७ ऑक्टो, २०११

स्टीव्ह जॉब्सः एक शापित यक्ष

जी अॅपल कंपनी आपण एका गॅरेजमध्ये चालू केली, जिला उभं करण्यासाठी आपण घाम गाळला, जिचे आपण आज चेअरमन आणि सर्वेसर्वा आहोत तीच अॅपल कंपनी आपल्याला पुढल्या दीड पावणेदोन वर्षांत चक्क काढून टाकेल हे मात्र स्टीव्हच्या स्वप्नातही नव्हतं. पण खुद्द स्टीव्हला स्वतःलाच आपल्या आयुष्यातील चढउतार इतके टोकाचे असतील असं बहुधा वाटलं नसावं. पण तसं घडलं...



एक शापित यक्ष
स्टीव्ह जॉब्सच्या कुटुंबियांनी त्याच्या मृत्यूनंतर एक पत्रक प्रसिद्धीला दिलं. त्या पत्रकाचं शीर्षक आहे ‘Steve died peacefully..”
स्टीव्ह जॉब्स ह्या माणसाला आयुष्यात काय मिळालं नाही? अमेरिकेतला तो 42 व्या क्रमांकाचा श्रीमंत माणूस होता. ऑगस्ट 2011 पर्यंत तो अॅपल कंपनीचा सीईओ होता. अफाट प्रसिद्धी, व्हीव्हीआयपी म्हणून कमालीचा सन्मान आणि शेवटी हेवा वाटावा असा जग हलवणारा शांत मृत्यू तोही वयाच्या अवघ्या 56 व्या वर्षी. स्टीव्ह जॉब्सला वृद्धत्व आलच नाही. ऐन भरात ऐन उंचीवर असताना तो गेला. ह्या साऱ्या वर्णनावरून असं वाटतं की अगदी सरळ साधं आणि सतत चढत्या आलेखाचं आयुष्य स्टीव्हच्या वाट्याला आलं असेल. पण आपलं हे वाटणं अर्धसत्य आहे. स्टीव्हच्या वाट्याला हेवा वाटावं असं यशस्वी आयुष्य आलं हे खरच. पण प्रत्येक यश हे येताना भयानक वाटावे असे चढ-उतार घेऊन आलं.
स्टीव्हचा कॅन्सर हा असाच एक चढ-उतार. 2003 मध्ये डॉक्टरांनी स्कॅनिंग केलं, आणि त्यांनाही धक्का बसला. स्टीव्हला स्वादुपिंडाचा कॅन्सर दिसून आला होता. वेळ फारच कमी होता. “तुमच्याकडे फक्त दोन-तीन महिने आहेत. जी काही व्यवस्था मृत्यूपुर्वी करायची ती करायला लागा” असा डॉक्टरांचा स्पष्ट सल्ला होता. पण अधिक तपासांती स्टीव्हचा कॅन्सर हा अत्यंत दुर्मिळ अशा प्रकारातला असल्याचं दिसलं. शस्त्रक्रिया करून अधिक आयुष्य मिळू शकेल असं दिसून आलं. स्टीव्ह 2003 ते 2011 हा काळ अंगावरचा कॅन्सर आणि नंतरच्या लिव्हर ट्रान्सप्लान्ट शस्त्रक्रियेनंतरच्या मर्यादांना न जुमानता यशाच्या हातात हात घालून जगला. आयट्यूनस, आयपॉड, आयफोन, आयपॅड अशी मी मी म्हणवणारी उत्पादनं त्यानं जगाला दिली. मॅकिंटॉश संगणक काढून त्याने जगाला संगणकाच्या दुनियेत आणलं, आणि आता आयपॅडची पाटी हातात देऊन त्याने टॅबचा श्रीगणेशा जगाकडून गिरवून घेतला.
पण स्टीव्हच्या आयुष्यातले चढउतार हे त्या कॅन्सरपुरतेच होते असं नाही. 56 वर्षांच्या त्याच्या आयुष्यातली 35 वर्ष हा खरा उमेदीचा काळ. जॉब्स हे त्याचे दत्तक आईवडिल. जन्मदाती आई अविवाहित. स्टीव्ह ह्या नात्यामुळे अस्वस्थ असायचा. आपल्या जन्मदात्या आईची माहिती काढण्याचे काम त्याने पैसे देऊन एका डिटेक्टीव्हकडे सोपवले होते. तेव्हा स्टीव्ह फक्त 18 वर्षांचा होता. तो गोंधळलेला होता. कॉलेज अर्धवट सोडलेलं होतं. आयुष्यात अर्थपूर्णता नव्हती. तसा अतारी ह्या डिजिटल गेम तयार करणाऱ्या कंपनीत तो नोकरीस होता. पण लक्ष लागत नव्हतं. त्याने ऐकलं होतं की भारतात नीम करोली बाबा नावाचे एक साधूपुरूष आहेत. कसं कुणास ठाऊक पण त्याच्या मनात नीम करोली बाबांबद्दल आकर्षण निर्माण झालं. भारतात जाऊन येण्यासाठी लागणारा पैसा स्टीव्हकडे नव्हता. आपले खर्च कमी करून आणि मिळेल तेवढी बचत करीत त्याने पैसा जमा केला. आपला मित्र डॅनियल कोटकीला बरोबर घेऊन तो भारतात आला तेव्हा स्टीव्ह फक्त 19 वर्षांचा होता. नीम करोली बाबाचा पत्ता शोधायचा, त्यांचं मार्गदर्शन घ्यायचं आणि आयुष्य अर्थपूर्ण कसं होईल याचा शोध घ्यायचा इतकच साधं उद्दिष्ट होतं. कोणताही व्यवसाय, आयात निर्यात, बाजारपेठ किंवा उत्पादन विक्री त्याच्या डोक्यात नव्हती. तो भारतात आला पण नीम करोली बाबा निवर्तल्याचं कळलं. त्याची ती भारतभेट निरर्थक ठरली. खर्च झाला, वेळ गेला, काम तर झालं नाहीच. पण भारतात स्टीव्ह आणि डॅनियल यांना वाईट अनुभव आले. कमालीचं दारिद्र्य पाहून ते दोघे मूळातच व्यथित होते ते आणखी व्यथित झाले. बाबांच्या शोधात नैनितालजवळ गेला असताना एक साधूसारखे वाटणारे गृहस्थ भेटले. त्यांच्या सल्ल्यावरून स्टीव्हने डोक्यावरचे केस काढून मुंडनही केले. मग एका मागे एक फसवणूक. डॅनियलचे ट्रॅव्हलर्स चेक्स चोरीला जाणं, मार्च (1974) महिन्याचा कमालीचा उकाडा, आणि शेवटी अचानक उदभवलेला जुलाबाचा आजार यामुळे स्टीव्ह आणि डॅनियल त्रस्त झाले. भारतातून निघताना स्टीव्हच्या डोक्यातला विचार पक्का झाला की कार्ल मार्क्स आणि नीम करोली बाबा ह्या दोघांचं कार्य एकत्र केलं तरी त्यापेक्षा अधिक कार्य वीजेच्या दिव्याचा शोध लावणाऱ्या थॉमस एडिसनने केलेलं आहे. हा विचार घेऊन त्याने भारताकडे पाठ फिरवली आणि तो अमेरिकेत गेला. एक प्रकारे वाईट अनुभवांतून काहीतरी चांगलं घेऊन तो अमेरिकेला गेला होता. त्याच्या गोंधळाची जागा एका निश्चित दिशेने घेतली होती.
पुढल्या दोन वर्षांतच एप्रिल 1976 मध्ये आपला मित्र स्टीव्ह वॉझनियाक याच्या मदतीने त्याने अॅपल कंपनीची स्थापना एका साध्या गॅरेजमध्ये केली. वयाच्या 21 व्या वर्षी त्याचा व्यवसाय गॅरेजमध्ये सुरू झाला. यथावकाश व्यवसायाला गती येऊ लागली. पण जवळ भांडवल नव्हते. ते मिळविण्यासाठी ओळखी काढत काढत स्टीव्ह माईक मार्कुला ह्या भांडवलदाराला भेटला. त्याने आर्थिक पाठबळ देण्याचे मान्य केले. माईक मार्कुला पुढली वीस वर्ष अॅपल कंपनीचं यश पावलोपावली पहात होता. 1977 साली अॅपल काँप्युटर इनकॉर्पोरेटेड ही कंपनी नोंदणीकृत झाली. 1978 साल सुरूवातीचे टक्केटोणपे आणि चढउतारात गेलं. 1979 मध्ये एकीकडे मॅकिंटॉश संगणकाचा प्रकल्प अॅपलमध्ये सुरू झाला होता. तर आर्थिक जमवाजमव करण्यासाठी स्टीव्हची पायपीट चालूच होती. 1980 मध्ये स्टीव्हने झेरॉक्स कंपनीतून 15 कर्मचारी कामासाठी बोलावले. मे 1980 मध्ये अॅपल-3 हा संगणक त्यांनी बाजारात आणला. डिसेंबर 1980 मध्ये अॅपल कंपनी शेअरबाजारात आली, आणि पहिल्याच दिवशी शेअरचा भाव 32 टक्के वाढला. कंपनीच्या कर्मचाऱ्यांना अॅपलने शेअर्स दिलेले असल्याने कंपनीचे 40 कर्मचारी पहिल्याच दिवशी लाखोपती झाले. सर्वात जास्त फायदा स्टीव्ह जॉब्सचा झाला. कारण तो कंपनीचा सर्वांत मोठा भागधारक होता. त्याची कमाई 21 कोटी 70 लाख डॉलर्स इतकी प्रचंड झाली. स्टीव्ह मिसरूड फुटण्याच्या वयाच्या पंचविशीत करोडपती झाला होता.
1981 मध्ये आयबीएम कंपनीने आपला संगणक बाजारात आणला होता. स्टीव्हच्या अॅपलची स्पर्धा आता आयबीएम ह्या बलाढ्य कंपनीशी होती. स्टीव्हकडे मॅकिंटॉश संगणकाचा हुकूमाचा एक्का होता. त्याचे पुढल्या आवृत्त्यांचे काम आणि बाजारातील वितरण 1981, 1982 मध्ये चालू होते. एकीकडे व्याप वाढत होता, नवी आव्हाने येत होती आणि दुसरीकडे अॅपल कंपनीतले चढउतार चालूच होते. 1983 साली आयबीएम कंपनीचे संगणक मोठ्या प्रमाणावर खपू लागले. वर्षभरात 10 लाखांहून अधिक संगणक (पीसी) विकण्याचा विक्रम आयबीएमने केला होता. स्टीव्हची अॅपल कंपनी पाच वर्षांतच इतकी वाढली होती की जगातल्या पहिल्या फॉर्च्युन 500 कंपन्यांमध्ये तिची गणना आता झाली होती. वाढता व्याप आणि मोठी व्यवस्था पाहण्यासाठी एका सक्षम आणि स्वतंत्र माणसाची गरज होती. 1983 साली स्टीव्हची 44 वर्षीय जॉन स्कलीशी भेट झाली. जॉन त्यावेळी पेप्सीकोला कंपनीत अध्यक्षपदी फार मोठ्या हुद्यावर होता. त्याचा विषय मार्केटींग हा होता. स्टीव्हने जॉन स्कलीचे मन वळवले आणि त्याला अॅपल कंपनीचे सीईओ पद देऊ केले. ह्याच 1983 मध्ये मायक्रोसॉफ्टने विंडोज ऑपरेटींग सिस्टमचा प्रारंभ जाहीर केला. मायक्रोसॉफ्टचीही घोडदौड सुरू झाली होती. 1984 मध्ये मायक्रोसॉफ्टने वर्ड, एक्सेल आणि पॉवरपॉईंट सॉफ्टवेअर्स बाजारात आणली आणि ती प्रचंड लोकप्रिय झाली. अॅपलनेही मॅकिंटॉश संगणकाच्या नव्या आवृत्त्या बाजारात आणल्या. बाजारपेठेत एका लढाईला तोंड फुटले होते.
जी अॅपल कंपनी आपण एका गॅरेजमध्ये चालू केली, जिला उभं करण्यासाठी आपण घाम गाळला, जिचे आपण आज चेअरमन आणि सर्वेसर्वा आहोत तीच अॅपल कंपनी आपल्याला पुढल्या दीड पावणेदोन वर्षांत चक्क काढून टाकेल हे मात्र स्टीव्हच्या स्वप्नातही नव्हतं. पण खुद्द स्टीव्हला स्वतःलाच आपल्या आयुष्यातील चढउतार इतके टोकाचे असतील असं बहुधा वाटलं नसावं. पण तसं घडलं. 1984 अखेर ते मे 1985 ह्या काळात जॉन स्कली आणि स्टीव्ह जॉब्स यांचं बिनसलं. स्टीव्ह कंपनीचा अध्यक्ष होता, मोठा भागधारकही होता. पण त्याला कंपनीच्या एका विभागाचं जनरल मॅनेजरपद दिलं गेलं. त्याला जाब विचारले जाऊ लागले. मागे निंदानालस्ती सुरू झाली. कंपनीत राजकारण शिरलं. संचालक मंडळ दुर्दैवाने जॉन स्कलीच्या बाजूने उभं राहिलं. सर्व संचालक विरोधात आणि स्टीव्ह एका बाजूला असं वातावरण तयार झालं. अर्थात याला काही प्रमाणात स्टीव्हचा एककल्ली स्वभावही कारणीभूत होताच. पण कंपनीच्या संस्थापकालाच कंपनीतून अपमानित करून काढून टाकण्याचं राजकारण अॅपलमध्ये सुरू व्हावं हे स्टीव्ह जॉब्ससाठी घर आणि घराचे वासे फिरल्यासारखं होतं. स्टीव्ह कडून सर्व कामे काढून घेण्यात आली होती. त्याचं काम काय, तर म्हणे ‘ग्लोबल थिंकर’ – अर्थात जागतिक विचार करणं. म्हणजे काय, तर काहीच नाही. स्टीव्हचं कार्यालयही एका बाजूला हलविण्यांत आलं. त्या कार्यालयाला ‘सैबेरिया’ वाळवंट म्हणून हिणवलं जाऊ लागलं. कुठे संस्थापक म्हणून मानाचा काळ, कुठे ऐन पंचविशीत करोडपती होणं, आणि कुठे वाट्यास एवढं टोकाचं अवमानित आयुष्य येणं? तेही, आपण ज्याला बोलावून आणून पद आणि नोकरी दिली त्याच्या कडून व्हावं? स्टीव्हसाठी तो कसोटीचा काळ होता. शेवटी अॅपल कंपनीने स्टीव्हला घरचा रस्ता दाखवला. चालत्या कंपनीतून काढल्याने स्टीव्हच्या आयुष्यात बेकारीचा काळ सुरू झाला. अॅपलने स्टीव्हला कोर्टातही खेचले. दुसरीकडे जॉन स्कलीने मायक्रोसॉफ्टच्या बिल गेटस यांचेशी हातमिळवणी केली. मॅकिंटॉश संगणकांमधलं तंत्रज्ञान विंडोजमध्ये वापरू देण्याचा करार स्कलीने बिल गेटस यांचेशी केला. सारंच स्टीव्हला मनस्तापाचं होतं. जॉन स्कली आणि स्टीव्ह जॉब्स यांचे संबंध पराकोटीचे बिघडले होते. टोकाचे चढउतार मी म्हणतो ते हे. ते पचवायला वेगळी धमक लागते. ती स्टीव्हच्या अंगात होती. स्टीव्हने स्वतःचं काहीतरी नवं काढण्याचा प्रयत्न करण्याचं ठरवलं. पुनश्च हरि ओम करणं अवघड आहे, याची कल्पना त्याला अर्थातच होती.
1986 साली स्टीव्हने अॅपलचे सर्व शेअर्स विकले. केवळ एक शेअर स्वतःकडे शिल्लक ठेवला. विकलेल्या पैशातून त्याने NeXT Inc ही स्वतःची नवी कंपनी सुरू केली. 1986 ते 1996 ह्या दहा वर्षांच्या काळात NeXT Inc ने स्वतःचे संगणक व NeXTStep नावाची ऑपरेटींग सिस्टमही काढली. बाजारपेठेत शिरकावही केला. पण तोपर्यंत मायक्रोसॉफ्टने आपले अढळ स्थान जगात निर्माण करून ठेवले होते. तो काळ अॅपल, मायक्रोसॉफ्ट आणि आयबीएम यांचा होता. NeXT Inc त्या पुढे मागे पडल्यासारखी होती. खरं तर ह्या टप्प्यावर स्टीव्ह जॉब्स पूर्णपणे पराभूतच व्हायचा. पण चढउतारात चढीचीही आपली पाळी येत असते. 1993 साली जॉन स्कलीने अॅपल कंपनीतून राजीनामा दिला, आणि तो बाहेर पडला. 1996 च्या डिसेंबरमध्ये चमत्कार घडला. अॅपलने चक्क स्टीव्ह जॉब्सची NeXT Inc ही कंपनी 43 कोटी डॉलर्सना विकत घेतली. ह्या व्यवहारामुळे स्टीव्ह पुन्हा आपल्या अॅपल कंपनीत आला. आता त्याचा हुद्दा सल्लागाराचा होता. NeXT Inc व्यवहाराशी संबंधित सल्लागार ह्या नात्याने तो अॅपलचा भाग बनला होता. जुलै 1997 मध्ये अॅपलचे अध्यक्ष आणि सीईओ गिल अमेलिओ यांना कंपनीने राजीनामा देण्यास भाग पाडले. ऑगस्ट 1997 मध्ये सल्लागार स्टीव्ह जॉब्सला अॅपलचा प्रमुख म्हणून नेमण्यांत आले. पुढल्याच सप्टेंबर महिन्यांत स्टीव्ह जॉब्सला सीईओचे पद देण्यांत आले. पुढली 1998, 1999 आणि 2000 ही वर्षे स्टीव्ह जॉब्सचे सीईओपद कायम राहिले. अॅपलही प्रगती करीत राहिली. 2001 आणि 2002 ही नव्या सहस्त्रकाची पहिली दोन वर्षेही आनंदात गेली. आता स्टीव्हच्या उताराची वेळ आली होती. 2003 ने स्टीव्हला स्वादुपिंडाच्या कॅन्सरचा आहेर दिला. तिथेही 2003 ते 2010 चढउतार येत राहिले. दरम्यान अॅपलने आयपॅड आणि आयफोनच्या नवनव्या आवृत्त्या जगाला दिल्या. स्टीव्ह जॉब्स म्हणजेच अॅपल हे समीकरण इतके पक्के झाले की स्टीव्ह जॉब्सची तब्येत बिघडल्याची अफवा जरी आली तरी शेअरबाजारात अॅपलच्या शेअरचा भाव कोसळू लागला. स्टीव्हच्या निधनानंतर अॅपल कंपनीने दुःख व्यक्त केले. apple.com ह्या आपल्या संकेतस्थळावरून सर्व रंग त्यांनी दूर केले, आणि स्टीव्ह जॉब्सचा तेजस्वी मुद्रेचा कृष्ण-धवल कटआऊट फोटो होम पेजवर देऊन त्याखाली लिहीले – स्टीव्ह जॉब्स 1955 ते 2011.
स्टीव्हन जॉब्स हा एक शापित यक्ष होता, हेच खरे.

[ दैनिक नवप्रभा, गोवा, रविवार (9 ऑक्टोबर 2011) अंकासाठी लिहीलेला खास लेख ]

२ टिप्पण्या:

  1. I think intorduction of establishment of pixar animation studio will be add some useful info. which helped steve. it has give steve new success.

    उत्तर द्याहटवा
  2. Thank you Shivaji. Your point about Pixar is very right. I could not cover it since there was a word limit on my writing. Yes, Pixar episode in Job's life was a vital one.

    उत्तर द्याहटवा