२१ फेब्रु, २०११

आवाज की दुनिया

आवाज हा आपल्या आयुष्यातला एक नैसर्गिक भाग आहे. हवा आणि प्राणवायू आपण नाकाने जसा सहज आणि नकळत घेत असतो तसच आवाजाचही आहे. सकाळचा दिवस सुरू होताना तो गजराचा कर्कश्श आवाज. तिथून झोप झटकून जागं व्हावं तर पहाटेची पक्षांची मंजूळ किलबिल. दिवस सुरू होताच आवाज जे आपल्या कानाला चिकटतात ते अगदी मध्यरात्र झाली तरी रातकिड्यांचे किर्रर्र आवाज चालूच असतात. आज हा आवाजाचा विषय मुद्दाम काढण्याचं कारण म्हणजे आपलं मल्टीमिडिया तंत्रज्ञानाचं विश्व. मल्टीमिडिया ह्या शब्दाचा पाया मूळातच आवाजाच्या आधारावर उभा आहे. आवाज नाही तर मल्टीमिडिया व्यर्थ आहे.

अगदी आपल्या साध्या पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनचं उदाहरण घ्या. आवाजाशिवाय तुम्हाला तुमच्या स्लाईडस किंवा एखादं प्रेझेंटेशन दाखवता येणार नाही असं नाही. पण जर ते प्रेझेंटेशन म्युझिक ट्रॅकने युक्त असेल किंवा त्यात काही योग्य असे साऊंड इफेक्टस असतील तर प्रेझेंटेशन अधिक प्रभावी होतं. पॉवरपॉईंटच्याच जोडीने दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर फ्लॅश मुव्हीजचं देता येईल. अडोबी कंपनीचं फ्लॅश हे सॉफ्टवेअर आज अतिशय लोकप्रिय आहे. वेबसाईटस सुरू होताना आपण जो इंट्रो बघतो त्यातले बहुसंख्य इंट्रोज हे फ्लॅशमध्ये केलेले असतात. ह्या इंट्रोजसाठी देखील विविध प्रकारचे आवाज वा साऊंड इफेक्टस वापरले जातात. अनीमेशनसाठी देखील फ्लॅश तंत्राचा वापर करण्यांत येतो. एक साधं आणि छोटं उदाहरण सांगतो. एक विदूषक उड्या मारत येतो आणि एका घराचा दरवाजा ठोठावतो. तो दरवाजा किरकिरत आपोआप उघडला जातो. विदूषक दारातून आत जाताच एक कुत्रा त्याच्या अंगावर भुंकत झेपावतो. आता हे सारं दृश्य फ्लॅश तंत्राने साधी चित्रे वापरून तयार करता येतं. मात्र अशा फ्लॅश मुव्हीसाठी विविध आवाजांची गरज लागते. विदूषक जेव्हा उड्या मारत असतो तेव्हा त्या उड्यांना साजेसा साऊंड इफेक्ट हवा. दरवाजा ठोठावण्याचा आवाज हवा. पुढे दरवाजाचं किरकिरत उघडणं. मग कुत्र्याचं भुंकणं. हे सारे आवाज मिळतील तेव्हा आपला फ्लॅश मुव्ही तयार होणार. हे आवाज मिळवण्यासाठी म्हणजे डाऊनलोड करण्यासाठी मग आपण गुगलवर जातो. तिथे आवाज मोफत डाऊनलोड करू देणारी साईट शोधू लागतो. हे शोधणं खूप वेळ खातं. आपल्या संयमाचा अंतही कधीकधी पहातं.

आवाज शोधण्यासाठी गुगलवर जाणं म्हणजे एखाद्या मोठ्या सुपरमार्केटमध्ये सुई शोधायला जाण्यासारखं आहे. सुपर मार्केटमध्ये सगळेच विभाग असतात. कपड्यांपासून भांड्यांपर्यंत आणि धान्यापासून ते टीव्ही-फ्रीजसारख्या इलेक्ट्रॉनिक यंत्रांपर्यंत सारं काही तिथं दिसतं. आपल्याला ते नको असतं. आपल्याला हवी आहे फक्त सुई. अशा वेळी आपल्याला विविध प्रकारच्या फक्त सुया उपलब्ध करून देणारं एखादं मार्केट मिळालं तर? गुगलवर एखादा आवाज किंवा साऊंड इफेक्ट शोधायचा म्हणजे जर सुपर मार्केट पालथं घालणं असेल, तर मग फक्त आवाज शोधून देणारं गुगलइतकं कार्यक्षम असं एखादं स्पेशलाईज्ड सर्च इंजिन आज अस्तित्वात आहे का? असा प्रश्न एव्हाना तुमच्या मनात स्वाभाविकच तयार झाला असेल. तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे - होय. फक्त साऊंडस व साऊंड इफेक्टस शोधून देणारं एक स्पेशलाईज्ड सर्च इंजिन आज इंटरनेटवर अस्तित्वात आहे. तेथे तुम्ही हवा तो आवाज शोधू शकता. तो ऐकू शकता. योग्य वाटला तर तो डाऊनलोड करून घेऊ शकता. नंतर अर्थातच तुमच्या पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनसाठी किंवा फ्लॅश मुव्हीसाठी वापरूही शकता. त्या स्पेशलाईज्ड सर्च इंजिनच्या साईटचा पत्ता आहे www.findsounds.com

Findsounds.com म्हणते की त्यांच्या साईटवर दर महिन्याला २० लाख साऊंड सर्च होत असतात. एकूण अडीच लाख व्यक्ती हे वीस लाख आवाज शोधत असतात. ही साईट तशी अगदी साधी आणि सरळ आहे. गुगलसारखी सर्च करण्याची एक लांबी चौकट त्यात मधोमध आहे. तिथे आपल्याला हवा तो शब्द वा सर्च कीवर्डस तिथे फक्त टाईप करायचे आणि एंटर बटण दाबायचं किंवा Search बटणावर क्लीक करायचं. अशा प्रकारे एंटर दाबण्यापूर्वी किंवा Search वर क्लीक करण्यापूर्वी हवं तर काही विशिष्ट पर्याय अर्थात ऑप्शन्स हवं तर आपण निवडू शकतो. म्हणजे समजा तुम्हाला फक्त mp3 फाईल हवी असेल तर केवळ तोच पर्याय तुम्ही निवडू शकता. अशा वेळी तुमच्यासमोर फक्त mp3 च्या लिंक्सच फक्त येतील. Findsounds.com चार प्रकारच्या साऊंड फाईल्स तुम्हाला शोधून देते. एक mp3, दुसरं wav, तिसरं au आणि चौथा प्रकार aiff. यापैकी mp3 आणि wav ह्या साऊंड फाईल्स आज विशेषत्वाने वापरल्या जातात.

गुगलप्रमाणे सर्च करण्याची ही जशी सोय आहे, तशी त्याच्या जोडीला विशिष्ट प्रकारचे आवाज शोधण्यासाठी वर्गीकरणाची सोयही findsounds.com ने केली आहे. त्यासाठी www.findsounds.com/types ह्या लिंकवर तुम्ही जायला हवं. तिथले हे प्रकार पहाः Animals, Birds, Holidays, Household, Insects, Mayhem, Miscellaneous, Musical Instruments, Nature, Noise makers, Office, People, Sports and Recreation, TV and Movies, Vehicles. हे झाले मुख्य प्रकार. आता त्या प्रत्येक मुख्य प्रकारात एक भली मोठी यादी दिलेली आहे. कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज हवा म्हंटल्यावर तुम्ही Animals मध्ये जाऊन Dog वर क्लीक करणार हे ओघानं आलच. तिथे आज कुत्र्याचे आवाज देणार्‍या एकूण २०० आवाजांच्या फाईल्स डाऊनलोडीगसाठी उपलब्ध आहेत. एक लक्षात घ्या की हे आवाज किंवा ह्या साऊंड फाईल्स findsounds.com ने संपूर्ण वेब धुंडाळून तुम्हाला शोधून दिल्या आहेत. म्हणजे त्यांनी फक्त सर्च इंजिनचं काम केलं आहे. ह्या फाईल्स अर्थातच वेगवेगळ्या वेबसाईटवरील आहेत.

आपलं वरचं उदाहरण घेऊन आपण पुढे जाऊ. विदूषक उड्या मारत येतो आहे. त्याच्या उड्यांसाठी आपल्याला योग्य तो साऊंड इफेक्ट हवा आहे. तर त्यासाठी People वर क्लीक करून नंतर Footsteps वर क्लीक करा. पहा, १०६ प्रकारची पावलं आपल्यापुढे आवाज करण्यासाठी सिद्ध आहेत. ह्याच पद्धतीने दरवाजा ठोठावण्याचा आवाज शोधायचा तर सरळ door knock हे शब्द टाईप करून एंटर दाबा. २०० प्रकारचे ठोठावण्याचे आवाज मिळतील. थोडक्यात ज्यांना अनीमेशन्स तयार करायची आहेत, किंवा आपल्याच ईमेलमधून एक गंमतीदार आवाज कुणाला पाठवायचा आहे अशांसाठी findsounds.com हे एक वरदानच आहे.

अशा प्रकारची specialised म्हणता येतील अशी शेकडो सर्च इंजिन्स आज इंटरनेटवर उपलब्ध आहेत. ती माहित असतील तर आपला वेळ तर वाचतोच, पण ती पाहता पाहता काही नव्या कल्पनाही डोक्यात येऊ लागतात. एखादी गोष्ट सापडली वा दिसली की मग त्याचा वापर कसा करता येईल याकडे मानवी मन झेपावू लागतं. ही अगदी नैसर्गिक म्हणावी अशीच प्रक्रिया आहे. Findsounds.com ची दखल न्युयॉर्क टाईम्स पासून ते पीसी वर्ल्ड पर्यंत सर्वांनी घेतलेली आहे. आवाजासाठी एक उत्तम वेबसाईट असा गौरव ह्या साईटच्या वाट्याला आलेला आहे. पीसी वर्ल्ड ने आपल्या Best of the web ह्या सदरात त्याचा समावेश केला आहे. न्युयॉर्क टाईम्सने त्याला Impressive Technology म्हणून गौरवलं आहे. याहूने त्याला Incredibly Useful असं म्हंटलं आहे.

असच आणखी एक आवाजी सर्च इंजिन म्हणजे www.soundsnap.com. ही वेबसाईटही findsounds.com सारखी असली तरी इथला फरक म्हणजे जगभरचे लोक इथे वेगवेगळे आवाज अपलोड करत असतात. इथेही सर्च आहे आणि इथेही टाईप्स आहेत. हे दुसरं आवाजी सर्च इंजिन मी मुद्दाम देत आहे ते अशासाठी की कधी findsounds.com वर तुम्हाला हवा तो आवाज सापडला नाही, तर हा पर्याय चाचपडून पहायला हरकत नाही.

ह्या टप्प्यापर्यंत आपण आलो आणि हवा तो आवाज मिळविण्यासाठी findsounds.com किंवा soundsnap.com वापरण्याची नोंद आपण घेतली. संगणकावरील आवाजाच्या बाबतीत वेगवेगळ्या प्रक्रिया करण्याची वेळ खूपदा येते. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याकडे wav फाईल असते, आणि आपल्याला त्याची mp3 करायची असते. आपल्याला कुणीतरी au किंवा aiff प्रकारची साऊंड फाईल पाठवतं, आणि आपल्याकडे ती उघडत नसते. आपल्याला मिळालेली आवाजाची फाईल मोठी किंवा लांबीने अधिक असते. ती लहान करून हवी असते. उदाहरण घेऊन सांगतो. समजा तुमच्याकडे एका पाठोपाठ एक अशी दहा पावले टाकण्याच्या आवाजाची फाईल आहे. तुम्हाला दहा पावलं नको आहेत. फक्त एकाच पावलाचा आवाज तुम्हाला हवा आहे. अशा वेळी दहा पैकी एक पाऊल कापून घेण्याची म्हणजचे Audio Editing ची सोय तुम्हाला हवी असते. ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी मी Audacity ह्या अधिकृतपणे मोफत असणार्‍या ओपन सोर्स सॉफ्टवेअरची शिफारस करीन. Audacity बद्दलची अधिक माहिती आणि तो प्रोग्राम डाऊनलोड करण्यासाठी http://audacity.sourceforge.net/ ह्या वेब लिंक वर जा. आवाज की दुनिया वर राज्य करण्याची ताकद Audacity मध्ये कितपत आहे याची चाहूल तुम्हाला त्या लिंकवरच लागेल.

सुमोपेंटः ऑनलाईन फोटोशॉप काऊंटर

अॅडोबी फोटोशॉप हे अजस्त्र ताकद असलेलं सॉफ्टवेअर आहे. त्याच्या भजनी तुम्ही एकदा लागलात की शिकता भुई थोडी होते. किंवा, फोटोशॉप शिकता शिकता पुरेवाट होते. ज्यांनी फोटोशॉप ह्या विषयावर हजारभर पानांची पुस्तके इंग्रजीत लिहीली आहेत असे अमेरिकन लेखकही आम्ही अजूनही फोटोशॉपचे विद्यार्थी आहोत, असं प्रस्तावनेत आवर्जुन लिहीतात. फोटोशी संबंधित काहीही काम निघालं की संबंधिताला आवर्जुन आठवण होते ती फोटोशॉप नामक सॉफ्टवेअरचीच. खरं तर फोटोशॉप मधला 'शॉप' हा शब्द कमालीच्या विनयाने आलेला आहे. ते शॉप म्हणजे दुकान नव्हेच, ते एक अतिप्रचंड सुपर मार्केट किंवा खरं तर तो फोटो मेगा मॉलचा प्रचंड असा कॉम्प्लेक्स आहे. आज तुम्ही फोटोशॉपची नवीन आवृत्ती म्हणजे सीएस-४ विकत घ्यायला गेलात तर त्याची अधिकृत किंमत आहे ६९९ डॉलर्स म्हणजे अदमासे ३४,००० रूपये. एवढी मोठी रक्कम टाकून फोटोशॉपची लायसन्स्ड कॉपी विकत घेणारे हे फोटो क्षेत्रातले पक्के व्यावसायिक किंवा मोठ्या संस्थाच असू शकतात. थोडक्यात, फोटो सॉफ्टवेअरच्या जगतातलं फोटोशॉप हे एक फाईव्ह स्टार हॉटेल आहे. फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जाऊन साधा चहा घ्यायचा म्हंटला तरी दीड-दोनशे रूपये मोजायची तयारी असावी लागते. ज्यांची अशी तयारी नसते ते फाईव्ह स्टार हॉटेलच्या नादी न लागता एखाद्या फास्ट फूड काऊंटरवर जाऊन आठ-दहा रूपयांत आपली चहाची तलफ भागवतात. असच एक फोटोशॉपसदृश्य फास्ट टूल काऊंटर म्हणजे इंटरनेटवरचं सुमोपेंट.

सुमोपेंट ह्या आपल्या मुख्य विषयाकडे वळण्यापूर्वी आपण नजर टाकूया अॅडोबी फोटोशॉपच्या गेल्या १८ वर्षांच्या वाटचालीकडे.. १९९० च्या फेब्रुवारीमध्ये फोटोशॉपची पहिली आवृत्ती म्हणजे व्हर्जन १.० आलं होतं. पुढे लगेचच काही महिन्यांनी २.० ही आवृत्ती आली. १९९४ साली ३.०, १९९६ साली ४.०, १९९८ साली ५.०, १९९९ मध्ये सुधारित ५.५, २००० मध्ये ६.०, २००१ मध्ये ७.० अशा वेगाने फोटोशॉप घोडदौड करत राहिलं. त्याची लोकप्रियता वाढत गेली. पुढे २००३ साली फोटोशॉप सीएस (म्हणजे ८.०), २००५ मध्ये सीएस२ (म्हणजे ९.०), २००७ मध्ये सीएस३ (म्हणजे १०.०) आणि २००८ सप्टेंबरमध्ये म्हणजे दोन महिन्यांपूर्वी सीएस४ (म्हणजे ११.०) ही सध्या ताजी असलेली फोटोशॉपची आवृत्ती आली. ज्यांनी २००७ साली म्हणजे सुमारे वर्षभरापूर्वी फोटोशॉपची सीएस३ ही तेव्हा नवीकोरी असणारी आवृत्ती अदमासे २०,००० रूपयांना अधिकृतपणे विकत घेतली होती, त्यांना आता सीएस४ चा अपग्रेड घेण्यासाठी सुमारे ९००० रूपये आणखी मोजावे लागतील.

वरच्या परिच्छेदात फोटोशॉपचा इतिहास भूगोल अशासाठी सांगितला की फोटोशॉपचा विकसित होण्याचा वेग प्रचंड आहे. जवळ जवळ दरवर्षी एक नवी आवृत्ती फोटोशॉपवाले आपल्यासमोर ठेवतायत. नवी आवृत्ती म्हणजे काहीतरी नवं त्यात असणार हे ओघानच आलं. ते नवं हवं असेल तर त्याची किंमत मोजणं हेही ओघानच आलं. ज्यांना ही किंमत मोजणं अवघड किंवा अशक्य आहे त्यांचेसाठी फोटोशॉपसारखं अधिकृतपणे मोफत उपलब्ध असणारं सॉफ्टवेअर म्हणजे गिंप. त्याची ताजी आवृत्ती म्हणजे २.६. फोटोशॉपच्या अकरा आवृत्त्यांपुढे गिंपच्या तीन आवृत्त्या हा वेग धीमा आहे हे खरच. गिंपला काही जण गरिबाचं फोटोशॉप असंही म्हणतात. ओपन सोर्स व अधिकृतपणे मोफत उपलब्ध असलेलं गिंप www.gimp.org ह्या साईटवरून तुम्हाला डाऊनलोड करता येईल. गिंप फोटोशॉपच्या जवळ येण्याचा आणि स्पर्धा करण्याचा प्रयत्न करतय हेही खरं, पण फोटोशॉपचा वेग महाप्रचंड आहे. तो मान्य करायलाच हवा.

आपला आजचा मुख्य विषय म्हणजे सुमोपेंट. त्या विषयाच्या नमनाला फोटोशॉपसंबंधी घडाभर तेल ओतावं लागलं याला तसच कारण आहे. एक म्हणजे सुमोपेंट हे इंटरनेटवर अगदी अलिकडे उपलब्ध झालेलं मिनी फोटोशॉप म्हणता येईल असं ऑनलाईन टूल आहे. सुमोपेंट हे तुमच्या संगणकावर इन्स्टॉल करावं लागत नाही. ते इंटरनेटवर तयारच उपलब्ध असतं. तुम्ही इंटरनेटवर www.sumopaint.com/app ह्या साईटवर गेलात की तुमच्या पुढे हे मिनी फोटोशॉप दत्त म्हणून उभं राहतं. ते अधिकृतरित्या मोफत आहे. त्यामुळे किंमत किती आणि दरवर्षी ती किती वाढणार याची कसलीच चर्चा उद्भवत नाही. भविष्यकाळातही सुमोपेंट विनामूल्यच राहणार असल्याची अधिकृत घोषणा त्यांनी केली आहे. त्यामुळे सुमोपेंट अतिशय वेगाने लोकप्रिय होत चाललं आहे. सुमोपेंट इंटरनेटवर थेट उघडत असलं तरी बर्‍यापैकी फास्ट आहे. त्यात तुम्ही तुमच्या हार्ड डिस्कवरील इमेज किंवा फोटो उघडू शकता. तुमचा फोटो क्रॉप करणं, तो लहान-मोठा, उभा-आडवा (रोटेट), उलटा सुलटा (फ्लीप) करणं, लेयर्समध्ये काम करणं, शार्पन, ब्लर, एम्बॉस, ग्लो करणं हे सारं त्यात आहेच. पण अनेकविध फिल्टर्सही त्यात उपलब्ध आहेत. फोटोशॉपसारखी तीस पेक्षा अधिक टूल्स त्यात दिली आहेत. विविध ब्रशेस, इफेक्टसची जोड त्यांना आहे. बेव्हेल, ग्रॅडीयंट, शॅडोजची व्यवस्था त्यात आहे. सिलेक्शन टेक्नीक्स, फेदर इफेक्ट, अल्फा लेयर, ब्राईटनेस, काँट्रास्ट, ह्यू, सॅच्युरेशन हे सगळंही त्यात आहे. मुख्य म्हणजे वर म्हंटल्याप्रमाणे हे सगळं मिळविण्यासाठी तुम्हाला करायचं काहीच नसतं. तुम्ही फक्त सुमोपेंट डॉट कॉम /अॅप ह्या साईटवर जायचं. इतकच.

ज्या देशात लिनक्स ही ऑपरेटींग सिस्टम तयार झाली त्या फिनलंड ह्या देशात हा सुमोपेंट तयार झाला आहे. सध्या त्याची ०.८ ही बाल्यावस्थेतील आवृत्ती नेटवर आहे. डिसेंबर २००८ अखेरीपर्यंत १.० ह्या पूर्ण आवृत्तीत तो प्रवेश करील अशी अपेक्षा आहे. फोटोशॉपमध्ये असलेल्या अनेक गोष्टी आज सुमोपेंट मध्ये नाहीत हे खरं आहे. पण ज्या पद्धतीने सुमोपेंट विकसित होतो आहे, तो पाहता त्याच्या पुढल्या आवृत्त्या फोटोशॉपच्या जवळ जवळ जात राहतील असं निश्चितपणे वाटतं. सुमोपेंट मध्ये तुमच्या फोटोवर काम करून झालं की त्या कामासकट तुमचा फोटो तुमच्या हार्ड डिस्कवर तुम्हाला सेव्हही करता येतो. किंवा, हवं तर सुमोपेंटच्या साईटवरच तो सेव्ह करून ठेवण्याची सोयही आहे. एवढं सारं असून फोटोशॉपच्या तुलनेत सुमोपेंट वापरायला फार सोपा आहे. लहान मुलांना ह्या साईटवर सोडलत तर काही काळात ती त्यात एवढी रमून जातात की निरर्थक गेम्सकडे त्यांचे लक्षही जात नाही असा अनुभव आहे.

सुमोपेंटसारख्या दुसर्‍या साईटस म्हणजे www.picnik.com आणि www.fotoflexer.com. ह्यातील पिकनिक डॉट कॉम गेली काही वर्षे नेटवर आहे. त्यामुळे ती चांगली विकसितही आहे आणि सुमोपेंटच्या तुलनेत थोरल्या भावासारखी आहे. पण तरीही ह्या मोफत उपलब्ध असणार्‍या तिन्ही साईटसमध्ये मला प्रभावित करते ती सुमोपेंट.

मुद्दा अगदी सरळ आहे. सुमोपेंट विनामूल्य आहे. तो इन्स्टॉल करावा लागत नाही. असं असूनही तो खूप काही देतो. तो मनोरंजनही करतो. तुमच्या फोटोवर काम करण्याचं कामही तो करतो. तुमची हार्ड डिस्कची जागाही तो मागत नाही. तुमची मेमरीही तो खात नाही. वेगाने चालतो. इंटरनेट अॅप्स आता वयात येत चालली आहेत याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे सुमोपेंट. भविष्यकाळात विंडोज किंवा लिनक्ससारखी संपूर्ण ऑपरेटींग सिस्टम, संपूर्ण एम.एस. ऑफिससारखा सूट आणि आपल्याला संगणकावर लागणारं सगळच इंटरनेटवर तयार मिळणार आहे असे संकेत ह्या सार्‍यातून मिळत आहेत. एकूणच संगणक जगतातील तंत्रज्ञानाचा वेग क्षणाक्षणाला वाढत चालला आहे, यात शंका नाही.

ब्लुक वर एक लूक

बुकर पुरस्कार जगभर प्रसिद्ध आहेत. १९९७ चा बुकर पुरस्कार भारतीय लेखिका अरूंधती रॉय यांच्या 'दि गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज' ह्या कादंबरीला मिळाला, किंवा अगदी अलिकडचा २००६ बुकर पुरस्कार आपल्या किरण देसाईंना त्यांच्या 'दि इनहेरीटन्स ऑफ लॉस' ह्या कादंबरीला मिळाला. खेरीज व्ही.एस. नायपॉल किंवा सलमान रश्दी यांच्या कादंबर्‍यांना मिळालेले बुकर पुरस्कार आपण कुठे ना कुठे वाचले, ऐकले वा टीव्हीवर पाहिले आहेत. बुकर पुरस्कारांना ३८ वर्षांची परंपरा आहे. पन्नास हजार ब्रिटीश पौंडाचा (सुमारे ४१ लाख रूपये) हा पुरस्कार जगभर प्रचंड प्रतिष्ठेचा मानला जातो.

बुकर पुरस्कार जेवढे परिचयाचे आहेत तेवढेच ब्लुकर पुरस्कार अपरिचित आहेत. आपल्यापैकी बर्‍याच जणांना ब्लुकर पुरस्कार म्हणजे बुकर पुरस्काराची काहीतरी नक्कल असावी असं वाटण्याची शक्यता आहे. ते स्वाभाविकही आहे. कारण बुकर आणि ब्लुकर ह्या दोन शब्दांमध्ये चांगलच साधर्म्य आहे. शब्दांमधील अक्षरांमध्ये बराचसा सारखेपणा असला तरी बुकर आणि ब्लुकर यांच्यात माध्यमाचा मोठाच फरक आहे. बुकर पुरस्कार लिखित वा पुस्तकरूपाने प्रसिद्ध झालेल्या कादंबर्‍या वा साहित्याला दिला जातो. ब्लुकर हा शब्द ब्लॉग ह्या शब्दाशी साधर्म्य दाखवणारा आहे. इंटरनेटच्या महाजालात दररोज हजारो ब्लॉग्जची भर पडते आहे. ह्या ब्लॉग्जमधून ज्या कादंबर्‍या किंवा अन्य साहित्य (नंतर पुस्तकरूपाने तयार होण्याजोगे) निर्माण होते त्यांना 'ब्लुक' असे नाव दिले गेले आहे. बुक हे छापिल पुस्तक, आणि ब्लुक हे इंटरनेटवरील ब्लॉग (वा एखादे संकेत स्थळ) वर तयार झालेले पुस्तक. बुक साठी बुकर पुरस्कार आणि ब्लुक साठी ब्लुकर पुरस्कार असा एकूण प्रकार आहे.

ब्लुकर पुरस्काराची सुरूवात २००६ साली झाली. त्याची एकूण रक्कम फक्त ८१७५ ब्रिटीश पौंडांची (सुमारे ७ लाख रूपये) आहे. बुकर आणि ब्लुकर मध्ये एकूण सात पटींचा फरक आहे. २००६ आणि २००७ अशी एकूण दोनच वर्षे ब्लुकर पुरस्कार दिले गेले आहेत. तिसर्‍या वर्षीचे म्हणजे यंदाच्या २००८ ब्लुकर पुरस्काराची तयारी व घोषणा मात्र अद्यापि व्हायची आहे. ब्लुकर पुरस्कार तीन प्रकारात दिले जातात. पहिला काल्पनिक साहित्य किंवा फिक्शन. दुसरा काल्पनिक नसलेले लेखन अर्थात नॉन फिक्शन, आणि तिसरा वेब कॉमिक. पुरस्काराची एकूण सात लाखाची रक्कम ह्या तीन प्रकारातील पुरस्कारांसाठी विभागली जाते.

२००७ मधील ब्लुकर पुरस्कारात नॉन फिक्शन विभागातील पुरस्कार विजेता एक तरूण अमेरिकन सैनिक आहे. त्याचे नाव कोर्बी बझैल. २००४ साली तो इराकमध्ये सैनिकी ड्युटीवर होता. मशिनगन चालवणं आणि शेकड्यांनी गोळ्या झाडणं हे त्याचं काम होतं. बझैलला जेव्हा वेळ मिळे तेव्हा तो आपल्या टेंटमध्ये असलेल्या इंटरनेट कॅफेमध्ये न चुकता जात असे. इतर सैनिकही तिथे जात. पण त्यांचे लक्ष गेम खेळणे, सिनेतारकांची छायाचित्रे पाहणे वगैरेंकडे असे. बझैल इंटरनेट कॅफेत संगणकावर बसून आपल्या ब्लॉगमध्ये रोजचे अनुभव लिहून ठेवत असे. त्याचं हे लिखाण सतत आठ आठवडे चाललं. आठ आठवड्यांत त्याच्या ह्या ब्लॉगने चांगला आकारही घेतला होता. ह्या ब्लॉगमधून एक ब्लुक किंवा पुस्तक तयार होईल हे त्याच्या ध्यानीमनीही नव्हतं. आठ आठवड्यानंतर बझैलचा हा उद्योग त्याच्या अधिकार्‍यांच्या लक्षात आला. त्यांनी अर्थातच त्याचं पुढलं लिखाण थांबवलं. दरम्यानच्या काळात त्याचा ब्लॉग पत्रकारांमध्ये चांगलाच माहितीचा झाला होता. इराकमध्ये प्रत्यक्ष मशिनगन चालवणारा एक सैनिक खुद्द युद्धस्थळावर अनुभवलेला हाल कथन करत असल्याने कित्येक वृत्तपत्रांनी त्याच्या ब्लॉगचा उल्लेख आपल्या वृत्तांतून केला. साहजिकच प्रकाशकांचं लक्ष त्या ब्लॉगकडे गेलं. त्यातून My War: Killing Time in Iraq हे ब्लुक जन्माला आलं. ह्या पुस्तकाची रॉयल्टी बझैलला जी काही मिळाली असेल ती असेल. पण २००७ च्या ब्लुक पुरस्कारांचा तो मानकरी ठरला. बझैल म्हणतो, की मी ब्लॉग लिहीला नसता तर हे कधीच शक्य झालं नसतं.

ब्लुकर पुरस्कारांच्या निमित्ताने ब्लॉग ह्या माध्यमाचे साहित्य जगतातील योगदान किती महत्वाचे आहे हे लक्षात आल्यावाचून रहात नाही. बझैल सारखा शेकडो शत्रूसैनिक ठार मारणारा माणूस ब्लॉग लिहीतो तो केवळ आपल्या समाधानासाठी. पण त्यातून एक पुस्तक जन्माला येतं आणि पेनग्विनसारखा प्रकाशक ते प्रकाशित करतो ह्या उदाहरणावरून बरच काही घेण्यासारखं आहे. मराठीमध्ये आज हजाराहून अधिक ब्लॉग्ज दिसतात. युनिकोड फाँटस सहज उपलब्ध झाल्याने अगदी सामान्यातला सामान्य माणूस आपले विचार व अनुभव मराठीतील आपल्या ब्लॉगवर नोंदवू शकतो. गावोगावी पसरलेले सायबर कॅफे, ब्रॉडबँडचा झपाट्याने होत चाललेला प्रचार आणि अन्न, वस्त्र, निवार्‍याबरोबर आवश्यक बनू पहाणारं इंटरनेट यांतून अनपेक्षितपणे कितीतरी ब्लुक्स आपल्यासमोर येऊ शकतात.

तळागाळांतून उभं राहिलेलं दलित साहित्य हे मराठी साहित्यातील एक अतिशय महत्वाचं दालन आहे. पण लिहीलं गेलेलं सर्वच दलित साहित्य पुस्तक रूपाने छापलं गेलं असेल असं नाही. असं साहित्य सहजपणे ब्लॉगवर जाऊ शकतं. त्यातून ब्लुग्ज जन्माला येऊ शकतात. बुक आणि ब्लुक यात फरक हा की बुकसाठी प्रकाशक शोधावा लागतो, आणि तो सहजासहजी मिळत नाही. मी लिहीलं तर कोण प्रकाशित करणार, मग लिहा कशाला उगाच? असा प्रश्न करणारांना ब्लॉग आणि ब्लुक हे दोन शब्द म्हणजे वरदानच आहेत. कोणी प्रकाशित केलं नाही तरी तुमचा ब्लॉग प्रकाशित होऊ शकतो. त्यासाठी एक दमडीही खर्च येत नाही. संगणक व इंटरनेटचं जुजबी ज्ञान त्यासाठी पुरेसं असतं हा संदेश बझैलच्या उदाहरणावरून आपल्यापर्यंत पोहोचतो आहे.

मध्यंतरी एक मराठी ब्लॉग चालवणारा किशोरवयीन मुलगा भेटला. तो स्वतःच्या कवितांचा ब्लॉग चालवतो. तो म्हणाला "मला ब्लॉग हा प्रकार फारच आवडतो. कारण तो माझी एकही कविता 'साभार' पाठवत नाही. माझ्या सर्व कविता त्यावर प्रकाशित होतात. त्यावर कॉमेंटस आल्या की मला धमाल वाटते. कविता मी कुठेही पोस्टाने पाठवत बसत नाही."

मला वाटतं की आपल्या प्रकाशकांनी ह्या ब्लुक प्रकाराकडे लक्ष ठेवून असायला हवं. मराठीतला एखादा बझैल त्यातून त्यांना केव्हा मिळेल हे सांगता येणार नाही. मराठी ब्लॉग्जमधून जर ब्लुक्स जन्माला येऊ लागली तर शासनानेही त्याकडे स्वागताचा कटाक्ष टाकायला हवा. ब्लुक्ससाठी शासनाचा पुरस्कार जाहीर झाला तर मराठीच्या मुकुटातील ते एक नवे पिस ठरल्याशिवाय राहणार नाही.

नेक्सस फाईल

कोरिया हा आशिया खंडातला आकाराने तसा लहानसाच देश. सॉफ्टवेअरच्या विश्वात कोरियाचं योगदान मर्यादितच मानलं जातं. पण ह्या देशातल्या जुंगहून नोह् ह्या तरूणाने तयार केलेली नेक्सक फाईल आणि नेक्सस फाँट ही दोन सॉफ्टवेअर मला नेहमीच प्रभावित करतात. जुंगहून नोह् हा शिक्षणाने आणि व्यवसायाने सॉफ्टवेअर इंजिनीयर. दोन वर्षे कोरियाच्या सैन्यात आणि दोन वर्षे सॅमसंग कंपनीच्या सॉफ्टवेअर डिव्हीजनमध्ये काम केलेला जुंगहूनचा सध्याचा व्यवसाय काय? हा प्रश्न घेऊन आपण त्याची अधिकृत xiles.net ही वेबसाईट पाहिली तर Now - ? इतकच वाचायला मिळतं. एप्रिल २००७ पर्यंत जुंगहून सॅमसंग कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनीयर म्हणून काम करीत होता. पण नंतर काय, त्याच उत्तर म्हणजे केवळ एक प्रश्नचिन्ह.

जुंगहून सध्या तो करीत असलेल्या कामाचं वर्णन जर केवळ एका प्रश्नचिन्हात आटपून टाकीत असेल तर ते प्रश्नचिन्ह नीट तपासून पहावं लागतं. कारण सरळ आहे जुंगहून ने तयार केलेल्या Nexusfile ह्या सॉफ्टवेअरचं पाचवं व्हर्जन जून २००८ मध्ये बाहेर आलं. पुढे लगोलग नेक्ससफाँट ह्या त्याच्याच सॉफ्टवेअरचं दुसरं व्हर्जन जुलै २००८ मध्ये त्याने जगासमोर टाकलं. ऑगस्ट २००८ मध्ये, म्हणजे पुढच्याच महिन्यात जुंगहूनने नेक्ससफाईल चं आणखी सुधारित म्हणजे 5.02 हे व्हर्जन उपलब्ध केलं. जुंगहूनच्या Now - ? चा अर्थ हा असा आहे.

नेक्ससफाईल म्हणजे आपला विंडोज फाईल मॅनेजर असतो तसा फाईल मॅनेजर आहे. पण तो साधा फाईल मॅनेजर नाही. तो अतिशय बुद्धीमान, सक्रिय आणि उत्साही असा फाईल मॅनेजर आहे. म्हणजे नेमकं काय? नेमकं सांगायचं तर नेक्ससफाईल हा जुंगहूनचा फाईल मॅनेजर मायक्रोसॉफ्टच्या फाईल मॅनेजरपेक्षा कितीतरी स्मार्ट म्हणावा अशा प्रकारचा फाईल मॅनेजर आहे. अजूनही आपल्याला म्हणजे नेमकं काय हे लक्षात आलेलं नाही. नेक्ससफाईलची वैशिष्ट्ये एक एक करून उलगडून दाखवायची तर चार दोन लेखांचा पसारा मांडावा लागेल. पण थोडक्यात सांगायचं तर ही काही वैशिष्ट्ये पहाः एक, नेक्ससफाईलला दोन फाईल पेन्ज म्हणजे रकाने आहेत. एकाच वेळी सी ड्राईव्ह आणि ई ड्राईव्ह त्यात तुम्ही उघडू शकता. सी ड्राईव्हमधल्या एखाद्या डिरेक्टरीतील एखादी फाईल तुम्ही ई ड्राईव्हमधल्या डिरेक्टरीत कॉपी किंवा मुव्ह करू शकता. विंडोज फाईल मॅनेजर मध्ये ही सोय नाही. एकाच नेटवर्कवरील दोन वेगवेगळ्या संगणकांमध्ये अशा प्रकारची फाईल्सची हलवाहलव करणे यासाठीही नेक्ससफाईल उपयुक्त ठरते.

आपण जेव्हा फाईल मॅनेजर उघडतो तेव्हा एक भली मोठी यादी आपल्यासमोर येते. ही यादी बघून बघून 'तेच ते आणि तेच ते' आपल्या डोळ्यासमोर उभं ठाकत असतं. नेक्ससफाईल मध्ये ही यादी बहुरंगात येते. डिरेक्टरीज किंवा फोल्डर्स हो लाल रंगात दिसतात. Exe फाईल हिरव्या रंगात एकत्र दिसतात. Pdf फाईल्स निळ्या रंगात, ह्या सर्व रंगांना काळ्या रंगाची पार्श्वभूमी असल्याने फाईल मॅनेजर पाहताना होतो तसा त्रास नेक्ससफाईल पाहताना होत नाही. थोडक्यात, उत्तम मांडणी, उत्तम व्यवस्था असलेला नेक्ससफाईल आहे.

आज तरी नेक्ससफाईल जगाला मोफत उपलब्ध आहे. उद्या जुंगहून नोह् ने ठरवलं आणि एखाद्या मोठ्या कंपनीने हे सॉफ्टवेअर टेकओव्हर केलं तर मात्र काही हजार रूपये किंमतीचा शिक्का त्यावर बसल्याशिवाय राहणार नाही. मात्र, काही हजार रूपये किंमत मोजून नेक्ससफाईल विकत घेऊन वापरायला जगातले लाखो लोक तयार झाल्याशिवाय राहणार नाहीत हेही तेवढच खरं आहे. नेक्ससफाईल मध्ये तुम्ही एखादी भली मोठी फाईल म्हणजे उदाहरणार्थ ४० एम.बी. आकाराची फाईल तिचे प्रत्येकी आठ एम.बी. आकाराचे पाच तुकडे करून ते वेगवेगळ्या पाच इमेलना अटॅच करून पाठवू शकता. तसंच दहा टेक्स्ट फाईल एकमेकांना जोडून त्याची एक फाईल तयार करू शकता. स्प्लीट आणि जॉईन ची सुविधा घेण्यासाठी आपल्याला एरवी आणखी एखादं वेगळं सॉफ्टवेअर वापरावं लागतं. पण नेक्ससफाईलने ते फाईल मॅनेजरमध्येच उपलब्ध केलं आहे. आपल्या नेहमीच्या फाईल मॅनेजर मध्ये उपलब्ध नसलेल्या अशा अनेक सोयी नेक्ससफाईलमध्ये उपलब्ध आहेत. त्या प्रत्यक्ष पाहूनच त्याचे खरे मोल जाणता येईल. नेक्ससफाईल चा गौरव कितीतरी फ्रीवेअर फाईल्स वेबसाईटसनी पंचतारांकित सॉफ्टवेअर म्हणून केला आहे. पंचतारांकित सेवा मोफत मिळत असेल तर जुन्या धर्मशाळेत कोण कशाला थांबेल हे तर अगदी सरळ आहे. जुनी धर्मशाळा सोडायची की नाही हा भाग पुढचा. मोफतच्या पंचतारांकित दालनात डोकावून बघायला आज काहीच हरकत नाही, हे मात्र खरं.

जुंगहून नोह् चं नेक्ससफाईल सारखचं आणखी एक अतिशय उपयुक्त सॉफ्टवेअर म्हणजे नेक्ससफाँट. तुमच्या संगणकावर एखादा नवा फाँट लावण्यासाठी किंवा नको असलेला फाँट काढून टाकण्यासाठी नेक्ससफाँट खूप कामास येतो. आपल्याकडे असलेल्या फाँटची लिस्ट त्यातील फाँटच्या नमुन्यासह आणि मुख्य म्हणजे आपल्याला हव्या त्या शब्दांमध्ये तयार करून त्याची प्रिंट नेक्ससफाँटमध्ये घेता येते. डिटीपी ऑपरेटर्स आणि डिझायनर्सना नेहमी अँटी अलायझिंग प्रकारचे फाँटस लागतात. त्याची सोय नेक्ससफाँट मध्ये आहे. फाँटलिस्ट किंवा आपल्याकडील फाँटची यादी एक चित्र (म्हणजे जेपीजी किंवा तत्सम ग्राफीक फाईलच्या स्वरूपात) म्हणूनही तिथे सेव्ह करता येते. थोडक्यात, नेक्ससफाँट हा एक उत्तम फाँटव्युवर आहे. तोही प्रत्यक्ष डाऊनलोड करून वापरून पहायला हवा.

नेक्ससफाईल आणि नेक्ससफाँट हे दोन्ही प्रोग्राम्स मोफत डाऊनलोडींगसाठी www.xiles.net ह्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. ह्या दोन्ही प्रोग्राम्समध्ये युनिकोड सपोर्ट आहे. त्यामुळे मराठी वा अन्य भाषांतील अक्षरेही तिथे व्यवस्थित दिसतात. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे नेक्ससफाईल आणि नेक्ससफाँट यांचं इन्स्टॉलेशन अत्यंत सोप आणि सुरक्षित आहे. ह्या दोन्ही फ्रीवेअर्स किंवा मोफत सॉफ्टवेअर्सची शिफारस मला करावीशी वाटते.

पेन ड्राईव्हमधील तिजोरी

पेन ड्राईव्ह उर्फ युएसबी ड्राईव्ह उर्फ युएसबी स्टीक या सदर्भातला हा लेख आहे हे शीर्षकावरून तुमच्या लक्षात आलेलं आहे. जे तुमच्या लक्षात आलय ते अगदी बरोबर आहे. पेन ड्राईव्हच्या संदर्भातलाच हा लेख आहे. ज्या शीर्षकावरून तुम्ही हे ताडलत त्यातले पेन ड्राईव्ह हे शब्द तुम्हाला दिसले आणि तुम्ही तुमचा अंदाज बांधलात. तुमचा तो अंदाज बरोबर जरी असला तरी तो अर्धा अंदाज आहे. कारण शीर्षकात पुढे 'तिजोरी' हा शब्द आहे. पेन ड्राईव्हमधील तिजोरी म्हणजे नेमकं काय याचा अंदाज तुम्हाला आलेला नाही. तो यावा यासाठी मी एक साधं रोजच्या जीवनातलं उदाहरण घेतो.

कल्पना करा, आपण घरातून बाहेर जायला निघालेलो आहोत. घराला कुलूपही लावून झालेलं आहे. आता त्या कुलूपाची चावी आपण आपल्या विश्वासू शेजार्‍यांकडे देतो, आणि निश्चिंत मनाने बाहेर पडतो. शेजार्‍यावर आपला विश्वास असतो. पण एक लक्षात घ्यायला हवं की शेजार्‍यावर कितीही विश्वास असला तरी आपल्या कपाटातील तिजोरीची चावी आपण शेजार्‍याला देत नाही. आपल्या तिजोरीत नेमकं काय ठेवलय याची माहितीही, शेजारी कितीही विश्वासू असला तरी, आपण त्याला देत नसतो. हे सगळं स्वाभाविक असतं. मुख्य दरवाजाची चावी लावून शेजारी आपलं घर उघडू शकतो याची कल्पना आपल्याला असते. आपल्या अनुपस्थितीत त्याने तशा पद्धतीने घर उघडलं तरी आपली त्याला तशी हरकत नसते. पण आपल्या घराची तिजोरी आणि त्यातल्या चीजवस्तू ही आपली खाजगी आणि अतिशय गुप्त अशी बाब असते. ती चावी आपण कुणालाच देत नसतो.

रोजच्या जीवनातलं हे उदाहरण बाजूला ठेवून आपण आपल्या पेन ड्राईव्हकडे वळू. पेन ड्राईव्ह म्हणजे काय हे 'एंटर' च्या वाचकांना समजावून सांगण्याची आवश्यकता नाही. ह्याच सदरात आपण 'ज्याची त्याची मास्टर की' नावाचा लेख वाचला होता. त्यात मी पेन ड्राईव्हचा वापर किती सोपा झाला आहे, किती परवडण्याजोगा आहे आणि प्रत्येकाला तो किती आवश्यक झाला आहे हे लिहीलं होतं. त्यामुळे तो भाग टाळून आपण आपल्या पेन ड्राईव्हकडे वळू. पेन ड्राईव्ह आणि आपलं घर याची तुलना करून पहा. पेन ड्राईव्ह हा सुद्धा आपल्या घरासारखाच असतो. पूर्णतः आपला स्वतःचा, स्वतःपुरता आणि ज्याच्यात आपल्याला पूर्ण प्रायव्हसी अपेक्षित असते अशी ती जागा (स्पेस) असते. घरातही स्पेस असते, आणि पेन ड्राईव्हमध्येही स्पेस असते. घरात आपलं चालतं. पेन ड्राईव्हमध्ये काय ठेवायचं, काय काढायचं याबद्दलही आपलं चालत असतं. ह्या निकषांवर आपलं घर आणि आपला पेन ड्राईव्ह यांच्यात चांगलच साम्य आहे.

आपल्या पेन ड्राईव्हमध्ये कशाकशाचा म्हणून भरणा नसतो? मित्र-मैत्रिणीच्या पर्सनल फोटोंपासून ते आपल्या वेगवेगळ्या पासवर्डपर्यंत आपण त्यात भरलेलं असतं. आपल्या आठ, दहा ईमेलचे पत्ते, आपल्या दोन चार क्रेडिट कार्डांचे एटीएम पिन नंबर्स, बॅंकेच्या लॉगिनचा तपशील, हिशोब, महत्वाची पत्रे वगैरे वगैरे सगळा जोखमीचा डेटा आपल्या पेन ड्राईव्हमध्ये साठवून ठेवणारी मंडळी मला माहीत आहेत. काही जण तर आपली रोजनिशी लिहून ती पेन ड्राईव्हमधल्या डायरी नावाच्या फोल्डरमध्ये दैनंदिन स्तरावर साठवत असतात. हा सारा डेटा दुसर्‍या कोणाच्याही हातात पडू नये असं आपल्याला वाटणं हे अगदी स्वाभाविक असतं. अतिशय खाजगी आणि अतिशय व्यक्तीगत असा तो माहिती-ऐवज असतो. असं असताना अचानक आपला पेन ड्राईव्ह दुसर्‍या कोणाच्या तरी हातात देण्याची वेळ आपल्यावर कधी तरी येते. अशा वेळी आपली गडबड उडते. पेन ड्राईव्हमध्ये तो व्यक्तीगत डेटा असतो. दुसर्‍याच्या हातात तो द्यावा, तर आपल्याला अडचणीचं वाटत असतं. वेळ तर आणीबाणीची असते. घाईचीही असते. वेळ नसतो. मग अशा वेळी आपण मधला मार्ग शोधतो. आपला पेन ड्राईव्ह आपण दुसर्‍याच्या हातात देण्यापूर्वी त्यातला तो व्यक्तीगत डेटा प्रथम डिलीट करतो. डिलीट झाल्याची खात्री करतो, मग निर्धास्त मनाने पेन ड्राईव्ह आपल्या मित्राच्या, नातेवाईकाच्या, किंवा सहकार्‍याच्या किंवा बॉसच्या हातात देतो. साधारणतः हीच मंडळी अशी असतात की ज्यांच्या आग्रहाला बळी पडण्यावाचून आपल्याला गत्यंतर नसतं.

आता पहा, आपलं घर आणि आपला पेन ड्राईव्ह याच्यातला फरक. आपल्या घराची चावी शेजार्‍याकडे ठेवताना आपण निर्धास्त असतो. कारण आपल्याला माहीत असतं की शेजार्‍याने घर उघडलं तरी त्याला आपली तिजोरी उघडता येणार नाहीये. त्या तिजोरीत काय आहे हे त्याला कधीच समजणार नाहीये. पण पेन ड्राईव्हमध्ये तशी तिजोरी कुठे असते? सगळच उघडं असतं. ज्याच्या हातात पेन ड्राईव्ह असतो तो त्यातलं काहीही पाहू शकतो. अशा परिस्थितीत काय करायचं? किती वेळा आपला व्यक्तीगत डेटा त्यात कॉपी करायचा, किती वेळा डिलीट करायचा? ह्या परिस्थितीवर काही उपाय नाही का? घरात जशी बंद तिजोरी असते, तशी काहीतरी पण पूर्णतः खात्रीची सोय आपल्या पेन ड्राईव्हमध्ये करता येणार नाही का?

मंडळी, घरातल्या तिजारीइतकीच किंबहुना त्यापेक्षा उत्तम सोय आपल्याला आपल्या पेन ड्राईव्हमध्ये करता येते. आपला व्यक्तीगत डेटा त्यात ठेवून आपण आपला पेन ड्राईव्ह निर्धास्तपणे कुणाच्याही हातात देऊ शकतो. आपला पेन ड्राईव्ह त्याने ' कोना कोना छान मारून ' पाहिला तरी आपल्या तिजोरीत काय आहे हे त्याला दिसूही शकत नाही, आणि कळूही शकत नाही. खरं तर आपली ती तिजोरीच मूळात अदृश्य असते. जर तिजोरीच दिसत नसेल तर त्यात आत काय आहे हे कळण्याची कसलीही सुतराम शक्यता मूळातच नाही. अगदी एखादा काँप्युटर एक्सपर्ट जरी येऊन बसला किंवा एखाद्या हॅकरच्या हातात तुमचा पेन ड्राईव्ह सापडला तरी त्यालाही दुसरा जन्म घेतल्याशिवाय ती तिजोरी फोडून आतला ऐवज पाहता येणार नाही.

पेन ड्राईव्हमध्ये तिजोरीची ही जी संकल्पना मी सांगतो आहे, तिचे नाव आहे ' रोहोस मिनी ड्राईव्ह ' . संकल्पना साधी सोपी आहे. तुमच्या पेन ड्राईव्हमध्येच एक स्वतंत्र ड्राईव्ह गुप्तपणे जन्माला घातला जातो. ह्या ड्राईव्हमध्ये तुम्हाला हव्या त्या पद्धतीने फोल्डर्स व फाईल्स ठेवता येतात. ही सारी फोल्डर्स व फाईल्स AES 256 bit key length पद्धतीने एन्क्रीप्ट करून साठवली जातात. म्हणजेच तुम्ही त्यात फोटो साठवला असला किंवा एखादी व्हिडिओ क्लीप त्यात ठेवली असली तरी ती सांकेतिक भाषेत गोंधळ घालून ठेवलेल्या माहितीसारखी भासते. ती वाचणं हे हॅकर सोडा ब्रम्हदेवालाही शक्य होणारं नसतं. आता बघा, तुमचा पेन ड्राईव्ह जेव्हा तुम्ही तुमच्या किंवा कोणाच्याही संगणकाच्या युएसबी ड्राईव्हमध्ये सरकवता तेव्हा तुम्हाला काहीतरी G किंवा H वगैरे अद्याक्षराचा नवा ड्राईव्ह विंडोज एक्स्प्लोअरर मध्ये दिसू लागतो. माझ्या संगणकात मी माझा पेन ड्राईव्ह लावला की H ड्राईव्ह अवतरतो. ह्याच ड्राईव्हमध्ये आपल्या पेन ड्राईव्हमधील फोल्डर्स आणि फाईल्स असतात. मी माझ्या पेन ड्राईव्हमध्ये रोहोस मिनी ड्राईव्ह ची सोय केली आहे. रोहोस मिनी ड्राईव्ह म्हणजे दुसरं तिसरं काही नसून एक प्रकारची तिजोरीच (तीही एन्क्रीप्शनची सोय असलेली) आहे. माझ्या H ड्राईव्हमध्ये इतर सर्व फोल्डर्स व फाईल्स दिसतात. त्या कोणालाही दिसतात. पण रोहोस मिनी ड्राईव्ह मधील फोल्डर्स व फाईल्स मात्र दिसत नाहीत. त्या ऐवजी Rohos नावाची एक Exe फाईल दिसते. ह्या फाईलवर क्लीक केल्यानंतर ती तुमचा पासवर्ड मागते. तो पासवर्ड दिल्याशिवाय माझ्या माहितीची तिजोरी मूळातच उघडत नाही. त्यामुळे तिजोरीतला माझा तो डेटा सुरक्षित राहतो. इतरांच्या हातात पेन ड्राईव्ह देऊनही मला डेटा सेफ्टी ची भिती नसते.

हा रोहोस मिनी ड्राईव्ह लावणं अतिशय सोपं आहे. लहान मुलांनाही तो सहजपणे लावता येईल इतका सोपा. त्याची पद्धत सांगतो. प्रथम http://www.rohos.com/rohos_mini.exe ह्या लिंकवरून रोहोस मिनी ड्राईव्ह डाऊनलोड करून घ्या. तो तुमच्या संगणकावर इन्स्टॉल करा. तुमच्या संगणकावर Windows XP किंवा Windows Vista असणं मात्र आवश्यक आहे. रोहोस मिनी ड्राईव्ह पूर्णपणे मोफत उपलब्ध आहे. त्यात तुम्ही १ जीबीपर्यंतचा डेटा एन्क्रीप्ट करून गुप्त ड्राईव्हमध्ये साठवू शकता. रोहोसचे वैशिष्ट्य हे की एक पेन ड्राईव्ह असून तुमच्या एक्स्प्लोअररमध्ये दोन ड्राईव्हज दिसतात. माझ्या बाबतीत एक ड्राईव्ह H असतो तर दुसरा ड्राईव्ह R असतो. H मधला डेटा सर्वांसाठी खुला असतो. R ड्राईव्ह पासवर्ड टाईप केल्याशिवाय मूळातच दिसत नाही. पासवर्ड टाईप केला की मात्र एक्स्प्लोअरर तो दाखवू लागतो. पासवर्ड आपल्याला हवा तेव्हा बदलता येतो. गुप्त ड्राईव्हमध्ये फोल्डर्स वा फाईल्स घालता येतात, काढता येतात. एन्क्रीप्शनची प्रक्रिया त्यात आपोआप होते, आपल्याला त्यासाठी काहीही करावं लागत नाही. ही सारी माहिती www.rohos.com ह्या साईटवर तुम्हाला पहायला मिळेल.

थोडक्यात काय, तर यापुढे काळजी करू नका. आपलं घर काय, किंवा पेन ड्राईव्ह काय चावी विश्वासू शेजार्‍याच्या हातात द्यायला हरकत नाही. तिजोरी मात्र नीट बंद करून ठेवा. त्याची चावी कोणाच्याही हातात पडणार नाही याची काळजी घ्या. तिजोरीत हवा तो ऐवज ठेवा. नंतर मग मात्र निर्धास्त राहण्याची सवय करून घ्यायला हवी. निर्धास्त कसं रहायचं हे शिकवणारे ब्लॉग्ज आणि ट्युटोरियल्सही इंटरनेटवर उपलब्ध आहेत. तेव्हा काळजी नसावी.

द. आशियाई दहशतवादाचा माहिती कोश

दहशतवाद हा विषय गेली कित्येक वर्षे जागतिक चव्हाट्यावर चर्चिला जातो आहे. २६ नोव्हेंबरला मुंबईवर जे दहशतवादी हल्ले झाले त्यामुळे तर हा विषय दुरदर्शनवरच्या बातम्यांचा मिनिटा मिनिटांचा अपडेट बनला आहे. वर्तमानपत्रांचे अक्षरशः हजारो रकाने दहशदवादाच्या बातम्या, छायाचित्रे, लेख आणि संपादकीयांनी भरून वाहताना आपण गेल्या महिनाभर पाहिले. लोकसभेपासून ते राज्यसभा आणि विधानमंडळापर्यंत हा विषय गाजतो आहे. मुख्यमंत्र्यांपासून ते केंद्रीय गृहमंत्र्यापर्यंत अनेकांना आपल्या खुर्च्या ह्याच विषयामुळे सोडाव्या लागल्या आहेत. जागतिक राजकारण त्यामुळे ढवळून निघाले आहे. युद्धाचे ढग गडगडाट करू लागले आहेत. अन्न, वस्त्र, निवारा आणि दहशतवादापासून संरक्षण ह्या आता खर्‍या अर्थाने सामान्य माणसाच्या चार किमान गरजा बनल्या आहेत.

ज्या वेळी दहशतवादी हल्ला होतो त्यावेळी आणि पुढले काही दिवस हा विषय कमालीचा चर्चेत राहतो. पुढे काही दिवसांनी वातावरण शांत झाले की हळू हळू तो विषय पडद्याआड जाऊ लागतो. संसदेवर झालेला हल्ला आठवा. संपूर्ण राष्ट्र त्याने ढवळून निघालं. पण नंतर तो विषय मागे पडला. मग वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्बस्फोटांच्या मालिका झाल्या. पुन्हा ते सारं विसरून लोक कामाला लागले. मुंबईवर झालेल्या हल्ल्याने मात्र सर्वच जण हादरले. आता जो तो दहशतवादाविषयीची माहिती कुठे वाचायला मिळाली की विशेष जिव्हाळ्याने ती वाचतो. त्यावर चर्चा करतो. हे सारं अगदी मनापासून होतं. कारण सामान्य माणूस आता हे गृहित धरून चालू लागला आहे, की ज्या रेल्वे स्टेशनवर तो उभा आहे तिथे कधीही गोळ्यांचा वर्षाव करणारा दहशतवादी अचानक उपटू शकतो. आयुष्यभर जी पथ्ये, औषधपाणी आणि उपचार घेत तो आपला जीव वाचवत आला तो जीव एका गोळीने केव्हाही जाऊ शकतो.

दहशतवादावर वर्तमानपत्रातून खूप लिहीलं जातय. दुरदर्शन वाहिन्यांवर खूप काही दाखवलंही जातय. पण ते सारं तात्कालिक असतं. संसदेवर झालेल्या हल्ल्याची बातमी देणारं वृत्तपत्र आज शोधायचं झालं तर सहजासहजी ते मिळू शकेल का? अशा वेळी संदर्भासाठी हमखास कामी येतं ते इंटरनेट. पण इंटरनेटवरही ते सारे संदर्भ एका जागी मिळणं दुरापास्त असतं. गुगलवर खूप वेळ शोधावं, पुन्हा पुन्हा शोधावं म्हणजे मग त्यातलं काही हाती येतं. ह्या शोधण्यात खूप वेळ आणि शक्ती खर्ची होते. अशा वेळी स्वाभाविकच मनात विचार येतो की दहशतवादासारख्या विषयाची सर्वांगीण माहिती एका जागी उपलब्ध करणारी एखादी वेबसाईट कोणती? मनात येणारा हा प्रश्न वरकरणी सरळ वाटतो. पण तो खर्‍या अर्थाने सरळ नसतो. दहशतवाद हा क्षणाक्षणाला बातम्या फोडणारा विषय आहे. वेबसाईटवर दहशतवादाची माहिती एकत्रित तर हवीच, पण ती अगदी मिनिटा मिनिटाला नसली तरी निदान दररोज अपडेट होणारी हवी. सर्वंकषता आणि अद्ययावतता ह्या दोन बाबींची पुर्तता करणारी वेबसाईट मिळेलही, पण त्या दोन बाबींपेक्षाही महत्वाची बाब म्हणजे त्या साईटची विश्वासार्हता. सर्वंकष व अद्ययावत पण चुकीची व अपुरी माहिती देणारी वेबसाईट असेल तर ती दहशतवादाइतकीच धोकादायक ठरेल.

दहशतवादासारख्या विषयावरील वेबसाईट कशी हवी याविषयीची प्रस्तावना आपण वर केली. आणखी एक मुद्दा म्हणजे आपण पॅलेस्टाईन-इस्त्रायलमधील किंवा ब्राझील-मेक्सिकोमधील दहशतवादापेक्षा अधिक संबंधित असतो ते पाकिस्तान, बांगला देश, श्रीलंका, नेपाळ आणि खुद्द आपल्या देशातील दहशतवादाशी. त्यामुळे आपल्याशी संबंधित दहशतवादाशी संबंधित, सर्वंकष, अद्ययावत आणि विश्वासार्ह अशी वेबसाईट ही ह्या संदर्भातील आपली गरज आहे. हे सगळे निकष भागवणारी, मला नोंद घ्यावीशी वाटणारी वेबसाईट म्हणजे http://www.satp.org/

SATP म्हणजे South Asian Terrorism Portal. ह्या संदर्भात नोंद घेण्यासारख्या दोन गोष्टी. एक म्हणजे ही वेबसाईट .org प्रकारची म्हणजे कोणत्या तरी संस्थेची आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ही वेबसाईट ना नफा, ना तोटा तत्वावर चालणार्‍या सामाजिक संस्थेची आहे. त्या संस्थेचे नाव आहे Institute for Conflict Management. ही एक नोंदणीकृत आणि मुख्य म्हणजे भारतीय संस्था आहे. पंजाबात पोलीस दलाचे प्रमुख म्हणून गाजलेले के.पी.एस. गिल हे निवृत्त आय.पी.एस. अधिकारी ह्या संस्थेचे अध्यक्ष आहेत. ह्या संस्थेतर्फे दहशतवादाची माहिती देणारं Faultlines नावाचं एक नियतकालिक प्रकाशित होतं. त्याचे संपादकही के.पी.एस. गिल हेच आहेत. दहशतवाद हा विषय जाणणारा गिल यांच्यासारखा ज्येष्ठ व अनुभवी माणूस ज्या संस्थेचा अध्यक्ष व संस्थेच्या नियतकालिकाचा संपादक आहे अशी वेबसाईट आपण निश्चितच विश्वासार्ह मानू शकतो.

SATP.ORG मध्ये फक्त दक्षिण आशियाचा विचार होत असल्याने त्यात फक्त भारत, पाकिस्तान, बांगला देश, भूतान, नेपाळ व श्रीलंका हे देश अंतर्भूत होतात. मूळ भारतीय संस्था असल्याने भारताचा विचार त्यात पूर्ण विस्ताराने होणार हे ओघानेच आले. स्वाभाविकच जम्मू-काश्मीर, आसाम, मणीपूर, त्रिपुरा, मिझोराम, नागालँड आंध्र प्रदेश, अरूणाचल प्रदेश व पंजाब ह्या राज्यांची दहशतवादाशी संबंधित सविस्तर पार्श्वभूमी आपल्याला इथे एकत्र मिळते. ह्या माहितीशी संबंधित तज्ज्ञांचे शेकडो लेख, आकडेवारीचे रकाने, टाईमलाईन म्हणजे घडलेल्या घटनांचा कालानुरूप क्रमाचा तपशील वगैरे त्यात उपलब्ध करण्यांत आला आहे. ह्या वेबसाईटवरील लिंक्सची ही शीर्षके पहाः Backgrounder, Assessment, Data Sheets, Timelines, Documents, Bibliography, Terrorist Groups, Maps वगैरे वगैरे. ह्या शीर्षकांवरून आत काय असेल याची आपल्याला कल्पना येते. ह्या शिवाय Terrorism Update ह्या सदरामध्ये आपल्याला दैनंदिन स्तरावर घडणार्‍या दहशतवादी घटनांची वृत्ते उपलब्ध होतात.

यातला पाकिस्तानचा विभाग भरगच्च माहितीने युक्त आहे. कारगिल युद्धाचे वेळी पाकिस्तानचे पंतप्रधान असणारे नवाझ शरीफ यांनी १२ जुलै १९९९ रोजी पाकिस्तानच्या जनतेला उद्देशून जे भाषण केले होते त्या पासून ते अगदी अलिकडील राष्ट्राध्यक्ष झरदारी यांच्या भाषणांपर्यंतचा शब्दशः तपशील पाकिस्तान डॉक्युमेंटस मध्ये वाचायला मिळतो. १२ जुलै १९९९ रोजी संभाव्य युद्धाच्या संदर्भात पाकिस्तानी जनतेशी जाहीरपणे बोलताना तात्कालिन पंतप्रधान नवाझ शरीफ म्हणाले होते " Dear brother and sisters, by the grace of God, Pakistan is not a wall of sand or a child's plaything. We have the ability to deal befittingly with aggression. Had war been imposed on us, the invader would have lived to regret the day. However, we do not wish to make war, nor have we looked for it. We know that in a nuclear conflict there can be no victors…."

१९९९ साली नवाझ शरीफ जे म्हणाले होते आणि आज २००८ मध्ये झरदारी आणि गिलानी जे म्हणत आहेत त्यातलं प्रचंड साम्य पाहून आश्चर्य वाटतं. अगदी अभ्यास म्हणून नाही तरी 'युद्धस्य कथा रम्याः' म्हणतात त्या न्यायानं ही सारी माहिती आपल्याला रंजक वाटते. अशा प्रकारच्या माहितीचा प्रचंड साठा ह्या वेबसाईटवर आहे.

थोडक्यात, दहशतवादाचा विषय जेव्हा जेव्हा येईल त्या त्या वेळी satp.org ही साईट आपल्या मदतीला येईल. ह्या विषयासाठी केवळ ह्या एकाच वेबसाईटवर अवलंबून रहावं असं मी अर्थातच म्हणणार नाही. पण ह्या संदर्भात इंटरनेटवर माहितीचा जो सागर आहे त्या सागरातला हा एक उपयुक्त तराफा मात्र नक्कीच आहे. दहशतवादाविषयीच्या माहिती सागरात नेटवर गटांगळ्या खाऊ लागलात आणि दिशा सापडेनाशी झाली तर ह्या तराफ्याचा आधार तुम्हाला नक्कीच वाटेल.

उपयुक्त झमझार

The Metamorphosis हे नाव तुम्ही ऐकलं असेल. जगप्रसिद्ध जर्मन कादंबरीकार फ्रँझ काफ्का याची १९१५ साली प्रकाशित झालेली ही कादंबरी. ह्या कादंबरीत ग्रेगर झॅमझाँ (Gregor Samsa) हे एक पात्र आहे. ग्रेगर हा तरूण व्यवसायाने फिरता विक्रेता असतो. रात्री झोपेतून उठल्यानंतर ग्रेगर झॅमझाँचं रूपांतर एका महाकाय किटकात होतं. झुरळ नाही पण आकाराने प्रचंड अशा झुरळासारखा व उडण्याची क्षमता असलेला हा किटक. मूळ माणसाचं रूपांतर किटकात होतं ही कादंबरीची संकल्पना सुमारे पावणेदोनशे वर्षांनंतर एका वेबसाईटला आपल्या नावासाठी घ्यावीशी वाटली. ती वेबसाईट म्हणजे www.zamzar.com.
Zamzar.com ला The Metamorphosis कादंबरीतल्या त्या पात्राच्या नावाचं आकर्षण वाटलं याचं कारण एका गोष्टीचं दुसर्‍या गोष्टीत रूपांतरण होण्याची त्या कादंबरीतली ती संकल्पना. Zamzar.com चा नेमका संबंध रूपांतरणाशीच आहे. ही वेबसाईट फक्त रूपांतरणाचं काम करते. दुसरं काहीही करत नाही. पण तुमच्या आमच्यासाठी झमझार डॉट कॉम प्रचंड आणि कायम उपयोगाची आहे. तुम्ही म्हणाल की असं कसलं रूपांतरण आपल्याला लागत असतं की झमझार सारखी साईट आपल्याला प्रचंड आणि कायम उपयोगाची वाटेल? तुमच्या ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही ह्या साईटला भेट दिलीत की चटकन मिळेल.
झमझार आपल्या संगणकावर असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या फाईल्सचं रूपांतर वेगवेगळ्या प्रकारच्या दुसर्‍या फाईल्समध्ये करते. हे रूपांतरण ऑनलाईन म्हणजे तुम्ही इंटरनेटवर काम करता करता करण्याची सोय झमझारने केली आहे. उदाहरणं देऊन थोडं स्पष्ट करून हे सांगायला हवं. आपण पहिलं उदाहरण तुमच्याकडे असलेल्या डिजिटल कॅमेर्‍याचं उदाहरण घेऊ. आजकाल घरोघरी डिजिटल कॅमेरे आहेत. त्यात तुम्ही जे फोटो घेता ते प्रामुख्याने jpg किंवा jpeg प्रकारच्या फाईल्सच्या स्वरूपात असतात. जेव्हा डिजिटल कॅमेर्‍यातून तुम्ही ते तुमच्या संगणकात उतरवता तेव्हा प्रत्येक फोटो हा .jpg वा .jpeg ह्या फाईल एक्सटेंशनने युक्त असतात. यातला एखादा मूळ jpeg असलेला फोटो समजा तुम्हाला स्मरणिकेत छापायला द्यायचा आहे. छपाईच्या कामात .tif प्रकारच्या फाईल्स सर्रास वापरल्या जातात. छपाई करणार्‍या प्रिंटींग प्रेसने नेमकी जर तुमच्याकडे .tif प्रकारची फाईल मागितली असेल तर? तुमचा फोटो jpeg प्रकारचा आहे. प्रेसला तर tif प्रकारात तुमचा फोटो हवा आहे. अशा वेळी प्रेसच्या त्या गरजेमुळे तुम्हाला तुमची मूळ .jpeg फाईल .tif प्रकारच्या फाईलमध्ये रूपांतरित करणं भाग आहे. हे रूपांतरण फोटोशॉप किंवा कोरल ड्रॉ सारख्या सॉफ्टवेअरमध्ये किंवा Irfanview सारख्या उपयुक्त फ्रीवेअरचा वापर करून होऊ शकतं. पण त्यासाठी तुमच्याकडे ती सॉफ्टवेअर असायला हवीत. नसतील तर डाऊनलोड करून घेण्यासाठी व्यवस्था व वेळ हवा. आणखी एक गोष्ट म्हणजे ती सॉफ्टवेअर वापरण्याची माहितीही हवी. यातलं हवं ते जर तुमच्याकडे तयार नसेल तर Zamzar.com तुमच्या तात्काळ मदतीला येते, आणि तुमची फाईल रूपांतरणाची समस्या सोडवते. तीही मोफत.
एक उदाहरण फोटोचं घेतलं. आता संगीत आणि गाण्यांकडे वळू. समजा तुमच्याकडे गाण्यांची एक सीडी आहे. त्यातली गाणी wav प्रकारच्या फाईल्समध्ये आहेत. तुम्हाला ती mp3 प्रकारच्या फाईलमध्ये हवी आहेत, कारण तुमचा mp3 प्लेअर wav प्रकारातली गाणी प्ले करीत नाही. अशा वेळीही झमझार तुम्हाला wav फाईल्सचं रूपांतर mp3 मध्ये करून देऊ शकतो.

Document प्रकारच्या फाईल्स 

एक अगदी सर्वत्र दिसणारं चित्र म्हणजे मायक्रोसॉफ्ट वर्ड सारख्या लोकप्रिय प्रोग्रामच्या फाईलचं. कुणीतरी आपल्याला ईमेलने अटॅच करून त्याच्याकडील वर्डची फाईल पाठवतो. त्याने पाठवलेली वर्ड फाईल आपल्या वर्ड प्रोग्राममध्ये उघडत नाही. कारण ज्याने फाईल पाठवली त्याच्याकडे मायक्रोसॉफ्ट वर्ड ची २००७ ची आवृत्ती असते. ह्या आवृत्तीत वर्ड फाईल्स तयार होतात त्या docx प्रकारच्या. त्याने पाठवलेली docx फाईल आपण वापरत असलेल्या मायक्रोसॉफ्ट वर्ड २००३ मध्ये उघडत नाही, तिथे फक्त doc प्रकारातली वर्ड फाईलच उघडत असते. म्हणजे गंमत पहा, दोन्हीकडे प्रोग्राम तोच, मायक्रोसॉफ्ट वर्डच. फक्त आवृत्तीत फरक. एक २००७ ची दुसरी नवी, दुसरी २००३ ची त्यामानाने जुनी. अशा पेचप्रसंगात देखील झमझार कामी येतो. तो तुम्हाला doc चे रूपांतर docx मध्ये सहजपणे आणि चुटकीसरशी करून देतो.
वर्डचं जे तेच html आणि pdf चं. नेहमी इंटरनेटवर बसणारांना ह्या दोन्ही प्रकारच्या फाईल्स चांगल्याच पाठ असतात. Html चं रूपांतर pdf मध्ये आणि pdf चं html मध्ये कसं करायचं हा यक्षप्रश्न बड्याबड्यांना पडलेला मी पाहिलेला आहे. हा प्रश्नही झमझार सोडवू शकतो.
वर्डच्या बरोबरीने जवळजवळ प्रत्येक कचेरीत वापरला जाणारा प्रोग्राम म्हणजे एक्सेल. तिथेही xls, xlsx, csv ह्या प्रकारातल्या फाईल्सचं रूपांतर इतर किंवा mdb सारख्या अक्सेस डेटाबेस फाईल्समध्ये करून देण्याचं काम झमझार करू शकतो.
नेहमीचं आपलं पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन घ्या. त्याची ती सुप्रसिद्ध ppt फाईल आपल्याला pdf करून हवी असते. किंवा काही वेळा ppt चं रूपांतर वेबसाईटसाठी फ्लॅशच्या swf फाईलमध्ये करून हवं असतं. तिथेही झमझार सेवा द्यायला सज्ज असतो.
इतर फाईल्स 

आपण नेहमी bmp, jpg, tif, gif, pcx, png ह्या प्रकारच्या इमेज फाईल्स पहात असतो. चित्रे, छायाचित्रे, नकाशे, छोटी अनीमेशन्स, क्लीपार्ट ही बहुधा ह्या प्रकारच्या फाईल्समध्ये दिसते. त्यांच्या रूपांतरणाची व्यवस्था आपल्याला नेहमी लागते. कित्येकदा आपल्या कार्यालयात किंवा घरी संगणकावर त्याची सोय असते. पण कधीतरी प्रवासात वा दौर्‍यावर असताना नेमकं अडलेलं असतं. अशा वेळी जवळच्या कुठल्याही सायबरकॅफेत जायचं आणि झमझार उघडून फाईल्सच्या रूपांतरणाची समस्या सोडवायची ही क्लृप्ती कामी येते.
मुकी छायचित्रे जशी इमेज फाईल्समध्ये असतात तशा चालत्या बोलत्या व्हिडिओ फिल्मस avi, mov, mp4, ram, wmv, vob, mpg, flv, gvi वगैरे प्रकारात असतात. झमझारने हे प्रकारही उपलब्ध केले आहेत.
इमेलला अटॅट होऊन येणार्‍या zip वा rar किंवा cab, tar, lzh प्रकारच्या फाईल्सचं रूपांतरण करण्याचं कामही झमझारवर होऊ शकतं.

वैशिष्ट्ये आणि मर्यादा 

झमझारचं पहिलं वैशिष्ट्य हे की तुम्हाला कोणतही सॉफ्टवेअर यासाठी डाऊनलोड करावं लागत नाही. जे काही करायचं ते थेट इंटरनेटवरच. तिथल्या तिथे. दुसरं म्हणजे, कोणतीही मोफत सेवा इंटरनेटवरून घ्यायची की हमखास रजिस्ट्रेशन नावाचा तापदायक आणि कंटाळवाणा उपचार करणं मोफत असलं तरी सक्तीचं केलेलं असतं. झमझारने तेही टाळलेलं आहे. तुम्हाला कोणतंही रजिस्ट्रेशन न करता ती सेवा मिळते. तुम्ही जी फाईल झमझारकडून रूपांतरित करून घेता ती तुम्हाला तुमच्या ईमेलवर अटॅच करून तात्काळ पाठवली जाते. झमझारच्या ह्या पद्धतीमुळे ती फाईल आपल्याला वेगळी कुठेतरी सेव्ह केली नाही तरी चालते. स्वतः झमझार ती फाईल चोवीस तासपर्यंत बॅकअप करून ठेवतो.
झमझारची सेवा दोन प्रकारची आहे. त्यातली मोफत उपलब्ध सेवा वर सांगितल्याप्रमाणे. यात रूपांतरित करावयाची फाईल १०० एम.बी. आकारापर्यंत असावी लागते. अर्थात तुम्हा-आम्हाला एवढी मर्यादा भरपूर होते, आणि त्याने कधीच अडत नाही. ज्यांना १०० एम. बी. पेक्षा मोठ्या आकाराच्या फाईल्स रूपांतरित करायच्या असतील त्यांना झमझारची पेड सेवा घेता येते. पेड सेवेंतर्गत आणखी काही जादा सेवा झमझार देऊ करतो. फाईलच्या रूपांतरणासाठी आपली फाईल तात्काळ अपलोड होत असली तरी झमझारकडे जाऊन तिला रांगेत उभं रहावं लागतं. आपल्या फाईलच्या रूपांतरणाचं काम पूर्ण करून नवी रूपांतरित फाईल संगणकीय स्वयंचलित पद्धतीने आपल्याला ईमेलने पाठविली जाते हे खरं असलं तरी काही वेळा ह्या कामात काही तास निघून जातात. झमझारने अधिकृतपणे चोवीस तासांची मुदत सांगितली आहे. तेवढी प्रतिक्षा करणं मात्र आपल्याला भाग असतं. पण ही सेवा मोफत व चोख असल्याने जगातले लाखो लोक तेवढी प्रतिक्षा करायला तयार असतात.
झमझारच्या पद्धतीने सेवा देणारी आणखी एक वेबसाईट म्हणजे media-covert.com. मात्र दोन्ही वेबसाईटमध्ये अधिक चांगले व युजर फ्रेंडली डिझाईन आहे ते झमझारचे. १९१५ सालच्या कादंबरीतली संकल्पना एकविसाव्या शतकातल्या नव्या वेब संकल्पनेशी जाऊन कशी मिळते आणि जुळते हे झमझारच्या उदाहरणातून दिसतं. ज्ञानाच्या पेशी स्थल-काल मर्यादा ओलांडून वाहतात त्या ह्या अशा.