५ मार्च, २०११

लिबियात इंटरनेट सुविधा बंद

Libya Telecom and Technology चे ltt.ly हे संकेतस्थळ आज 5 मार्च रोजी उपलब्ध नाही.
लिबियाचा हुकूमशहा मुहम्मर गडाफी याच्या विरोधात सुरू झालेले बंड मोडून काढण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून देशातील इंटरनेट यंत्रणा पूर्णपणे ठप्प करण्यांत आल्याच्या बातम्या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांनी दिल्या आहेत. लिबियाला इंटरनेट व टेलिकम्युनिकेशन सेवा पुरविणाऱ्या कंपन्या मुहम्मर गडाफीचा मुलगा महंमद याच्या मालकीच्या आहेत. एकाएकी संपर्क व्यवस्थाच थांबल्याने ईमेल पाठवणे तसेच कोणतीही डेटा ट्रान्सफर करणे ह्या प्रक्रियाच पूर्ण थांबल्या आहेत. 
गेला महिनाभर  लिबियात आंदोलनांनी जोर धरल्यानंतर लिबियातील इंटरनेटचा वापर प्रचंड वाढल्याचे गुगलने प्रसिद्ध केलेल्या आंकडेवारीत दिसून आले होते. लोक फार मोठ्या प्रमाणावर आपल्या डिजिटल कॅमेऱ्यांनी तसेच मोबाईल फोनच्या कॅमेऱ्यांनी आंदोलनाची क्षणचित्रे टिपत होते, व ती युट्युबवर प्रकाशित करीत होते. ह्या कारणाने लिबिया आणि मुहम्मर गडाफी यांच्या विरोधात एक आंतरराष्ट्रीय मत तयार होऊ लागले होते. कदाचित, त्याचा अंदाज आल्यानेच लिबियातील इंटरनेट सेवा पूर्णपणे थांबविण्याचा निर्णय गडाफी कुटुंबाने घेतला असावा असा अंदाज व्यक्त करण्यांत येतो. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा