१३ फेब्रु, २०१२

बिलंदर डॉटकॉमची थरारक कहाणी (भाग-4)

कीम श्मिट म्हणजे फार मोठा गुंतवणूकदार अशी प्रतिमा आयती तयार होतीच. कीमनी letsbuyit.com मध्ये 3,75,000 युरोची गुंतवणूक केली. त्याच्या घोषणा मिडियात आल्या. कीमने मग मुलाखती दिल्या. “ही कंपनी मोठा धंदा आणि मोठा नफा मिळवणार असल्याचं” निवेदन कीमने पत्रकारांपुढे केलं. पुढे असंही सांगितलं की लवकरच तो आणखी 5 कोटी युरो letsbuyit.com मध्ये गुंतवणार आहे. बापरे, 5 कोटी युरो? म्हणजे 327 कोटी रूपये? काही जणांच्या मते ही घोषणा केली तेव्हा कीमच्या खिशात म्हणे दहा युरो सुद्धा नव्हते..

कीम डॉटकॉमला वयाच्या 22 व्या वर्षी जर्मन पोलिसांनी टेलीफोनच्या चोरीच्या जोडण्या व तत्संबंधी गुन्ह्यांसाठी अटक केली. वयाच्या नवव्या वाढदिवसाला भेट म्हणून मिळालेला संगणक वापरत तो हॅकर कसा बनला वगैरे आपण गेल्या भागात वाचलं. आता, 1996 नंतरच्या घडामोडींकडे नजर टाकू. 1996 साली अटक झाल्यानंतर पुढे 1998 पर्यंत त्याच्यावर खटला चालला. त्याने जे गुन्हे केलेले आहेत ते वयाच्या विशीच्या आत म्हणजे ‘अंडर एज’ असताना केल्याचं मत कोर्टाने व्यक्त केलं आणि त्याला झालेली दोन वर्षांची शिक्षा रद्द झाली. कीम महाशय सुटले. बाहेर आल्यानंतर कीमसाहेबांना चांगली मागणी आली. डेटा सिक्युरिटीसाठी कीमचा सल्ला लोकांना हवासा वाटू लागला. कंपन्यांचे सर्व्हर, नेटवर्कस वगैरेंच्या सुरक्षिततेसाठी ‘डेटा प्रोटेक्ट’ नावाची कंपनीच मग कीमनी सुरू केली. मुख्य उद्देश अर्थातच कमाई करण्याचा होता. कीमचं नशीबही दांडगं की ‘लुफ्तान्सा’ सारखी जर्मन विमान कंपनी त्याच्या गळाला लागली. कीमने लुफ्तान्साला प्रथम त्यांच्या सिस्टममध्ये घुसखोरी करून दाखवली. ती घुसखोरी पाहून लुफ्तान्साच्या तोंडचं पाणीच पळालं. लुफ्तान्सावाल्यांच्या लक्षात आलं की डेटा प्रोटेक्शनचं काम कीमला दिलं नाही तर आपल्या सिस्टम्सचं काही खरं नाही. कीम डेटा सिक्युरिटी कन्सल्टंट म्हणून खोऱ्याने पैसा ओढू लागला. वयाच्या जेमतेम पंचविशीमध्येच ‘दुनिया झुकती है’ चं प्रॅक्टीकल करून कीमजी मोकळे झाले होते.
विलासीनता हा कीमचा स्थायीभाव. सुंदर स्त्रिया, महागड्या मोटरकार्स, आलिशान फाईव्ह स्टार रहाणी म्हणजे कीम श्मिट हे समीकरण एव्हाना जर्मनीत सर्वतोमुखी झालेलं होतं. आपलं आयुष्य कसं उधळपट्टीचं आहे, कसं विलासीनतेचं आहे ही बाब कीम त्याच्या मुलाखतींमधून मिडियाला मोकळेपणाने सांगे. त्यामुळे कीम श्मिट हा एक प्रचंड श्रीमंत असा हॅकर आणि काँप्युटर एक्सपर्ट आहे असं सगळीकडे पसरलं होतं.
कीमच्या विलासी वृत्तीची साक्ष देणारं हे एक छायाचित्र.
 कीम बरोबर असलेली ती तरूणी म्हणजे प्लेबॉय नियतकालिकातील
 एक मॉडेल जेनिना युसोफियन. खेरीज इतर मित्र मंडळी.
अशा वातावरणात इ.स. 2000 मध्ये त्याने आपली ‘डेटा प्रोटेक्ट’ ही कंपनी हळूच विकायला काढली. ‘डेटा प्रोटेक्ट’ चं 80 टक्के भागभांडवल त्याने ‘टीयुव्ही ऱ्हीनलँड’ ह्या कंपनीला घसघशीत किंमतीला विकलं. आपल्या कंपनीला डेटा सिक्युरिटीचं चांगलं तंत्रज्ञान मिळेल असा भाबडा विश्वास ‘टीयुव्ही ऱ्हीनलँड’ ला वाटत होता. डेटा प्रोटेक्टची उर्वरित 20 टक्के मालकी कीमने आपल्या नव्या कीमव्हेस्टर ह्या कंपनीकडे ठेवली. कीम आता इनव्हेस्टमेंटच्या जगात उलाढाली करू लागला. सुपीक डोक्याच्या शेतात खाजखुजलीची लागवड व्हावी तसाच काहीसा हा प्रकार होता. 
एव्हाना जानेवारी 2001 उजाडला होता. जगात सर्वत्र डॉट कॉम कंपन्यांना घरघर लागायला सुरूवात झाली होती. डॉट कॉम बबल फुटतो आहे अशी चर्चा सुरू होऊन लोक धास्तावले होते. letsbuyit.com नावाचं असंच एक संकेतस्थळ होतं. इंटरनेटवरून खरेदी-विक्री करणारी ती वेबसाईट जवळ जवळ दिवाळखोर बनली होती. शेअर पार भुईसपाट झाला होता. अशा वातावरणात कीमव्हेस्टर कंपनीचं लक्ष तिथे गेलं. कीमव्हेस्टर कंपनी आणि कीम श्मिट म्हणजे फार मोठा गुंतवणूकदार अशी प्रतिमा आयती तयार होतीच. कीमनी letsbuyit.com मध्ये 3,75,000 युरोची गुंतवणूक केली. त्याच्या घोषणा मिडियात आल्या. कीमने मग मुलाखती दिल्या. “ही कंपनी मोठा धंदा आणि मोठा नफा मिळवणार असल्याचं” निवेदन कीमने पत्रकारांपुढे केलं. पुढे असंही सांगितलं की लवकरच तो आणखी 5 कोटी युरो letsbuyit.com मध्ये गुंतवणार आहे. बापरे, 5 कोटी युरो? म्हणजे 327 कोटी रूपये? काही जणांच्या मते ही घोषणा केली तेव्हा कीमच्या खिशात म्हणे दहा युरो सुद्धा नव्हते. रिकामा खिसा हलवायला कीमचं काय जात होतं. कीमच्या घोषणेमुळे letsbuyit.com चा शेअर न भूतो इतका म्हणजे काही शे पटींनी वाढला.
letsbuyit.com चं त्यावेळचं कार्यालय
लोकांनी त्यावर उड्या टाकल्या. शेअरचा भाव शिखरावर जाताच कीमसाहेबांनी आपले शेअर विकून टाकले. यातून 1.5 दशलक्ष डॉलर्स इतका नफा कीमव्हेस्टरला झाला. पुढल्याच आठवड्यात letsbuyit.com ही कंपनी बुडाली आणि दिवाळखोर झाली. कीमचे मात्र असलेले नसलेले सगळे खिसे भरून नोटा बाहेर वाहू लागल्या होत्या. विलासीनतेची नवी शिखरं त्या खिशांना आता खुणावू लागली होती. हजारो गुंतवणूदार मात्र रस्त्यावर आले होते. पुढल्या भागात पाहू कीम डॉटकॉमचं देशाटन आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचा पाठलाग करणारे पोलिस यांचे किस्से. आणि, मुख्य म्हणजे सुपीक डोक्याच्या कीमचे पुढले कारनामे..

1 टिप्पणी: