२० फेब्रु, २०११

गुगलमधलं I am feeling lucky म्हणजे नेमकं काय?

गुगल सर्चचं Home Page म्हणजे साधेपणाचा कळस आहे. शुभ्र पांढरी पार्श्वभूमी आणि त्यावर दररोज बदलती गुगल नावाची छबी ह्याच दोन गोष्टी त्यावर ठळकपणे दिसतात. इतर बाकी साध्या टायपातले काही बाही, पण आवश्यक शब्द. सर्च करण्यासाठी टाईप करायच्या शब्दांसाठी एक लांबलचक पट्टी आणि त्याखाली Google Search आणि I am feeling lucky ह्या नावाची दोन बटणं. त्यातलं Google Search हे बटण कशासाठी आहे हा प्रश्न कोणालाही पडत नाही. पण दुसरं बटण I am feeling lucky म्हणजे नेमकं काय, आणि ते बटण नेमकं करतं काय हा प्रश्न दहातल्या आठ जणांना पडतो.

गुगल सर्च करताना I am feeling lucky असं स्वतःबद्दल म्हणण्यासारखं काय आहे, असा सरळ आणि भाबडा प्रश्न येणं स्वाभाविक आहे.

ह्या प्रश्नाचं उत्तर समजावून घेण्यासाठी आपण एक साधी कृती करू, म्हणजे हा Lucky प्रकार काय आहे हे आपल्या लक्षात येईल. गुगलच्या सर्च टेक्स्ट फिल्डमध्ये (म्हणजे त्या लांबलचक पट्टीमध्ये Stanford हा शब्द टाईप करा. आता Google Search ह्या बटणावर क्लीक न करता, I am feeling lucky वर क्लीक करा. बघा काय झालं! कोणताही सर्च रिझल्ट समोर आला नाही. एरवी अमुक तमुक क्षुल्लक सेकंदात लाखो सर्च रिझल्ट देणार्‍या गुगलने काय केल? सर्च रिझल्ट न देता त्याने थेट stanford.edu ही वेबसाईट उघडली. याचाच अर्थ तुम्ही लक्की ठरलात. तुम्हाला सर्च रिझल्टमध्ये डोळे घुसवून हवं ते शोधावं लागलं नाही. तुम्हाला स्टॅनफोर्ड विद्यापीठाची वेबसाईट हवी होती, हे गुगलने जाणलं आणि तुम्हाला कोणताही त्रास होऊ न देता सुखाने हवी ती वेबसाईट तुमच्यापुढे उघडली.

आयुष्यात जे हवं ते कोणतीही तोशिस न पडता समोर येण्याचं भाग्य गुगलमध्येही असू शकतं ते हे असं. मराठीत म्हणूनच I am feeling lucky चं भाषांतर 'मी भाग्यवान' असं गुगलनेच केलं आहे. मराठी गुगलमध्ये जसं 'मी भाग्यवान' नावाचं बटण असतं तसं हिंदीत 'आज मेरी किस्मत अच्छी है' नावाचं बटण असतं. गुजरातीत "મારું નસીબ જોર કરે છે" नावाचं बटण आहे.

Stanford प्रमाणेच BBC, White House, Maharashtra हे शब्द टाकून Feeling Lucky दाबून काय होतं ते पहा. बीबीसीची, ओबामांच्या व्हाईट हाऊसची आणि महाराष्ट्र सरकारची वेबसाईट थेट उघडते. एवढं समजून घेतल्यानंतर आपण आजपर्यंत का लक्की ठरत नव्हतो हे आपल्या कायम लक्षात आल्याशिवाय राहणार नाही.

1 टिप्पणी: