२१ फेब्रु, २०११

देशोदेशीचा माहितीकोश

जगात अफगाणिस्तान व अल्बेनिया पासून ते झांबिया आणि झिंबाब्वे पर्यंत अनेकविध देश आहेत. ह्या सर्व देशांची अतिशय बारीक सारीक माहिती अमेरिकेचे हेरखाते आपल्या सी.आय.ए. ह्या गुप्तहेर संघटनेच्या माध्यमातून गोळा करीत असते. ही गोळा केलेली माहिती दर पंधरा दिवसांनी तपासून अद्ययावत ठेवण्याची व्यवस्था सी.आय.ए. कडे आहे. वेगवेगळ्या देशांची इतकी अद्ययावत माहिती गोळा करणारी यंत्रणा जगात दुसरी नसावी. सामान्यतः एखादे हेरखाते जेव्हा अशी माहिती गोळा करते तेव्हा त्याबद्दल पूर्णपणे गुप्तता पाळण्यात येते. पण अमेरिकेच्या सी.आय.ए. चे वैशिष्ट्य हे की गोळा केलेल्या माहितीतील फार मोठा भाग ते जगाच्या माहितीसाठी मोफत खुला करतात. दर वर्षी सी.आय.ए. 'दि वर्ल्ड फॅक्टबुक' ह्या नावाचा एक भला मोठा ग्रंथच पुस्तक रूपाने प्रकाशित करते. गेली दहा वर्षे तर हा ग्रंथ जगासाठी इंटरनेटवर उपलब्ध करण्यांत येत आहे. आज त्याबद्दल 'एंटर' मध्ये लिहिण्याचे कारण म्हणजे हा देशोदेशीचा विशाल माहितीकोश तुम्हीही इंटरनेटवर पाहू शकता, वाचू शकता, त्या माहितीचा संदर्भासाठी उपयोग करू शकता. सी.आय.ए. सारखी जागतिक स्तरावरील आणि अमेरिकन सरकारच्या अधिपत्याखाली अधिकृतपणे काम करणारी संस्था जेव्हा अशी माहिती उपलब्ध करते, तेव्हा तिच्या विश्वासार्हतेबद्दल शंका बाळगण्याचे कारण नसते. इंटरनेटवर ही माहिती पाहण्यासाठीचा वेबपत्ता आहे - https://www.cia.gov/library/publications/the-world-factbook/
दि वर्ल्ड फॅक्टबुक मध्ये १९४ स्वतंत्र देशांची अत्यंत सविस्तर अशी माहिती आहे. त्या व्यतिरिक्त तैवानसारखा अमेरिकेने अद्यापि मान्यता न दिलेला प्रदेश, वा ऑस्ट्रेलिया, ब्रिटन सारख्या खंडांतील काही प्रदेश वा बेटे वगैरेंची भर त्यात घातल्यास जगातील एकूण २६६ भौगोलिक क्षेत्रघटकांची माहिती ह्या कोशात आपल्याला मिळते.
माहितीचे स्वरूप 
एखाद्या देशाची सविस्तर माहिती हा कोश देतो म्हणजे नेमकी कोणती माहिती त्यात आपल्याला मिळते हे समजून घेणे आवश्यक आहे. आपण त्यासाठी आपल्याच देशाचे उदाहरण घेऊ. भारताची माहिती देणार्‍या पानावर जेव्हा आपण येतो तेव्हा सर्वांत वर एक सूचना आपल्याला वाचायला मिळते. 'This page was last updated on 19 June 2008' हे वाक्य पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येते की कोणतेही छापिल पुस्तक आपल्याला इतकी अद्ययावत माहिती उपलब्ध करू शकणार नाही. कारण छापिल पुस्तकातील माहिती कंपोज आणि प्रुफरीड करून पुढे ती छापली जाऊन जेव्हा आपल्यापुढे येते तेव्हा ती किमान महिना दोन महिने तरी जुनी झालेली असते. ते पुस्तक छापल्यानंतर त्याच्या प्रती संपेपर्यंत पुढील आवृत्ती येत नसल्याने छापिल पुस्तकांतील माहिती जुनी जुनी होत जाते. 'दि वर्ल्ड फॅक्टबुक' इंटरनेटवर दर पंधरा दिवसांनी अपडेट होत असल्याने माहितीच्या अद्ययावततेच्या स्पर्धेत ते छापिल पुस्तकाला शर्यतीत खूपच मागे टाकते. ह्या कारणामुळेच जगभरातील लाखो अभ्यासकांसाठी हे फॅक्टबुक म्हणजे एक दैनंदिन संदर्भासाठीचा ग्रंथ झालेला आहे.
आपण पुन्हा भारताच्या पानावर येऊ. भारताविषयीच्या माहितीचे पान आपण आपल्या प्रिंटरवर छापायचे ठरवले तर तो मजकूर ए-४ आकाराची एकूण १६ पाने व्यापतो. म्हणजेच भारतासारख्या एकूण २६६ भौगोलिक क्षेत्रघटकांची माहिती देण्यासाठी हे हँडबुक ३००० हून अधिक पानांचा मजकूर आपल्यापुढे उपलब्ध करते. भारताच्या पानावर सर्वात वर आपला तिरंगा झेंडा आणि भारताचा नकाशा आहे. त्यानंतर भारत देशाची एकूण ऐतिहासिक पार्श्वभूमी थोडक्यात, पण आर्य - द्रविड ते मौर्य काळापर्यंत आणि पुढे इंग्रजांचा अंमल, स्वातंत्र्य चळवळ असे टप्पे घेत आजच्या काळापर्यंत दिलेली आपल्याला दिसते. ही थोडक्यात पार्श्वभूमी संपली की पुढे आपल्यावर माहितीचा एक जबरदस्त धबधबा कोसळू लागतो. भारताचे जमिनी व सामुद्रिक क्षेत्रफळ, सीमारेषांची किलोमीटरमधील लांबी (उदाहरणार्थ चीनची सीमा ३३८० कि.मी., पाकिस्तानची २९१२ कि.मी., नेपाळची १६९० कि.मी. वगैरे), शेती व बिगर शेती जमिनीचे क्षेत्रफळ हे तपशील प्रथम येतात. मग लोकसंख्येचे आकडे दिसू लागतात. त्यात एकूण लोकसंख्या, त्यात स्त्रिया किती, पुरूष किती, ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण किती, जन्म-मृ्त्यूचा दर किती वगैरे माहिती नेमकी दिलेली दिसते. पुढे भारतातल्या एडस आणि एच.आय.व्ही. बाधितांचे आकडेही असतात. धर्माच्या निकषावर लोकसंख्येचे प्रमाण (हिंदू ८०.५%, मुस्लीम १३.४%, ख्रिस्ती २.३%, शीख १.९% वगैरे) देणारी टक्केवारी पुढे येते. कोणत्या भाषा बोलल्या जातात, साक्षरता किती आहे हा आणखी सविस्तर तपशीलही नोंदलेला दिसतो. एवढं झाल्यावर भारतातील सरकारी व राजकीय माहितीचा विभाग असतो. त्यात राज्यांची नावे, राष्ट्रपती प्रतिभा पाटील, पंतप्रधान मनमोहनसिंग, उपराष्ट्रपती हमिद अन्सारी यांच्या नावाचा उल्लेखही असतो. लोकसभेच्या ५४५ जागांपैकी ५४३ निवडणूकीने व २ जागा राष्ट्रपतींद्वारा नेमणूकीने भरल्या जातात हे देऊन काँग्रेस १४७, भाजपा १२९, सीपीआय(मा) ४३, स.प. ३८, शिवसेना १२, राष्ट्रवादी काँग्रेस १० वगैरे पक्के आकडे देऊन सरकारची रचना नेमकी कशी आहे हे दाखवलेलं असतं. राजकीय पक्षांचा तपशील देताना बहुजन समाज पार्टीच्या मायावतींपासून ते शिवसेनेच्या बाळासाहेब ठाकरें आणि काँग्रेसच्या सोनिया गांधींपर्यंत सर्व प्रमुख पक्षप्रमुखांची दखल घेतलेली दिसते. राजकीय दबाव गटात विश्व हिंदू परिषद, रा.स्व. संघ, बजरंग दलापासून ते हुरियत काँन्फरन्सनाही वगळलेले नसते.
राजकीय पार्श्वभूमी एवढी सविस्तर आल्यानंतर आर्थिक बाजू तेवढ्याच तपशीलाने येणं स्वाभाविकच असतं. शेतकर्‍यांचे प्रमाण, मजुरांची संख्या, बेकारांची संख्या, महागाईचा दर, राष्ट्रीय अंदाजपत्रक, पिके, उद्योग, तेल, वायू, खनिजे, आयात-निर्यात, चलन, आर्थिक वर्षाचा तपशील हे सारंही तपशीलाने असतं.
महत्वाची आकडेवारी 
भारतात एकूण लँडलाईन फोन्स २००५ साली ४ कोटी ९७ लाख होते. मात्र २००६ साली भारतातील मोबाईल फोन्सची संख्या १६ कोटी ६१ लाख होती. इतका बारीक तपशील देताना भारताच्या VSAT आणि INSAT पद्धतींचा उल्लेख करायला सी.आय.ए. चे हे हँडबुक विसरत नाही. भारतातील रेडिओ आणि टीव्ही स्टेशन्सची संख्या, इंटरनेट युजर्सची संख्या, इंटरनेट होस्टस, एकूण विमानतळे, विमानतळांच्या धावपट्ट्यांची एकूण लांबी, गॅस पाईपलाईन्सची एकूण लांबी, रेल्वेमार्गाची व महामार्गांची एकूण लांबी, जलमार्गांचा तपशील हा नेमकेपणाने सी.आय.ए. कडे उपलब्ध असतो. मुंबई, गोव्यापासून कांडलापर्यंत महत्वाची बंदरे त्यांनी नोंदलेली असतात.
एवढं झाल्यानंतर आपल्या लष्कराची माहिती त्यांनी दिली नसती तरच नवल. आपलं पायदळ, हवाई दल, आणि नाविक दलाचा तपशील तिथे आपल्याला मिळतो. भारताचे चीन, पाकिस्तान, बांगला देश, श्रीलंका, भूतान वगैरेंशी कसे संबंध आहेत त्याबद्दलचे टिपणही पुढे वाचायला मिळते. पुढे भारतात आलेल्या निर्वासितांची संख्याही दिलेली असते.
वरील परिच्छेदांमध्ये आपण फक्त भारताविषयी कोणती माहिती आली आहे याचा तपशील पाहिला. अशाच प्रकारचा तपशील २५० हून अधिक देशांबद्दल आणि क्षेत्रघटकांबद्दल त्यात आलेला आहे. इंटरनेट वा संगणकावर बसून फक्त गेम खेळण्यात वेळ घालवणार्‍या आबालवृद्धांनी ही माहिती पाहताना चीन-भारत, किंवा भारत-पाकिस्तान, किंवा भारत-बांगला देश वगैरे तुलना करून पाहिली तर गेमपेक्षाही चांगले मनोरंजन होऊ शकेल.
वाचनासाठी मोफत उपलब्ध 
हा सारा माहितीचा खजिना तुम्ही इंटरनेटवर मोफत वाचू शकता. निरनिराळ्या स्पर्धा परिक्षांना बसणार्‍या विद्यार्थ्यांसाठी करन्ट इव्हेंटस वा जनरल अवेअरनेसचे ज्ञान सुधारण्यासाठी ह्या हँडबुकसारखे दुसरे साधन नाही.

ड्व्होरॅक (Dvorak) कीबोर्ड

माणूस परंपरेने चालत असतो असं म्हणतात. काँप्युटरचा कीबोर्ड हे एका परंपरेचच प्रतीक आहे. कीबोर्डची ही परंपरा चालत आली आहे १८७२ सालापासून. म्हणजे कीबोर्डच्या परंपरेला आता १३३ वर्षे झाली. संगणकाचा जो कीबोर्ड आज आपण वापरतो त्याला QWERTY कीबोर्ड असं म्हंटलं जातं. कीबोर्डवर अक्षरांची जी सर्वांत वरची बटणं असतात त्यात QWERTY ही ओळीने पहिली सहा अक्षरं. कीबोर्डवरील अक्षरांची ही रचना आणि पहिला टाईपरायटर तयार केला ख्रिस्तोफर शोल्स ह्या अमेरिकन माणसाने. १८७२ साली शोल्सने त्याचे पेटंट रेमिंग्टन ह्या टाईपरायटर कंपनीला १२००० डॉलर्सना र्विकून टाकले. तेव्हापासून शोल्सने तयार केलेली QWERTY कीबोर्डवरील अक्षरांची रचना काहीही बदल न होता जशीच्या तशी चालत आली आहे. काँप्युटरच्या कीबोर्डनेही शोल्सची ही रचना स्वीकारली आणि ती आता जगभर चालू आहे.
ख्रिस्तोफर शोल्स हा मूळचा एक पत्रकार. १८४५ साली तो 'साऊथपोर्ट टेलिग्राफ' नावाच्या एका छोट्या वृत्तपत्राचा संपादक होता. शोल्स पत्रकार असला तरी त्याच्या पिंडात एक संशोधक भिणलेला होता. तंत्रज्ञानविषयक त्याचे काही ना काही उद्योग सतत चाललेले असतं. कागदावर पान क्रमांक छापण्याचे जे छोटे यंत्र होते त्या यंत्राच्या आधारावर क्रमांकांच्या जागी अक्षरे टाकून त्याने एक मिनी टाईपरायटर तयार केला होता. आपल्या ह्या संशोधनाचं पेटंटही शोल्सने १८६४ साली नोंदवलेलं होतं. टाईपरायटरच्या ह्या टप्प्यापर्यंत QWERTY अक्षररचना शोल्सच्या स्वप्नातही नव्हती. पुढे १८६८ साली त्याने टाईपरायटरचं आणखी एक यंत्र तयार केलं आणि त्याचं पेटंटही आपल्या नावावर नोंदवलं. ह्याच दरम्यान कधीतरी QWERTY अक्षररचना तयार झाली.
खरं तर शोल्सने टाईपरायटरचा जो पहिला प्रयत्न केला होता त्यातली अक्षररचना ABCDEFG अशी क्रमाने म्हणजे अकारविल्हेच होती. ह्या पद्धतीने असलेल्या टाईपरायटरमधील अक्षरांचे दांडे टाईप करताना एकमेकात अडकत असतं. हे दांडे एकमेकात अडकले की टायपिस्टचं काम थांबत असे. टायपिस्टला ते अडकलेले दांडे हाताने सोडवावे लागत आणि मग पुन्हा टायपिंग सुरू करावे लागे. ह्या दोषावर मात करण्याचा प्रयत्न शोल्स आणि त्याचा व्यवसायातला भागीदार जेम्स डेन्समोर हे दोघे करीत होते. टायपिंग करताना नेमक्या कोणत्या अक्षरांच्या दांड्या वारंवार अडकतात याचे निरीक्षण डेन्समोरने केले. त्या निरीक्षणातून वारंवार अडकणार्‍या अक्षरांच्या दांड्यांच्या जागा त्यांनी बदलून पाहिल्या. अशा प्रकारे जागा बदलल्याने मूळची ABCDEFG अशी जी अकारविल्हे अक्षररचना मूळ कीबोर्डवर होती ती बदलली गेली. पण अक्षरांच्या दांड्या अडकण्याचे प्रमाण खूपच कमी झाले. अक्षरांच्या जागा बदलण्याच्या ह्या खटाटोपातूनच QWERTY ह्या अक्षररचनेचा आज वापरात असलेला कीबोर्ड तयार झाला. पुढे रेमिंग्टन टाईपरायटर कंपनीने आपला टाईपरायटर बाजारात आणला तो ह्याच अक्षररचनेला कायम स्वीकारून. पुढे टायपिस्टसच्या कितीतरी पिढ्या हाच कीबोर्ड शिकून आपला टायपिंग स्पीड वाढवत राहिल्या. इतर टाईपरायटर कंपन्यांनीही हीच अक्षररचना कायम ठेवून आपले टाईपरायटर बाजारात आणले.
शोल्सचा हा जो जगभर वापरला जाणारा कीबोर्ड (म्हणजे QWERTY ही अक्षररचना) आहे त्यामागे केवळ टाईपरायटरच्या अक्षरांच्या दांड्या एकमेकात अडकू नयेत इतकाच विचार आहे. आज आपण आपल्या काँप्युटरचा कीबोर्ड वापरतो त्यातही तीच अक्षररचना आली आहे ती केवळ परंपरेतून. ही परंपरा तोडण्याचा अंशतः यशस्वी प्रयत्न केला तो डॉ. ऑगस्ट ड्व्होरॅक ह्या शिक्षणतज्ज्ञाने. ड्व्होरॅक ह्या नावाचा उच्चार करताना सुरूवातीस ड चा अगदी पुसटसा उच्चार केला जातो. तो पुसटसा उच्चार ऐकू न आल्यास डॉ. ऑगस्ट व्होरॅक असेच नाव कानी पडेल. डॉ. ड्व्होरॅक हे वॉशिंग्टन विद्यापीठात सिअॅटल येथे शिक्षणशास्त्र आणि मानसशास्त्राचे प्राध्यापक होते. टायपिस्ट जेव्हा टायपिंग करीत असतो तेव्हा त्याचे काम तणावाचे न होता आरामदायी (Ergonomic) व्हावे आणि टायपिस्टची उत्पादकता वाढावी असा प्रयत्न डॉ. ड्व्होरॅक करीत होते. त्यांनी माणसाच्या बोटांचा शारिरीक व हालचालींच्या दृष्टीकोनातून बारकाईने अभ्यास केला. डॉ. ड्व्होरॅक यांचे हे संशोधन चालू होते १९३० च्या आसपास. १९३२ साली ते पुर्णत्वाला जाऊन त्यांचा नवा कोबोर्ड तयार झाला. १९३६ साली त्यांचे पेटंट अमेरिकन सरकारने नोंदवले. तो काळ दुसर्‍या महायुद्धाचा होता. महायुद्धाच्या समस्येपुढे डॉ. ड्व्होरॅक यांचे हे नवे संशोधन मागेच राहिले. १९७५ साली डॉ. ड्व्होरॅक यांचे निधन झाले. त्यानंतर सात वर्षांनी म्हणजे १९८२ साली त्यांच्या ह्या कीबोर्डला रितसर मान्यता मिळाली. पुढे आयबीएम कंपनीने आपल्या काँप्युटर कीबोर्डसाठी ड्व्होरॅक कीबोर्डचा पर्यायही उपलब्ध केला. १९८४ साली ड्व्होरॅक कीबोर्ड वापरणारे १००००० टायपिस्ट अमेरिकेत होते. १९९५ ची मायक्रोसॉफ्ट विंडोज ९५ आली तेव्हा त्याबरोबर नेहमीच्या QWERTY कीबोर्डबरोबर डव्होरॅक कीबोर्ड देखील उपलब्ध करण्यांत आला. आजही तुमच्या आमच्या संगणकावर तुम्ही ड्व्होरॅक कीबोर्ड वापरू शकता. एक गंमत म्हणून तो वापरून पहायला काहीच हरकत नाही.
तुम्ही जर Windows 98, Windows XP किंवा Windows Vista वापरत असाल तर तुमच्या संगणकावरचा तोच कीबोर्ड कायम ठेवून तुम्हाला ड्व्होरॅक कीबोर्ड (सॉफ्टवेअरच्या सहाय्याने) पद्धतीने टाईप करता येईल. त्यासाठी Help मध्ये जाऊन Dvorak हा एकच शब्द टाईप करून माहिती शोधा. तुम्हाला आवश्यक ती सर्व माहिती Windows Help मध्ये मिळेल. ड्व्होरॅक कीबोर्डचं वैशिष्ट्य म्हणजे त्यात तुम्हाला एका हाताने टाईप करण्याची सोय आहे. आपला नेहमीचा QWERTY हा कीबोर्ड दोन्ही हातांनी टाईप करावा लागतो. पण खूपदा एखादा हात प्लास्टरमध्ये असेल किंवा काही दुखणे असेल तर एका हाताने (डाव्या आणि उजव्या कोणत्याही) टाईप करण्याची सोय ड्व्होरॅक कीबोर्डमध्ये आहे. अर्थात ज्यांना दोन्ही हातांनी टायपिंग करायचे असेल तर तीही सोय अर्थातच ड्व्होरॅक मध्ये आहे.
आता कोणी म्हणेल की हे काहीतरी काँप्युटर सॉफ्टवेअरवाल्यांचे नवे फॅड आहे. तर मंडळी तसं नाही. ड्व्होरॅक कीबोर्ड हा गीनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस मध्येही गेला आहे. २००५ मध्ये बार्बारा ब्लॅकबर्न ह्या महिलेने ड्व्होरॅक कीबोर्ड वापरून दर मिनिटाला २१२ शब्द ह्या वेगाने टायपिंग करून दाखवले. तिचा हा टायपिंग वेग गीनेस बुकवाल्यांनी जगातील सर्वांत फास्ट टायपिंगचा विक्रम म्हणून नोंदवलेला आहे. ह्या कीबोर्डची माहिती विंडोजच्या हेल्पव्यतिरिक्त इंटरनेटवर सर्वत्र उपलब्ध आहे. http://www.gigliwood.com/abcd/ ह्या साईटवर तर A basic course in Dvorak (त्याला ABCD असं छान नाव दिलं आहे) हा कीबोर्ड शिकण्याचा एक कोर्सच उपलब्ध आहे. http://www.mwbrooks.com/dvorak/di.html ही साईट एका सेवाभावी संस्थेची म्हणजे Dvorak International यांची आहे. ही संस्था ह्या कीबोर्डचा प्रचार जगभरात सर्वत्र व्हावा यासाठी प्रयत्नशील आहे. तुमच्या संगणकावर ड्व्होरॅक कीबोर्ड कसा लावायचा याची माहिती http://www.dvorak-keyboard.com/convert.html ह्या साईटवर उपलब्ध आहे.
जे हा कीबोर्ड वापरतात त्यापैकी अनेकांचं म्हणणं असं आहे की हा कीबोर्ड वापरून तुमचा टायपिंग स्पीड ७० ते १०० टक्केपर्यंत वाढू शकतो. हे म्हणणं खरं असेल तर मग आजपर्यंत ह्या कीबोर्डचा प्रचार का झाला नाही? तो सगळीकडे मोठ्या प्रमाणावर का पसरला नाही? असे प्रश्न तुम्हा-आम्हाला पडणं स्वाभाविक आहे. ड्व्होरॅक कीबोर्डचे जे पाठिराखे आहेत ते त्यावर म्हणतात की परंपरा न सोडण्याची आपली वृत्ती त्याला कारणीभूत आहे. वेगळा मार्ग चोखाळण्याला धाडस लागतं. ते धाडस आपण करीत नाही. आपल्यासारखेच इतर बहुतेक जण असतात. त्यामुळे QWERTY कीबोर्ड पिढ्यान पिढ्या चालत राहिला. परंपरेच्या नाण्याची दुसरी बाजू म्हणजे चाकोरी. चाकोरीबाहेर जाऊन प्रयत्न करणारे कमी असतात. त्यामुळेच ड्व्होरॅक कीबोर्ड तितकासा रूढ झाला नाही. हे ड्व्होरॅकच्या पाठिराख्यांचं म्हणणं खरं की खोटं याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही. तुमचं त्यावरचं मत ठरविण्यापूर्वी मात्र तुम्ही तो वापरून पहायला हवा इतकच मला म्हणायचं आहे.
तुम्हाला वाटतं तितकं ते अवघडही नाही, आणि वेगळ्या दमड्या मोजायच्या नसल्याने खिशाला चाट पाडणाराही हा प्रकार नाही. काहीतरी नवं करून पाहण्याची आवड असणारांनी हा नवा कीबोर्ड अवश्य वापरून पहायला हवा असं मला वाटतं.

मराठी विकीपेडियाचं दुर्लक्षित जग

इंटरनेटवर विकीपेडिया नावाचा एक ज्ञानकोश सर्वांसाठी मोफत खुला आहे. www.wikipedia.org ह्या साईटवर गेलात की तुम्हाला इंग्रजी विकीपेडियाचा ज्ञानखजिना मोफत खुला होतो. इंग्रजी धरून जगातल्या एकूण २५५ भाषांमध्ये आज हा विकीपेडिया उपलब्ध आहे. ह्या २५५ भाषांमध्ये इंग्रजी जशी आहे तशी आपली मायबोली मराठी पण आहे. इंग्रजीमध्ये आज पुस्तक रूपाने उपलब्ध असणारा एनसायक्लोपेडिया ब्रिटानिका, किंवा मुख्यत्वे सीडीवरचा मायक्रोसॉफ्टचा एनकार्टा एनसायक्लोपडिया वगैरे हजारो पानांचे ज्ञानकोश आपण पाहिले आहेत किंवा ऐकले आहेत. मराठीतही ज्ञानकोशकार श्री.व्यं. केतकरांचे ज्ञानकोश खंड, ग.रं भिडे यांचे व्यावहारिक ज्ञानकोशांचे खंड, पं. महादेवशास्त्री जोशी यांचे भारतीय संस्कृती कोश, आणि महाराष्ट्रात सर्वांना परिचित असलेला तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा विश्वकोश असे लहान-मोठे ज्ञानकोश प्रकाशित झाले. इंग्रजीतल्या ब्रिटानिका किंवा एनकार्टा सारख्या ज्ञानकोशाची सुधारित (म्हणजे अद्ययावत ह्या अर्थाने) आवृत्ती पुस्तकरूपाने व/वा सीडी-डीव्हीडीच्या स्वरूपात दरवर्षी प्रकाशित होते. मात्र, मराठीत अद्ययावत स्वरूपात ग्रंथ वा सीडी-डीव्हीडी स्वरूपात नियमित प्रकाशित होणारा एकही ज्ञानकोश आज अस्तित्वात नाही.
ह्या पार्श्वभूमीवर मराठीत अद्ययावत स्वरूपात उपलब्ध होणारा ज्ञानकोश एकच, तो म्हणजे इंटरनेटवरचा मराठी विकीपेडिया. हा मराठी विकीपेडिया ज्ञानकोशाच्या स्वरूपात इंटरनेटवर उपलब्ध असला तरी तो परिपूर्ण मात्र नाही. मराठी विकिपेडिया व इंग्रजी विकीपेडिया यांच्यातला फरक डोळे दिपवणारा आहे. इंग्रजीत जो विकीपेडिया इंटरनेटवर उपलब्ध आहे त्यात १ मे २००८ रोजी २,३३,५४,८८० (अक्षरी- दोन कोटी तेहतीस लाख चोपन्न हजार आठशे ऐंशी फक्त) नोंदी (Articles) उपलब्ध होत्या. ह्याच तारखेस, मराठी विकीपेडियामध्ये १७,१०० (सतरा हजार एकशे फक्त) नोंदी (Articles) होत्या. जगातले ७० लाखांहून अधिक लोक (सदस्य) आज इंग्रजी विकीपेडियाचा वापर करतात. मराठीत त्या तुलनेत फक्त २०९४ लोक विकीपेडियाचे मेंबर युजर्स आहेत. केवळ ७ जण मराठी विकीपेडियाचे व्यवस्थापक (Admins) आहेत. इंग्रजीत व्यवस्थापकांचा हाच आकडा १५३८ आहे. इंग्रजीत ७ लाखांहून अधिक चित्रे/छायाचित्रे/आकृत्या/नकाशे नोंदींबरोबर पहायला मिळतात. मराठी विकीपेडियाचा हाच आकडा १,१९६ आहे.
इंग्रजीच्या मानाने मराठी विकीपेडिया हा इंटरनेटवरचा मराठी ज्ञानकोश खूपच मागे असला तरी इतर भारतीय भाषांतले विकीपेडियाही मराठीच्याच वळणाने प्रवास करताना दिसतात. तेलगू विकीपेडिया आज भारतीय भाषांमध्ये सर्वांत आघाडीवर आहे. त्यात ३९,९०८ नोंदी (Articles) आहेत. त्या खालोखाल बंगाली विकीपेडियामध्ये १७,३२९, हिंदी विकीपेडियात १८,२६०, तामिळमध्ये १३,६५९, उर्दूमध्ये ७५५३, मल्याळीमध्ये ६१४०, कानडीमध्ये ५४५२, संस्कृतमध्ये ३८८२, भोजपुरीमध्ये २४०९, गुजरातीमध्ये ५६७, उडिया ५४३, काश्मीरी ३७५, सिंधी ३१०, पंजाबी २९५, असामी १८० अशी इतर भारतीय भाषांमधील विकीपेडियांची अवस्था आहे.
जगातील अन्य भाषांमध्ये विकीपेडिया कशा प्रकारे विकसित होतोय हे पाहणंही उदबोधक ठरेल. इंग्रजीच्या खालोखाल दुसरा क्रमांक लागतो तो जर्मन भाषेचा. जर्मन विकीपेडियामध्ये ७,४३,४७७ नोंदी (Articles) आहेत. फ्रेंच ६,५२,६४७, जपानी४,८७,५५७, इटालियन ४,४६,८०९, डच ४,३४,११६, स्पॅनिश ३,५६,७३२, रशियन २,६७,३८१, चिनी १,७४,७२६.
ह्या संदर्भात सर्व २५५ भाषांची तपशीलवार आकडेवारी ज्यांना पहायची आहे त्यांनी http://meta.wikimedia.org/wiki/List_of_Wikipedias ह्या इंटरनेट लिंकवर जाऊन अवश्य पहावं.
विकीपेडियाचं स्वरूप 
लोकशाही सरकारची व्याख्या करताना नेहमी of the people, for the people, by the people अशी केली जाते. विकीपेडियाची व्याख्याही त्याच धर्तीवर करता येईल. विकीपेडिया हा सर्वांचा, सर्वांसाठी असलेला, सर्वांनी मिळून तयार केलेला खुला ज्ञानकोश आहे. विकीपेडिया हा कोणा एका व्यक्तीच्या किंवा संस्थेच्या मालकीचा नाही. तो सर्वांचा आहे. त्यासाठी कोणीही लिखाण करू शकतो. उपलब्ध असलेले लेख जगातील कोणालाही संपादित करता येतात. उपलब्ध लेखातील माहिती चुकीची वाटली तर कोणीही ती सुधारू शकतो. नसलेली माहिती त्यात टाकू शकतो. चुकीची माहिती काढूनही टाकू शकतो. हा अधिकार जगातील प्रत्येकाला आणि अक्षरशः कोणालाही आहे. अशा परिस्थितीत विकीपेडियातील माहिती अचूक कशी काय असू शकेल? कोणी चेष्टा-मस्करी करण्यासाठी, किंवा मुद्दाम एखाद्याची बदनामी करण्यासाठी हेतुतः चुकीची माहिती त्यात टाकू शकणार नाही का? वगैरे प्रकारचे प्रश्न आपल्याला पडणं स्वाभाविक आहे.
विकीपेडियाचं हे खुलं आणि अनिर्बंध स्वरूप हे एकीकडे त्याचं बलस्थान आहे, आणि त्याच वेळी त्याचं दोषस्थानही आहे. जग हे चांगल्या माणसांमुळे चालत असतं असं म्हणतात. विकीपेडियाही असाच चांगल्या प्रवृत्तीच्या माणसांमुळे आज चालतो आहे ही वस्तुस्थिती आहे. महात्मा गांधीच्या वरचा विकीपेडियातील लेख समजा एखाद्या वाईट प्रवृत्तीच्या माणसाने संपादित केला आणि त्यात महात्माजींची बदनामी करणारा मजकूर टाकला तर काय होईल? तो तसा मजकूर टाकू शकेल का? उत्तर आहे, होय, तो तसा मजकूर टाकू शकेल. पण मग जगाला तो बदनामीकारक मजकूर विकीपेडियामध्ये वाचायला मिळेल का? तर त्याचं उत्तर आहे, तशी शक्यता फार कमी आहे. याचं कारण जे बदल वा संपादन विकीपेडियातील लेखांमध्ये होत असतं त्यावर विकीपेडियाच्या व्यवस्थापकांचं (Admins) चं बारीक लक्ष असतं. ह्या व्यतिरिक्त जगातल्या प्रत्येकाचं त्यावर लक्ष असणंही अपेक्षित असतं. जर एखाद्याच्या लक्षात तो बदनामीकारक मजकूर आला तर लगेचच तो काढून टाकण्याचं काम ती व्यक्ती करू शकते. वाईट प्रवृत्ती विरूद्ध सतप्रवृत्ती असा लढा विकीपेडियाच्या व्यासपीठावर होणार हे विकीपेडियाने गृहित धरलेलं आहे. नेमक्या ह्याच पायावर आजचा विकीपेडिया उभा आहे.
मूळात विकीपेडियामधला wiki कुठला हा प्रश्न अनेकांसमोर उभा असेल. Wiki हा हवाईयन शब्द आहे. त्याचा अर्थ- त्वरेने म्हणजे इंग्रजीत quick. १९९५ साली वार्ड कनिंगहॅम ह्या अमेरिकन सॉफ्टवेअर कंन्सल्टंटने प्रथम wiki तंत्र वापरले. कनिंगहॅम अँड कनिंगहॅम नावाची त्याची कन्सल्टंसी देणारी व्यावसायिक संस्था होती. आपल्या संस्थेत त्याने wikiwikiweb नावाचे सॉफ्टवेअर तयार केले आणि आपल्या कंपनीच्या वेबसाईटवर ठेवले. हे सॉफ्टवेअर वापरल्याने त्याच्या वेबसाईटवर इतर प्रोग्रामर्स येऊ शकत असत, आणि त्यांच्या काही नव्या कल्पना असतील तर त्यांना त्या तेथे ठेवता येत असतं. विकीपेडियाची कल्पना राबवणारे ते पहिले सॉफ्टवेअर. आपली कल्पना वेबसाईटवर पटकन (quick) ठेवण्याची सोय म्हणून त्या सॉफ्टवेअरचे नाव कनिंगहॅमने wikiwikiweb असे ठेवले. कनिंगहॅम एकदा होनोलूलू विमानतळावर गेला असताना विमानतळावरील एका सेविकेने त्याला त्याचे सामान पटापट एअरपोर्ट बसमध्ये ठेवण्यास सांगितले. तेव्हा तिने विकी विकी हे शब्द उच्चारले होते. कनिंगहॅमच्या ते विकी विकी हे शब्द लक्षात राहिले होते. आपण जो विकी हा शब्द वापरून एक सॉफ्टवेअर केले आहे त्यातून उद्या wikipedia.org नावाचा ज्ञानसूर्य उगवणार आहे याची कल्पना कनिंगहॅमला तेव्हा नव्हती. १५ जून २००१ रोजी विकीपेडियाचा शुभारंभ झाला आणि आज २००८ साली wikipedia.org ही वेबसाईट जगातील दहाव्या क्रमांकाची वेबसाईट आहे.
विकीपेडिया आणि मराठी 
इंग्रजी विकीपेडिया केवळ साडेसात वर्षांमध्ये ३० लाख लेखांचा विक्रम करू शकला. साधारणतः २००५ च्या सुमारास मराठी विकीपेडियाच्या आरंभाला खरी चालना मिळाली. आज मराठी विकीपेडियाला मराठी लेखन करणारांची नितांत गरज आहे. त्यासाठी www.mr.wikipedia.org ह्या मराठी विकीपेडियाच्या वेबसाईटवर वारंवार आवाहन करण्यांत येत आहे. मराठी लेख संपादनाची स्पर्धाही विकीपेडियावर वारंवार जाहीर होत असते. त्यात भाग घेण्यासाठी कळकळीने आवाहन केले जाते. संगणकावर मराठी अक्षरं, शब्द, जोडशब्द कसे आणावे याचेही मार्गदर्शन तेथे आहे. सध्या सर्वत्र मराठीची चर्चा चालू आहे. त्या चर्चेत मराठी विकीपेडिया येणेही आवश्यक आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून (खरं तर संपूर्ण जगातूनच) मराठी विकीपेडियाचे फक्त २१०० सदस्य व्हावेत हे पटण्यासारखेच नाही. ह्या सदस्य संख्येत लक्षणीय वाढ झाल्यास मराठी विकीपेडियाचा विकास झपाट्याने म्हणा, बिगी बिगी म्हणा किंवा विकी विकी म्हणा होत जाईल.
विकीपेडियाच्या पाठोपाठ आता विक्शनरी म्हणजे विकीच्या माध्यमातून तयार होणारी डिक्शनरी, विकीबुक्स, विकीन्यूज, विकीव्हर्सिटी वगैरे उपक्रमही विकसित झाले आहेत. मराठीत ते आणून यशस्वी करण्याचा प्रयत्न आज काही हाताच्या बोटावर मोजता येतील इतकीच मराठी मंडळी आज करीत आहेत. त्यांना साथ देणं हे सर्व मराठीजनांचं कर्तव्य आहे. लक्षात घ्या की डच भाषा बोलणारे जगात फक्त २ कोटी ४० लाख लोक आहेत. ह्या लोकांनी आपल्या डच भाषेच्या विकीपेडियावर एकूण ४,३४,११६ एवढे लेख लिहीले आहेत. मराठी भाषा बोलणारे जगात ९ कोटीहून अधिक लोक आहेत. म्हणजे आपण संख्येने डच भाषिकांच्या चौपट आहोत. पण आपण आजपर्यंत फक्त १७,००० लेखच मराठी विकीपेडियावर लिहू शकलो आहोत. कुठे २ कोटी ४० लाख आणि कुठे ९ कोटीचा आकडा? कुठे डचांचे ४ लाख ३४ हजार ११६ लेख आणि कुठे आपले फक्त १७,००० लेख? विकीपेडियाच्या बाबतीत मराठीचं काहीतरी चुकतय एवढं नक्की.
जागतिक पातळीवर तुमच्या भाषेतील विकीपेडिया हाही प्रगतीचा एक निकष मानला जाऊ शकतो. मराठीने इतर गोष्टींबरोबर विकीपेडियाकडेही लक्ष द्यायला हवे. कुणी ऐकतय का मी काय म्हणतोय ते?

घरच्या प्लंबिंगच्या कामाबद्दल माहिती देणारी साईट

घरकामात उपयुक्त साईट म्हणजे www.friendlyplumber.com/plumbing101.html . नावावरून तुमच्या लक्षात आलं असेल की घरच्या प्लंबिंगच्या कामाबद्दल माहिती देणारी ही साईट आहे. पाईप, नळ, वायसर, टॉयलेट वगैरे विषय इथे उत्तम प्रकारे चर्चिले गेले आहेत. 'युएसए टुडे' सारख्या दैनिकाने ह्या साईटला 'हॉट साईट' म्हणून गौरविले होते. त्यावरून त्याच्या उपयुक्ततेची कल्पना तुम्हाला येईल.

काहीही कशालाही चिकटवा.

ही लिंक फार गंमतीदार आहे. तिचं नाव आहे www.thistothat.com . आता हे धीक टू दॅट नेमकं काय आहे हे सांगायला हवं. धीसच्या बाजूला सिरॅमिक, फॅब्रीक, ग्लास, लेदर, मेटल, पेपर, प्लास्टीक, रबर, फोम, विनायल आणि लाकूड एवढ्या गोष्टी आहेत. दॅटच्या बाजूलाही ह्या सर्व गोष्टी आहेत. मग धीक टू दॅट म्हणजे काय? उत्तर सोपं आहे. काहीही कशालाही चिकटवा. Let's glue. म्हणजे काचेला लाकूड चिकटवा, किंवा रबराला धातू चिकटवा, किंवा प्लास्टीकला फॅब्रीक चिकटवा. काहीही कशालाही कसं चिकटवायचं हे thistothat.com आपल्याला सांगते. त्यासाठी कोणते विशिष्ट गोंद किंवा रसायनं वगैरे उपलब्ध आहेत, त्यांना काय म्हणतात वगैरे माहिती तिथे मिळते. मुद्दाम पहावी आणि लक्षात ठेवावी अशी ही साईट.

१७५ प्रकारच्या घरगुती दुरूस्त्या

www.fixitclub.com/ तर चांगलीच कामाची आहे. एकूण १७५ प्रकारच्या घरगुती दुरूस्त्या तिथे शिकवल्या आहेत. त्यात तुमच्या डीव्हीडी प्लेअर रिपेअरपासून ते इलेक्ट्रीक ओव्हन रिपेअरपर्यंत बरंच काही आहे. यात वस्तूची दुरूस्ती करताना नेमकी कशी करावी हे सांगताना अनेक छायाचित्रे देऊन दाखविलेलं असल्याने नेमकी कृती समजण्यास सोपी जाते.

१०१ नवे उपयोग

आपल्या दैनंदिन जीवनातल्या साध्या साध्या गोष्टींचा नवा उपयोग सांगणारी. इंटरनेटवर अनेक ब्लॉग्जनी ह्या लिंकचा उल्लेख केल्याने ही लिंक चांगली लोकप्रिय झाली आहे. http://www.realsimple.com/work-life/101-new-uses-for-everyday-things-10000001030084/index.htmll . हा लिंकचा पत्ता लांबीला थोडा मोठा असला तरी तेथील माहिती फार उपयुक्त आहे. लिंबू, वर्तमानपत्र, कॉफी फिल्टर, ऑलिव्ह ऑईल, बेकींग सोडा, व्हिनेगार, वेलक्रो, खाण्याचं मीठ वगैरेंचे एकूण १०१ नवे उपयोग ह्या साईटने सांगितले आहेत. मूळात realsimple.com ही साईट life made easier ह्या ब्रीदवाक्याने चालत असते. त्यांनी सांगितलेले १०१ नवे उपयोग गंमतीदार आहेत. उदाहरणार्थ भरपूर मीठ घातलेलं गरम पाणी ड्रेनेजमध्ये ओतल्यास चोक-अप झालेले ड्रेनेज मोकळे होते. किंवा, दाढीचे क्रीम संपले असेल तर त्याजागी ऑलिव्ह ऑईल वापरल्यास दाढी उत्तम होते. व्हिनेगारचे दोन तीन चमचे पाण्यात टाकून त्या पाण्यातून स्वेटर वगैरे सारखे कपडे काढल्यास ते अधिक मऊसार होतात. वगैरे वगैरे. ह्या १०१ उपयोगांवर नजर टाकून त्यातले काही आपल्या कामी येतात का हे पहायला हरकत नाही.