अगदी डावीकडे सलमान खान, आणि सोबत त्याचे सहकारी. अगदी उजवीकडे असलेला शंतनु, त्याने एम.आय.टी. मधून चार पदव्या घेतल्या आहेत. |
सलमानने गणिताचा एक एक छोटा धडा तयार केला. त्या धड्याचा व्हिडिओ तयार करून तो युट्युबवर टाकायचा आणि नादियाने त्यावरून अभ्यास करायचा असं सुरू झालं. हा व्हिडिओ तयार करण्यासाठी सलमानला कॅमेरा लागत नसे. केवळ आपल्या काँप्युटरचा उपयोग करून तो व्हिडिओ तयार करीत असे. नादियाला जे समजावून सांगायचं ते तो आपल्या संगणकाच्या स्क्रीनवर करून दाखवी. ही संगणकावरची जी कृती असे त्याचे व्हिडिओ रेकॉर्डींग कॅमटासिया स्टुडिओ नावाचे एक सॉफ्टवेअर करीत असे. समजावून सांगताना दुसरीकडे सलमानचा आवाजही रेकॉर्ड होई. एक पद्धतशीर ट्युटोरियल त्यातून तयार होई. कॅमेरा वापरात नसल्याने सलमानचा चेहेरा त्यात येत नसे पण विषय समजण्यासाठी सलमानचा चेहेरा दिसण्याची गरज कुठे होती?
हे व्हिडिओ पाहून नादियाचं गणित खूपच सुधारलं. तिचं यश पाहून तिच्या काही मैत्रिणी, इतर नातेवाईकही पुढे आले. सलमानला हे शिक्षणाचं कार्य भावलं. बघता बघता व्हिडिओ ट्युटोरियल्सची संख्या वाढू लागली. आज इंटरनेटमुळे ही संख्या 3000 व्हिडिओंच्या घरात गेली आहे. सलमानला आपलं उच्च शिक्षण ह्या कामी खूप उपयोगी पडलं. त्याचे विषय पहाः अंकगणित, बीजगणित, भूमिती, कॅलक्युलस, स्टॅटीस्टीक्स, अर्थशास्त्र, जीवशास्त्र, बँकींग, रसायनशास्त्र, खगोलशास्त्र, इतिहास, आय.आय.टी. जेईई परिक्षेची तयारी, पदार्थविज्ञान वगैरे. आता हे सारे विषय शाळा-कॉलेजच्या अभ्यासाचे. विद्यार्थी आणि पालकांना ते हवेहवेसे वाटले नाहीत तरच नवल.
तुम्हालाही सलमानचे हे व्हिडिओ पाहता येतील. विद्यार्थ्यांना ते नक्कीच उपयुक्त वाटतील. ते पूर्णपणे मोफतही आहेत. आपल्याकडे मोफत म्हंटलं की त्यांना थोडं कमी लेखलं जातं. सलमानने एका ट्युटोरियलला काही हजार लावले असते तर त्याला ते अशक्य नव्हतं. पण अमेरिकेत बिल गेटस सारख्या माणसानं आपल्या मुलांना शिकवण्यासाठी सलमानचे हे व्हिडिओ नियमितपणे वापरायचं ठरवलं आहे. मोफत म्हणून अर्थातच नाही, तर प्रचंड उपयोगी म्हणून..
सलमान खानचा हा सारा शैक्षणिक खजिना त्याच्या www.khanacademy.org वर मोफत उपलब्ध आहे. त्याची अनेक वैशिष्ट्ये आहेत. आज हिंदीसह अनेक भाषांमध्ये हे व्हिडिओ खान अकॅडमीने उपलब्ध केले आहेत. त्या भाषा कोणत्या? त्यात मराठी आहे का? सलमान खान आपल्या अनुभवाबद्दल काय म्हणतो. त्याचे पुढले बेत काय आहेत? हा महत्त्वाचा तपशील पाहू - असाही एक सलमान खान (भाग 3 ) मध्ये...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा