२०१५ ते २०२० चा वेध
पौराणिक सिनेमांमध्ये नारद मुनी "नारायण नारायण" म्हणतात आणि क्षणार्धात एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी प्रकट होतात हे दृश्य अगदी नेहमीचे आहे. पुराणकाळातले हे चमत्कार केवळ दैवी म्हणून आपण सिनेमापुरते स्वीकारतो. मानवी आयुष्यात हे अशक्य आहे याची जाणीव आपल्याला असते. माणसाला एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जायचे असेल तर त्याला प्रवास करावा लागतो. नारदमुनींसारखे एका ठिकाणाहून दुसरीकडे क्षणार्धात प्रकट होणे माणसाला शक्य नाही हे लहान मुलालाही कळते. मात्र ह्या अशक्यप्राय चमत्काराला प्रत्यक्षात आणण्याची प्रक्रिया इसवी सन २०१५ मध्ये सुरू झालेली असेल असे एलॉन विद्यापीठ आणि प्युइंटरनेटचा अहवाल म्हणतो. तंत्रज्ञानाच्या भाषेत याला 'टेलिपोर्टेशन' असे म्हणतात.
टेलिपोर्टेशन नेमके कसे असेल? ह्या क्षणाला दिल्लीत असणारा माणूस अमेरिकेत न्युयॉर्कला पोहोचणार असेल तर अनेक तासांचा विमानप्रवास अपरिहार्य आहे. हा माणूस भारताचा पंतप्रधान आहे, अमेरिकेचा अध्यक्ष आहे की सामान्य माणूस आहे यावर विमानप्रवासाचे अंतर कमी-जास्त होऊ शकत नाही. काही तासांचा विमानप्रवास हा अपरिहार्य ठरतो. पण टेलिपोर्टेशनमध्ये हे काही तासांचे अंतर काही क्षणांचे होईल. हे नेमकं कसं घडेल हा पाहणं मनोरंजक आहे. दिल्लीत असणारा माणूस एका भल्या मोठ्या कपाटात जाईल. आत गेल्यावर कपाट बंद होईल. विशिष्ट बटण दाबल्यानंतर कपाटातील माणसाच्या शरीरातला प्रत्येक अणूरेणू वेगळा होऊ लागेल. संपूर्ण शरीराचे अणूरेणू वेगळे झाले की ते तसेच्या तसे न्युयॉर्कमधील त्या विशिष्ट स्थळी असलेल्या कपाटात पाठवले जातील. न्युयॉर्कच्या त्या कपाटातील अणूरेणू एकत्र झाले की कपाट उघडले जाईल. आतून दिल्लीतला माणूस बाहेर पडेल.
आज हा सारा प्रकार एखाद्या काल्पनिक विज्ञानकथेतला वाटतो. असं कसं शक्य आहे असा प्रश्न स्वाभाविकच आपल्याला पडतो. ह्या संदर्भात २००५ साली प्रसिद्ध झालेल्या 'टेलिपोर्टेशन - दि इंपॉसिबल लीप' ह्या डेव्हीड डार्लींग नामक ब्रिटीश संशोधकाने लिहीलेल्या इंग्रजी पुस्तकाचा उल्लेख अहवालात आला आहे. डेव्हीड यांनी आपल्या पुस्तकात आत्मविश्वासाने लिहीले आहे की माणसाच्या शरीरातले अणू (Atom) आणि रेणू (Molecules) एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी पाठवण्याचे प्रयोग म्हणजे मानवी शरीराचे अदृश्य वहन करण्याच्या क्रियेचे पहिले पाऊल आहे. त्यानंतर लवकरच अतिसुक्ष्म विघटित अणू रेणू (Micromolecules व Microbes) यांचे अदृश्य वहन करण्याची पायरी असेल.
टेलिपोर्टेशनचा भाग हा माणसाला केवळ दिल्ली ते न्युयॉर्क पाठवण्याइतका मर्यादित मात्र नाही. परग्रहावर पाठवायचे एखादे यान वा यांत्रिक मानव (रोबो) हेही पृथ्वीवरून पाठवले जाऊ शकेल. अंतराळ प्रवास संपूर्णपणे टाळता येणे त्यामुळे शक्य होईल. आज अर्भकावस्थेत असलेली नॅनो टेक्नॉलॉजी त्यासाठी पूर्ण प्रगत होण्याची मात्र गरज आहे. आज रंगीत फॅक्स हा अगदी नेहमीचा झाला आहे. पण चाळीस वर्षांपूर्वी एका ठिकाणी ठेवलेला मजकूर वा चित्र दुसर्या खंडातल्या ठिकाणी जसाच्या तसा आणि तोही काही क्षणात उमटू शकेल ही कल्पना परिकथेतच शोभून दिसणारी होती. तेव्हा मुद्दा एका ठिकाणचे चित्र वा मजकूर दुसर्या ठिकाणी पाठवण्याचा विषय होता. आज टेलिपोर्टेशनचा विषय आहे इतकाच फरक लक्षात घ्यावा लागेल.
स्वयंचलित वाहनांचे युग
वाहनचालक नसलेली वाहने हे २०१५ सालामधील एक वास्तव असू शकते असा अंदाज हा अहवाल व्यक्त करतो. त्यासाठी जीपीएस म्हणजे ग्लोबल पोझीशनिंग सिस्टम, सॅटेलाईट नेव्हीगेशन, सेंसर्स, लेझर्स, व्हिडीओ कॅमेरे यांचा उपयोग मोठ्या प्रमाणावर होईल असं शास्त्रज्ञांना वाटतं. ही साधने प्रवासात समोर येणारे अडथळे वा माणसे यांचा अचूक अंदाज घेऊन वाहने हाकतील. त्यांना जो मार्ग ठरवून दिला आहे त्या मार्गांनी ते बिनचूक मार्गक्रमण करतील आणि आपल्या ठरलेल्या ठिकाणी सुरक्षित पोहोचतील. पण अंदाज आणि वास्तव यांच्यात कधी कधी विरोधाभास कसा असतो पहा: जनरल मोटर्स ह्या जागतिक स्तरावरील कंपनीने २००५ साली अंदाज व्यक्त केला होता की २००८ साली ते ड्रायव्हरविना चालणारी मोटर भर ट्रॅफिकमधून ताशी ६० किलोमीटरपर्यंतच्या वेगाने धावडवून दाखवतील. ह्या अंदाजामागे जनरल मोटर्ससारख्या कंपनीचे काही आडाखे असणार यात शंकाच नाही. पण सर्वच बाबतीत परावलंबी असणार्या माणसाचं काय होतं पहा. २००८ च्या अखेरीस (म्हणजे आजच्या काळात) जनरल मोटर्स आर्थिक मंदीच्या वणव्यात होरपळते आहे. स्वतःचं अस्तित्व बाजारपेठेत टिकवण्यासाठी पराकाष्ठा करीत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा