसे यांचा अचूक अंदाज घेऊन वाहने हाकतील. त्यांना जो मार्ग ठरवून दिला आहे त्या मार्गांनी ते बिनचूक मार्गक्रमण करतील आणि आपल्या ठरलेल्या ठिकाणी सुरक्षित पोहोचतील. पण अंदाज आणि वास्तव यांच्यात कधी कधी विरोधाभास कसा असतो पहा: जनरल मोटर्स ह्या जागतिक स्तरावरील कंपनीने २००५ साली अंदाज व्यक्त केला होता की २००८ साली ते ड्रायव्हरविना चालणारी मोटर भर ट्रॅफिकमधून ताशी ६० किलोमीटरपर्यंतच्या वेगाने धावडवून दाखवतील. ह्या अंदाजामागे जनरल मोटर्ससारख्या कंपनीचे काही आडाखे असणार यात शंकाच नाही. पण सर्वच बाबतीत परावलंबी असणार्‍या माणसाचं काय होतं पहा. २००८ च्या अखेरीस (म्हणजे आजच्या काळात) जनरल मोटर्स आर्थिक मंदीच्या वणव्यात होरपळते आहे. स्वतःचं अस्तित्व बाजारपेठेत टिकवण्यासाठी पराकाष्ठा करीत आहे.