IBM अर्थात International Business Machines यंदा आपला शतक महोत्सव साजरा करीत आहे. यात लक्षात घेण्याजोगी बाब ही की कंपनीला यंदा म्हणजे 2011 साली 100 वर्ष होत असली तरी IBM ह्या नावाला अजून शंभर वर्षे झालेली नाहीत. जून 16, 1911 ह्या तारखेला Computing-Tabulating-Recording Company (C-T-R) स्थापन झाली. ह्या कंपनीने पुढे आपलं नाव बदललं आणि ते International Business Machines (IBM) असं केलं. CTR कंपनीची IBM झाली ती तारीख आहे फेब्रुवारी 14, 1924.
म्हणजे, जून 1911 ते फेब्रुवारी 1924 ही एकूण जवळ जवळ पावणेतेरा वर्षे CTR कंपनीची कारकीर्द आहे. पण जून 1911 ते येता जून 2011 ही IBM कंपनीची सलग 100 वर्षे कंपनीने मानणं हे अगदी योग्य आहे याचे कारणथॉमस जे वॅटसन ह्या असामान्य कर्तृत्वाच्या माणसाने 1914 ते 1956 ह्या काळात ही कंपनी खऱ्या अर्थाने घडवली. कंपनी आणि कर्मचारी यांच्यातले संबंध सौहार्दाचे असावेत यासाठी कंपन्या विविध सोयी-सुविधा देतात, कितीतरी सामाजिक उपक्रम करतात हे आपण आज पाहतो. पण आय.बी.एम. चे द्रष्टेपण पहाः 1914 साली आय.बी.एम. ने पहिल्यांदा अपंग कर्मचाऱ्याची नेमणूक केली. थॉमस जे. वॅटसन त्यावेळी जनरल मॅनेजर होते. 1915 साली कंपनीने सर्व कर्मचाऱ्यांसाठी एक घोषणा दिली - THINK.कर्मचाऱ्यांना विचार करा असं सांगणारं व्यवस्थापन वॅटसन यांनी दिलं. 1916 साली कंपनी कर्मचाऱ्यांसाठी एक शिक्षण कार्यक्रम तयार करण्यांत आला. पुढे सातत्याने तो राबविण्यांत आला. त्यातून 1933 साली IBM Schoolhouse ची इमारत उभी राहिली. 1933 साली 40 तासांचा आठवडा कंपनीने जाहीर केला. कारखान्यातील कामगार आणि कचेरीतील कर्मचारी सर्वांनाच तो लागू केला गेला. आज आपण 5 डे वीक झालेला पाहतो. ती दुरदृष्टी वॅटसन यांनी 1933 साली दाखवली होती. 1934 साली कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांचा ग्रुप लाईफ इन्शुरन्स उतरविण्यांत आला होता. त्या काळी कारखान्यातील कामगारांना विशिष्ट कामापुरतं (Piece work) घेण्याची पद्धत असे. वॅटसन यांनी कामगारांना मासिक पगार चालू केला. त्यामुळे कामगारांच्या कुटुंबांना एक आर्थिक स्थैर्य लाभले. 1942 साली अपंगांना प्रशिक्षण आणि नंतर नोकऱ्या देण्यासाठी एक स्वतंत्र कार्यक्रम कंपनीने चालू केला. समान न्याय देण्याच्या दृष्टीकोनातून 1943 साली एक महिला कंपनीची उपाध्यक्षा झाली. 1946 साली कंपनीने पहिल्या कृष्णवर्णीय सेल्समनची नेमणूक केली. कृष्णवर्णीयांना समान हक्क देणारा कायदा नंतर कितीतरी वर्षांनी म्हणजे 1964 साली (Civil Rights Act of 1964) पास झाला. ह्या सर्व प्रागतिक स्वरूपाच्या घटना वॅटसन यांच्या कारकीर्दीतल्या आहेत. थॉमस जे. वॅटसन यांचे 1956 साली निधन झाले. तत्पूर्वी त्यांनी कंपनीचा कारभार आपला मुलगा थॉमस वॅटसन (ज्युनियर) याच्याकडे सोपवला.
कंपनीच्या शतक महोत्सवानिमित्त कंपनीने They were there ह्या लघुपटाची निर्मिती केली आहे. 31 मिनिटांचा हा लघुपट खालील चौकोनातील Play बटणावर क्लीक करून पाहता येईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा