३ मार्च, २०११
असाही एक सलमान खान...भाग 1
तुम्ही गुगल ईमेज सर्च वर इंग्रजीत सलमान खान असं सर्च केलत तर 0.18 सेकंदात (म्हणजे पाव सेकंदापेक्षाही कमी वेळात) एकूण 32 लाख 80 हजार फोटो उपलब्ध होतात. पण तो दबंगफेम अभिनेता सलमान खान. हा लेख त्या सलमान खान बद्दल नाही. मग ह्या लेखातला कोण हा सलमान?
हा सलमान खान आहे 32 वर्षांचा एक अमेरिकन तरूण. त्याची आई कलकत्त्याची, आणि वडील बांगला देशीय. दोघेही अमेरिकेत स्थलांतरीत झालेले. सलमान खान हार्वर्ड विद्यापीठाचा एम.बी.ए. शिवाय, गणित, इलेक्ट्रीकल इंजिनियरिंग, काँप्युटर सायन्स ह्या विषयाचा पदवीधर (B.S.) म्हणजे तीन डिग्र्या. पुढे, अमेरिकेतील प्रतिष्ठित MIT (Massachusetts Institute of Technology) मधून त्याने इलेक्ट्रीकल इंजिनियरिंग आणि काँप्युटर सायन्स मधील मास्टर्स डिग्रीही (M.S.) घेतलेली. खरं तर एखाद्या मोठ्या कंपनीचा सीईओ म्हणून नेमला जाण्यासाठी अतिशय लायक व्यक्ती.
तसा सलमानखान चांगल्या नोकरीत होताही. करियरचा भला मोठा हायवे त्याला मोकळा होता. एक छंद किंवा आवड म्हणून फावल्या वेळात सलमान त्याच्या नात्यातल्या शाळकरी मुलांना गणित वगैरे शिकवायचा. शिक्षण हा त्याच्या व्यक्तिमत्तवाचा भाग कधीच नव्हता. पण वयाच्या 29 व्या वर्षी म्हणजे सप्टेंबर 2009 मध्ये त्याने आपली लठ्ठ पगाराची नोकरी सोडली. त्याने अचानक शिक्षणाला वाहून घ्यायचं ठरवलं. 'हातचं सोडून पळत्याच्या मागे' ही मराठीतली म्हण त्याला बरोबर लागू होत होती.
सप्टेंबर 2009 ते आता फेब्रुवारी 2011 हा काळ जेमतेम दीड वर्षांचा. अगदी अलिकडचा. ह्या काळात पळत्याच्या मागे धावून सलमानने काय मिळवलं?
सप्टेंबर 2010 मध्ये गुगल कंपनीने सलमानला 2 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 9 कोटी रूपये) देणगी म्हणून दिले. मायक्रोसॉफ्टचे मालक बिल गेटस सलमानला "धिस अमेझिंग गाय" असं म्हणतात. त्यांच्या गेटस फाऊंडेशननेही सलमानला असेच मोठ्या रक्कमेचे (किती ते कळलेले नाही) पारितोषिक दिले आहे. पण ह्या सर्वांवर कडी म्हणजे बिल गेटस यांनी आपल्या मुलीला शिक्षणासाठी सलमानच्या शाळेत प्रवेश घेऊन दिला आहे.
हे सारं काय प्रकरण आहे?
वाचू, असाही एक सलमान खान...भाग 2 मध्ये...
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा